भोगापुरम येथील हॉटेल अन्नपूर्णा येथे आम्ही वगळता कोणाचाच मागमूस नव्हता. आमचे स्वागत करणारे पोलिस गेल्यावर तर तिथे चिटपाखरूही नव्हते. आमची झोप मात्र शांत झाली. पहाटे जाग आल्यावर मी आणि संजय चहाच्या शोधार्थ बाहेर पडलो. जवळपास दीड किमी अंतरावर आम्हाला चहाची सोय दिसली. तिथेच दोन दोन छोटे कप चहा घेऊन आम्ही पुन्हा थर्मोस भरून घेतला. वाटेत सूर्योदयाचा सूर्य फारच लोभसवाणा दिसत होता. रस्त्याच्या कडेला एके ठिकाणी रांगेत बरेचसे मुखवटे लावलेले दिसत होते. त्यावरील कलाकारी लक्ष वेधून घेत होती.
हॉटेलमध्ये आल्यावर आम्ही आनंदबरोबर परत चहा घेतला. हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये कोणी नव्हतेच. सायकली योग्य अवस्थेत आहेत ह्याची तपासणी करून आम्ही निघालो. आम्ही सायकलवायला सुरुवात करेपर्यंत ८.१५ वाजून गेले होते. हॉटेल सोडल्यानंतर जवळपास ११ किमी सेवा रस्ता आणि मुख्य महामार्ग ह्यामधील बॅरिकेड्स आम्हाला महामार्गाला जाण्यासाठी वाट देत नव्हते. त्यानंतर मार्ग सापडताच आम्ही मुख्य महामार्ग पकडला. सहा लेनचा महामार्ग आणि त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन दोन लेनचे सेवा मार्ग असा प्रशस्त कारभार होता.
समोर महामार्गावर एक उड्डाणपूल दिसू लागला. एक रस्ता त्याच्या डावीकडे वळत होता जो विशाखापट्टणमकडे जाणार होता. मात्र ते आमच्या मार्गात नव्हते तर महामार्गापासून जवळपास तीस किमी आत होते. मी उड्डाणपूल चढायला सुरुवात केली खरी. मात्र आधीच्या अनुभवावरून मला शंका आली की आनंद आणि संजय उड्डाणपूल न चढता बाजूच्या रस्त्याने यायचा प्रयत्न करतील जो आमच्या मार्गापासून दूर थेट विशाखापट्टणमला जाईल. त्यामुळे मी उड्डाणपुलावर थोड्याच अंतरात थांबलो. वास्तविक उड्डाणपूल सुरू व्हायच्या आधी विशाखापट्टणचा फाटा फुटतो तिथे फलकही होता. मात्र माझ्या अंदाजाप्रमाणे दोघेही तो फलक न पाहता उड्डाणपूल टाळून विशाखापट्टणकडे वळले. माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचू शकत नसला तरी त्यांनी मला पाहिले होते. पुन्हा हातवारे करून त्यांना तो मार्ग घेऊ नका असे सांगू लागलो. थोडे पुढे येताच त्यांना माझ्या खुणा लक्षात आल्या आणि दोघेही मागे येत परत उड्डाणपुलावर आले.
थोड्या वेळातच आम्हाला उन्हाचा तडाखा जाणवू लागला. सकाळी निघायला उशीर झाल्यामुळे एव्हाना भूकही लागली होती. मात्र नाष्टा करायचा असेल तर पुन्हा सेवा रस्त्याला जावे लागणार होते. दुर्दैवाने एकदा महामार्ग पकडल्यावर पुढे तीस किमी पर्यंत बॅरिकेड्स संपत नव्हते. तसेही सेवा रस्त्यालाही कोणतेही दुकान अथवा छोटी टपरीही नव्हती. डोक्यावर उन्हाची आग आणि पोटात भुकेची आग आम्हाला त्राही माम करायला लावत होती. आमची गती चांगलीच मंदावली होती. आज खरेतर मी फार अंतर ठेवले नव्हते. जेमतेम १०० किमी अंतरावर असलेल्या एलमनचिल्ली ह्या गावात राहायचे ठरवले होते. मात्र आंध्र पोलिसांमधील आनंदच्या मित्राने ते गाव राहण्यायोग्य नसल्याने तिथे राहू नका असे सांगितले होते. त्यामुळे जमले तर आणखी थोडे पुढे जावे लागणार होते.
आम्ही अतिशय संथपणे मात्र निर्धाराने पेडल मारत होतो. अखेरीस जवळपास ५० किमी अंतरावर आम्हाला सेवा रस्त्याला जाता आले. तिथेही नाष्टा करण्यासाठी उपहारगृह नव्हतेच. पण एक चहाकेंद्र होते. तिथे चहा आणि बिस्किटे ह्यावर समाधान मारून आम्ही पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. वेळ पुढे जात होती तसे ऊन तर वाढतच होते. आम्ही आता सेवा रस्त्यानेच जाणे सुरू ठेवले. मात्र त्याच्या लगतही ना विश्रांतीसाठी ना कोणते झाड होते ना एखादे दुकान. चहा बिस्किटांनी नाश्त्याची कसर भरून काढली नव्हती.
आम्ही पुन्हा एकदा सायकलवायला सुरुवात केली. ऊन आणि भुकेने आम्हाला थकवा जाणवू लागला होता. अखेरीस आणखी थोडा वेळ पेडल मारल्यावर एक बस थांबा दिसला. तिथे बसायची सोय होती. वर छप्परही होते. मी लगेचच तिथे सायकल लावली. बस स्थानकावर नाव होते बंजारा! आम्हीही तसेच बंजाऱ्यांप्रमाणे भटकंती करत होतो. त्यामुळे ते बस स्थानक आम्हाला शोभेसेच होते. मी तिथे आडवाच झालो. डोक्याखाली हेल्मेट घेऊन शांतपणे पडून राहिलो.

संजय आणि आनंदही विसावा घेत होते. थोडी विश्रांती झाल्यावर आम्ही नाईलाजाने उठलो. नाष्टा झाला नव्हताच मात्र मध्यानाची वेळ उलटून गेली होती. आता जेवण तरी मिळणार की नाही ह्याची चिंता सतावत होती. आम्ही सेवा रस्ता सोडू शकत नव्हतो. त्यामुळेही आमची गती आणखीच मंदावली. सुदैवाने काही अंतरावर एक छानसा धाबा दिसला. आम्ही सायकली लावल्या. इतक्यात आणखी एक सायकलपटू तिथे आला. आमच्या सायकली पाहून त्यानेही त्याची सायकल तिथे थांबवली होती.
आमचे जेवण येईपर्यंत मी त्याच्याकडे जाऊन त्याची चौकशी केली. तो येथील स्थानिक असावा त्यामुळे मी इंग्रजीतच त्याची चौकशी केली. त्याने सांगितले की तो मूळचा गोवेकर होता. म्हणून मी हिंदीत संभाषण पुढे नेले. त्याने नाव सांगितले... विक्रम दाभाडकर! मग थेट मराठीच सुरू केली. विक्रम नोकरीनिमित्ताने विशाखापट्टणम येथे कूक म्हणून काम करत होता. साधारण वर्षभर तो येथे राहत होता आणि तेलगु बोलायलाही शिकला होता. आत्ता सायकलने विशाखापट्टणमहून गोव्याला जायला निघाला होता. विशाखापट्टणमहून राज नावाचा सायकलपटू आमच्याबरोबर चेन्नईपर्यंत येणार होता. त्याला येणे रद्द करावे लागले होते. त्याच्या ऐवजी अनपेक्षितपणे आता विक्रम काही अंतर तरी आमच्याबरोबर येणार होताच. अर्थातच आता स्थानिक भाषा बोलता येणारा साथीदार लाभल्याने आमची सोय होणार होती आणि त्यालाही आमची सोबत मिळणार होती.
धाबा पंजाबी होता. तिथे शेवभाजी आहे कळल्यावर मी एकदम खूष झालो. रोटी आणि शेवभाजी असा मस्त बेत होता. भातापासून माझी सुटका झाली होती. आम्ही सगळ्यांनीच मनसोक्त ताव मारला. सकाळी नाष्टा न मिळाल्याची कसर जेवणात भरून काढली
जेवण झाल्यावर थोडे सुस्तावलो असलो तरी जवळपास निम्मे अंतर बाकी असल्याची जाणीव होतीच. आम्ही थोड्या सुस्तपणे सायकलवायला सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा सेवा रस्त्यावरून मुख्य रस्त्याला यायला मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे आम्ही सेवा रस्त्यानेच जाऊ लागलो.
थोड्या वेळाने मुख्य महामार्ग एका उड्डाणपुलावरून जात असल्याचे दिसले. मात्र सेवा रस्ता त्या महामार्गाखालून पलीकडच्या बाजूला गेला होता. आम्हाला महामार्गाला जायला वाटच नव्हती. नाईलाजाने आम्ही सेवा रस्त्याने महामार्गाखालून गेलेल्या रस्त्याने गेलो. तर तो मार्ग महामार्गाच्या उजवीकडून एका गावात शिरत होता. आम्हाला पर्यायच नव्हता. नाईलाजाने आम्हाला त्या गावात शिरून ५- ७ किमी गाव फिरून पुन्हा महामार्गाला यावे लागले. आनंद आणि संजयला महामार्ग न सोडता सेवा रस्ता का घेऊ नये ह्याचा आज एका दिवसातच दोनदा अनुभव आला होता. पहिल्यांदा ते दोघेही सेवा रस्ता समजून आमचा मार्ग सोडून विशाखापट्टणम कडे जाण्याची दिशा धरणार होते आणि आत्ता सेवा रस्त्यामुळे आम्हाला मोठा फेरा पडला होता.
जेवण उशिरा झाल्याने आमच्याकडे सूर्यास्तापर्यंत फार वेळही उरला नव्हता. येलमनचिली अजून लांबच होते आणि सूर्य झपाट्याने क्षितिज गाठू लागला होता. अखेरीस मी आनंदला त्याच्या आंध्र पोलिसांतील मित्रांना आमची कुठे व्यवस्था होऊ शकते ह्याची पुन्हा विचारणा करायला सांगितले. त्यांनी सांगितले की आम्ही येलमनचिल्ली पोलिसांच्या हद्दीत पोचलो आहोत. त्यामुळे त्याच गावात आमची व्यवस्था ते करतील. पोलिस खात्याने जे गाव आम्हाला टाळायला सांगितले होते, नेमके त्याच गावात त्या पोलिसांनाच आमची व्यवस्था करावी लागणार होती.
पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही येलमनचिल्ली येथे पोचलो. गुगल मॅप ने आम्हाला चांगल्याच कच्च्या रस्त्याला वळवले. त्या रस्त्याने आम्ही गावात शिरलो. तिथेही वाटेत पोलिस खात्यातील सहकारी आम्हाला घेण्यासाठी सामोरे आले.
एका टुमदार लॉज मधील एका मोठ्या खोलीत पाच सहा बेड टाकलेले होते. तिथेच आमची व्यवस्था करण्यात आली होती. गाव छोटेसेच होते. त्यामुळे आम्हाला लगेचच बाहेर पडून जेवणाची व्यवस्था बघावी लागणार होती. सुदैवाने फार लांब जावे न लागता आमची जेवणाची व्यवस्था झाली. दुपारी रोटी मिळाली असली तरी आता मात्र भातावर समाधान मानावे लागणार होते.
















कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा