रविवार, ८ नोव्हेंबर, २०२६

मेजवानी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३२

कोलकाताच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता गुवाहाटीच्या हिरव्यागार आणि निसर्गरम्य उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता. नलबारी शहरातील काल रात्रीची गजबज आणि गोंधळ आज सकाळी नव्हते. मोहिमेतील अखेरच्या दिवशी असलेले अंतरही कमी होते. त्यामुळे आम्हीही जरा शांतपणे आवरत होतो.

सकाळी चहासाठी आम्हाला शोधाशोध करावी लागली नाही. आम्ही राहत असलेल्या लॉजच्याच तळमजल्यावर उपहारगृहात आम्ही चहा घेतला. त्याच उपहारगृहात सायकली उभ्या करुन त्यावर सामान लादले. आम्ही शांतपणे आणि अगदी संथपणे आवरत होतो. हॉटेलमधील कर्मचारी, ग्राहक आमची विचारपूस करत होते. त्यांच्याशी गप्पा मारत आम्ही सायकली सज्ज केल्या. शेवटच्या दिवशी पाय थोडेसे संथ मारले जातात हा अनुभव आधीच्या सायकलसफरीमध्ये मला नेहमीच आला आहे. मात्र आज आम्ही सुरुवात केली तीही अगदी संथपणे. आम्ही जवळपास ८ वाजता सायकलवायला सुरुवात केली.

तिघांच्याही सायकलींना गती मिळत नव्हती. मनोजदेखील आज अगदी आरामात पाय मारत होता. संजय त्याच्याबरोबर होताच. मी थोडी आघाडी घेतली. माझाही वेग फार नव्हताच. आमची सायकल पुढे जात असताना थोड्या थोड्या अंतरावर No.1 Bajwi Hotel & Dhaba पुढे असल्याचे फलक दिसत होते. त्या हॉटेलबद्दल थोडे कुतूहल वाटू लागले होते. थोड्या वेळातच भूकही लागली. त्या हॉटेलच्या जवळ आलो असे वाटत असताना ते माझ्या नजरेस पडत नव्हते. इतक्यात रस्त्याच्या बाजूला एक छोटे दुकान कम रेस्टॉरंट दिसले. तिथे चौकशी केली तर तिथे खायला काहीही नव्हते. मात्र त्या दुकानदाराने सांगितले पुढे अगदी जवळच एक हॉटेल आहे. पाय मारावे लागणार होतेच. अक्षरशः हाकेच्या अंतरावरच मला हवा असलेला No.1 Bajwi Hotel & Dhaba फलक दिसला. रस्त्याच्या डाव्या बाजूला थोडे आत एक हॉटेल दिसत होते. 


मनोज, संजय तिथे येताच आम्ही आत शिरलो. एव्हाना २५-२७ किमी सायकलवून झाले होते आणि साडेनऊ वाजले होते. जठराग्नी चांगलाच प्रदीप्त झाला होता. आमचे लक्ष भिंतीवर लावलेल्या मेनुकडे गेले. त्याबरोबर दहा दिवस सायकल चालवत इथे पोचल्याबद्दल आणि आज सकाळी नाश्त्याला थेट इथे आल्याबद्दल आनंद झाला. खरं पाहता जवळपास ५० लोक बसू शकतील अश्या ह्या उपहारगृहात आम्ही सोडून इतर कोणीही ग्राहक नव्हते. उपहारगृह मात्र अतिशय स्वच्छ होते. मुंबई मध्ये कुठेही न पाहिलेले दोन पदार्थ मला पदार्थसुची मध्ये दिसले. ते पाहताच माझ्या जिभेला चांगलेच पाणी सुटले. 






मुंबईचं काय पण मी भारतात आत्तापर्यंत जेवढा फिरलो त्यापैकी कुठेही हे दोन पदार्थ मला पाहायला मिळाले नव्हते. मी मनोजला विचारले. तोही तयार झाला. मी लगेचच ऑर्डर दिली.... पोर्क प्लेट आणि डक प्लेट!



दोन्ही पदार्थ अतिशय चविष्ट होते. मला वाटले होते की डक मऊ असेल आणि पोर्क त्यापेक्षा चावायला कठीण असेल. मात्र अगदी उलट होते. डक उत्तम शिजल्याने छान लागत होतेच मात्र पोर्क तर अगदी लुसलुशीत लागत होते... जणू खरवसच! माझ्या रसनेची तृप्ती झाली होती. मात्र ही मेजवानी मुंबईत सहजपणे मिळणार नाही ह्याची जाणीव अस्वस्थ करत होती. आम्ही जवळपास तासभर तिथे थांबलो आणि मनसोक्त पोर्क आणि डक खाऊन घेतले. 

त्यानंतरही आम्ही अगदी आरामात सायकल चालवत होतो. मनोज शक्यतो पहिले १० किमी संपले की आघाडी घ्यायचा, जेवणानंतर आघाडी मी घ्यायचो. तसा नियम काही केला नव्हता. मात्र आज शेवटच्या दिवशी मनोज जाणीवपूर्वक मला  आघाडी घ्यायला देत होता. मला क्रिकेट ग्राउंड वर एखाद्या कसलेल्या फलंदाजाने कर्णधाराला प्रथम सीमारेषा ओलांडण्याचा मान दिल्यासारखे वाटले. तो खरतर माझ्यापेक्षा ८ वर्ष मोठा. मात्र सफरीचा आयोजन माझे होते त्यामुळे त्याने मला आज समाप्तीच्या क्षणी तो मान दिला असावा. गोवा कन्याकुमारी सफरीत मी सगळे दिवस २५ जणांच्या समुहात पुढे असायचो. मात्र शेवटच्या दिवशी आज सफर संपणार ह्या जाणिवेने मी शेवटचा राहिलो होतो. मनोजमुळे मला ह्या गोष्टीची आठवण येत होती.

आज फोटो/ विडिओ काढण्याची फार इच्छाही होत नव्हती. वेग फार न घेता आम्ही सायकलवत होतो. बारा वाजण्याच्या सुमारास आम्हाला एक चांगले हॉटेल दिसले. परत गुवाहाटीपर्यंत इतके चांगले हॉटेल दिसले न दिसले तर... ह्याचा विचार करत आम्ही आत शिरलो. आमच्या सायकली, वेष पाहून ह्या हॉटेलमध्येही आमची विचारपूस केली गेली. आमचा उद्देश, कापलेले अंतर ह्याबद्दल आमचे कौतुक करत तेथील लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या.





तासाभरातच आम्ही गुवाहाटी शहराचा निर्देश करणाऱ्या नामफलकापाशी पोचलो. सूर्यनारायण जणू आमची मोहीम फत्ते झाल्याबद्दल आमचे अभिनंदन करण्यास त्या नामफलकापाशी आला होता. आम्ही गुवाहाटीच्या सीमारेषेवर होतो मात्र अजून गुवाहाटी शहर गाठायचे होते. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...