हॉटेल ग्रीनलँड टॉवर्स येथे आमची सोय अतिशय उत्कृष्ट झाली होती. पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे होते. कारण कालची ३० किमी ची कसर आणि आजचे १५० किमी असा एकूण अंदाजे १८० किमीचा पल्ला आज गाठायचा होता. सकाळी आम्ही थोडे आरामात आवरले. सुमारे ७.३० च्या सुमारास आम्ही सुरुवात केली. तिघेही जण एकापाठोपाठ जात होतो.
रस्ता अरुंद आणि थोडा खडबडीत होता. मात्र आमच्या सायकली व्यवस्थित साथ देत होत्या. त्यामुळे आम्ही शांतपणे जात होतो. साधारण २०-२५ किमी अंतर पार केले होते. समोर ५०० मीटर अंतरावर टोल असल्याचे लक्षात आले. मी मागे बघून दोघेही जण येत असल्याची खात्री केली. एक छोटे वळण लागले. टोल जवळ येत असताना रस्ता रुंद झाला होता. तिथे पुन्हा मागे वळून पाहिले तर दोघेही दिसेनात. मी टोल पार करून वाट पहायचे ठरवले. उशिराने सुरुवात केल्यामुळे एव्हाना नाश्त्याची वेळही झाली होती. मी थोडा वेळ वाट पाहिली तरी दोघेही दिसेनात. अखेर मी माझ्या राखीव कोट्यातील दोन लाडू खाऊन घेतले. माझा अंदाज होता की तोपर्यंत तरी दोघेही येतील. मात्र मागे कोणीच दिसेना. आणखी १५-२० मिनिटांनी संजयचा फोन आला की आनंदच्या सायकलने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मी पुन्हा थोडा वेळ वाट पाहून मागे जायचा निर्णय घेतला. मला टोल पुन्हा पार करून मागे जायचे होते. त्यामुळे मी पायउतार झालो. रस्ता क्रॉस करून जायला जागा नव्हती. त्यामुळे मी सायकल हातात धरून उलट दिशेने टोल ओलांडून मागे आलो.
माझ्या अंदाजाप्रमाणे लगेचच तेथील पोलिसाने मला बोलावले. मी त्याला आमची मोहीम सांगितली. तसेच मी मागे परत का आलो हे सांगितले. त्याचा स्वभाव खरोखरच चांगला होता. त्याने माझे म्हणणे मध्ये अडवले नाही. मला बोलायची पूर्ण मुभा दिली. मी संधी साधत माझ्याबरोबर मुंबईतील निवृत्त ACP असल्याचे जाणिवपूर्वक सांगितले आणि त्या ACP च्याच सायकलचा प्रॉब्लेम झाला असल्याचे सांगितले. तो पोलीस मुळातच शांत स्वभावाचा होता. तो आता आणखीच अदबीने चौकशी करू लागला. त्याने त्याच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला बोलावून माझी ओळख करून दिली तसेच माझ्याबरोबर एक ACP आहे हेही सांगितले. आता आमच्या तिघांच्या गप्पा रंगत होत्या. त्या पोलिसाने माहिती पुरवली की तो केवळ पोलिस म्हणून कर्तव्य बजावत नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी मदतही करतो. समाजसेवा करण्यात त्याला आनंद मिळतो ह्याचे काही किस्सेही त्याने सांगितले. त्या पोलिसाला आम्हाला नाश्ता द्यायची इच्छा होती. मात्र जवळपास कोणतेही हॉटेल नव्हते त्यामुळे आम्हाला तो नाश्ता देऊ शकत नव्हता ह्याची खंतही त्याने बोलून दाखवली. मात्र त्या दरम्यान अजूनही संजय आणि आनंद का येत नाहीत ह्याची चिंताही मला सतावत होती. बऱ्याच वेळाने दोघे येताना दिसल्यावर मला हायसे वाटले.
आनंद आल्यावर त्याची मी ओळख करून दिली. पुन्हा एकदा आमच्या गप्पा रंगू लागल्या. आनंदला भेटून त्या दोन्ही पोलिसांना खूप आनंद वाटत होता. आम्ही जरी थांबलो असलो तरी सूर्य ना थांबला होता ना त्याने गती कमी केली होती. घड्याळबाबा त्यांचे हात भराभर फिरवत होते. आम्ही पुन्हा सायकल चालवायला सुरुवात केली खरी. मात्र एव्हाना सकाळची आल्हाददायक वेळ निघून गेली होती.
जेवण्यासाठी आम्ही एका छोट्याशा धाब्यावर थांबलो. बंगाली माणसाचे मत्स्यप्रेम मी ऐकून होतोच. त्यामुळे मी इथे मत्स्य आहाराची संधी सोडणार नव्हतो. वेळ वाचवण्यासाठी मी भात खाण्याचा निर्णय घेतला. खरेतर भात खाऊन माझे पोट भरणार नव्हतेच. त्यामुळे मी दशावतारातील पहिला अवतार भाताबरोबर उदरात भरून समाधान करून घेतले. अखेर म्हणतात ना.. when in Rome, behave like Roman. आनंद आणि संजयने मात्र शाकाहार पसंत केला. आनंद मला चिडवत होता की मासे खाण्यापेक्षा येथील भाजी उत्तम आहे. पण मी तर भाजीचा स्वादही चाखला होताच. त्यामुळे मला दोन्ही चवींचा उपभोग घेता आला होता. जेवण चांगलेच तब्बतीत झाले होते. आम्ही त्यानंतर पुन्हा एकदा शांतपणे सुरुवात केली.
थोड्याच वेळात आम्ही ओडिशा राज्यात प्रवेश केला. ओडिशा राज्याविषयी मला कुतूहल होतेच. येथील आदरातिथ्याविषयी मी ऐकले होते. आता ओडिशातील पाहुणचाराचा प्रत्यक्ष प्रत्यय येणारच होता.
मी अग्रिमाच्या संपर्कात होतोच. तिने मला सुशांत नावाच्या मित्राचा संपर्क दिला होता. त्याने आमची भद्रकला रहायची सोय केली होती. मात्र आता दिवसभरात १८० किमी अंतर पार करून भद्रक गाठणे फारच अवघड होते. त्यामुळे आता मी त्या अगोदर ३० किमी अंतरावरील सोर (soro) गावात सोय होईल का ते पाहू लागलो. दुर्दैवाने तिथे राहण्यासाठी गुगलबाबा काही मदत करत नव्हते आणि सुशांतही तिथे मदत करू शकणार नव्हता.
एव्हाना भास्कराचार्यांनी मात्र बराच पल्ला गाठला होता. मध्यान्ह केव्हा टळून गेली हे आमच्या लक्षातच आले नाही. आम्ही वेग घेऊ लागलो. तिघांनाही वेळ, वेग आणि अंतर ह्या त्रैराशिकाची जाणीव होती. मात्र अचानक संजयच्या पायात cramp येऊ लागले. मी एखादे वाहन मिळून आम्हा तिघांना किंवा किमान संजय आणि त्याच्या सायकलला पुढे पाठवता येईल का हे पाहू लागलो. मात्र तसे काही चिन्ह दिसेना. अखेर मी सुशांतला संपर्क साधून आम्ही आज बालासोरपर्यंत जाऊन थांबत असल्याचे सांगितले. सुशांतने लगेचच बालासोर येथे त्याच्या मित्राच्या सहाय्याने तो आमची व्यवस्था करत असल्याचे सांगितले. थोड्याच वेळात पूर्ण काळोख पडला.
सुशांतने मला सांगितले होते की त्याच्या मित्राने आमची व्यवस्था एका ऑफिसमध्ये केली आहे. मात्र तेथील सुपरवायझर ८ वाजता निघून जातो त्यामुळे आम्ही त्या आधी पोचणे आवश्यक आहे. सुदैवाने सातच्याच सुमारास आम्ही महामार्गावरच बालासोर शहरातील मुख्य चौकात पोचलो होतो.
बालासोर ह्या शहराला बालेश्वर असेही म्हटले जाते. हे आज जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहराचा इतिहास फार रंजक आहे. बालासोरजवळील गावांमध्ये केलेल्या उत्खननातून मानवी वसाहतींच्या तीन वेगवेगळ्या सांस्कृतिक टप्प्यांचे पुरावे मिळाले आहेत, म्हणजे, चॅल्कोलिथिक (२०००-१००० ईसवीसनपूर्व), लोहयुग (१०००-४०० ईसविसनपूर्व) आणि प्रारंभिक ऐतिहासिक काळ (४००-२०० ईसविसनपूर्व). बालेश्वर जिल्हा हा प्राचीन कलिंग राज्याचा भाग होता. पुढे तो मुकुंद देवाच्या मृत्यूपर्यंत उत्कलचा प्रदेश बनला. १५६८ मध्ये तो मुघल साम्राज्याने आपल्या ताब्यात घेतला. पुढे १७०० पर्यंत त्यांच्या ताब्यात राहिला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने (EIC) १६३३ मध्ये बालासोर येथे एक कारखाना स्थापन केला. १७१९ मध्ये, ट्रायस्टे कंपनीच्या व्यापाऱ्यांनी तेथे एक व्यापारी चौकी स्थापन केली. कलकत्त्याचे महत्त्व वाढत असताना, हुगळी नदीवर चढण्यासाठी येणाऱ्या जहाजांसाठी बालासोर हे नदी पायलट सेवांचे केंद्र बनले. १६८६ मध्ये अँग्लो-मुघल युद्धादरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने या शहरावर बॉम्बफेक केली. परंतु मुघल सैन्याने कंपनीची डाळ शिजू दिली नाही. पोर्तुगीजही इथे व्यापारासाठी आले. ते मलेशियाहून बोर्नियोला तांदूळ, कापूस आणि लोणी यांसारख्या ओरिसाच्या उत्पादनांची निर्यात करत होते आणि इंडोनेशियाहून चिनी उत्पादने आणि मसाले आणत होते. आजच्या ओडिशाचा हा भाग नागपूरकर भोसल्यांनीही जिंकून घेतला होता. १८०३ मध्ये देवगावच्या तहामध्ये त्यांना तो इंग्रजांना द्यावा लागला.
९ सप्टेंबर १९१५ रोजी बालासोरजवळ, जतिंद्रनाथ मुखर्जी (बाघा जतिन) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रांतिकारक आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात घनघोर लढाई झाली. माऊसर पिस्तूलांनी सज्ज असलेले जतिन आणि त्यांचे अनुयायी आधुनिक रायफलांनी सज्ज असलेल्या ब्रिटिश पोलिसांच्या आणि लष्कराच्या मोठ्या तुकडीशी भिडले. दोन तास चाललेल्या या लढाईत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली, ज्यात जतिनला प्राणघातक जखमा झाल्या. दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले.
बालासोर येथे आम्ही पोचल्याचे सुशांतला कळवले. समोरच चहाची गाडी होती. तिथे चहा घेत असताना आम्हाला तिथून ५-६ किमी अंतरावर एक मठात आमची सोय होऊ शकते अशी माहिती मिळाली. आसपासचे लोक आमची चौकशी करून आम्हाला शुभेच्छाही देत होते. सुशांतचा फोन आला तो मात्र आम्हाला निराश करणारा होता. तो सुपरवायझर निघून गेला होता. सुशांत आमची माफी मागत म्हणाला की बहुधा त्या सुपरवायझरला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नाही. मात्र समोरच एक हॉटेल दिसत होते. त्यामुळे मी सुशांतला सांगितले की आमची काळजी करू नकोस. आमची व्यवस्था होईल. आम्ही तिघेही त्या हॉटेलमध्ये गेलो. मात्र तिथे सांगितलेली किंमत आम्हाला अवाजवी वाटली. गाव तसे मोठे वाटत होते. आम्ही त्या मठात जायचाही विचार करत होतो.
इतक्यात आनंदला त्याच्या मित्राने बालासोर येथील संपर्क दिल्याची आठवण झाली. आम्ही लगेचच तो संपर्क साधला....अरबिंद रे ह्यांनी लगेचच आम्हाला आमची सोय करत असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या हॉटेलात आम्ही पोचलो. मात्र तिथे योग्य सोय उपलब्ध नव्हती. अरबिंद ह्यांनी अजिबात वेळ न दवडता आमची सोय लगेच दुसऱ्या हॉटेलात केली. ते आमच्याबरोबर हॉटेल स्वर्णचुडा इथे आले. तेथील सोय व्यवस्थित असल्याची त्यांनी खात्री केली आणि मगच त्यांनी आमचा निरोप घेतला.
रात्रीचे जेवण छान झाले. मात्र झोपण्या अगोदर मी एका मोहिमेवर जाऊन आलो. दोन दिवसात मिळून आम्ही ५०- ६० किमी मागे पडलो होतो. त्यामुळे पुढील दिवशी लवकर निघावे लागणार होते. त्यासाठी लवकर उठावे लागणार होते. सकाळची आन्हिके आवरायची तर चहा तर हवाच. आमच्या हॉटेलमध्ये तो इतक्या पहाटे मिळणार नव्हता. त्यामुळे आनंद आणि संजय झोपण्याची तयारी करत असताना मी जवळपास जाऊन पहाटे ५ वाजता चहा कुठे मिळेल ह्याची खात्री करून हॉटेल मध्ये परतलो.






Tumchya chikatichya prayatna vadala salaam !
उत्तर द्याहटवापुढच्या वेळी तुम्हीपण या
हटवा