मंगळवार, २२ मे, २०१८

We Can Do It

चार दिवस सलग सुट्टी असल्यामुळे श्विनचे टायर फुरफुरू लागले होते. सायकलिंग सुरु करून तीन- चार महिने झाल्यामुळे स्कॉटलाही एकदा मोठा पल्ला गाठायचा होता. अखेरीस श्विन- स्कॉटने 'डोंबिवली तळेगाव' मोहीम करायचे ठरवले.

वैशाख महिना सुरु असल्यामुळे रविराज लवकर हजेरी लावत होते. त्याचाच फायदा घेत श्विन - स्कॉटने पहाटेच्या प्रहरी कूच केले. डोंबिवली पूर्वेला पोचताच समोरून डोंबिवली सायकल क्लबचे चे सदस्य भीमाशंकर बिराजदार येताना दिसले. एकमेकांना अभिवादन करून आम्ही आपापल्या मार्गाने पुढे निघालो. रस्त्यावर फारशी वर्दळही सुरु झाली नव्हती. चार रस्ता, मानपाडा रस्ता मार्गे श्विन- स्कॉटने शिळकडे जाणारा महामार्ग पकडला.

शहराबाहेर पडल्यावर वेगही वाढला होता. स्कॉट पुढे आणि श्विन मागे अश्या क्रमाने दोघेही भरधाव निघाले. शिळफाटा, तळोजा पार करत पनवेल कधी आले ते कळलेही नाही. नेहमीप्रमाणे पळस्पे फाटा येताच श्विनने पहिला विसावा घेतला. श्विनला मनुष्यशक्तीच्या इंधनाचा अविरत पुरवठा सुरु राहण्यासाठी मला क्षुधाशांती करावी लागणार होती. इडली सांभार वर ताव मारून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. पनवेल ते खोपोली हा रस्ता श्विनला नेहमीच आवडतो. पळस्पे फाटा येईपर्यंत ४० किमी अंतर पार झाल्याने पायही मोकळे झाले असतात, शिवाय पुढे रस्ता रुंद असल्याने वेगही सहजपणे वाढवता येतो. वाटेत निरापान करून खोपोली गाठले तोपर्यंत सूर्यही रंगात आला होता. मात्र श्विन- स्कॉटला त्याची तमा नव्हती.

पुढील घाट लक्षात घेता श्विनने पुन्हा मनुष्यशक्तीचा पुरवठा कमी पडू नये म्हणून आवश्यक कच्चा माल भरायचे ठरवले. खोपोली येथील बस स्थानका कडून रेलस्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एक उपहारगृह डोंबिवली सायकल क्लबच्या सदस्यांनी श्विनला आधीच दाखवले होते. तिथे पुन्हा इडली सांभारचा कच्चा माल भरून घाटामध्ये मनुष्यशक्तीचे इंधन कमी पडणार नाही याची श्विनने खात्री करून घेतली. सारंग मुळ्ये, योगेश चौघुले, प्रितेश या DCC सदस्यांचे हे आवडते हॉटेल. तेथे मनसोक्त ताव मारून झाल्यावर श्विन स्कॉट घाटरस्त्याकडे वळले.

अवघ्या तीन महिन्यापूर्वी सायकलजगतात प्रवेश केलेल्या स्कॉटची आता खरी कसोटी होती. स्कॉटला दोन्ही गियर १-१ वर आणण्याची सूचना देत श्विननेही गियर कमी केले. घाट सुरु होताच थोड्या वेळातच स्कॉटने पायउतार होण्याचा निर्णय घेतला. श्विनला याची कल्पना होतीच. एका झाडाजवळ विसावा घेण्याचा स्कॉटचा विचार होता. स्कॉटने रस्त्याच्या कडेला असलेल्या कट्ट्याला टेकत विसावा घेतला खरा. पण त्या कट्टयामागे दरीच्या दिशेने गेलेल्या फांदीवर एक हुँप्या बसला होता. स्कॉटची त्याकडे पाठ होती. मात्र श्विनने मात्र त्या हुँप्याला बघितले होते. स्कॉट त्या हुँप्याच्या एका झेपेच्या अंतरात होती. मात्र त्या हुँप्याचे स्कॉट श्विनकडे विशेष लक्ष नव्हते. त्याचा अंदाज घेत श्विनने त्याला कॅमेराबद्ध करण्याचे ठरवले. मात्र ते बघताच एक बालवयातील मर्कटाला मात्र तो विचार फारसा आवडला नाही. लांबवर उड्या मारत ते बाळ त्या हुँप्याच्या जवळ येऊन बसले. त्याचा इरादा काही चांगला वाटत नव्हता. स्कॉटला सावध करत श्विनने हुँप्याला कॅमेराबद्ध करणे सुरूच ठेवले. बालमर्कट मात्र त्याचे दात विचकत श्विन स्कॉटकडे पाहू लागले. श्विनने तो शांत बसलेला हुँप्या आणि उंचीपेक्षा जास्त रागावून दात विचकणाऱ्या बालमर्कटाला कॅमेराबद्ध केले. बालमार्कट अधिकच चेकाळु लागले हे पाहताच श्विनने स्कॉटला सावध करत चटकन पुढे जायला सुरुवात केली.

टाटा सायमाळ इथे मिळणारा वडापाव आणि चहा घेण्यासाठी विसावा घेणे हा श्विनचा आवडता टप्पा. तिथे भूक नसली तरी श्विन वडापाव आणि चहा नक्कीच घेत असे. त्या निमित्ताने थोडावेळ विश्रांती घेऊन श्विन स्कॉट पुढे निघाले. आता पुढचा टप्पा होता शिंग्रोबा मंदिर. स्कॉटने मात्र तिथपर्यंत पायी चालत जायचा निर्णय घेतला. घाटाचा पहिलाच अनुभव असल्याने ते स्वाभाविकच होते. श्विन मात्र घाट चढण्याची मजा घेत होती. श्विन खालील गियर टाकून चालत येणाऱ्या स्कॉटच्या गतीने पुढे जात होती. मध्येच श्विनने पॅडल मारत पुढे जाऊन उतारावरून परत स्कॉटपर्यंत येणे सुरु केले. अश्या पुढे मागे फेऱ्या मारत घाट चढणे श्विनला आणखीच आवडू लागले.

पनवेलपासूनच थोड्या थोड्या वेळाने अंगावर संदेशफलक लावलेल्या अश्वशक्तीधारी चार चाकी गाड्या दिसत होत्या. त्यावरील संदेशही वेगवेगळ्या विषयांवर आधारित होते. श्विन स्कॉट ची त्या गाड्यांबद्दलची उत्सुकता चाळवली होती.

घाट चढताना एका वळणावर तीन-चारजण एका छत्रीखाली बसले होते. त्यांच्याकडील फलकाकडे पाहून त्यांचा संबंध संदेशधारी चारचाकी गाड्यांशी असावा असे जाणवले. त्यांना विचारताच त्यातील एकाने सांगितले की ती टाइम्स द्वारे मुंबई गोवा अशी चारचाकी गाड्यांची मोहीम होती. त्या मोहिमेत जवळपास २५० चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. याखेरीज इतर काही माहिती द्यायला मात्र ते तयार नव्हते.

घाटातील चढ चढताना स्कॉटची दमछाक होत होती.  स्कॉटने एका वळणावर विसावा घेतला. श्विनही पुढचा एक चढ चढून पुन्हा मागे येऊन स्कॉटजवळ थांबली. टाइम्स द्वारे आयोजित मोहिमेतील चारचाकी गाड्यांपैकी काही गाड्या पुढे जात होत्या. त्यातील एका गाडीवर संदेश होता 'We Can do it'.

श्विनने तो संदेश स्कॉटला दाखवला. अर्थात ती भावना स्कॉटच्या मनात आधीपासून होतीच. स्कॉटने पुन्हा मार्गक्रमण सुरु केले. लगेचच शिंग्रोबा मंदिराचा चढ सुरु झाला. श्विनला शिंग्रोबाचे दर्शन घेण्याची घाई झाली होती. त्यामुळे श्विनने तो चढ पार करत शिंग्रोबाचे मंदिर गाठले. स्कॉट तिथे पोचेपर्यंत श्विनने छोटे फोटोसेशनही उरकले. मग स्कॉटला तिथेच थांबवून शिंग्रोबा मंदिराचा उतार उतरत पुन्हा चढ चढायचे ठरवले. श्विन पुन्हा चढ चढत असताना स्कॉटने श्विनचे व्हिडिओ शूटिंग केले. शिंग्रोबा मंदिर हे खरेतर या मार्गाने जाणाऱ्या सर्वच प्रवाश्यांचे श्रद्धास्थान! (शिंग्रोबाची माहिती आधी श्विनसफारीच्या एका ब्लॉगमध्ये आल्यामुळे इथे पुन्हा देत नाही).

शिंग्रोबा मंदिरापुढील दोन वळणे चढताना खूपच मजा येते. पावसाळ्यात ह्या दोन वळणांनंतर एक धबधबा लागतो. मात्र सध्या वैशाख महिन्यात इथे तसा धबधब्याचा आनंद मिळू शकणार नव्हता. त्यामुळे ह्या ठिकाणी विश्रांती न घेता श्विन स्कॉटने पुढे जाण्याचे ठरवले. इथून पुढे जाण्याकरिता दोन पर्याय आहेत. एक म्हणजे जुन्या रस्त्याने जाणे आणि दुसरा पर्याय म्हणजे द्रुतगती महामार्गावरून काही अंतर जाणे. (येथून द्रुतगती महामार्गावरील काही अंतर जाण्यास दुचाकींना परवानगी आहे).  श्विनचे मत जुन्या रस्त्याने जाण्याचे असले तरी स्कॉटने मात्र द्रुतगती महामार्ग हा पर्याय निवडला. अर्थातच दोघेही द्रुतगती महामार्गाला लागले. एव्हाना सूर्य चांगलाच प्रखर झाला होता. स्कॉटला येथील वर्दळ, आत्तापर्यंत झालेला प्रवास आणि तापलेला सूर्य यांचा परिणाम जाणवत होता. वाटेत एक बस बंद पडून थांबलेली होती. त्याचा फायदा घेत श्विन स्कॉट पुन्हा विश्रांती साठी थांबले. मात्र उन्हाचा तडाखा तिथेही जाणवत असल्याने श्विनने पुढे जाऊन वाहतूक नियंत्रण केंद्रावर जाऊन विश्रांती घेण्याचे सुचवले.

स्कॉटने नाईलाजाने ते मान्य केले. दोघांनीही वाहतूक नियंत्रण केंद्र गाठले. इथे येताच श्विनला DCC सदस्य अय्यर यांच्या बरोबर सायकलने अष्टविनायक यात्रा करताना ह्या वाहतूक नियंत्रण केंद्रावर झालेल्या स्वागत समारंभाची आठवण आली.

तेथे पोचताच काही वाहतूक नियंत्रक पोलीस स्कॉट श्विनची आस्थेने चौकशी करू लागले. त्यांच्याशी संवाद साधत, पाण्याची बेगमी करत आणि चहापान उरकत श्विन स्कॉट पुढे निघाले खरे. पण आता डोक्यावरील सुर्याप्रमाणेच जठराग्निही चांगलाच प्रखर झाला होता. श्विनने आता मात्र थोडे जलद गतीने जायचे ठरवले. स्कॉटमात्र जलद गतीने येऊ शकत नव्हती. श्विनने पुढे जाऊन कामत हॉटेलशेजारील कट्ट्यावर जाऊन थोडे लाडू खात जठराग्नीला आहुती दिली. पाठोपाठ स्कॉटही तेथे पोचली. Save our sahyadri मोहिमेदरम्यान कामत हॉटेल शेजारील उत्तम जेवण मिळणारे हॉटेल श्विनला माहित झाले होते.

श्विन स्कॉटला त्या हॉटेलच्या आवारात दावणीला बांधत आम्ही हॉटेलमध्ये गेलो. थाळीची ऑर्डर देऊन आम्ही तेथे बसलो असताना खिडकीत तीन माकडे येऊन आमच्याकडे पाहत होती. अर्थात खिडकीची काच लावलेली असल्याने आम्ही त्या खिडकीशेजारील टेबलवर शांतपणे बसलो होतो. घाट सुरु होताच हुँप्या आणि बालमार्कटाचे दर्शन झाले होतेच आता घाट संपत असताना हि मर्कट त्रयी आम्हाला दर्शन देत होती. जणू शनिवारचा वार असल्याने आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हनुमानच वेगवेगळ्या रुपात समोर येत होते. अर्थात ही कल्पना चांगली वाटत असली तरी दात विचकणाऱ्या बालमर्कटाची त्यावेळी तरी भीतीच वाटली होती.

गप्पा मारत आम्ही ह्या हॉटेलमधील थाळीची लज्जत घेत मर्कट त्रयी कडे पाहत होतो. ते तिघेही शांतपणे खिडकीत बसले होते. क्षुधाशांती झाल्यावर श्विन स्कॉटचें दावे सोडून आम्ही लोणावळ्याच्या दिशेने कूच केले.

क्षुधाशांती आणि विश्रांती झाल्यामुळे श्विन स्कॉट ची गतीही वाढली होती. लोणावळा येण्या अगोदरचा चढही नवीन सायकलस्टची परीक्षा घेतो. कारण घाट संपला असे समजून नवीन सायकलिस्ट थोडा बेसावध असतो. मात्र ताजेतवाने झालेल्या श्विन स्कॉटने तो चढ लीलया पार केला. लोणावळा शहर पार केल्यावर तर स्कॉटचा उत्साह आणि गती चांगलीच वाढली. आता तर श्विनलाही स्कॉटच्या गतीने जाण्यासाठी वेग कायम ठेवावा लागत होता. स्कॉटचा उत्साह पाहता श्विनने कामशेतचा घाट चढण्याचा मनसुबा विचारला.तर कामशेत गावातून जाण्याचा पर्याय आहे हे कळताच स्कॉटने तो पर्याय निवडला.

पुढील रस्त्यावर फार चढ नसल्याने श्विन स्कॉट वेगात निघाले. वाटेत अमृतपानासाठी एक थांबा घेत श्विन स्कॉटने तळेगावात शिरणारा चौक गाठला. तेथे मटकीभेळेवर आडवा हात मारून श्विन स्कॉटने तळेगाव गाठले तेव्हा सूर्य उतरणीला लागला होता.

लग्नाचा २१ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी (खंडाळा घाटासह) डोंबिवली ते तळेगाव हे ११५ किमी अंतर सायकलने पार करत श्विन स्कॉटने 'WE CAN DO IT' हे सिद्ध केले होते.

२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...