रविवार, १९ मे, २०१९

मात- क्षमतेच्या प्रतिबंधावर

भारतीय सौर वैशाख ३०, १९४१

29th day ride of A Pan India Commute 35days challange

सायकलिंग हा असा छंद आहे जो जगाच्या कानाकोपऱ्यातील, वेगवेगळ्या स्तरातील लोकांना एका सूत्रात बद्ध करतो. सायकल मित्र संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सायकलपटूंना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. या संमेलनाच्या ठाणे येथे भरलेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने PuRu Khilari शी ओळख झाली होती. काल भारतीय सौर दिनांक २९ वैशाख १९४१ रोजी पुरुचा मेसेज आला. त्याने म्हटले होते की मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन तांडेम सायकलवरून खारघर येथील टेकडीवर जाण्याचा कार्यक्रम आखला होता. त्या तांडेम सायकलवर मागे बसणारे सायकलपटू दृष्टिदोष असणारे होते. त्यापैकी डोंबिवली येथील प्रसाद उतेकर ह्या दृष्टिदोष असलेल्या सायकल पटू बरोबर तांडेम (दोघांनी चालवायच्या) सायकलवर चालक सायकलपटू बनून येण्याविषयी पुरु विचारत होता. नवनवीन सायकल पटूंशी ओळख करून घेण्याची संधी कशी सोडणार? मात्र तांडेम सायकलवरून जायचे असल्याने श्विनला बरोबर नेता येणार नव्हते. मग मी जस्ट राइड या समूहातील सदस्यांनाही बरोबर येण्याचे आवाहन केले.

 #dombivlicycleclub मधील सदस्य आता रविवारच्या मजेखातर काढण्यात येणाऱ्या फेरीवर समाधानी नासल्याने #justride या समूहाची निर्मिती झाली होती. Just ride ग्रुप मधील सदस्य सायकलिंग केवळ आठवड्यातून एकदा मजेखातर आणि बेबंदपणे करण्याची गोष्ट मानत नव्हते, तर सायकलिंग हे रोजच्या दैनंदिन जीवनात नियमितपणे आणि शिस्तबद्ध रित्या करण्याचा छंद मानत होते. 'जस्ट राइड' समूहाच्या दोन वेगवेगळ्या राइड आधीच ठरल्यामुळे त्यातील कोणीही माझ्याबरोबर येऊ शकणार नव्हते.

मी मात्र पुरुला लगेचच होकार दिला होता. त्याप्रमाणे एकनाथचा दूरध्वनी आला. त्यानेही मी येत असल्याची खात्री करून घेतली. मी होकार दिला खरा पण सकाळी ६.३० ला महापे येथील DAKC येथील प्रवेशद्वार क्रमांक १ येथे पोचायचे म्हणजे डोंबिवली येथून ५.१५ ला तरी निघणे भाग होते. प्रसादचा दूरध्वनी आला तेव्हा त्याला मी येत असल्याची खात्री देत सकाळी उठण्यासाठी पहाटे ४ वाजता दूरध्वनी करण्याबद्दलही सांगितले. अर्थात माझी झोप त्यावेळी दूरध्वनी घेण्याइतपत सावध असेल का याबद्दल मलाच शंका होती.

रात्री मात्र दर तासातासाने जाग येत होती. ३.३० - ३.४५ झालेले पाहिले, तेव्हा परत १०-१५ मिनिटे झोपण्याचे ठरवले. तेव्हाही त्या वेळात गाढ झोप लागली तर...ही शंका येतच होती. प्रसादने मात्र बरोबर ४ वाजता दूरध्वनी केला, त्याबरोबर मी लगेचच उठलो. ठरल्याप्रमाणे ५ वाजता प्रसाद कडे गेलो. तो तयारच होता. साधारण ५.१५ ला आमची तांडेम सायकल निघाली तेव्हा रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार होता. श्विन नसली तरी रस्त्यामध्ये श्वानांचा मुक्त संचार सुरु होता. सायकलच्या पुढे मी विजेरी लावली होती मात्र मागील बाजूस लाल दिवा नव्हता. पहाटेची वेळ असल्याने डोंबिवली शहरातील रस्ते मोकळे होते. तांडेम सायकल शांतपणे जात होती. पहाटे इतक्या अंधारात तेही नेहमीप्रमाणे श्विनबरोबर नाही तर तांडेम सायकलवर प्रसादला घेऊन जाताना सुरुवातीला थोडा ताण वाटत होता. मात्र प्रसाद आणि माझा समन्वय लगेचच साधला गेला. कल्याण शिळ रस्त्यावर तांडेम सायकलने वेग घेतला. डोंबिवलीमधील श्वानांना तांडेम मध्ये रस वाटला नव्हता मात्र कल्याण शिळ रस्त्यावर मात्र श्वानांचे एक टोळकेच तांडेमच्या मागे लागले. तांडेम थांबवून परत सुरु करणे टाळण्यासाठी मी तांडेमचा वेग कमी केला. सुदैवाने त्या श्वानांचा तांडेम मधील रस लगेचच संपला. एवढ्यात #justride चे Ritesh Savla आणि Rahul Ghatwal यांनी आम्हाला गाठले. त्यांच्याबरोबर Pushkar Kolte होता. कल्याण फाटा येथे त्यांच्याबरोबर स्वयंचित्र घेतल्यावर तांडेम पुढे निघाली. कल्याण फाट्याहून समोर जाणारा चढ टाळण्यासाठी आम्ही उजवीकडे वळण घेऊन शिळफाटा गाठला. (डोंबिवली कर मात्र कल्याण फाट्यालाच शिळफाटा समजतात)

शिळफाट्याहून डावे वळण घेत तांडेम महापेच्या रोखाने निघाली. सुरुवातीचा चढ संपल्यावर लागलेल्या उतारावर तांडेम सुसाट निघाली. ठरल्याप्रमाणे आम्ही बरोबर ६.३० ला DAKC च्या प्रवेशद्वार क्र १ पाशी पोचलो. आमच्याचबरोबर पवईहून आलेला सुधीरही दुसरी तांडेम घेऊन एकटाच राइड करत तेथे पोचला. कोलाबा हुन येणारी तिसरी तांडेम मात्र रद्द झाल्याचे कळले. थोड्या वेळातच एकनाथही आम्हाला सामील झाला. सुधीरच्या तांडेमवर तो बसला. मी आणि सुधीर चालक सायकलस्वार होतो. आम्ही पुन्हा सुरुवात केली खरी मात्र महामार्गावर कोंडी सुरु झाली होती. मग आम्ही निरापान करून दोन्ही तांडेमना सेवा रस्त्यावर वळवले. थोड्याच वेळात आमची तांडेम रुसली. सुधीर आणि एकनाथला मात्र लय सापडली होती. त्यांना दूरध्वनी करून मागे बोलावले.सुधीर आणि एकनाथ त्यांच्या तांडेम वरून तर मी आणि प्रसाद आमच्या तांडेमबरोबर चालत सायकलदुरुस्तीचे दुकान शोधू लागलो. तुर्भे रेल्वे स्थानका समोर एक दुकान दिसले खरे पण ते बंद होते. सुधीरने त्या बंद असलेल्या शटरवर वाजवत कानोसा घेतला. सुदैवाने दुकानदाराने दाद दिली आणि आमच्या तांडेमच्या चाकाच्या हवेच्या नळीची आरित (भाषाप्रभु गन्धार डोम्बिवलीकर यांच्या लेखणितील देणगी) काढून दिले.

एव्हाना बराच वेळ गेला होता. त्यानंतर मात्र अधिक वेळ न दवडता गुळगुळीत महामार्गचा लाभ घेत दोन्ही तांडेम वेगाने खारघर येथे पोचल्या. खारघर येथील सेवा रस्त्यावर जाऊन परत थोडे मागे वळल्यावर खारघर टेकडीचे प्रवेशद्वार होते. एकनाथने मी चालवत असलेल्या तांडेमवर बसायचे ठरवले. मला मात्र त्याचे वजन पेलवेल का याची शंका वाटत होती. खरंतर तांडेम चालवताना चालकाला संतुलन साधावे लागते. वेग मिळाल्यावर संतुलन साधणे थोडे सोपे जाते, मात्र सुरु करताना वेग नसल्याने थोडी जास्त दक्षता घ्यावी लागते.

एकनाथ आणि मी तांडेम सुरु करताना एकनाथने पटकन जोर दिल्यामुळे संतुलन लगेचच साधले गेले. एकनाथ ज्या प्रकारे जोर देत होता त्यावरून त्याने मनाली ते खारदूंगला सायकलिंग कसे केले असेल ह्याची पूर्ण कल्पना येत होती. खारघर टेकडीचा चढ सुरु झाला. मी गियर खाली आणण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आमच्या तांडेमला खटक्याचे गियर नसून गोल फिरवायचे गियर होते, त्यामुळे ते फिरवले तरी पटकन बदलले जात नव्हते. अर्थातच निर्देशक जो गियर दाखवत होता तोच गियर पडला की नाही हेही कळत नव्हते. त्यामुळे मी उलटसुलट गियर फिरवत चाचपणी करत होतो. चढ वाढतच होता. एव्हाना ९-९.३० झाले होते त्यामुळे जठराग्निही भडकला होता. अर्धेअधिक अंतर पार होईपर्यंत माझी ऊर्जा अपुरी पडू लागली. एकनाथ मात्र माझ्याही वाटणीचा जोर लावत होता. शेवटी एके ठिकाणी थांबून मी पाणी पिऊन घेतले. एकनाथ मात्र आता एकटाच जोर लावू लागला, मी फक्त पेडल फिरवण्याचे काम करू लागलो. चढ संपण्याचे लक्षण दिसत नव्हते. एकनाथच्या जोरावर आम्ही एका फाट्यावर पोचलो. आता नव्वद अंशात दोन रस्ते पुढे जात होते. सुधीर आणि प्रसाद कोणत्या वाटेने गेले हे कळायला मार्ग नव्हता. ती संधी साधत मी पुन्हा विश्रांती घेतली. थोड्या वेळात एका बाजूने एक रिक्षा येताना दिसली. ती रिक्षा आली त्याच दिशेला एक तांडेम गेलेली त्याने पाहिली असल्याचे त्याने सांगितले. त्याबरोबर आमची तांडेमही त्या दिशेने जाऊ लागली. तेथून जेमतेम दोन किमी अंतर असल्याचेही समजले. पुढे सुधीर आणि प्रसादही परत येताना दिसले. त्यांनी चढ संपल्याचे सांगितल्यावर मलाही धीर आला. मी आणि एकनाथ पुढे निघालो. थोड्याच वेळात फणसवाडी येथे पोचलो. तेथे स्वयंचित्र घेऊन आम्ही परतू लागलो.





आता उतार असल्याने वेग आवरता घेण्यासाठी ब्रेकवर नियंत्रण ठेवावे लागत होते. जो ६-८ किमीचा चढ चढताना पायाचा कस लागत होता तोच आता उताराच्या स्वरूपात समोर आल्याने आता हाताची परीक्षा घेत होता.  मात्र तांडेम विनासायास तो उतार पार करून टेकडीच्या पायथ्याशी पोचली. अर्थात जठराग्नीला आहुती द्यायची गरज वाटत होतीच. आता वेग वाढवत आम्ही क्षुधाशांतीसाठी पोचलो. तिथे इडलीवर ताव मारून तांडेम चालवायची मनुष्यशक्तीचे इंधन अविरत सुरु राहण्याची खात्री करून घेतली.



आता प्रसाद पुन्हा माझ्या बरोबर तांडेमवर बसला आणि एकनाथ सुधीरबरोबर तांडेम वर बसला. दोन्ही तांडेम बरोबर निघाल्या मात्र थोड्या वेळातच सुधीर आणि एकनाथ दिसेनासे झाले. आम्ही मात्र आरामात जाऊ लागलो. पुढे काही अंतरावर सुधीर आणि एकनाथ आमचा निरोप घेण्यासाठी थांबलो होते. आमचा निरोप घेऊन ते पुन्हा पुढे निघाले.  मी मात्र आता पूर्ण थकलो होतो. रविराजही पूर्ण तेजाने तळपत आमचे आव्हान कठीण करत होते. पुन्हा एकदा निरापान करत आम्ही परतीच्या मार्गाने पुढे निघालो. तरीही ओठ कोरडे पडत होते. थोड्या थोड्या वेळात जलपान करत विश्रांती घेत होतोच. महापेचा चढ सुरु होण्या आधी पुन्हा जलपान केले. खालमानेने तो चढ चढायला सुरुवात केली. विशेष त्रास न होता तो चढ पार झाल्यावर पुढील उतारावर आम्ही ताजेतवाने झालो. शिळ फाटा कल्याण फाटा मार्गाने कोकणरत्न येथे पोचलो. आता डोंबिवली जवळ आली असली तरी कोकणरत्न हा नियमित थांबा घेण्याचे ठरवले. तेथे सोलकढीचा आस्वाद घेऊन तांडेमचा प्रवास पुन्हा सुरु झाला. एव्हाना मध्यानं झाली होती. भर वैशाखात रविराज त्याचे काम चोख बजावत होता. पालवा येथे मात्र वाहतुकीची पूर्ण कोंडी झाली होती. तेथून काटई नाक्यापर्यंतचा प्रवास कोंडीमय होता. डोक्यावर उग्र रूप धारण केलेला रविराज आणि रस्त्यावर अश्वशक्तीधारी प्रदूषणकारी वाहनांची दाटी यांनी मनुष्यशक्तीधारी तांडेमची वाटचाल बिकट केली होती. त्या कोंडीतून श्विनप्रमाणे लगेच वाट काढता येणार नव्हती. मात्र तेथून सुटका करून घेत तांडेम डोंबिवली मध्ये शिरली. माझे ओठ पुन्हा कोरडे पडले होते. त्यामुळे पुन्हा निरापान करूनच आम्ही स्वगृही परतलो. ८०किमीचा तांडेमवरील प्रवास पूर्ण होऊन घरी पोचल्यावर प्रसाद अजूनही ताजातवाना वाटत होता. अस्मादिक मात्र घरी पोचल्यावर रात्री अपुरी राहिलेल्या निद्रेच्या अधीन झाले.

 #OnefortheWorld #CommuteChallenge #35DoC #35DaysofCommute #GetCycloned #LetsCYCLE #Keepchallenging #Keepriding #stayfit #stayhealthy #SmartCommute #Cycle2work #ABBF #adventuresbeyondbarriersfoundation

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...