कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या आरतीने केली जाते. कडाव येथील श्रीगणेशाचे दर्शन घेण्याची माझी फार वर्षांपासूनची इच्छाही होती. त्यामुळे पवनने कडावचा पर्याय सुचवताच मी लगोलग होकार दिला.
कर्जतजवळ कोथळीगडाच्या परिसरात वसलेले कडाव हे छोटेसे गाव. वस्ती जेमतेम ५ हजाराच्या आतबाहेर. येथील सिद्धिविनायकाची महती खूप वर्षांपूर्वी ऐकलेली होती. येथील गणेश प्रतिमा खूप प्राचीन आहे. कण्व ऋषींनी या गणेशाची स्थापना केली अशी आख्यायिका आहे. अंदाजे ३०० वर्षांपूर्वी या गावच्या पाटीलांना शेत नांगरत असताना ही मूर्ती मिळाली. या मंदिराचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला, असे म्हटले जाते. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे ही खूप मोठी असून एकदंत शूर्पकर्ण या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ती घडवलेली आहे. दिगंबर आणि यज्ञोपवीत परिधान केलेली अशी ही निश्चितच आगळीवेगळी मूर्ती आहे.
आमचे सदस्य केवळ डोंबिवलीतील नव्हते तर चेंबूर, पनवेल, खारघर आणि ठाणे येथून येणार होते. आम्ही तळोजा फाटा (उंबार्ली) येथे भेटण्याचे ठरवले. सर्वांच्या दृष्टीने वेळ थोडी उशिराचीच ठरवली होती. इतरांची वाट पाहत येथील पंढरपुरी चहाचा आस्वादही घेता येणार होता.
तळोजा फाटा येथे सायकल सफरीतील पहिला चहा घेऊन तेथून निघालो तोपर्यंत घड्याळबाबा जवळपास ८ वाजल्याचे सांगत होते. वास्तविक आजची सायकलसफर ही आमच्या मोहिमेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती. ह्या सफरीनिमित्त आम्ही सगळेजण प्रथमच एकत्र सायकलवणार होतो. ह्या दरम्यान प्रत्येकाची बलस्थान, कच्चे दुवे लक्षात येऊ शकत होते. तसेच काहीजणांची पहिलीच मोठी सफर असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी देखील आजची सायकलसफर महत्वाची होती. दुर्दैवाने आमची आजची सदस्यसंख्या मात्र ५ वरच सीमित झाली होती. प्रसाद अजून आमच्या संघात सामील व्हायचाच होता. मात्र इतर ४ जणही आज सामील होऊ शकले नव्हते.
तळोजा फाटा येथे चहापान झाल्यावर आम्ही लगोलग बदलापूरच्या दिशेने निघालो. येथील हमरस्ता फुजीच्या टायरखालचाच! आज तर फुजीला इतरांनीही साथ होती. नेवाळी फाटा हा पहिला टप्पा लगेचच पार झाला. सर्वानन, मी, पवन, मीरा आणि नयना मॅडम एकमेकांच्या गतीचा अंदाज घेत कूच करत होतो. बदलापूर गाठत असताना जठराग्नी जागृत झाला होता. त्याला आहुती देऊन आम्ही पुन्हा मार्गक्रमण सुरू केले.
पुढील रस्ता तसा उघडाबोडखा. काही वर्षांपूर्वी असलेली हिरवळ कधी नाहीशी झाली होती कोण जाणे. सगळे सायकलस्वार धीम्या गतीने जाऊ लागले. वांगणी, शेलू, नेरळ मागे पडेपर्यंत रविराज चांगलेच तळपू लागले होते. अर्थातच सायकलस्वारांचा सकाळचा उत्साह कमी झाला होता. उन्हाच्या तडाख्याने तहान लागत होतीच, शिवाय आता पुन्हा पोटातील कावळे कावकाव करू लागले होते. अजूनही कर्जत लांब होते. त्यापुढे कडाव...! दरम्यान आम्हाला कर्जतला न जाता कडावकडे जाणाऱ्या जवळच्या रस्त्याचा सुगावा लागला. जवळपास १० किमी अंतर कमी होणार असल्याचे कळले तरी सावधगिरी म्हणून अस्मादिकांनी रस्ता कितपत चांगला आहे ह्याची विचारणा केली. ग्रामस्थांनी जेमतेम २००-३०० मीटर रस्ता खराब असून पुढचा रस्ता चांगला असल्याचे सांगितले. ग्रामस्थांवर विश्वास ठेवून आम्ही तो रस्ता निवडला.
मात्र काही वेळातच चांगला रस्ता ही ग्रामस्थांची कल्पना आणि आमची कल्पना ह्यात महद्अंतर असल्याचे लक्षात आले. खरतर हा रस्ता आमच्या नाजूक सायकलींची परीक्षा पाहणाराच होता. आम्हीच काय आमच्या निर्जीव सायकलीही कुरकुर करू लागल्या होत्या. मात्र आता परत फिरायला वाव नव्हता. परत त्याच मार्गाने जायला आमच्या सायकलीही तयार नव्हत्या. वेग मंदावलेला होताच. कदाचित त्याचमुळे ' उपरवालेकी चित्रकारी ' पहायला आम्हाला सवड मिळाली. खरतर आम्हाला म्हणण्यापेक्षा पवनला.. असे म्हणायला हवे कारण ती चित्रकारी दिसली ती त्याच्याच दृष्टीला..
पुढचा रस्ता आता बरा म्हणण्याइतपत होता. मात्र सगळेजण कधी एकदा कडाव येतय असा विचार करू लागले होते. आम्ही कर्जत मुरबाड हमरस्त्याला लागलो. कडाव गाव आले होते. श्रीविनायकाचे मंदिर उजव्या हाताला दिसले. अष्टविनायकांच्या परिसरातील गर्दी इथे नव्हती. मंदिराचे आवार मोकळे होते. मंदिराशेजारी गार पाण्याने चेहऱ्यावर पाण्याचा हबका मारताच आलेला थकवा निघून गेला. मंदिराचे सभागृह देखील लांबरुंद होते. थोडा विसावा घेऊन आम्ही बाहेर आलो. पवन आम्हाला पुढे नेत होता... आमचे गंतव्य स्थान अजून आलेच नव्हते. मात्र आता पुन्हा सायकलवायला मजा येऊ लागली. कडाव मागे पडले होते. रविराज थेट डोक्यावर येऊन आग ओकू लागला होता. सायकली वेग घेऊ लागल्या एवढ्यात पवन एका कच्च्या रस्त्याला वळला.
निसर्ग मुक्तहस्ते उधळण करत होता, पण आमची मनस्थिती त्याचा लाभ घेण्याची नव्हती. आकाशातील रवी, पोटातील कावळे आम्हाला आजूबाजूचा निसर्ग पाहण्याचा विचार करू देत नव्हते. मात्र थोड्या वेळातच आम्ही एका सुंदर जागी पोचलो.
येथील दृश्य पाहूनच सगळे प्रसन्न झाले. पण आमचे होणारे स्वागत तर अगदी राजेशाही होते. पवन इथे येण्यासाठी का आग्रही होता, ह्याचे प्रत्यंतर लगेचच आले. थंडगार लिंबू सरबत देत आमचे स्वागत झाले. तेही भल्यामोठ्या पेल्यामध्ये. आम्ही अगदी मनसोक्त सरबत पिऊन घेतले. आता सगळेजण शांत झाले होते. हा बंगला पवनच्या मामांचा होता. आवार चांगलेच मोठे होते. आजूबाजूला वृक्षराजी मन प्रसन्न करत होतीच. बंगल्यामध्ये असलेल्या तरण तलावात पोहण्याचा मोह सर्वाननला आवरता आला नाही.
आम्ही चांगलेच ताजेतवाने झालो होतो. जेवणासाठी आम्ही दिवाणखान्यात गेलो. एका मोठ्या मेजावर जंगी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. पवनचे मामा अथवा त्यांचे कुटुंबीय येथे राहत नसले तरी देखरेख करण्यासाठी एक गडी येथे राहत असे. त्याने स्वतःच स्वयंपाक केला होता. ती चव इतकी उत्कृष्ट होती की आम्ही बोटेही चाखत होतो. वास्तविक परत घरापर्यंत सायकलवायचे होते, तरीही हात आखडता घेता येत नव्हता. जेवण चांगलेच तब्बेतीत झाले. आता खरेतर वामकुक्षी आवश्यक वाटू लागली. सगळेजण चांगलेच रेंगाळले. मात्र घरी पोचणे आवश्यकच होते. त्यामुळे अगदी मनाविरुद्धच आम्ही परत निघालो.. ते मात्र पवनला बजावत की आता आपली मोहीम संपली की आपण सगळे इथे परत येऊ तेही मुक्कामासाठी..
'' गर फिरदौस बर रुए ज़मीं अस्त, हमीं अस्तो, हमीं अस्तो, हमीं अस्त "










Super
उत्तर द्याहटवाThanks, Ajit
हटवा