आज आमच्या विशाखापट्टणमच्या मित्राने विक्रमने आमचा निरोप घेऊन तो गोव्याकडे निघाला. गेले काही दिवस तो आमच्या मोहिमेचाच एक भाग झाला होता. त्याची दिशा खरतर पश्चिमेकडे होती तर आमची दक्षिणेकडे. मात्र दोन वेगळ्या दिशांना प्रवास करत असतानाही काही सामाईक अंतर आम्हाला एकत्र पार करता आले. त्यादरम्यान आम्हाला एकमेकांचे अनुभव शेअर करता आले. एकमेकांबरोबर काही नवीन अनुभव घेता आले. आपल्या जीवनप्रवासात असे अनेक प्रवासी आपल्याला भेटत असतात ज्यांच्याबरोबर खूप कमी वेळ एकत्र घालवता येतो मात्र त्यामध्ये येणारे अनुभव कायम आठवणीत राहतात. आमचा गोवेकर मित्र विक्रम ह्याच्याबरोबर असेच कायम आठवणीत राहतील असे क्षण आम्ही अनुभवले होते.
विक्रम त्याच्या दिशेला निघाला खरा मात्र नंतर सायकलची हवा भरण्यातच आमचा अर्धा तास गेला. वास्तविक रोज हवा भरायची गरज नसतेच, मात्र आनंदकडे जो ऑटोमॅटिक पंप होता त्याच्या जोरावर आम्ही उगाचच रोज हवा चेक करत होतो. तो पंप लावताना ट्यूब मधील हवा नेहमीच कमी होत असे आणि आम्ही पुन्हा एकदा ती कमी झालेली हवा भरत बसत असू. खरतर हे नसते उपद्व्याप होते. आजही आम्ही तोच प्रयोग पुन्हा एकदा नव्याने करत होतो. मात्र आनंदच्या ट्यूबमध्ये हवा भरली जाईना. त्याच्या ट्यूब मध्ये हवा भरताना पंपचा प्रेस्ता व्हॉल्व तिरका लागून अडकला होता. राजू म्हणाला आपल्याला उशीर झाला ह्यात काहीतरी देवाची योजना असावी. आजही अंतर १४० किमी च्याच आसपास होते. त्यामुळे नंतर मात्र तिघेही सुसाट निघालो. तिघांचा सूर छान लागला होता.
जवळपास पन्नास किमी अंतर पार होत असताना मला महामार्गालगत एक छानसे उपहारगृह दिसले. महामार्गाला तिरक्या दिशेला असणारे ते उपहारगृह खूप छान दिसत होते. मी फुजीला तिथे वळवले. तिथे बसायला कोणतीही सोय नव्हती. मात्र स्वच्छता होती, टापटीप होती. वातावरण छान होते. तिथे पाहताच येथील पदार्थ चविष्ट असतील असे वाटत होते. सर्वसाधारण दक्षिणात्य नाश्त्याचे पदार्थ तेथील पदार्थसुचीवर दिसले. मात्र त्या सूचीवरील उजवी बाजू बघताच मला कळेना की जिथे फक्त उभे राहून खाण्याची सोय आहे तिथे वातानुकूलित उपहारगृहात असू शकतील असे आकडे का लिहिले आहेत. अर्थातच अश्या अवास्तव किंमती देऊन नाष्टा करण्यात मला रस नव्हता. मी थोड्याशा नाइलाज मिश्रित रागाने तेथून फुजीवर स्वार झालो.
आनंद आणि संजय अजून आले नव्हते. मी पुन्हा फुजीला दौडवणार तोच पुढे अगदी लगेचच महामार्गाच्या डावीकडे एक मोठा ओपन टेम्पो दिसत होता.
तिथे बरेच लोक उभे होते. लांबूनच तिथे दक्षिणात्य खाद्य पदार्थ मिळत असल्याचे जाणवत होते. त्या टेम्पोमध्येच किचन तयार केले होते. त्या टेम्पोला जोडूनच basin साठी नळ ही होता. इडली, डोसा, उत्तप्पा असे पदार्थ उपलब्ध होते. मी पोचल्यावर पाठोपाठ आनंद आणि संजयही आलेच. आमचे पन्नास किमी अंतर विनाथांबा पार झाले होते. त्यामुळे इंधनाची गरज चांगलीच जाणवत होती. आम्ही जठराग्नीला आहुती देत इंधन भरून घेतले. येथील पदार्थ जगात इतर कुठेही मिळणार नाहीत इतके चविष्ट होते. मला तर शक्य असते तर त्याला डोंबिवलीमध्ये दुकानच टाकून दिले असते 🤣.
अजूनही जवळपास १०० किमी अंतर बाकी असल्याने आम्हाला तिथे जास्त थांबणे शक्य नव्हतेच शिवाय हाच वेग आणि सातत्य कायम राखणे गरजेचे होते. मात्र आनंद आणि संजयच्या पोटात इंधन भरले की सायकल पर्यंत ते पोचत नाही. त्यामुळे दोघेही रेंगाळले होते. नंतर मात्र मी थोडा पुढे गेलो.
साधारण दोनेक तास पाय मारून झाल्यावर पुन्हा एकदा इंधनाची गरज जाणवू लागणे स्वाभाविक होते. एखादा धाबा दिसतोय का हे मी शोधत होतो. मात्र बऱ्याच अंतरात काही खायला मिळेना. मग मी प्रोटीन powder आणि दोन लाडू खाऊन घेतले. आंध्र प्रदेशात बऱ्याच अंतरात खायला न मिळणे हा अनुभव सतत येत होता. खरतर त्यासाठीच प्रोटीन पावडर आणि हे भुकलाडू मी बरोबर ठेवले होते. मात्र तो रोजच जेवणाला पर्याय ठरू शकत नव्हता. जेव्हा १४०- १५० किमी अंतर पार करायचे असेल तेव्हा जेवणही छान मिळणे गरजेचे होते. आज मात्र आमचे नशीब जोरावर होते. मी शोधक नजरेने पाय मारत असताना रस्त्याला बरीच मोकळी जागा दिसली. तिथेच आत मध्ये एक धाबा दिसत होता. मी पुढे जाऊन पाहतो तर ' बिहार झारखंड धाबा ' असा फलक दिसला. आंध्र प्रदेशात उत्तर भारतीय धाबा दिसल्याने मला जरा हायसे वाटले. नुसता भात खाऊन माझे समाधान होत नव्हतेच. इथे रोटी, पराठे मिळतील अशी आशा होती. धाब्यावर छानसे फुलके मिळत होते. सोबत मटार पनीरची भाजी होती. मी खुष झालो. मी फुलके आणि नंतर पनीर वर ताव मारत असतानाच आमचे आसाममधील मित्र दिगंत बारुआह आणि जितेंदरसिंगही तिथे आले.
हे दोघेही गेले तीन दिवस आम्हाला वाटेत भेटत होते. तेही सायकलपटू असले तरी सध्या मोटर सायकलने फिरत होते. इथून तिरुपती धनुष्कोडी कन्याकुमारी मुंबई मध्य प्रदेश मार्गाने परत आसामला जाणार होते. थोड्या वेळात आनंद आणि संजयही आले. माझे जेवण आटोपले होतेच. दिगंत आणि जितेंदर थोडी विश्रांती घेऊन पुढे निघाले आणि पाऊस सुरू झाला. अर्थातच आम्हाला आणखी थोडी विश्रांती घ्यावी लागली.
पाऊस संपून निघेपर्यंत ३.४५ वाजत आले होते. आता भास्कराचार्य जेमतेम दीडेक तास साथ देणार होते. त्यामध्ये ४८ किमी अंतर कापायचे होते. त्यामुळे आता आम्हाला निर्धाराने वेग कायम राखत पुढे जावे लागणार होते. मात्र आत्तापर्यंतच्या अनुभवावरून आनंद आणि संजय पोटात इंधन गेल्यावर संथ होणार ह्याची जाणीव होती. त्यामुळे त्यांना वेग घेतलात तर निदान सात वाजेपर्यंत तरी पोहोचू असे सांगितले. मात्र लगेचच लक्षात आले की दोघांनी ते मनावर घेतले नाहीये. खरतर आता किमान २० किमी प्रतितास वेगाने जावे लागणार होते. तरच मध्ये एखादा ब्रेक घेऊन तीन तासात गंतव्य स्थान गाठता आले असते. ते दोघेही वेग घेत नाहीयेत हे लक्षात आल्यावर मात्र मी पुढे निघालो. दोनेक तासात ४८ किमी अंतर कापून शांतपणे हॉटेलच्या रूम मध्ये वाट पहायची ठरवली. कारण आता एखादी अडचण आली तर राखीव वेळ आमच्याकडे नव्हता. मी सायकल चालवत असताना आणखी एक गोष्ट लक्षात येत होती की १५- २० किमी अंतरात छोटेसे खोपटही नव्हते. म्हणजेच अंधार पडायच्या आत आम्हाला जास्तीत जास्त अंतर कापायला हवे होते. अन्यथा अडचणीची वेळ आली तर आम्हाला कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हता. मी साधारण ३० किमी अंतर कापलेही. इतक्यात संजयचा फोन आला की राजूची सायकल पंक्चर झाली आहे. मी त्यांना त्यांचे location विचारले. पाहिले तर ते माझ्यापासून साधारण १० किमी मागे होते. मागच्या १० किमी मधल्या पट्ट्यात मनुष्य वस्तीच दिसली नव्हती. ज्या गोष्टीची भीती होती ती समोर ठाकली होती. त्यांच्यासाठी मागे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे त्यांना एखादा टेम्पो बघायला सांगून मी तोपर्यंत पुढे गाव दिसले की पर्याय शोधतो असे सांगीतले. नशिबाने थोड्या वेळातच एक गाव दिसले. तिथे एक रिक्षा स्टँड होता. मी तिथे पोचल्यावर सगळे रिक्षावाले माझी चौकशी करू लागले. मी त्यांना परिस्थिती सांगितली आणि म्हटले तुम्ही तिथे जाऊन दोघांना सायकलसह कावळी गावात आणून सोडा. कावळी गाव रिक्षा स्टँडपासून जवळपास १०- १५ किमी पुढे होते. तर माझे साथीदार आमच्यापासून १० किमी मागे होते. म्हणजे जी रिक्षा जाईल तिला आधी १० किमी मागे जाऊन तिथून परत २० किमी अंतरावरील कावळी गावात येऊन परत मागे त्यांच्या स्वतःच्या घरी १० किमी असे ४० किमी अंतर कापावे लागणार होते. तेथील रिक्षावाले खरोखरच चांगल्या स्वभावाचे होते. त्यांच्यात थोडी चलबिचल सुरू झाली होती. एकतर संध्याकाळ झाली होती. अंधार सुरू होत होता. त्यात हा दोन सायकल स्वार , दोन सायकली असा लवाजमा घेऊन एकंदर ४० किमी अंतर पार करायचे होते. अर्थात गाव छोटेसे होते म्हणजे तिथे जागही फार उशिरापर्यंत नसावी. मात्र लक्ष्मीनारायण नावाचा रिक्षावाला तयारही झाला. मी आनंद आणि संजय दोघांना फोन करू लागलो. मात्र दोघेही फोन उचलेनात. त्यांना मेसेजही पाठवला. लक्ष्मीनारायणचा संपर्क क्रमांक कळवला. मला पुढे कावळी गावापर्यंत अंधारात एकट्याने सायकल चालवत जायचे होते. रस्त्यात मनुष्यवस्ती असणार नव्हतीच. मी वाटेत जंगल आहे का/ जंगली प्राण्यांचा उपद्रव आहे का ह्याची चौकशी केली. तसे काही नसल्याचे समजताच थोडा निश्वास सोडला. बराच वेळ संजय आणि आनंद फोन मेसेजला उत्तर देत नसल्याने रिक्षावाल्यांना त्या दोघांचा नंबर दिला. आता अंधार सुरू होत होता. मी परत वेग घेतला. कावळी गावाची हद्द सुरू झाल्यावर मला हायसे वाटले. एव्हाना लक्ष्मीनारायणही त्या दोघांना घेऊन निघाल्याचे समजले.
मी थोड्या वेळातच आमची व्यवस्था झाली होती त्या हॉटेलला पोचलो. तिथे आमची व्यवस्था चौथ्या मजल्यावर होती. सुरुवातीला ह्याही हॉटेलमध्ये आमच्या स्वागताचा गोंधळ झाला. मात्र येथील पोलिसप्रमुख क्रांथी सरांनी येथील हॉटेल व्यवस्थापनाला समजावल्यावर माझी व्यवस्था झाली. माझे आवरेपर्यंत लक्ष्मीनारायण दोन्ही सायकली त्यावरचे सजीव आणि निर्जीव luggage घेऊन हॉटेलला पोचला.
लक्ष्मीनारायणने केलेल्या मदतीमुळे आनंद अगदी भारावून गेला होता. त्यानेही लक्ष्मीनारायणला अगदी खूष केले. तसेच आंध्र पोलिसांनी आम्हालाही खूष केले. आज निवासाबरोबर भोजन ही त्यांच्यातर्फे होते. दिवस चांगलाच घडामोडींचा आणि लांबला होता मात्र आंध्र पोलिसांनी दिलेल्या जेवणामुळे आमचा शीण निघून गेला.
आनंद सकाळी जी ईश्वरी योजना म्हणत होता ती नेमकी कोणती हा प्रश्न मला पडला होता!





.jpg)












Mastach
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा