बुधवार, १ मे, २०१९

२१ दिवस मोहीम - वर्ष ३रे

महाराष्ट्र दिन अर्थात
दिनांक राष्ट्रीय सौर ११ वैशाख, १९४१ (ग्रेगोरियन दिनांक १ मे २०१९)

डॉ सुनील पुणतांबेकर आणि श्री दीपक देशपांडे यांच्या पुढाकाराने ७ वर्षांपूर्वी डोंबिवली सायकल क्लबची (DCC) स्थापना झाली.  स्थापनेपासूनच DCC सदस्य सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. नववर्षस्वागत यात्रेत DCC चा सहभाग क्लबच्या स्थापनेपासून आहेच. शिवाय वृक्षलागवडीपासून मतदानजागृती पर्यंत सर्वच क्षेत्रात DCC सदस्य आपले योगदान देत असतात.

क्लब स्थापन झाल्यापासून क्लबचे सदस्य दर रविवारी एकत्रित सायकलिंग करत असतात. यामध्ये गेल्या ७ वर्षात एकही रविवारचा खंड पडलेला नाही. मात्र सायकलिंग केवळ रविवारपुरते मर्यादित न राहता तो रोजच्या जीवनाचा भाग व्हावा हि कळकळ क्लबचे एक संस्थापक सदस्य श्री शशांक वैद्य यांना वाटत होती. श्री प्रदीप अडुर हे क्लबचे आणखी एक संस्थापक सदस्य निवृत्त होईपर्यंत डोंबिवली ते भांडुप ऑफिसला सायकलने जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेत श्री शशांक वैद्य गेली ७ वर्ष डोंबिवलीहुन ठाण्याला ऑफिसला सायकलने जात आहेत.

मात्र हे सातत्य DCC च्या सर्व सदस्यांमध्ये यावे तसेच जे लोक आज सायकलिंग करत नाहीत किंवा काही कारणाने ज्यांनी सायकलिंग थांबवले आहे, त्यांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करावे या उद्देशाने श्री शशांक वैद्य यांनी DCC च्या माध्यमातून सायकलिंग जागृती साठी २१ दिवस मोहीम सुरु केली.

पहिल्या वर्षी ह्या मोहिमेत २१ जण सहभागी झाले होते तर दुसऱ्या वर्षी ३५ जणांनी सहभाग घेतला होता. योगायोगाने यंदाच्या तिसऱ्या वर्षी २१+ ३५ अश्या ५६ सदस्यांचा सहभाग या मोहिमेत होता. स्वतःचे सायकलिंग मधील सातत्य सुधारावे आणि इतरांना सायकलिंगसाठी प्रोत्साहित करावे हे दोन प्रमुख हेतू या मोहिमेद्वारे साधायचे होते. त्याबरोबरच भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरचा प्रसार करणे हा उपहेतूही या मोहिमेद्वारे साध्य करायचा होता.

शशांक वैद्य यांच्याबरोबर डॉ राहुल घाटवळ, अमर कुलकर्णी, रुचा कोचरेकर यांनी यावर्षी ज्युरी म्हणून काम पाहिले. कल्याण येथील बाईकपोर्ट या समूहाचे श्री साहिर शेख यांनी मोहिमेतील पहिल्या ५ सदस्यांना मोफत तर किमान पात्रता पूर्ण करणाऱ्या उर्वरित सदस्यांना २०% सवलतीमधे सर्विसिंग देण्याचे आश्वासन देत मोहिमेतील सदस्यांना प्रोत्साहित केले. देव गायकवाड, पुष्कर जोशी, मेघेश कुलकर्णी, रुधिर मोघे, गन्धार कुलकर्णी हे पडद्याआडून मार्गदर्शन आणि सहकार्य करतच होते.

५६ सदस्यांच्या सहभागामुळे आणि मैत्रीपूर्ण वातावरणामुळे या वर्षीची उपक्रमातील रंगत आणि चुरस उत्तरोत्तर वाढत गेली.

या मोहिमेमध्ये तीन तीन सदस्यांची दोन संपूर्ण कुटुंब सहभागी झाली होतीच. शिवाय मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगण्यासाठी भारतभ्रमण करत असलेला गन्धार कुलकर्णी हासुद्धा सहभागी झाला होता. DCC चा एक सदस्य - सोहल वैद्य हा तर थेट अमेरिकेतील मियामी येथून या मोहिमेत सहभागी झाला होता.

या सर्वांचे कौतुक करणे गरजेचेच होते. ह्या कौतुकसोहळ्यासाठी महाराष्ट्रदिनासारखा दिवस लाभणे हे तर दुधात साखर पडण्यासारखेच होते.

२१दिवसांच्या मोहिमेतील सहभागींना प्रमाणपत्र देण्याच्या कार्यक्रमासाठी डोंबिवली येथील मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ विनय भोळे आणि डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष डॉ विश्वास पुराणिक यांची उपस्थिती लाभल्याने सगळ्यांच्याच उत्साहात भर पडली.

डॉ सुनील पुणतांबेकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत प्रास्ताविक केले. त्यांनंतर शशांक वैद्य यांनी मोहिमेची उद्दिष्ये आणि राष्ट्रीय कॅलेंडरची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर डॉ पुराणिक यांनी सायकल दुरुस्ती वर्कशॉप साठी जिमखान्याची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन या कार्यक्रमादरम्यान दिले. दरवर्षी कॉलेजमधील विद्यार्थ्यांची सायकल फेरी मॉडेल कॉलेजतर्फे स्वातंत्रदिननिमित्त काढली जाते. त्याची माहिती देत डॉ विनय भोळे यांनी मॉडेल कॉलेज येथे सायकल स्टँडची व्यवस्था करत असल्याचेही सांगितले.

२१ दिवस मोहिमेतील सहभागिंच्या कौतुकसोहळ्यासाठी सर्वजण ज्या उत्साहाने आणि आपुलकीने आजच्या समारंभात सहभागी झाले होते त्यावरून पुढील वर्षीचा समारंभ अधिक मोठ्या प्रमाणावर करावा लागेल याची खात्री आज पटत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...