रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

Sunrise state आंध्र प्रदेशात प्रवेश: कोलकाता चेन्नई सायकल सफर


चिलीका येथील गुरुद्वारामधील वातावरण अतिशय शांत होते. सचिनसिंग खूपच प्रेमळ आणि अतिथ्यशील होताच. तसेच त्याचा सहकारी देखील खूप आदराने वागत होता. मी पहाटेच INS CHILIKA समोर एक चहाची हातगाडी गाठली. अजून तो शेगडी पेटवतच होता. महामार्गावरील उड्डाणपुलाखाली INS CHILIKA च्या गेट समोरच ती हातगाडी होती. सगळा जामानिमा अगदी आटोपशीर होता. त्याचे काम सुरू असतानाच आणखी पाचसहा जण तिथे आले. चहा छानच होता. तिथेच दोन छोटे कप चहा पिऊन आनंद, संजय आणि माझ्यासाठी आणखी दोनदोन कप चहा थर्मास मध्ये घेतला. मी गुरुद्वारामध्ये जाईपर्यंत आनंद आणि संजय तयार होत होते. त्यांच्याबरोबर आणखी दोन दोन कप चहा घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी तयार झालो.

सचिनसिंगला आम्ही प्रवास सुरू करतोय म्हणून सांगितले तर तो आम्हाला चहा आणि नाश्त्याचा आग्रह करू लागला. त्याचे प्रेमळ आतिथ्य मोडवता येत नव्हते. मात्र इतक्या लवकर नाष्टा करण्याची आम्हाला सवय नव्हती. माझा तर लहान लहान का होईना चार पाच कप चहा झाला होता. पण सचिनसिंग आणि चहा दोन्हीचाही मान तर ठेवणे भाग होते. अखेरीस आम्ही चहावर तडजोड केली. चहा बिस्किटे घेऊन आम्ही सचिनसिंग आणि त्याच्या सहकाऱ्याचा निरोप घेतला.


आम्ही लगेचच महामार्गाला लागलो. थोड्याच वेळात एक छोटासा घाट लागला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तो घाट सर करताना खूप मजा आली. अर्थात तो घाट फारच छोटा होता. पुढे जवळपास ९ किमीचा किंचित तीव्रतेचा उतार होता. त्यामुळे आम्ही चांगलाच वेग घेतला होता. चिलीका लेक अजूनही आम्हाला समांतर काही अंतरावर होताच. अर्थात आमच्यापासून तो लांब असल्याने आम्हाला मात्र तो दिसत नव्हता. थोड्या वेळाने जान्हिकुडा मार्गे येणारा रस्ता महामार्गाला मिळाला. चिलीका लेक संपल्याची ती खुण होती.

काही अंतरावर एक मुलगी सायकलवरून जात असलेली दिसली. ती बहुधा शाळा कॉलेज किंवा क्लासला जात असल्याचे जाणवले. मी तिची चौकशी केली. ती साधारण १२ वी मध्ये शिकणारी मुलगी होती. तिने सांगितले की ती रोज कॉलेजमध्ये सायकलनेच जाते. आत्ताही ती कॉलेजलाच जात होती. साधारण साडेतीन चार दशकांपूर्वी डोंबिवलीमध्ये पेंढारकर कॉलेजचे प्रांगण सायकलींनी भरलेले असायचे. मात्र आता तिथे स्वयंचलित दुचाकीचं दिसतात. त्यामुळे त्या मुलीने जेव्हा ती रोज कॉलेजला सायकलने जाते असे सांगितले तेव्हा मला खूप छान वाटले. मी आमच्या मोहिमेविषयी तिला सांगितले. पुढे तिला म्हटले सायकल चालवणे कायम सुरूच ठेव. आमची मोहीम ऐकून तीदेखील खूप उत्साहित झाली होती. एक सेल्फी घेऊन मी तिचा निरोप घेतला.






अर्धशतकी दौड करून आम्ही छत्रपुर गाठले. शहर सुरू होत असतानाच एक मोठा चौक होता. त्या चौकातच दक्षिणात्य पदार्थांची रेलचेल असलेल्या टपऱ्या होत्या. लांबूनही येथील पदार्थ उत्तम असल्याची जाणीव होत होती. सायकली बाजूला लावून आम्ही खाण्याची ऑर्डर दिली. येथील पदार्थ खरोखरच उत्तम होते. आम्ही चांगलाच आडवा हात मारला. जठराग्नी अगदी तृप्त झाल्यावर त्याला पुन्हा चहाची आहुती दिली. 


नाष्टा झाल्यावर संजय आणि आनंद रेंगाळू लागले. मी थोडी आघाडी घेतली. थोड्या वेळातच आम्ही ओरिसा राज्य पार करून आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला होता. 







नाष्टा करून बराच वेळ झाला होता. भुकेची जाणीव होऊ लागली होती. मात्र वाटेत कोणतेही हॉटेल दिसत नव्हते. दुपारी ऊनही चांगलेच जाणवत होते. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून मी चेहऱ्यावर पाणी मारले, ओले फडके नाकावरून घेतले. उन्हे त्रास देत असताना पोटातही आग लागली होती. अखेरीस एके ठिकाणी समोसा आणि चहा ह्यावर आम्ही भूक भागवली. आनंद, संजय आणि मी तिघेही पुढेमागेच होतो. इतक्यात एका स्वयंचलित दुचाकीवरून एक स्वार मला समांतर जात माझी चौकशी करू लागला. मी त्याला आमची मोहीम सांगितली. त्याच्या बरोबर आणखी एक स्वयंचलित दुचाकीचालक होता. दोघेही आमची मोहीम ऐकून खूष झाले. तेही आमच्याच प्रमाणे सायकलस्वारच होते. 


मात्र आत्ता ते सायकल ऐवजी स्वयंचलित दुचाकी वरून एक मोठा प्रवास करत होते. दोघेही गुवाहाटीहून निघाले होते. पुढे चेन्नई कन्याकुमारी मुंबई मार्गे ते परत गुवाहाटी पर्यंतचा प्रवास करणार होते. आम्ही सगळेच एकमेकांची माहिती घेत उत्साहित झालो. दिगंत बारुआ आणि जितेंदर सिंग ह्या त्या दोनही स्वारांना त्यांच्या प्रवासादरम्यान मुंबईमध्ये आल्यावर माझ्या घरी राहण्याचे आमंत्रण दिले तसेच पुढील वर्षी आम्ही गुवाहाटी गाठणार असल्याचेही सांगितले. ते दोघेही कोलकाता चेन्नई महामार्गाने न येता सातपदा जान्हिकुडा असा चिलीका लेक मधून जलप्रवास करून आले होते. मी त्यांना सांगितले की आम्हीही तोच मार्ग निवडला होता. पण विशाखापट्टणम येथील आम्हाला सामील होणार असलेला सहकारी राज ह्यांच्याकडून असे समजले होते की सध्या एकच बोट आहे तीही दुपारी तीन साडेतीन वाजताची. त्यानंतर साठ किमी अंतरापर्यंत राहण्याची सोय नाही. त्यामुळे आम्ही तो पर्याय स्वीकारला नाही. मात्र दिगंत आणि जितेंदर म्हणाले की असे काहीही नाही. बोटी सातत्याने सुरू आहेत. राजने दिलेल्या चुकीच्या माहितीवर अवलंबून राहिल्याने आमची चिलीका लेकमधून प्रवास करण्याची संधी गेल्याची खंत वाटली तरी त्याऐवजी गुरुद्वारामधील सचिनसिंगचा सहवास लाभण्याची संधी मिळणे हे जास्त समाधानकारक वाटत होते.







आमची पलासा येथील राहण्याची व्यवस्था झाली नव्हती. विशाखापट्टणम येथील मित्र राज खरेतर पुढे आमच्याबरोबर चेन्नईपर्यंत येणार होता. दुर्दैवाने १० दिवसांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. मी त्याला म्हटले होते की आम्ही विशाखापट्टणम येथे पोचेपर्यंत तू बरा होशील. संध्याकाळी सहाच्या सुमारास मी त्याला पलासा येथे काही व्यवस्था होऊ शकते का हे विचारले. त्याने सांगितले की त्याची थेट ओळख नसली तरी तिथे चांगली हॉटेल्स आहेत जिथे राहण्याची व्यवस्था होऊ शकेल. मात्र त्याने एक निराशाजनक बातमीही दिली. ती म्हणजे तो अजूनही बरा झाला नव्हता त्यामुळे आमच्याबरोबर विशाखापट्टणम ते चेन्नई सायकल प्रवास करू शकणार नव्हता.

पलासा येथे राहण्याची सोय करण्याबद्दल मला कोणीतरी reference दिल्याचे मला आठवत होते. राजने तर तो refrence दिला नव्हता. मग मी अग्रीमा आणि सुशांतला विचारले. पण त्यांनीही नकार दिला. आनंद आणि संजयला विचारले तर त्यांना काहीच लक्षात येईना. मी माझ्या भ्रमणध्वनी मध्ये शोधू लागलो. अखेर आनंदनेच एका हॉटेलचा reference दिल्याचे लक्षात आले. सूर्यास्त होऊन जवळपास तासभर झाला होता. पलासा अजूनही ८ किमी लांब होते. इतक्यात आम्हाला हॉटेल अमरावती नावाचे हॉटेल दिसले. तिथे चौकशी केली. तर राहायची आणि जेवणाची चांगली सोय होत असल्याचे लक्षात आले. मी लगेचच शेजारी असलेल्या छोट्या दुकानात चहा घेत सकाळी चहा किती लवकर मिळेल ह्याची चौकशी केली. तर आम्हाला कळले की तिथे २४ तास चहा मिळू शकतो. आता तर तिथे राहण्याबद्दल मी अगदीच निश्चिंत झालो.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...