शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

साठा उत्तराची कहाणी

रविवार दिनांक २९ अग्रहायण १९४२
अशास्त्रीय, युरोपियन ख्रिस्ती दिनांक २० डिसेंबर २०२०


आज पहाटे जरा लवकरच जाग आली. उठल्याबरोबर मी फुजीकडे गेलो. तिचे टायर फुरफुरत होते. आज सुट्टी असल्यामुळे थोडे फार लांब जायला मिळणार याची तिला खात्री होती. मी पेडल रिपब्लिक समूहावर पाहिले. त्यातील सदस्य आज पिसे डॅम येथे जाणार होते. मला आज 175 किलोमीटर चे लक्ष्य करायचे होते. पेडल रिपब्लिक या गटातील सदस्यांबरोबर पिसे डॅम ला जाऊन पुढे नाशिकच्या दिशेने जाऊन आजचे लक्ष्य लक्ष पार करायचे मी ठरवले. नेहमीप्रमाणेच घरून निघेपर्यंत मला उशीर झाला होता. पेडल रिपब्लिकचे सदस्‍य त्यांच्या नियोजित वेळेनुसार पुढे गेले होते. रविराज त्यांची सहस्त्र किरणे धरित्रीवर पसरवू लागल्यानंतर फुजी बाहेर निघाली. गेल्या रविवारी द्विशतकी धाव घेतल्यावर श्विनला आरामाची आणि शुश्रूषेची गरज होती. त्यामुळे सध्या फुजीचेच राज्य होते. फुजीवर स्वार होऊन मी पिसे डॅमला पोचलो तेव्हा कल्याणहुन आलेले चार-पाच सायकलपटू दिसले. त्यांच्याशी ओळख करत गप्पागोष्टी करत असताना माझी नजर मात्र पेडल रिपब्लिकच्या सदस्यांना शोधत होती. पेडल रिपब्लिक समूहातील कोणीही सदस्य तिथे दिसत नव्हता. मग मी डॉक्टर राहुल घाटवळ यांना भ्रमणध्वनी लावला तेव्हा कळले की ते आदल्या रात्री 175 किलोमीटर सायकल चालवून घरी सकाळीच पोचले होते. हे रात्रीचे सायकलवणे त्यांना पुरणार नाही असे वाटल्याने, लगेच पिसे डॅम ला ही जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र वाटेत रहदारीमुळे त्यांचा एक दीड तास वाढला. त्यामुळे त्यांनी पिसे डॅम चा बेत रद्द केला. 

घाटवळ पिसे डॅम ला आले नसल्याचे कळताच मी प्रसादला फोन केला. त्याने सांगितले की सगळेजण तिथे नदीपाशी गेले आहेत. त्यामुळे मी कल्याणमधील आलेल्या सदस्यांबरोबर बोलत असतानाच सुमित मोकल तिथे आला त्यानेही प्रसादला फोन केला होता सुमितला नदीकडे जायचा रस्ता माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.  त्यामुळे मी त्याच्या पाठोपाठ जाऊ लागलो. कल्याणचे सायकलपटू सुद्धा आमच्या बरोबरच येत होते. रस्ता बराचसा खराब होता. आम्हाला पेडल रिपब्लिकचे सदस्य कोठेच दिसेना. थोड्या वेळातच प्रसादचा फोन आला. तेव्हा समजले कि आम्ही रस्ता चुकलो होतो आणि थोडे फार पुढे गेलो होतो.

 पेडल रिपब्लिक च्या सदस्यांची भेट झाल्यावर रमेश काकांचे  अभिनंदन केले. २१ दिवस सायकलमोहिमेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. सगळेजण चहासाठी थांबले. चहा आणि वडापाव खाऊन झाल्यावर सगळ्यांचा जठराग्नी आणखीच जागृत झाला.  लगेचच काहीजणांनी मिसळची फरमाईश केली. 




मला 175 किलोमीटरचे लक्ष्य डोळ्यासमोर दिसू लागले. त्यामुळे अधिक वेळ न दवडता मी सगळ्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. सावर्डे नाक्याला उजवे वळण घेऊन पडघा टोलनाका गाठला. आता ठाणे नाशिक महामार्ग सुरू झाला होता. त्यामुळे आता वेगात जाता येईल अशी खात्री होती. मात्र लगेच टोलनाक्याला वाहनांची मोठी रांग लागलेली दिसली. फुजी एमटीबी श्रेणीतली नसली तरी बाजूच्या कच्च्या रस्त्यावरून पुढे जाणे भाग होते. फुजीने वाहनांच्या रांगेतून वाट काढत सुटका करून घेतली. मग मात्र फुजीला वेग मिळाला. महामार्ग असल्यामुळे रस्ता चांगला होता.

थोडे पुढे जाताच काही अंतरावर एक संत्रे वाला दिसला मोठ-मोठी रसाळ संत्री पाहून मोह पडला. संत्रे वाल्याकडून एक किलो संत्री घेऊन पाठीवरील सॅकचे वजन वाढवून घेतले. शहापूर मागे टाकून फुजी पुढे निघाली तेव्हा घड्याळ बाबा दहा वाजल्याचे सांगत होते. भुकेची जाणीव होऊ लागली होती. इतक्यातच महामार्गाच्या मध्यभागी एक छोटेसे देऊळ दिसले. जवळ जाऊन पाहताच त्या देवळाभोवतीची स्वच्छता नजरेस आली. 






सभामंडम नव्हताच, फक्त गाभारा आणि सभोवती लक्ख झाडलेले छोटेसे आवार. जवळपास कोणीच नव्हते. फुजीला आवारात उभे करून मी मी पाठीवरील सॅकमधून नाश्त्याचा डबा काढला. नाश्ता करत असताना त्या सुबक मंदिराभोवतीचे स्वच्छ आवार पाहून मन प्रसन्न होत होते. तेथून पाय निघत नव्हता. मात्र पुढील लक्ष्याची जाणीव तिथे फार वेळ थांबू देत नव्हती. मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. 

आटगाव- खर्डी पार करून आता कसारा जवळ येऊ लागला होता.



 Strava अजून पुढे जायला सांगत होता. कसारा मागे टाकून घाट सुरू झाला. फुजीला घाट चढण्यात मजा वाटू लागली.  थोडे पुढे जाताच इगतपुरी चे फलक दिसू लागले. मध्यान्ह उलटली होती. Stravaने 90 किलोमीटर अंतर पार करण्याचे सूचित केले की परत फिरायचे असे ठरवून फुजी घाट चढू लागली.



 घाटातील चढ फार तीव्रतेचा नसल्याने फुजी आरामात पुढे जात होती.  इगतपुरी साधारण 12 किलोमीटर लांब राहिले तेव्हा मात्र strava ने परत फिरायची परवानगी दिली. खरतर घाट पूर्ण चढुन इगतपुरी गाठण्याचा मोह होत होता. मात्र येथून परत घरी पोचेपर्यंत आजचे लक्ष्य पूर्ण होणार होते. त्यामुळे अधिक हव्यास न धरता मी फुजीचे हँडल वळवलेे.   
परत फिरल्याबरोबर घाट उतार सुरू झाला. त्यामुळे फुजीला लगेचच वेग मिळाला. फुजीने परतीच्या मार्गात कसारा पार केले. नाष्टा करून अडीच तास झाले असावेत. पुन्हा भुकेची जाणीव होत होती. ओठही कोरडे पडत होते. मात्र सावली मिळेल अशी जागा दिसेना. समोर एक चढ दिसत होता. फुजीने आस्ते कदम चाल केली. चढ पार होताच रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर दिसले. 






हेही मंदिर लहानच होते. दोन तीन पायऱ्या चढून गाभाऱ्यात प्रवेश करता येत होता. त्या पायऱ्यांवर एक म्हातारी बसली होती. मंदिराशेजारी पिण्याच्या पाण्याची टाकी होती. तहान आणि भूक दोन्हीची मागणी पूर्ण होणार याचा अंदाज आल्याने मी फुजीला थांबवले. मी पिण्याच्या पाण्याच्या टाकीकडे जाऊ लागलो तोच मागून म्हातारीचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला. 
ती काय म्हणते आहे काहीच कळत नव्हते. मी टाकीचा नळ सोडून बघितले तर त्याला पाणी येत नव्हते. माझ्यापाठोपाठ म्हातारी तिथे आली आणि नळाला पाणी नसल्याचे सांगू लागली. मी शांतपणे मंदिराच्या पायर्‍यांकडे वळलो आणि म्हातारी मंदिराच्या मागील बाजूस निघून गेली. 

तेथील पायर्‍यांवर बसून मी संत्रे बाहेर काढले. संत्रे सोलत असतानाच मंंदिरामागून काही काट्याकुटाक्या गोळा करून म्हातारी पुन्हा पायऱ्यांवर येऊन बसली. त्याबरोबर मी म्हातारीलाही संत्र घेणार का असे विचारले. ऐकले न ऐकल्यासारखे करून म्हातारी समोरील आवार बसल्या बसल्या सावरू लागली. माझे संत्रे खाणे मी सुरू ठेवले. थोड्या वेळात म्हातारी पुन्हा पायऱ्यांवर बसली. मी पुन्हा संत्र घेणार का विचारताच मात्र म्हातारीने संत्र घेतले. म्हातारी खूष झाली होती. लगेचच माझी चौकशी करून तिने तिच्या घरच्या कहाण्या सांगायला सुरुवात केली. घरी दोन मुले आहेत मात्र ते मंदिराकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मलाच मंदिराकडे पहावे लागते असे ती सांगत होती. कसारा जवळच्या तुकारामनगरहून ती मंदिरापाशी येते, स्वच्छता ठेवते आणि देवळाभोवती राखण करत दिवसभर थांबते. तिचा त्रागा सुरूच होता. सुना आणि मुले काहीच काम करत नाहीत, लग्न झाल्यावर मुले सुनांच्या नादी लागली अशी कर्मकहाणी सांगू लागली. म्हातारी चांगलीच बोलण्याच्या मूडमध्ये आली होती. 

इतक्यात एक टेम्पो तिथे आला. बसल्या जागेवरूनच त्यातील इसमाने एक नाणे मंदिरासमोर फेकले. त्याबरोबर म्हातारी त्या टेम्पोमधील इसमावर तोंडसुख घेऊ लागली. बहुधा तिला सांगायचं असावं, 'आज भी मै फेके हुये पैसे नही उठाती'.
टेम्पो मात्र केव्हांच पसार झाला होता. म्हातारी काय बोलत होती काहीच कळत नव्हते. टेम्पो लांब गेल्याचे पाहताच ती पुन्हा तिच्या मुला सुनांच्या मुद्द्याकडे वळली.

आता मात्र काढता पाय घेणे गरजेचे वाटू लागले. माझे संत्र खाणेही संपले होते. म्हातारीचा निरोप घेऊन मी मी तेथून निघालो. रस्ता उताराचाच होता. त्यामुळे पुन्हा लगेच वेग मिळाला. सूर्यनारायण डोक्यावर आल्यामुळे पुन्हा पुन्हा तहान मात्र लागू लागली होती. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित मी पुढे जात होतो. पुन्हा एकदा खर्डी मागे टाकले. दीड-दोन चा सुमार झाला होता. ऊन चांगलेच लागू लागले. थोडावेळ आराम करून मग पुढे जावे, असा विचार मनात येऊ लागला. सकाळी ज्या मंदिरात नाष्टा केला होता, त्या मंदिराच्या आवारात थोडावेळ आडवे पडता येईल असा विचार करून मी पुढे सरकू लागलो. मात्र आता ओठ सारखे सुकू लागले. थोड्या वेळाने पाणी पीत मी जात असताना रस्त्याच्या उजव्या बाजूला नीरा केंद्र दिसले. त्याबरोबर वेगात असलेल्या फुजिला थांबवून मी रस्ता ओलांडला. दोन निरा घशावाटे उतरल्यावर बरे वाटले. मंदिरापाशी जाऊन पुन्हा निरा प्यावी असा विचार करून दोन निरा बांधूनही घेतल्या. फुजी पुन्हा पुढे जाऊ लागली. आडगाव पार करून गेल्यावर थोड्या अंतरावर रस्त्याच्या मधोमध असलेले मंदिर पुन्हा दिसले. 



त्याबरोबर मी मंदिराकडे गेलो. माझ्याआधीच एक माणूस पहुडलेला दिसला. फुजिला बाजूला उभे करून मीदेखील आडवा झालो. हेल्मेट डोक्याखाली घेतले. पाचेक मिनिटे पाठीला आराम मिळाल्यावर मी पुन्हा ताजातवाना झालो. सॅकमधील संत्रे काढून सोलत असतानाच तिथे असलेला इसम जागा झाला. आमची नजरानजर होताच त्याने खुणेनेच प्यायला पाणी हवे असल्याचे सांगितले. मी माझ्या जवळील बाटली देऊ केली. पाणी पिऊन झाल्यावर तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. मी माझे संत्रे खाणे सुरूच ठेवले. थोड्या वेळात तो बोलू लागला. तो भिवंडीपासून चालत आला होता. मला आश्चर्यच वाटले. तो पदयात्रा करत शिर्डीला जाणाऱ्या वाटसरूपैकी वाटत नव्हता. त्याला तो कुठे जाणार असे विचारताच नाशिकला जाणार असल्याचे त्याने सांगितले. पाठोपाठ भाऊ येत असून ती त्याची वाट पाहत आहे असे तो म्हणाला. माझ्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून त्याने सांगितले तो घरून भांडून निघाला होता. त्याचा भाऊ स्वयंचलित दुचाकी घेऊन येत होता. त्याचीच वाट पहात तो मंदीरापाशी थांबला होता. त्याच्याजवळ एक छोटी पिशवी दिसत होती. घरून भांडून निघाल्यामुळे इतक्या वेळात त्याने काही खाल्ले असेल का असा विचार मनात येऊ लागला. माझ्या जवळील नीरा त्याला देण्याचा विचार करत असतानाच त्याने एक बिडी बाहेर काढुन शिलगावली. त्याचे मंदिराच्या आवारात बिडी  ओढणे मला अजिबातच आवडले नव्हते. मात्र देव सर्वत्रच आहे या भूमिकेतून त्याने कोठेही बीडी ओढली तरी ती मंदिरात ओढल्यासारखे होते. दोन झुरके मारून झाल्यावर तो पुढे बोलू लागला त्याने सांगितले की त्याला चिलीम ओढण्याचाही छंद होता. हे ऐकताच त्याला निरा न देण्याचा माझा निर्णय मला अधिकच पटला. काहीही न बोलता मी आणखी एक संत्रे काढून ते फस्त केले. 

दोन छोट्या मंदिरात भेटलेल्या दोन व्यक्ती. जवळपास एकाच क्षेत्रात राहणाऱ्या, साधारण एकाच आर्थिक स्थितीत असलेल्या. मात्र दोघांमध्ये किती फरक होता. म्हातारी बडबडी होती, त्रासिक होती मात्र प्रेमळ होती. तर हा स्वभावाने शांत, मात्र नाना छंदाच्या नादी लागलेला. मात्र एक होते दोघांनाही भूक होती मन मोकळे करण्याची! त्रयस्थासमोर लोक किती सहजपणे मोकळी होतात! आपल्या माणसांना गमावण्याची भीती त्रयस्थांबरोबर बोलताना नसते. ह्यामुळेच तसे घडत असावे. (आपल्या माणसांना जपण्यासाठी त्यांच्याशी खोटं वागणं योग्य की वाईटपणा घेऊन का होईना त्यांच्याशी खरं वागणं योग्य?).

असो, दोन संत्री पोटात जाताच मी चांगलाच ताजातवाना झालो. त्यासरशी पुन्हा फुजीवर स्वार होऊन मी शहापूरच्या दिशेने निघालो. शहापूर पार झाले न झाले तोच तीन-चार सायकलस्वार डाव्या बाजूला दिसले. त्यांच्या तोंडावर मास्क असल्यामुळे आणि फुजी थोडी पुढे असल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. मात्र त्यातील एकाने एस ओ एस (saveoursahyadri मोहिमेचा) चा टी-शर्ट घातलेला होता. त्यामुळे तो ओळखीचा असावा असे वाटले. इतक्यात मागचा सायकल स्वार माझ्याशी बोलत जवळ येऊ लागला. आवाज ऐकताच तो विलास असल्याचे लक्षात आले. आता उरलेले अंतर आरामात आणि मजेत पार होणार याची खात्री वाटली. विलास इतर सायकलपटूंशी ओळख करून देत असतानाच  सायकलचे हँडल एकदम खाली गेले. त्यामुळे मी थांबलो. विलास आणि त्याचे मित्र पुढे निघाले. मला प्रथम काही कळलेच नाही. त्यामुळे मी विलासला फोन लावला. त्याला माझा कॉल कळला नाही. मी हँडलकडे पाहिले तेव्हा लक्षात आले की हँडलचा एक स्क्रू सैल झाला होता.

तो घट्ट करून मी जाऊ लागलो. तोपर्यंत विलास आणि त्याचे सहकारी पुढे गेले होते. मी पुम्हा 'एकला चालो रे' चा मंत्र जपत पुढे जाऊ लागलो. पडघा गाव जवळ आले तोच विलासचा फोन आला. त्याने सांगितले की तो आणि त्याचे मित्र पडघा टोल नाकापाशी माझी वाट पाहत थांबले आहेत.  मीही पडघ्यापर्यंत पोहोचलो होतोच. त्याला तसे सांगून पाचेक मिनिटात मी पडघा टोलपाशी त्यांना भेटलो. एका चहास्टॉलपाशी ते माझी वाट पाहत होते. चहाबिस्किटे समोर येत त्यांचा फडशा पाडत असताना आमच्या गप्पा रंगत होत्या. विलास, सुशांत करंदीकर, राम ह्यांच्याचबरोबर आणखी एक सायकल स्वार होता. सुशांत आज 97 वा किल्ला सायकलवरून भेट देऊन परतत होत होता. तर त्याच्याबरोबर गेलेल्या विलासची ही माहुली गडावरील आजची एकशे अकरावी भेट होती. पडघा नाक्यावरून आम्ही सावडेमार्गे कल्याणकडे जाण्याचे ठरवले. सुशांत मी आणि विलास आमच्या गप्पा रंगत होत्या. सुशांतने सायकलवरून मनाली लेह खार्दुंगला केले होतेच. शिवाय तीन वेळा स्वयंचलित दुचाकीनेही त्याने मनाली खार्दुंग ला केले होते. तो स्वतः अशा सहली आयोजितही करतो असल्याचे समजले. 




थोड्या वेळातच आधारवाडी येथे पोहोचत मी आणि विलासने इतरांचा निरोप घेतला. मी गणित मांडले तर माझे ध्येय गाठायला घरी जाईपर्यंत २-३ किमी कमी पडतील असे वाटत होते. हे समजताच विलास मला घेऊन थोड्या लांबच्या मार्गाने घरी गेला जेणेकरून मला माझे लक्ष्य पूर्ण करता यावे. 

डोंबिवलीमध्ये शिरताना 21days camapign मधील दुसरा विजेता प्रवीण दाभाडेच्या दुकानात शिरलो. तो आणि त्याची सायकलबरोबर मला आणि फुजीला फोटो काढायचा होता. मात्र त्याची सायकल त्याने दुरुस्तीला पाठवली होती. पण माझी इच्छा समजताच त्याने भ्रमणध्वनी करून त्याची सायकल ज्याच्याबरोबर दुरुस्तीला पाठवली होती त्याला आहे त्या स्थितीत परत आणायला सांगितली. दरम्यान माझे १७५ किमीचे लक्ष्य पूर्ण झाले. त्याचदरम्यान प्रवीणने बोलता बोलता आणखी दोघांना सायकल चालवायला प्रवृत्त केले. 




ध्येय पूर्ण झाल्यामुळे आनंद साजरा करायला मी आणि प्रवीण चहा पिण्यासाठी गेलो. हे ठिकाण डॉ राहुल घाटवळांनी दाखवलेले होते.




चहा घेत असताना तिथे आणखी तीन सायकलस्वार आले. तिघेही मूळ चेंबूरकर पण आता डोंबिवलीकर झालेले. ते होते राजेश कयाळ आणि त्याचे दोन मित्र. तिघांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जम बसवला होता. बालपणाची त्यांची मैत्री अजूनही घट्ट होतीच... कदाचित सायकलप्रेम ही त्यांची सामाईक आवडही त्याला कारणीभूत असावी. प्रवीण आणि मी त्या तिघांबरोबर गप्पांमध्ये इतके रंगून गेलो की जणू आम्हीही त्यांचे बालपणीचे मित्रच होतो... अर्थात समव्यसनी जमले की वेळेचे भान ते काय राहणार?




एकंदरीत आजचा दिवस ह्या भेटींमुळे संस्मरणीय तर झाला होताच शिवाय ह्या भेटींमुळेच आजची सायकलसफरही सुफल संपूर्ण झाली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...