सायकलपे समय थमसा जाता है
हर लम्हा साफ नजर आता है
वो सूरज की लाली
वो चिडिया की बोली
वो फुलोंके रंग
वो उपरवाले की सारी चित्रकारी
एका अज्ञात सायकलमित्राने सायकलसफरीचे वर्णन अगदी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. कदाचित म्हणूनच एक सायकलसफर संपताना पुढील सायकलसफरीचे विचार मनात घर करू लागतात. पुणे जम्मू सायकलसफरीबरोबर भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडील राज्ये चक्राकांत झाली होती. आता वेध लागले होते पूर्व किनाऱ्याचे!
उत्तरेकडे झेपावताना आपल्याला देवनागरी साथ करत असते. मात्र दक्षिणेकडे प्रचलित असलेली लिपी अगम्य वाटते. उत्तरेकडील भाषाही जश्या समजायला सोप्या वाटतात, तसे दाक्षिणात्य भाषांबद्दल होत नाही. कर्नाटक, केरळ येथे सायकलवताना अडचण आली नाही. कारण तिथे YHAI ची साथ होती. आता ती साथ नव्हती, तर स्वतः आखणी करायची होती.
वास्तविक केरळी माणसांचे अगत्य तर वाखाणण्यासारखे असते ह्याचा अनुभव सायकल सफरीत तसेच कौटुंबिक सहलीत चार चाकीतून फिरताना ही आला होता. मात्र तमिळनाडूबद्दल खात्री वाटत नव्हती.
कदाचित त्यामुळेच भारत परिक्रमा पूर्ण करायचे मनात असूनही पुढील टप्पा आखण्याचे दूर जात होते.
दरम्यान माझा मुलगा.. राजस.. शिक्षणासाठी चेन्नई येथे राहत होता. बहुतेक ह्याच कारणासाठी का असेना अखेरीस पुढचा टप्पा ठरवला गेला. एक टोक चेन्नई असणार हे निश्चित होते. तर YHAI बरोबर पूर्वी कन्याकुमारी गाठलेले असल्याने दुसरे टोक कन्याकुमारी हेही ठरलेलेच होते.
मीरालाही सायकल सफर आवडू लागल्याने तिने लगेचच संमती दिली. दोन टोके ठरली तरी मार्ग किंवा दिशा ठरवणे महत्वाचे होते. कन्याकुमारी येथील समुद्राच्या पार्श्वभूमीवर सायकल उंचावत मोहीम पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्याचे आकर्षण नक्कीच मोठे होते. चेन्नई येथील सायकलपटूही तीच दिशा ठरवीत. शिवाय चेन्नईकडून कन्याकुमारीकडे जाताना उताराचा लाभ जास्त वेळा घेता येणार होता. म्हणजे प्रवासाची दिशा चेन्नई ते कन्याकुमारी ठरवणे जास्त सोयीस्कर असणार होते.
मात्र YHAI तर्फे कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास आधी केल्यामुळे तेथूनच सुरुवात करत चेन्नई गाठायची असे मनात आले. अर्थातच कन्याकुमारी चेन्नई सायकलप्रवास करण्याचे निश्चित झाले.
मनात आले की इतरांना सांगायचे म्हणजे आपला निर्णय पक्का होत जातो.. हा अनुभव होताच. मीरा येणार हे नक्की होते, तसेच नयना आघारकार येणार हेही गृहीत धरले होते. अय्यरकाका मात्र अमेरिकेत असल्याने येऊ शकणार नव्हते.
सायकल मित्रांच्या वेगवेगळ्या समूहांमध्ये मोहिमेची कल्पना सांगितली. त्याला प्रतिसाद मिळत होता. दरम्यान मी एकंदर १००० किमी मार्गाचे रोजचे शतकी टप्पेही ठरवत होतो.
अनेक सायकल समूह/ सायकलमित्रांकडून मोहिमेविषयी विचारणा होत होतीच. त्यांची सामील होण्याची उत्सुकता जाणवत होती. अश्या मोहिमांमध्ये भाग घेत असताना केवळ उत्सुकता पुरेशी नसते तर स्वतःची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची तयारी, जिद्द आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो. विचारणा करणारा फोन आला की त्यांना विश्वास देणे सुरू होतेच. मात्र मला स्वतःला अजूनही भाषेची अडचण, तमिळनाडू येथील स्थानिकांच्या सहकार्याविषयी वाटत असणारी शंका सतावत होतीच.


खूप छान लेखन.. 👌🏻💐
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा