शनिवार, १४ मार्च, २०२०

पाचावर धारण: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख १२

भारतीय (निधर्मी) दिनांक सौर ५ पौष १९४२
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २६ डिसेंम्बर २०१९


वर्णं कीर्तिं मतिं लक्ष्मीं स्वास्थ्यमायुश्च विदन्ति।
ब्राह्मे मुहूर्ते संजाग्रच्छि वा पंकज यथा॥

ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणाऱ्या व्यक्तीला सुंदरता, लक्ष्मी, बुद्धी, स्वास्थ्य, आयु इ. गोष्टींची प्राप्ती होते. यामुळे शरीर कमळाप्रमाणे सुंदर होते.

हे वचन पटले तरी ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी दोन तास आधी उठण्यासाठी मन वळणे अवघडच. मात्र पुणे जम्मू सायकल सफर सुरू झाल्यावर मात्र श्विन/फुजीला आपोआपच ब्रह्म मुहूर्तावर जाग येऊ लागली होती. वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की ब्रह्म मुहूर्तातील वातावरण प्रदूषणमुक्त आहे. त्याच वेळी, वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सर्वाधिक (४१ टक्के) असते, जे फुफ्फुसांच्या शुद्धीकरणासाठी महत्वाचे आहे.

आज सगळे सायकलस्वार ब्रह्म मुहूर्तावर केवळ उठले नव्हते, तर हॉटेल राजस्थानच्या प्रांगणात कूच करण्यासाठी सज्जही झाले होते. ब्रह्म मुहूर्ताचे महत्व पटत असले तरी श्विन मात्र त्यावेळी घराबाहेरही पडत नसे त्याचे कारण घराबाहेर पडताक्षणी त्या ब्रह्म मुहूर्तावर जागे असलेले श्वानपथक! भल्या पहाटे रस्त्यातील श्वानपथकाला चांगलाच चेव आलेला असतो. हा अनुभव श्विन/फुजी ला अनेकदा आलेला होता.

गेल्या चारपाच दिवसात मात्र सवयीने जाग आल्याने सगळ्या सायकलस्वारांबरोबर फुजीही ब्रह्ममुहूर्तावर तयार झाली होती (फुजीची निवड झाल्यामुळे श्विन आजही टेम्पोतच राहणार होती). खरंतर आज तर नेहमीपेक्षाही सगळेजण लवकर तयार झाले होते. गेले तीन दिवस महामार्गावरूनच प्रवास सुरू असल्याने फुजीने घंटी लावली नव्हता. आज अहमदाबाद शहरात प्रवेश करायचा असल्याने आजमात्रं घंटी लावणे गरजेचे होते. त्यामुळे फुजीने घंटी लावली. साध्या घंटीच्या आवाजाने रस्त्यातील कोणीही लक्ष देत नसले तरी फुजीने विशिष्ट आवाज काढणारी घंटी लावली होती. ह्या घंटीच्या आवाजाने पुढील माणूस झटकन बाजूला तरी होईल किंवा किमान मागे वळून तरी बघेल. 

दरम्यान सगळे सायकलस्वार कूच करण्यास तयार झाले. इतक्यात फूजीच्या हाताळ्याला घंटी लावल्यामुळे शेजारील विजेरी मात्र सरकली. ती विजेरी गर्रकन गोल फिरली. फुजीने सगळ्यांना थांबण्यास सांगितले. मात्र चार स्वारांनी लक्ष नसल्याने कुच केले. अजून दोन सायकलस्वारांनी मात्र कूच केले नव्हते. त्यांना फुजीने परिस्थितीची कल्पना दिली आणि थांबण्यास सांगितले. मात्र फुजीची विनंती ऐकूनही त्या दोन्ही सायकलस्वारांनी सरळ सरळ दुर्लक्ष करत कूच केले. टेम्पोमध्ये बसून गौतम हे सर्व पाहत होता.

फूजीच्या हाताळ्याला विजेरी लावण्याचा खटाटोप निष्फळ होत होता. २-३ मिनिटे प्रयत्न करूनही ती विजेरी लागली नाही, त्यामुळे उशीर होऊ नये म्हणून विजेरी खिशात टाकून गौतमच्या टेम्पोच्या उजेडात जायचे फुजीने ठरवले. गौतमलाही तशी कल्पना दिली. फुजीने महामार्ग पकडला खरा पण विजेरी नसल्याने फुजीला वेग घेता येईना. शिवाय आज गेल्या तीन दिवसांपेक्षा तब्बल अर्धा तास लवकर प्रवास सुरु झाल्यामुळे आदित्यनारायण इतक्यात उगवणार नव्हता. अर्थातच आता पुढिल सायकलस्वार आणि फुजीमधील अंतर कमी व्ह्यायच्या ऐवजी वाढतच जाणार होते.

महामार्ग मोकळा होता. फुजीची सगळी भिस्त मागून येणाऱ्या गौतमच्या टेम्पोवरच होती. इतक्यात समोर एक उड्डाणपूल दिसला. उड्डाणपूलशेजारूनही एक रस्ता जात होता. गौतमचा टेम्पो फुजीपासून अंतर ठेवून येत होता. त्यामुळे विजेरी नसताना उड्डाणपुलावरून जाताना दुसरे वाहन टेम्पोपुढे येऊन फुजीला धडकण्याची शक्यता होती. दुसरे म्हणजे पुढे गेलेले सगळे सायकलस्वार उड्डाणपुलाऐवजी शेजारील रस्त्यावरून जाणेच पसंत करत. जर ते उड्डाणपूलशेजारील रस्त्यावरून जाऊन फुजीसाठी थांबले असतील तर...ती शक्यताही होतीच.

त्यामुळे फुजीने उड्डाणपुलावरून न जाता शेजारील रस्त्यावरून जाणे पसंत केले. गौतमचा टेम्पो मागोमाग येईल हा विश्वास होताच. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. सर्वत्र सामसूम होती. पुढील सायकलपटूंना लवकर गाठणे आवश्यक होते. रस्त्यावर थोडाफार उजेड होता. त्याच्या आधारावर फुजी जात होती. जवळपास ३००-४०० मीटर अंतर पार झाले तरी बाजूचा उड्डाणपूल अजून उच्चच उंच जात होता. आणि अचानक....
रस्ता संपला होता. पुढे केवळ पायवाट होती आणि डाव्या हाताला कचऱ्याचे ढीग होते. फुजीने मागे वळून पाहिले उड्डाणपूल सुरू झाला ती जागा बरीच दूर होती. गौतमही दिसत नव्हता. खरंतर त्याला शेवटच्या सायकलपटूबरोबर राहणे आवश्यक होते. त्याला तशी सूचना सफर सुरू होण्यापूर्वीच देण्यात आली होती.

आता मागे जाणेही सोपे नव्हते. फुजीने आणखी थोडे पुढे जात अंदाज घ्यायचे ठरवले. फुजी पायउतार होत पुढे जात होती. थोड्याच अंतरावर जवळपास २०-२५ श्वान मुटकुळे करून झोपलेली दिसली. अद्याप अंधाराचेच साम्राज्य होते. आता तिथे थांबणे धोकादायक होतेच, पण परत मागे वळण्याचा प्रयत्न करणेही धोकादायक होते. मागे वळताना एखाद्या श्वानाला संशय आला तरी इतर श्वानही मागे आली असती. फुजीला त्यांच्यापेक्षा अधिक वेगात आता मागेही फिरता येणार नव्हते आणि पुढेही जाता येणार नव्हते. 

हवेत किंचित गारठा असला तरी फुजीला तो जाणवेनासा झाला होता. फुजीने शांतपणे पुढे जात राहण्याचे ठरवले. श्वानपथकाच्या शेजारून जात असताना आवाजही न करता पुढे जावे लागणार होते. कोणत्याही श्वानाकडे नजरही न वळवता फुजीने चाल सुरू ठेवली. कोणत्याही श्वानाच्या  डोळ्यात डोळे घालून पाहिले तर त्या श्वानाला ते आव्हान वाटू शकते आणि जर एखाद्या जरी श्वानाला तसे वाटले असते तर.... ते श्वान तर अंगावर आले असतेच पण इतर २५ श्वानही अंगावर आली असती. सगळे सायकलस्वार एकत्र जाणे आवश्यक असताना फूजीच्या विनंतिकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे फुजी पूर्ण संकटात होती. गौतमनेही फुजीला पुढे जाण्यापासून थांबवण्याऐवजी बहुधा उड्डाणपूल गाठला होता. आता मात्र फुजी पूर्णपणे संकटात होती. जरासा आवाज झाला असता, थोडीशी चूक झाली असती तर फूजीची हाडेही कुणाला सापडली नसती. 

सुदैवाने कोणत्याही श्वानाने फुजीची दखल घेतली नाही. थोड्या वेळात मात्र आता पुढे जाणारी पायवाटही संपली. आता परत त्याच श्वानपथकाच्या समोरून परत जवळपास अर्धा किमी मागे जावे लागणार होते. इतक्यात उड्डाणपुलाखालून उजवीकडे एक पायवाट दिसली, तेथून उड्डाणपुलाला काटकोनात जाणारा रस्ता दिसला. मात्र तो रस्ता काटकोनात जात असल्याने परत महामार्गाला लागणार नव्हता. इतक्यात उड्डाणपुलाला वळसा घालून पुढे जाणारी पायवाट फुजीला दिसली. फुजीने ती पायवाट गाठली. पुढे पुन्हा छोटा रस्ता उड्डाणपुलाच्या डावीकडून जाताना दिसला. त्यासरशी पुन्हा स्वार होत फुजीने टाच मारली. आणखी अर्ध्या पाऊण किमी अंतरावर उड्डाणपूल संपून फुजी जात असलेला रस्ता महामार्गाला लागत होता. तो रस्ता पुन्हा महामार्गाला लागत होता. तिथे उड्डाणपूल उतरून गौतम फुजीची वाट पाहत असलेला दिसला. हा जवळपास दीड किमीचा उड्डाणपूलशेजारील रस्ता पार करून पुन्हा गौतम दिसेपर्यंत मात्र फुजीची पाचावर धारण बसली होती.

1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...