अब्दूलला आम्हाला रघुनाथगंज दाखवायचे होते. खरतर तो आग्रह करत होता की आम्ही आणखी एकदोन दिवस रहावे. त्याच्याबरोबर त्याच्या आई वडिलांना भेटायला जंगीपूरलाही यावे. पण आम्हाला ते शक्य नव्हते. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरात लवकर आम्हाला निघायचे होते. संध्याकाळच्या थोडक्या वेळात त्याने जमेल तेवढे रघुनाथगंज आम्हाला दाखवायचे ठरवले.
आम्ही फिरायला बाहेर पडलो. अब्दुल आणि माझ्या गप्पा सुरू होत्याच. बंगाली, मराठी शब्दांच्या गमतीजमती आम्ही एकमेकांना सांगत होतो. ' आई ' .... माँ ला मराठीत आई म्हणतात ना! तो मला विचारत होता. मी म्हटले हो, पण तुला कसे माहित! अब्दूलने मला सांगितले होते की तो बंगालच्या बाहेर अद्याप गेला नव्हता. तो म्हणाला चित्रपटात मी पाहिले आहे. त्यानंतर बंगाली आणि मराठीतील काही जवळपास असणारे शब्द आम्ही एकमेकांना विचारत आणि सांगत होतो.
दरम्यान मी अब्दुल आम्हाला बाजारात घेऊन गेला. त्याने आम्हाला दरबेशपारा येथील नियोगी टिफीन स्टोअर मध्ये नेले. हे तेथील खवय्यांचे खास ठिकाण होते. तिथे गेल्यावर ठाण्यातील मामलेदार मिसळ अथवा पुण्यातील डेक्कन पाशी असलेल्या आप्पांच्या उपहारगृहाची आठवण होत होती. त्या उपहारगृहामध्ये फारतर चार पाच टेबल असावी. मात्र तिथे चांगलाच राबता होता. तेथील कचोरी खूपच छान असल्याचे आम्हाला सांगितले. खरोखरच कचोरी अप्रतिम होती. आम्ही खात असतानाच तिथे जिलबीचा घाणाही काढला जात होता. अब्दूलने आम्हाला येथील जिलेबी खाण्याचाही आग्रह केला. जीभ चाळवली होतीच. आम्ही लगेचच जिलेबीवर आडवा हात मारला.
तिथून तो आम्हाला नदीकाठावर घेऊन गेला. तिथे आरती सुरू होती. आम्हाला त्याने नदीचे दर्शन घडवले. तिथे मिळणारे खाद्यपदार्थ त्याला आम्हाला खाऊ घालायचे होते. नदीजवळील सुभाष दीप च्या ' चा ठेक ' पाशी आम्ही आलो. चहा तर हवा होताच. ' चा ठेक' मध्ये फर्मास चहा मिळाला. आमची भ्रमंती सुरू होती त्याबरोबर खादंती सुद्धा सुरू होती.


अब्दूलने आमचा पाहुणचार त्या एका संध्याकाळीच व्यवस्थित आणि यथायोग्य करायचा चंग बांधला होता. तिथून आम्ही परत एकदा बाजारात बालीघाटा रस्ता येथे गेलो. रस्ता चिंचोळा होता. थोडाफार अंधारही होता. रस्त्यावर फार गर्दी नव्हती. इतक्यात एक दुकान दिसले...बादल चंद्रा घोष स्वीट शॉप! दुकान साधेसुधे होते. तेथील पदार्थात वैविध्य होते. अब्दूलने आम्हाला येथील मिठाई खाण्याचा आग्रह केला. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रसगुल्ले होते. ते पाहून माझ्या तोंडाला चांगलेच पाणी सुटले. आम्ही तीनचार प्रकारचे रसगुल्ले मटकावले. मनोज स्वतः रसगुल्ले खायचा नाही. मात्र मला आग्रह करायचा. मी त्या आग्रहाला आनंदाने बळी पडायचो. मनोजला मिष्टी दोही हवे होते. त्याने त्याचीही चांगलीच तारीफ केली. मग मला आणि संजयला मिष्टी दोही घेणे तर क्रमप्राप्तच होते. बंगाल मध्ये रसगुल्ले आणि मिष्टी दोही न खाणारा अरसिकच म्हटला पाहिजे.


आता आम्ही परत अब्दुलच्या घराकडे वळलो. तो म्हणत होता आता आपण जेवण करू आणि मगच घरी जाऊ. दुपारी जेवण मिळत नव्हते आणि आता तर पोटावर अत्याचार सुरू होते. आम्ही त्याला म्हटले आत्ता एवढे खाणे झाले आहे आता इतक्यात तरी जेवण जाणार नाही. त्याबरोबर तो आम्हाला एक मैदानाकडे घेऊन गेला. तिथे एक बंदिस्त बॅडमिंटन कोर्टही होते. तिथेही आम्ही थोडा वेळ काढला. आमचे पोट मात्र तुडुंब भरलेले होते.
अब्दूलने आमचा उत्तम पाहुणचार केला होताच, रघुनाथगंमधील तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ खायला घातले होते. मात्र त्याने फार खाल्ले नव्हते. आम्ही विचार केला की आमच्याबरोबर तो ही जेवेल. त्यामुळे आम्ही त्याच्याबरोबर कुंडू हॉटेलमध्ये गेलो. ही एक खानावळ होती. अब्दूलने आमच्याकरता थाळीची ऑर्डर केली. तीनच थाळी आल्या. अब्दूलने फक्त आमच्यासाठी जेवण मागवले होते. ही त्याची नेहमीची मेस नव्हती. तो स्वतः त्याच्या नेहमीच्या मेसमध्ये जेवायला जाणार होता. आम्हाला ह्याची कल्पनाच नव्हती. थाळी मध्ये फक्त भात होता.... तोही डोंगराएवढा! आमचे पोट तर आधीच तुडुंब भरलेले होते. लाजेखातर थोडा फार भात खाणे क्रमप्राप्त होतेच. तो खाल्ला जावा म्हणून मी आणि मनोजने मासे मागवले. पण आमचे पोट भातही नाकारत होते आणि मासेही. पोटाला दामटवत आम्ही मासे संपवले. मात्र तो भात अर्धाही संपवता येत नव्हता. खरतर तिघांसाठी मिळून एकच थाळी मागवली असती तरी चालले असते. आम्ही पूर्ण शरणागती पत्करली.
तिथून आम्ही अब्दुलच्या वसतिगृहाकडे निघालो. मला जिरे घ्यायचे होते. पण त्याला हिंदी किंवा इंग्रजीत काय म्हणतात ते मला माहित नव्हते. बंगाली मध्ये त्याचे भाषांतर काय असेल ह्याची तर सुतराम कल्पना नव्हती. आम्ही घरातून निघाल्यापासून जिऱ्याला हिंदी इंग्रजीत काय म्हणतात ते आठवत होतो. अखेरीस मी अब्दूलला म्हटले मला जो पदार्थ घ्यायचा आहे तो किराणा दुकानात मिळतो, तो बडीशेप सारखा दिसतो. त्याला लक्षात येईना. मग मी गुगल करून त्याला फोटो दाखवला. त्यासरशी अब्दुल लगेच म्हणाला...' जीरा!'. मी डोक्याला एवढा ताण देऊन अब्दूलला जीरा हवय हे कसे सांगायचा ह्याचा विचार करत होतो. आणि... जिऱ्याला बंगालीतही जीरा म्हणत असतील ह्याचा विचारच केला नव्हता. घरातून निघाल्यापासून मी आणि अब्दूलने मराठी बंगालीत साम्य असलेले काही शब्द आठवून एकमेकांना सांगितले होते. त्याची मजा घेतली होती. मात्र जिऱ्याने माझी चांगलीच फिरकी घेतली होती.
आम्ही घरी आलो. बहुधा आम्हाला मोकळीक मिळावी म्हणून तो शेजारी त्याच्या मित्राकडे झोपायला गेला. काय नाते होते आमचे आणि अब्दुलचे! आम्ही ह्या आधी कधी भेटलो नव्हतो, परत कधी भेटू माहित नाही. मात्र आमचे नाते जोडले गेले ते कायमचे. भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील अब्दुल आणि पश्चिम किनाऱ्यावरील आम्ही ह्यांचे बंध कायमसाठी बांधले गेले. Cuouchsurfing च्या माध्यमातून असे अनेक अनोळखी लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांप्रमाणे आपला पाहुणचार करतात किंवा आपणही तसे कोणाला आमंत्रित करू शकतो. ह्यातून मिळणारा आनंद पैशाने विकत घेता येत नाही.
👍
उत्तर द्याहटवा