शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२६

समृध्द संपन्न आसाम: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३१

आसाम म्हणजे केवळ पर्वत, नद्या/ महानद्या नव्हे. येथील भूगोलाप्रमाणेच येथील इतिहासदेखील समृद्ध आहे. आसाममध्ये प्रवेश करत असल्याची जाणीव झाल्यापासून मी शोधत होतो आसामच्या शिवाजीला....लाचित बारफुकुनला. औरंग्याच्या क्रूर राजवटीला जसा शिवाजी महाराजांनी विरोध केला तसाच विरोध त्याला आसाममध्ये केला आहोम राजांनी. लचित बरफुकून हा त्याचा सेनापती. 

त्या रिक्षावाल्याचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा सायकलवायला लागलो. मी आसामच्या इतिहासाचा शोध घेत होतो. त्याच्या पाऊलखुणा शोधत होतो. आम्ही थोड्याच वेळात  महामार्गालगत वसलेल्या सरभोग शहराच्या चौकात पोचलो. तिथे गजबज दिसत होती. लांबूनच घोड्यावर बसलेल्या एका स्वाराचे शिल्प तिथे दिसले. मी उत्सुकतेने तिथे पोचलो. त्या स्वाराची काही माहिती तिथे लिहिली आहे का हे पाहिले. मात्र ती माहिती आसामी भाषेत होती. मला प्रथम वाटले हे शिल्प लाचित बरफुकुन ह्यांचे असावे. 


मात्र हे शिल्प होते आसाममधील 'बीर चिला रॉय' किंवा 'शुक्लध्वज' यांचे. ह्यांचे मूळ नाव शुक्लध्वज असे होते. शत्रूंवर हल्ला करताना ते एखाद्या घारीप्रमाणे (ज्याला स्थानिक भाषेत 'चिल' किंवा 'चिला' म्हणतात) ) अत्यंत वेगवान आणि अचूक असत, म्हणूनच बीर चिलराय हे नाव पडले. त्यांच्या अत्यंत वेगवान लष्करी रणनीतींमुळे त्यांना 'काइट प्रिन्स' (गरुडासारख्या चपळ राजकुमार) म्हणूनही ओळखले जात असे.  हा १२ फूट उंच कांस्य पुतळा प्रसिद्ध आसामी शिल्पकार बिजु कुमार दास यांनी घडवलेला आहे. या भव्य शिल्पात, १६ व्या शतकातील हा महान सेनानी मागच्या पायांवर उभ्या असलेल्या घोड्यावर स्वार होऊन पूर्ण युद्धवेषात हातात पारंपरिक वक्र तलवार ('दाव') उगारून  शत्रूवर चाल करून जात असल्याचे दर्शवण्यात आले आहे. दाखवण्यात आले आहे.
शुक्लध्वज अथवा बीर चिलराय (१५१० ते १५७१) हे १६ व्या शतकातील एक दिग्गज सेनापती आणि कामता राज्याच्या (सध्याचा आसाम तसेच पश्चिम बंगाल, बांगलादेश आणि नेपाळचा काही भाग) कोच राजवंशातील एक राजपुत्र होते. त्यांनी त्यांचे थोरले बंधू, महाराज नर नारायण यांच्या अधिपत्याखाली लष्करी दलांचे सरसेनापती म्हणून काम केले. या दोन बंधूंनी मिळून आपल्या राज्याचा विस्तार एका विशाल साम्राज्यात केला, जो काळ कोच राजवंशाचा सुवर्णकाळ मानला जातो.
त्यांच्या नेतृत्वाखाली कोच सैन्याने शेजारील शक्तिशाली राज्यांविरुद्ध यशस्वी युद्धे केली. त्यांनी अहोम राज्याची राजधानी 'गरगाव' जिंकून घेतली; तसेच कचारी, मणिपूर, जयंतिया, त्रिपुरा आणि सिल्हेट ही राज्ये कोच सत्तेच्या अधिपत्याखाली आणली किंवा त्यांना खंडणी देण्यास भाग पाडले. 

सैन्याची जलद हालचाल सुलभ व्हावी म्हणून, चिलराय यांच्या कल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली 'गोहाईं कमल अली' हा ऐतिहासिक रस्ता बांधला गेला. त्या काळातील लष्करी वाहतुकीच्या दृष्टीने ही एक मोठी कामगिरी होती. आयुष्याच्या उत्तरार्धात, त्यांनी सुलेमान कर्रानीच्या नेतृत्वाखालील बंगाल सल्तनतविरुद्ध मोहीम आखली. अत्यंत शौर्याने लढूनही, त्यांना सुलतानचा सेनापती 'कालापहाड' याने काही काळासाठी कैद केले होते.

चिलराय केवळ एक योद्धाच नव्हते, तर ते एक सुशिक्षित राज्यकर्ते आणि कला, संस्कृती व धर्माचे पुरस्कर्तेही होते. त्यांनी महान संत आणि समाजसुधारक श्रीमंत शंकरदेव यांना आश्रय दिला, राजकीय संरक्षण दिले आणि त्यांना मोठा आर्थिक आधारही दिला. या महत्त्वपूर्ण पाठिंब्यामुळेच आसाममध्ये 'एकशरण नामधर्म' या सांस्कृतिक पुनर्जागरणाची चळवळ सुरक्षितपणे बहरली.  कालापहाडच्या सैन्याने केलेल्या विध्वंसक आक्रमणांनंतर, चिलराय आणि त्याचा भाऊ नर नारायण यांनी नीलाचल टेकडीवरील पवित्र कामाख्या मंदिराचे पूर्णपणे पुनर्निर्माण करून त्याचा ऐतिहासिक मूळ ढाचा पुन्हा उभा करण्याची जबाबदारी स्वीकारली.

आसामी अस्मिता आणि राज्य निर्मितीमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी, आसाम सरकार दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी त्यांची जयंती 'वीर चिलराय दिवस' म्हणून साजरी करते. हा दिवस संपूर्ण राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो आणि सरकार आधुनिक काळातील शौर्याचा गौरव करण्यासाठी प्रतिष्ठित 'वीर चिलराय पुरस्कार' प्रदान करते. 

लचित बरफुकन यांचा काळ हा सतराव्या शतकातील. तोपर्यंत प्रादेशिक संघर्षाचे स्वरूप बदलले होते. अहोम राज्यासमोर आता विस्तारवादी मुघल साम्राज्याचे बाह्य संकट उभे ठाकले होते. अहोम सैन्याचे सेनापती म्हणून लचित बोरफुकन यांनी १६७१ मध्ये ऐतिहासिक 'सराईघाटच्या लढाई'त मुघल नौदलाचा पराभव केला.

आज, इतिहासाच्या स्मृतीमध्ये हे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून, आसामच्या इतिहासातील दोन महान राष्ट्रीय नायक आणि लष्करी प्रतिभावंत म्हणून त्यांना समान आदराने गौरवले जाते.

ह्या वीर सेनानीला नमन करून मी पुन्हा सायकलवायला लागलो. एव्हाना १०.३० वाजून गेले होते. आसाममधील ही मध्यांनाची वेळ. अर्थातच सूर्य डोक्यावर आला होता. आमचे जवळपास ४२ किमी अंतर पार झाले होते. आजही शतकी दौड करायची होती. त्यामुळे आम्ही पुढे दोनेक तास सलग पेडल मारत राहिलो. अखेर एका धाब्यावर जाऊन विसावलो. 


तिथे पोचताच आमची विचारपूस सुरू झाली. इथेही आमच्या मोहिमेबद्दल लोकांना जाणून घ्यायचे होतेच. आम्ही जेवणाची ऑर्डर देऊन जरा निवांत बसलो होतो. जेवणही छान मिळाले होते. 


जठराग्नी शांत होताच मनोजने शेजारील बाकड्यावर मस्तपैकी ताणून दिली. संजय मात्र बसल्या खुर्चीवरच निद्रादेवीची आराधना करत होता. माझी इच्छाही मनोजप्रमाणेच आडवे होण्याची होतीच. माझ्या डोक्यातील वेळ आणि अंतराचे गणित बाजूला ठेवत मीही मनोजशेजारील बाकड्यावर आडवा झालो. 

तासभर विश्रांती घेतल्यावर मात्र आम्ही त्या धाब्याचा निरोप घेतला. आता जलद गतीने जाणे भाग होते. आणखी तीनेक तासात सूर्यास्त अपेक्षित होता तर जवळपास ६० किमी अंतर बाकी होते. आमच्या सरासरी गतीने आजही तासभर सूर्यास्तानंतर सायकलवायला लागणार होते. मात्र ती आम्ही घेतलेली निवांत विश्रांती आम्हाला हवीच होती. पुरेशी विश्रांती झाल्यावर आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो होतो. वाटेत शाळेतील मुले दिसताच आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत, सेल्फी घेत/ देत होतो.


अडीच वाजता सूर्य डोक्यावरून खाली येत क्षितिजाच्या दिशेने सरकला होता. मात्र अजून दोन तास तरी तो आम्हाला साथ देणार होता. महामार्गालगत सातत्याने भूतानकडे जाणारे रस्तेही आम्हाला दिसत होते. किंबहुना आमचा मार्ग हा भूतानच्या सीमारेषेला समांतर असाच होता.


सकाळपासूनच आज रस्त्यावरून बरेच मोटारसायकलिस्ट जाताना दिसत होते. आम्ही एकमेकांना अंगठा उंचावत प्रोत्साहन देत होतो. त्यापैकी एक मोटरसायकलिस्ट आमच्यापाशी थांबला. त्याने आमची विचारपूस केली. आम्हीही त्याला विचारले की आज इतके मोटरसायकलिस्ट का दिसत आहेत. त्याने आम्हाला सांगितले की अरुणाचल प्रदेश मध्ये मोटरसायकलिस्टचे  अखिल भारतीय संमेलन आहे. देशभरातील ३००० हून अधिक मोटारसायकलिस्ट तिथे येत आहेत. आमची मोहीम ऐकून ते खुष झाला. आठवणभेट म्हणून त्याने मला एक सन्मानचिन्ह दिले.

आम्ही नलबारी येथे पोचेपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. इथे आमची राहण्याची सोय शोधायची होती. संदीपने आम्हाला एका लॉजचे नाव सांगितले होते. गुगलबाबांची मदत घेत आम्ही निघालो. महामार्ग सोडून एका चिंचोळ्या रस्त्याला लागलो. पुढे थोडा प्रशस्त रस्ता दिसला खरा. मात्र त्या रस्त्यावर मंडप घातलेला होता. लोकांचा जथ्था आतबाहेर ये जा करताना दिसत होता. आम्ही पायउतार होत लोकांच्या मागून त्या गर्दीतून पुढे जायचे ठरवले. रस्त्याच्या मध्यभागी लोक चालत होते तर दोन्ही बाजूला वेगवेगळे स्टॉल लागलेले दिसत होते. तो रस्ता तंबूने वेढलेला होता. त्यातून कसाबसा मार्ग काढत आम्ही एका पुलापाशी पोचलो. गुगलबाबांच्या मदतीने पुलावरून संदीपने सांगितलेल्या हॉटेलपाशी पोचलो. ते हॉटेल एका चौकात किंबहुना एका तिकाण्यावर होते. आम्ही पोचलो तर प्रवेशद्वार बंद दिसले. रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. त्या बंद असलेल्या लॉजच्याच समोर छोट्याशा जागेत आम्ही सायकली उभ्या केल्या. शेजारील दुकानात चौकशी करता समजले की इथे रास मेला नावाचा दोन सप्ताह चालणारा उत्सव सुरू असल्याने प्रचंड गर्दी आहे. आजच मी रासमेलाचा शेवटचा दिवस होता.

नलबाडी रास महोत्सव हा आसाममधील नलबाडी (नलबारी) येथील 'श्री श्री हरी मंदिरात' १९३३ पासून साजरा केला जाणारा एक प्रमुख वार्षिक सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव आहे. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि 'रासलीला' परंपरेला समर्पित आहे. यात आसामसह आसपासच्या प्रदेशांतून लाखो पर्यटक आणि भाविक सहभागी होतात. हा उत्सव साधारणपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ११ ते १३ दिवसांपर्यंत साजरा केला जातो. ह्या उत्सवात भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांवर आधारित, अत्यंत बारकाईने घडवलेल्या आणि मानवी आकाराच्या मातीच्या मूर्ती पाहायला मिळतात. तसेच आसाम मधील प्रसिद्ध फिरत्या नाट्यसंस्थांद्वारे शहराच्या विविध भागांत उभारलेल्या मंचांवर होणारे सादरीकरण पाहता येते. पारंपरिक 'भाओना' नाटके, शास्त्रीय व लोकनृत्य, भक्तिसंगीत आणि कलाकारांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या प्रमाणावर व्यापार मेळे, हातमाग व हस्तकलेचे स्टॉल्स, पुस्तक प्रदर्शने आणि स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आयोजित केले जातात. आम्हाला मात्र ह्यापैकी कशातही रस नव्हता. आम्हाला हवी होती विश्रांती!

आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहायचे ठरवले होते त्या हॉटेलमधील कामगारांवर गेल्या १२-१३ दिवसात कामाचे प्रचंड ओझे पडले म्हणून नेमका आज तो लॉज बंद असल्याचे समजले. सुदैवाने तिथेच समोर तिरक्या दिशेला अजून एक लॉज होता. मी आणि सायकली तिथेच थांबलो. संजय आणि मनोज त्या लॉजची चौकशी करून आले.  तिथे आम्हाला जागा तर मिळालीच शिवाय तळमजल्यावर त्यांचेच मोठे राजस्थानी उपहारगृह होते. तरीही आम्ही सायकली, सामान ह्यांची व्यवस्था लावून थोडे फ्रेश होऊन दुसरे काही उपहारगृह आहे का हे शोधायला बाहेर पडलो. मात्र एकही उपहारगृह सुरू दिसेना. जी उपहारगृह सुरू होती ती बंद होत होती. आम्ही घाईघाईने आमच्या लॉजच्याच उपहारगृहात परत आलो. ते मात्र सुरू होते. जेवणही समाधानकारक होते. 

मात्र विशेष समाधान ह्याचे होते की आज एकाच दिवशी आम्हाला आसामचे ऐतिहासिक वैभव (बीर चिलराय) आणि सांस्कृतिक वैभव (नलबारी येथील रासमेळा) अनुभवायला मिळाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...