चेन्नईला जाणारा मार्ग नक्की कोणता ह्याचा फलक तिथे नव्हता. जवळपास कोणी दिसत नव्हते. मी थोडे वेगात जाऊन उड्डाणपूल चढून अंदाज घ्यायचा ठरवले. उड्डाणपूल चढलो. खालील काटकोनात जाणारा रस्ता चांगलाच प्रशस्त आणि उत्तम अवस्थेत होता. बहुधा हाच चेन्नई कडे जाणारा महामार्ग असावा अशी खात्री वाटू लागली. तरीही एका मोटारसायकलस्वाराला थांबवून खात्री करून घेतली. संजय आणि आनंद अजून उड्डाणपूल चढले नव्हते. मी पटकन मागे आलो आणि आम्ही उड्डाणपुलाशेजारील रस्त्याने त्या पुलाखालील काटकोनात जाणाऱ्या रस्त्याला लागलो. आता आम्ही कोना महामार्ग सोडून कोलकाता सुरत/ कोलकाता मुंबई महामार्गाला लागलो होतो. एव्हाना भूकही लागली होती. जवळपास एखादे छान हॉटेल पाहणे गरजेचे होते. मात्र तसे काही चिन्ह दिसेना. घड्याळबाबा दहा वाजल्याचे सांगत होते. आनंदला दहाची नाश्त्याची वेळ साधायची होती. मला रस्त्याच्या बाजूला एक गाडीवर काही लोक खाताना दिसले. तिथे जाऊन चौकशी केली तर फार काही मिळत नसल्याचे लक्षात आले. एकही ओळखीचा पदार्थ दिसेना. खायला काय मागायचे हेच कळेना. तिथे दोन पोलिसही उभे राहून क्षुधाशांती करत होते. त्या गाडीवाल्याने सातूच्या पिठाचा एक पातळसर पदार्थ आम्हाला खायला घातला. त्या दोन पोलिसांशी माझ्या गप्पा सुरू होत्या. गाडीवाला आणि आसपासच्या लोकांना हिंदी तोडकीमोडकीच येत असावी. मात्र ते पोलिस दुभाष्याचे काम करत होते.
क्षुधाशांती झाल्यावर पुन्हा एकदा आम्ही महामार्गाला लागलो. दोनेक तास सायकल चालवली असताना अचानक मला मागचे चाक जड वाटू लागले. हवा थोडी कमी वाटली. शंका आली की बहुधा हे puncture असणार. पंप मारून हवा भरली, मात्र पुन्हा हवा कमीच वाटू लागली. सुदैवाने जवळच फुलेस्वर हे गाव होते. तिथे चौकशी करताच puncture चे दुकान रस्त्याच्या पलीकडेच असल्याचे समजले. मध्यानाची वेळ झाली होती. मात्र आता भुकेपेक्षा सायकलची काळजी जास्त होती. दुकानदाराला आमची मोहीम समजताच त्यानेही लगेच काम सुरू केले. संजयला माझी चहाची हाव माहीत होतीच. सातूच्या पिठावर त्या गाडीवाल्याने चहा पिऊन दिला नव्हता. मात्र संजयने puncture चे काम सुरू असताना चहाची सोय केली. खापराच्या वाटीसारख्या पात्रात असलेल्या त्या चहाला खरपूस मात्र छान चव आली होती. दुसऱ्यांदा चहा प्यायचा मोह आवरता आला नाही.
इतक्यात आमच्या सायकली आणि जर्सी पाहून एक माणूस आमच्यापाशी आला. आम्ही मराठी आहोत हे पाहून तो आणखीच खूष झाला. तो पूर्वी नागपूर येथे कामाला होता. त्याच्याशी गप्पा चांगल्याच रंगल्या. मात्र साधारण १ वाजला असताना जेमतेम ४० किमी अंतर पार झाले होते... आणि आमचे मूळ ध्येय होते १५० किमीचे.. अर्थात अजून १०० किमी तरी पेडल मारायचे होते. तेव्हा गप्पा आटोपून आम्ही पुन्हा स्वार झालो. थोडे पुढे जातो तोच आनंदच्या सायकलचे मागचे चाक पुन्हा एकदा सरळ रेषेत जायचे नाकारू लागले. आमच्या प्रवासाला येणारे अडथळे नेमाने येत होते. अडथळ्यांची आणि आमची साथ सुरूच होती. मात्र जेव्हा अडथळे येतात तेव्हा त्यांना दूर करणारे हातही सापडतात. किंबहुना असे अडथळे हे नवीन ओळखीची संधीच असतात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा