शनिवार, १ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग ११: तिन्ही घरचा पाहुणा: कोलकाता चेन्नई सायकलसफर

सायकलने भारतभ्रमण करत असताना केवळ विविध ठिकाणे पाहणे एवढाच मूलभूत हेतू नाही. तर अश्या मोहिमा करत असताना वेगवेगळ्या व्यक्ती, संस्था ह्यांच्याशीही संबंध जोडले जावे हाही हेतू असतो. चिंचवड - पुणे येथील काही मित्रांनी रामकृष्ण मठाच्या सहाय्याने काही वर्षांपूर्वी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल सफर केली होती. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमामध्ये राहिलो होतो. तलासरी येथून त्या मित्रांबरोबर डोंबिवली येथे सायकलने येताना वाटेत सकवार येथील रामकृष्ण मठ येथे भेट दिली होती. तेव्हा रामकृष्ण मठाच्या कार्याविषयी उत्सुकताही निर्माण झाली होती.

पुढे तलासरी येथील वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य पाहणारे श्री वसंत भुसारा ह्यांच्याशी नियमित संपर्क सुरू झाला. पुणे जम्मू सायकलसफर करत असताना पुन्हा एकदा तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्र येथे राहण्याचा योग आला होता. तर कन्याकुमारी चेन्नई मोहीम करत असताना वनवासी कल्याण आश्रमाचे त्रिवेंद्रम येथील पदाधिकारी परिचित झाले होते. 

कन्याकुमारी चेन्नई सायकल मोहिमेचा शुभारंभ विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी येथून करत असताना तेथेही एक रात्र मुक्काम झाला होता. विवेकानंदांच्या कार्याविषयी कुतूहल वाटू लागले होते. विवेकानंदांचे चरित्र वाचत असताना लक्षात आले की रामकृष्ण मठ/ मिशनची सुरुवात विवेकानंदांनीच केली होती. कोलकाता येथील बेलूर मठ हे रामकृष्ण मठ/ मिशनचे मुख्यालय आहे. सन १८९७ मध्ये विवेकानंद ह्यांनीच बेलूर मठाची स्थापना केली होती.

ह्या सर्व गोष्टींची जाणीव होताच मी आमची मोहीम कोलकाता येथील बेलूर मठ येथून सुरू करण्याचे ठरवले. बेलूर मठ येथे email पाठवून आमची मोहीम बेलूर मठापासून सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली. बेलूर मठाच्या व्यवस्थापनाने अतिशय आनंदाने आमची विनंती मान्य केली. इतकेच नव्हे तर आमची तिथे राहण्याची सोय होईल असेही कळवले होते. शिवाय आमची मोहीम कधी सुरू होणार, त्यावेळी आणखी कोणी उपस्थित असणार आहे का, अशी विचारणाही केली. आमच्या मोहिमेविषयी त्यांनाही कुतूहल वाटत होते.

खरतर श्री केळकर ह्यांना संपर्क होण्याअगोदरच आमची सर्व व्यवस्था होण्याची खात्री बेलूर मठ येथील व्यवस्थापनाने दिली होती. बेलूर मठ येथे भेट दिल्यास, तिथे मुक्काम केल्यास विवेकानंदांच्या कार्याविषयी रामकृष्ण मठ/ मिशन विषयी प्रत्यक्ष माहिती घेता आली असती. रामकृष्ण मिशनच्या कामकाजाविषयी कुतूहल होतेच. त्यामुळेच आमच्या मोहिमेचा शुभारंभ बेलूर मठ येथूनच सुरू करण्याचे मी ठरवले होते.

. ....खरतर मी बेलूर मठ येथे मी राहण्याविषयी नव्हे फक्त मोहिमेचा शुभारंभ करण्याची परवानगी मागितली होती, केळकरांनाही मी त्यांच्याकडे राहायला येण्याविषयी नव्हे तर कोलकाता येथे पोचल्यावर सायकल दुरुस्ती आणि सहाय्य वाहन ह्या संदर्भात मदत मागितली होती. मात्र दोन्हीकडून स्वतःहून आमची राहण्याचीही सोय केली असल्याचे कळवले होते. तौपालीने आमच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली होती.

तीनही ठिकाणी राहण्याची व्यवस्था होत असल्याची खात्री झाली होती. एकंदरीत कोलकाता येथे पोचल्यावर मुक्कामाचा प्रश्न सुटला होता... किंबहुना आता नक्की कोणाला होकार द्यायचा आणि कोणाला नकार द्यायचा.. तोही कसा...हा उलट प्रश्न मला पडला होता. मी अजून कोणताही निर्णय घेतला नव्हता......घेऊ शकत नव्हतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...