'तू सायकलने ऑफिसला का येतोस?' Cycle2work करणाऱ्या प्रत्येकालाच हा प्रश्न कधी न कधी विचारला गेला असतो. गम्मत म्हणजे ज्यांनी सायकल कधी चालवलेलीही नाही असे लोक तर ह्यात असतातच, पण रोज नियमाने व्यायाम म्हणून सायकल चालवणारेही असतात.
हा प्रश्न विचारणाऱ्याच्या आश्चर्याचेच मला आश्चर्य वाटते. अर्थात ह्यात त्यांचे काही चुकत नसते, कारण त्यांची अवस्था ही तळ्यातल्या बेडकांप्रमाणे असते. तळ्याबाहेरचे जग त्यांनी पहिलेलेच नसते.
काही शंका..नव्हे ठाम मत ह्यांनी बनवलेले असते...
सायकलने ऑफिसला येताना दमायला होत असणार, प्रचंड घाम येत असणार, दिवसभर थकवा जाणवणार, कामात उत्साह राहणार नाही,.....
सायकलने ऑफिसला जायचं तर ऑफिसमध्ये शॉवर, बाथरूम तरी हवं...
एक नव्हे शंभर ठाम 'मतं'!
व्यायाम (Excercise) आणि श्रम (exsertion) यातील फरक लक्षात न येणाऱ्यांना असे प्रश्न पडत असतात. Excercise केल्यावर आपल्याला उत्साह येतो, थकवा जाणवत नाही, मात्र exsertion मूळे थकवा जाणवतो, उत्साह कमी होतो. सायकळवणे (सायकल चालवणे) हा व्यायामाचा (excerscise) प्रकार आहे (exsertion) श्रमाचा नव्हे. मात्र लोकलने, बसने प्रवास करताना व्यायाम नव्हे तर श्रम होत असतात. मग दमायला सायकलने होईल का इतर पर्यायी वाहनाने?
सायकलने ऑफिसला जाताना आपल्याला जे स्वातंत्र्य अनुभवायला मिळते, ते इतर वाहनांनी मिळणे अशक्यच! सगळ्यात पहिले स्वातंत्र्य म्हणजे मानगुटीवरचे घड्याळ खाली उतरवता येते. सायकल2वर्क नसेल तर पहाटे ५.३०-६ ला उठून दीड तास सायकलिंग किंवा इतर व्यायाम करा, घाईघाईने आवरा, नाष्टा कोम्बा आणि पैसे देऊन लोकांच्या शिव्या, धक्के खात आणि इतरांचे घाम आपल्या अंगाला फासून लोकलने जा. सायकलवरून ऑफिसला जाताना जेवढा घाम येतो, तेवढा घाम तर लोकलची वाट पाहत रेल स्टेशनवरच येतो.
परत नंतर रिक्षावाल्यांची मग्रुरी, रिक्षाला पैसे म्हणजे काळ्या पैशाला मदत (इन्कम टॅक्स भरणारा रिक्षावाला मला तरी भेटला नाही), शिवाय लोकलमुळे ऑफिसला उशीर ठरलेलाच! म्हणजे सगळे काही घडाळ्याच्या काट्यावर पण करा आणि तरीही मनस्ताप पदरी पडून घ्या.
शिवाय व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा लागत असूनही घर ते ऑफिस असा प्रवासाचा एकूण वेळ मोजला तर तोही जवळपास cycle2work करताना लागतो तेवढाच!
त्यापेक्षा cycle2work असेल तर आरामात ७ ला उठा, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आधी पोचून घास ३२ वेळा चावून नाष्टा करा. व्यायामासाठी वेगळा वेळ द्यायला नको. ऑफिसला जायच्या वेळातच व्यायामपण. वाटेत फोटोग्राफी करता येते. मी तर एका छोट्या तळ्याकाठी थांबून, फुलपाखरे, पक्षी, झाडे, फुले बघत पण थांबतो. झाडांच्या विविध छटा बघतो... अक्षरशः रोज पिकनिक. म्हणजे सायकल2वर्क करताना आपले घड्याळ आपणच ठरवू शकतो. इथे त्या निर्जीव वस्तूची गुलामी करावी लागत नाही.
इतरांपेक्षा उशिरा उठुनही व्यायामासाठी वेगळा वेळ द्यावा न लागल्याने आपण ऑफिसच्या वेळेच्या एक-दीड तास लवकर पोहोचू शकतो. सकाळी ९ पर्यंत ऑफिसला पोचलो तर घामही फार येत नाही. ऑफिसमध्ये काही शॉवर किंवा बाथरूम नसले तरी टॉयलेट तर असते. इतर लोक ऑफिसला यायच्या आधीच आपण टॉयलेटमध्येही कपडे बदलू शकतो. बेसिनचे पाणी तोंडावर मारून साबणाने तोंड आणि हात धुता येतात. तसेच त्यानंतर ऑफिसमध्ये नाष्टा करून सगळे यायच्या पाऊण एक तासभर आधी कामाला सुरुवात. त्यामुळे इतरांपेक्षा दिवसभर सगळ्यांपेक्षा फ्रेशही राहता येते. शिवाय संध्याकाळी आपण एकटेच डॉट वेळेवर निघु शकतो. त्यामुळे घरी जातानाही फ्रेश. बाकीचे सहकारी लोकलमधून येताना स्वतःबरोबर इतरांचाही घाम अंगाला लावून येतात आणि दिवसभर तसेच त्या घामेजल्या कपड्यात बसतात, शिवाय संध्याकाळी आपण वेळेवर गेल्यावर त्यांची चिडचिड होते ती वेगळीच. त्यामुळे घरी जातानाही ते वैतागलेलेच!
इतर काही सुचले नाही तर ह्या चिंताक्रांत जंतूना शंका असते ऋतूंची- उन्हाळ्यात ह्यांना उन्हाची चिंता, पावसाळ्यात पावसाची तर हिवाळ्यात थंडीची! नशीब अजून चौथा ऋतू नाही.
खरतर तिन्ही ऋतूंमध्ये cycle2work ची वेगळीच मजा असते. उन्हाळ्यात मोठ्ठा दिवस- त्यामुळे लवकर ऑफिसला पोचायचे आणि संध्याकाळी आरामात परत निघायचे, वाटेत हवा तेवढा वेळ थांबायचे- फोटो काढायचे.
पावसाळा तर आणखीच चांगला. वेग थोडा मंदावतो खरे. पण आपण दमल्यावर काय करतो- तोंडावर पाणी मारतो. इथे तर निसर्गच हे काम स्वतःहून आपल्यासाठी करत असतो. श्रावण महिन्यातील निसर्गाची उधळण पाहण्याची संधी आणि वेळ cycle2work करताना रोजच मिळते.
हिवाळ्याच्या दिवसात सायकलिंगची मजा तर काही औरच! अनेक परदेशी पक्षी ह्या दरम्यान आपल्याकडे येतात. त्यांना न्याहाळत, कॅमेराबद्ध करत जाण्यासाठी इतर कोणते वाहन सोयीस्कर आहे.
थोडक्यात लोक वर्षातून, महिन्यातून किंवा फारतर आठवड्यातून एकदा पिकनिकला जातात. पण cycle2work करताना आपण रोजच पिकनिक करत असतो.
काळा घोड्यावरून चाललेला पाववाला असो की BKC तील वातानुकूलित केबिनमध्ये बसणारा उच्चशिक्षित असो.... cycle2work करताना सगळ्यांनाच समान वागणूक मिळते. इथे फर्स्ट क्लास-सेकंड क्लास, लेडीज डबा- जेन्ट्स डबा असले भेदभाव नाही. कोणी बसायचं, कोणी उभं राहून प्रवास करायचा, कोणी खिडकीत बसायचं ह्याची मारामारी नाही. धक्काबुक्की नाही नी कोणाचे शिव्याशाप नाही. सगळ्यांना बसायची, वारा अंगावर घ्यायची समान संधी. Cycle2work करतानाची समानता रेल्वे, बस मध्ये कशी मिळणार?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे रस्त्यात भेटणारी माणसे. रस्त्यावरील मजुरापासून आलिशान चारचाकीतील माणूस ह्या सगळ्यांनाच आपल्याबद्दल उत्सुकता असते. सारख्याच आपलेपणाने ते आपल्याशी वागतात, आपल्याशी बोलायला संधी शोधत असतात. हे विश्वबंधुत्व ऑफिसला सायकलने जातानाच मिळू शकते.
म्हणून तर मी नेहमी म्हणतो स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व देणारे सायकल हे एकमेव वाहन आहे.


शशांकजी,
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिले आहे. लेखनात सर्व मुद्दे घेतल्यामुळे कोणालाही कारणं द्यायला वाव ठेवला नाही. फ्रेश हवेमुळे तुमच्या शरीराची ऑक्सिजन लेव्हल पण छान राहिल्याने दिवसभर फ्रेश राहता
सतीश साठे
धन्यवाद. Cycle2work हा विषय माझ्यासाठी खुप जिव्हाळ्याचा आहे
हटवाशशांक,
उत्तर द्याहटवासायकल2वर्क यावर तू अधिकारवाणीने लोहू शकतोस, कारण तू ते करतोस. आशा प्रकारच्या सायकलिंग मध्ये कसलेही भेदाभेद नसतात हा नवीन व मानवतावादी मुद्दा तू लक्षात आणून दिला आहेस हे मस्तच! शिवाय करणारा करत राहतो, व ज्यांना असं सायकलिंग जमत नाही ते सबबी शोधत राहतात हे लक्षात येतं. तुझ्या या लिखाणाने अजून काही जण सायकल2वर्क साठी तयार होतील असे वाटते, तुलाही पुढील सायकल2वर्क साठी सदिच्छा.
-- धनंजय मदन
धन्यवाद, तुमच्या प्रोत्साहनामुळे मला सायकलवायला आणि लिहायलाही नेहमी उत्साह वाटतो
हटवासुंदर लेख शशांक,
उत्तर द्याहटवासायकलने ऑफ़िसला जाण्यामध्ये येणार्या सर्व अडचणी या खरंतर अडचणी नसून, आपण करून घेतलेल्या समजूती आहेत असे हे वाचल्यावर पटते.
मुंबईत जर कोणी रोज बाराही महीने दिडदोन तास सायकल चालवत ऑफ़िसला जात असेल, तर जगात कुठेही ते शक्य आहे.
अनेकांना यातुन प्रेरणा मिळेल.
-- मंदार पाध्ये.
खरोखरच, मंदार! मुंबई आणि जवळच्या उपनगरात तर आपण अगदी सुरक्षित असतो. केव्हाही आणि कुठेही मदत मिळू शकते. लोक फक्त समाजाच्या लाजेखातर टाळाटाळ करतात, पण जर हॉलंडचे पंतप्रधान, भारतातील खासदार सुद्धा सायकलने ऑफिसला जातात तर आपण कसली आणि का लाज बाळगायची? आपण जिथे राहतो तेथील हवामानाला आपण ऍडजस्ट झालेलोच असतो तर मग हवामानाची तर काय अडचण?
हटवापावसाळ्यात पाणी साठलेले असताना चारचाकी, दुचाकी बंद पडतात पण सायकल तेथूनही जाते
मस्त लेख शशांक सर,
उत्तर द्याहटवालेख वाचून फार मस्त वाटले कारण आपण सांगितलेले अनुभव कमी अधिक प्रमाणात मला देखील येतात... तसे पाहता माझ्या ऑफिस चे अंतर माहीम ते वडाळा 4 ते 5 किमी फक्त. पण अनेकदा निघताना दिसलेली कार पुढे ऑफिस जवळ असताना माझ्या मागेपुढे च असते कारण ट्राफिक मुळे त्यांना लवकर जाता येत नाही पण मी आपला मजेत जागा काढत सभोवतालची मज्जा घेत पोहोचतो
तुमच्या अनुभवा तून जर कोणी सुरवात करत असेल तर या हून सुखद काय असावे.
धन्यावाद
विजय बेलाडकर
खरच आहे. ती प्रदूषणकारी वाहने कित्येकदा १०-१५ मिनिटे एकाच जागी उभी असतात. एवढ्या वेळात आपण ३-४ किमी नक्की पुढे जाऊ शकतो
हटवा