गेल्या रविवारी अग्रिमा नायर माझ्या घरी राहायला आली होती. आई वडील दोघेही आर्मी मध्ये! एकुलती एक मुलगी. १७ व्या वर्षापर्यंत आई वडील ह्यांच्या बरोबर वेगवेगळ्या शहरात राहण्यात गेले.
मग मात्र तिने आई वडिलांबरोबर फिरणे थांबवले....
म्हणजे...
आता.. ती एकटीच निरनिराळ्या शहरात राहू (भटकू) लागली. कोणत्याही शहरात सलग दोन - तीन महिन्यांपेक्षा जास्त मुक्काम नाही. ही फिरस्ती चालू असताना शिक्षण काय आणि कसे घेणार? अग्रिमाने बायो टेक मध्ये मास्टर्स केले, नुरो सायन्स मध्ये PhD केली. हे सुरू असतानाही भटकेगिरी सुरूच!
यादरम्यान थोडा स्ट्रेस जाणवायला लागल्यावर तिचे लक्ष योगाभ्यासाकडे वळले. मग काय योग थेरपी मध्ये थेट मास्टर्स पूर्ण केले.
आता तरी स्थिरावायचे... हिने Anatomy आणि आयुर्वेद देखील सोडले नाही. त्यांच्याही अभ्यास केला. गेल्या वर्षापर्यंत म्हणजे...वयाच्या २९ व्या वर्षापर्यंत शिक्षण सुरू होते.
ह्या सगळ्या प्रवासादरम्यान खरतर भ्रमंतीदरम्यान अनेक बौद्ध भिक्खू तिचे मित्र झाले. ही केरळमध्ये असताना एका बौद्ध भिक्खूने तिला भेटायला बोलावले. तो होता लडाखला! मैत्री केली आहे...तर निभावयालही पाहिजेच. लगेच पोचायचे तर विमानाने जायला हवे..
पण हिच्या डोक्यात विचार आला ..चालतच जावे... गेली पाचेक वर्ष रोज ५-६ तास चालत होतीच. खरतर मनात विचार आल्यावर ही निघालीही असती....पण मित्राला भेटायची ओढ असल्याने वेळही वाचवायचा होता. मग तिने लगेचच पुढच्या पर्यायाचा विचार केला.. सायकल.. इकोफ्रेंडली पण चालण्या/धावण्यापेक्षा वेळ वाचवणारा पर्याय. तिने लडाखपर्यंतचा प्रवास करताना वाटेतील प्रत्येक मुक्कामी योगप्रसार करण्याचेही उद्दिष्ट्य ठरवले.
८ व्या, ९ व्या इयत्तेत असताना आईची सायकल चालवलेली होती. तीही आईबरोबर भांडून आई जेव्हा सायकल देईल तेव्हा. म्हणजे साधारण १५ व्या वर्षानंतर सायकल न चालवणारी आग्रिमा आता वयाच्या ३० व्या वर्षी प्रथमच सायकल चालवणार होती... तेही केरळ ते लडाख! तेसुद्धा एकटी! आई वडिलांच्या संमतीच काय? अग्रिमाला जेव्हा मी विचारलं, "तुझ्या आई वडिलांनी तुला संमती कशी दिली". तर ती म्हणाली,"त्यांच्याकडे दोनच पर्याय होते १) मला विरोध करायचा किंवा २) माझ्या(निर्णयाच्या) बरोबर राहायचे. माझा निर्णय बदलणार नाही हे त्यांना माहीतच होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला."
अरेच्चा पण सायकल कुठे होती? सायकलशिवाय हे नुसतेच मनातले मांडे झाले होते.
पण हिची इच्छा लक्षात घेताच तिच्या एका भावाने तिला सायकल भेट दिली. लगेचच तिने सायकलचे नामकरण केले...' चक्रिका '. अग्रिमा म्हणते चक्रिका म्हणजे 'दैवी चक्र धारण करणारी दुर्गा'. खरोखरंच अग्रिमाला साथ करायला दुर्गाच हवी!
सायकल हातात पडली न पडली तोच हिने कूच केले.
सायकल विकत घेतल्यापासून २४ तासाच्या आत अग्रिमाने कोची सोडले देखील! मूहूर्त देखील छान साधला गेला .. जागतिक योग दिन! सायकल प्रवासाचे उद्दिष्ट्य योगप्रसार हे होते आणि सुरुवात जागतिक योग दिनी... आणखी कोणता चांगला मुहूर्त सापडणार?
गेल्या १५ वर्षात सायकल चालवलेलीही नाही. त्यात एकदम गियरवाली टुरिंग सायकल हातात. गियर बदलणे दूर, पेडल मारण्याचेच ज्ञान दोन तीन मिनिटातच उघडे पडले. अग्रिमाने सुरुवात केली अन् पुढे लगेचच एक गतिरोधक आला. हिचे एक पेडल वर आणि दुसरे खाली.... पेडल गतिरोधकाला मस्त घासले गेले. सायकलवर हिचा संसार होताच. तो भार सहन करत सायकलवर बसून पहिल्या काही मिनिटातच पहिला धडा शिकायला मिळाला... गतिरोधक आल्यावर सायकलचे दोन पेडल जमिनीपासून समान अंतरावर असावेत.
पेडलचे झाले...पण गियरचे काय. बरं सोबतीला कोणी नाहीच, त्यामुळे वाटेत त्याबद्दलचे मार्गदर्शनही नाही. मग काय थेट on job training! पेडल मारता मारता हिने स्वयमशिक्षणच घेतले. १५ वर्षानंतर प्रथम सायकल हातात... तीही हलक्या वजनाची नव्हे तर बऱ्यापैकी वजन असलेली टुरिंग बाईक...सोबत स्वतःचे आणि सायकलचे सामान असे सामानाचेच जवळपास १५ किलो वजन.
हे सगळे वजन झेलत अग्रिमाने पहिल्याच दिवशी ३०-३५ किमी अंतर कापले. दुसऱ्या दिवशी तर चक्क सत्तरी गाठत पहिल्या दोन दिवसात शतक पूर्ण केले. प्रवासात एका सायकलदुरुस्ती दुकानात शिरून पंक्चर काढणेही शिकून घेतले.
आषाढ महिना सुरू असल्याने आकाशातून धरणीकडे कोसळणारा पाऊस उभा झोडपत होताच. त्यातच तळकोकणात असताना समुद्राकडून मुख्य भुमिकडे जाणारा वारा आडवा झोडपून काढत होता. पाऊस वाऱ्याच्या ह्या उभ्या आडव्या तडाख्यामुळे एके दिवशी तिला संपूर्ण दिवसभर सायकलवर बसताच आले नाही. दिवसभर पावसाळी कपडे घालून, डोळ्यांवर येणारे थेंब झेलत चक्रिका आणि सामानाचे ओझे वाहवत चालत राहावे लागले.
केरळ, कर्नाटक, गोवा पार करत तिच्या प्रवासाच्या ४२ व्या दिवशी ती डोंबिवलीला माझ्या घरी आली. तेव्हाही तिचा उत्साह ओसंडून वाहत होता. आषाढाने झोडपले तरी श्रावणातील उनपावसाचा खेळ पाहत अग्रिमा खूप आनंदली होती. काल प्रवासाच्या ४४ व्या दिवशी तिने महाराष्ट्र पार करत थेट गुजरात ह्या पाचव्या राज्यात प्रवेशही केला आहे. श्रावणातील हिरवा निसर्ग, वातावरण तिचा प्रवास नक्कीच सुखकर करेल आणि ती लडाखदेखील सहजपणे गाठेल.. ती त्यानंतर दुसऱ्या मार्गाने सायकलवरून पुन्हा केरळला पोचणार आहे. पण तेही तिचे गंतव्यस्थान नव्हेच. त्यानंतरही तिचा प्रवास सुरुच राहणार आहे... ती स्वतःला nomad (भटकी) म्हणवते. तिच्या ह्या भटकेपणाला सलाम!





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा