रामकृष्ण मठ येथील चेन्नई येथिल मुक्कामाची सोय होऊ शकते का ह्याबद्दल मी विचारणा केली होती. तेव्हाच श्री रघुनायकानंद स्वामीजींनी मला ज्या ठिकाणी स्वतः विवेकानंद राहिले होते त्या विवेकानंद हाऊस मध्ये तुमची व्यवस्था होईल असे मला कळवले होते. शिकागो येथील धर्म संसदेत विवेकानंद ह्यांच्या ऐतिहासिक सहभागासाठी चेन्नईतील त्यांचे तरुण, उत्साही शिष्य ह्यांचा महत्वाचा वाटा होता. पश्चिमेकडील स्वामीजींच्या चार वर्षांच्या वास्तव्यादरम्यान, ते चेन्नईतील त्यांच्या अनुयायांशी जवळून संपर्कात राहिले. फेब्रुवारी १८९७ मध्ये पश्चिमेकडून परतल्यावर स्वामीजींचे भव्य स्वागत करण्यात आले. त्या काळात, ते आइस हाऊस (आता विवेकानंद हाऊस) येथे नऊ दिवस राहिले. त्याच वास्तूमध्ये रहाण्याचे भाग्य आम्हाला लाभले होते.
सध्या मठा द्वारे साहित्य प्रकाशन, शिक्षण, वैद्यकीय उपक्रम, ग्रामोद्धार् योजना असे अनेक उपक्रम चालवले जातात. मठ परिसरात दोन पुस्तकांची दुकाने आहेत - एक जुन्या मंदिराजवळ आणि दुसरे मुख्य प्रवेशद्वाराजवळ. श्री रामकृष्ण मठ चेन्नईने प्रकाशित केलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त, रामकृष्ण संप्रदायाच्या इतर केंद्रांनी प्रकाशित केलेली असंख्य पुस्तके देखील उपलब्ध आहेत.
आमच्या कोलकाता चेन्नई सायकलप्रवासाची सांगता अशा पवित्र वास्तूमध्ये होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. त्यामुळे आम्ही कृतकृत्य झालो होतो.
अर्थातच पहिल्या रात्री माझा चेन्नई येथील मित्र रवी ह्याच्यातर्फे आम्हाला मेजवानी होती. तो त्याची चारचाकी गाडी घेऊन आम्हाला घ्यायला आला. चेन्नईच्या माउंट रस्त्यावरील प्रसिद्ध बुहारी ह्या हॉटेलमध्ये रवीने आम्हाला नेले.
हे हॉटेल जवळपास ७४ वर्ष जुने आहे. तेथील मेजवानीचा आस्वाद घेतल्यावर मला फायर पानाचा मोह आवरला नाही. रवी आणि माझी खरेतर ही फक्त दुसरी भेट! मात्र त्याचे आदरातिथ्य आमची लहानपणापासूनची मैत्री असावी असेच होते. गप्पा आवरत नव्हत्या. मात्र आम्ही कोणत्या हॉटेलमध्ये नव्हे तर विवेकानंद केंद्र इथे राहणार होतो. त्यामुळे उशिरा परत पोचून चालणार नव्हते.
रवीने आम्हाला परत विवेकानंद केंद्र इथे सोडले. रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा मुक्काम मैलापूर येथील रामकृष्ण मठ येथे हलवला. आम्हाला रामकृष्ण मठ येथे जी वास्तू फक्त स्वामी, साधू ह्यांच्याकरिता राखून ठेवलेली असते तिथे राहण्याची संधी मिळाली. तिथे चहा, नाष्टा, जेवण ह्यांचीही सोय करण्यात आली होती. येथे एक भव्य ग्रंथालय देखील आहे. त्या ग्रंथालयाचा कारभार ज्या स्वामींकडे आहे, ते मराठी बोलू शकतात असे कळले. आम्ही आवर्जून त्यांची भेट घेतली. त्यांनाही आम्हाला भेटून आनंद झाला.
सायकली परत रेल्वेने पाठवून आम्ही आणखी एक दिवस जीवाची चेन्नई करून घेतली. परतीचा प्रवास हवाई मार्गाने करत पुन्हा मुंबई गाठली.












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा