मात्र आनंदची सायकल त्यासाठी तयार नव्हती. आनंद आणि संजय ह्यांना त्यांच्या सायकलची वेष्टण काढायला सांगून मी स्टेशन जवळील सायकल दुरुस्ती दुकान शोधू लागलो. आम्ही कोलकाता चेन्नई सायकल प्रवासाचे जर्सी घातल्यामुळे जाणारे येणारे लोक आमच्यापाशी थांबून विचारपूस करत होते, आम्हाला शुभेच्छा देत होते. खरतर आनंदच्या सायकलला त्या शुभेच्छांची गरज जास्त होती.
मला ड्रीम बाईकचे शाह ह्यांची आठवण झाली. त्यांनी लगेचच सर्व मदत करण्याची खात्री दिली. मी त्यांना आमची परिस्थिती सांगितली. ते स्वतः ओरिसामध्ये पुरी जवळ एका मोठ्या सायकल महोत्सवासाठी गेले होते. एका टीमची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र त्यांचा भाऊ बिकाश शाह कोलकाता येथील दुकानात होता. बिकाशचा लगेचच फोन आला. त्यांचे दुकान जवळपास १०- १५ किमी लांब होते. आम्ही त्याला तासभर लागेल असे सांगितले. एव्हाना अंधार पडायला लागला होता.
मुंबईपेक्षा कोलकाता येथील रेखांशा मध्ये तब्बल १५.३० अंशाचा फरक आहे. साधारणपणे एक अंश फरकाने सूर्य चार मिनिटाने स्थान बदलतो. अर्थात दोन्ही शहरातील सूर्यास्तामध्ये जवळपास ६२ मिनिटांचे अंतर आहे. अंधारात त्यांचे दुकान शोधणे कठीण होते. मी एका हातात मोबाईल घेऊन त्यावर गुगल मॅप लावला. आनंद आणि संजयला मागोमाग यायला सांगितले. आनंदची सायकल त्याला त्रास देत होती. त्यामुळे त्याला वेग घेता येत नव्हता. तो वाटेत दुकान सापडते का हे शोधत होता. मात्र त्यामुळे आणखीच उशीर होऊ लागला. बिकाशचे फोन सुरूच होते. आम्ही मजल दरमजल करत एकदाचे रुबी येथील ड्रीम बाईकचे दुकान शोधले. बिकाश एकटाच दुकानात बसला होता. लवकर अंधार पडत असल्याने त्याची दुकान बंद करण्याची वेळ झाली होती. मात्र आमच्या सफरीसाठी तोही उत्सुक होता.
माझी पिशवी विमानतळावर राहिल्याने मला नवीन विद्युत उपकरणे घ्यायची होती. आनंदला सायकलच्या दुकानात थांबायला सांगून मी जवळपास शोध घेऊ लागलो. सुदैवाने मोबाईल चार्जर मिळाला. त्या आनंदात मी परत आलो मात्र आनंदच्या सायकलचा असहकार सुरूच होता. त्या चाकासाठी लागणारी योग्य उपकरणे दुकानात नव्हती. बिकाशने त्या उपकरणाशिवाय चालवलेल्या प्रयत्नांना यश येत नव्हते. मात्र त्यानेच आम्हाला गरिया भागातील डेकाथलॉन येथील दुकानाचा पत्ता दिला. तेथील मेकॅनिकशी तो स्वतः बोलला. आनंदने मुंबईतील डेकाथलॉन शॉप मधील सल्लागाराशी बोलून त्यालाही बिकाशने सांगितलेल्या मेकॅनिकशी बोलण्यास सांगितले.
डेकाथलॉन चे दुकान पुन्हा साधारण १०- १२ किमी लांब होते. अंधारात मोबाईल वर गुगल मॅप लावून मी पुन्हा पुढे जाऊ लागलो. डाव्या हातात मोबाईल आणि उजव्या हातात सायकल सांभाळत मी जाऊ लागलो. संजय आणि आनंद मागोमाग येत होते. प्रत्येक वळणावर ते मागे आहेत ह्याची खात्री करत मी पुढे सरकत होतो. दोघांनाही गुगल मॅप लावून सायकल चालवण्याचा अनुभव नव्हता. काही अंतरावर एक उड्डाणपूल सुरू झाला. रस्ता तसा अरुंदच होता. मी उड्डाणपुलाच्या अगदी डावीकडून जात होतो. मात्र उजव्या बाजूने अगदी जवळून इंधन जळणारी दुचाकी, चारचाकी वाहने जात असल्याने मला मागे बघून संजय आणि आनंद किती मागे आहेत ह्याचा अंदाज घेता येईना. सायकलही दोन्ही हातात धरावी लागत होती, त्यामुळे गुगल मॅप लावलेला मोबाईल खिशात ठेवावा लागला होता. उड्डाणपूल बराच लांबलचक होता. वाटेत एक फाटा जाताना दिसला. तिथे रस्ताही थोडा रुंद झाला होता. त्याचा फायदा घेत मी थांबलो. डेकाथलॉन दुकान अजूनही लांब असल्याचे गुगल बाबा सांगत होते. आम्ही जाईपर्यंत दुकान चालू असणे गरजेचे होते. आनंद आणि संजय दिसल्यावर मी पुन्हा सायकल दामटवली. आम्हाला खरतर भूकही लागली होती. पण आता स्वतःपेक्षा सायकलचीच काळजी जास्त होती.
डेकाथलॉन दुकान दिसल्यावर मात्र जीवात जीव आला. आनंद आणि मी दुकानात शिरलो. दुकान दुमजली होते. खालच्या मजल्यावर वेगवेगळ्या खेळांचे साहित्य होते तर पहिल्या मजल्यावर सायकलचे सुटे भाग, सायकली आणि सायकल दुरुस्ती विभाग होता. तेथील मेकॅनिकने आनंदची सायकल पाहिली. तेथील मेकॅनिक अश्रफ अलीचा सूर सुरुवातीला आश्वासक वाटत नव्हता. योग्य साहित्य हाताशी नव्हते. मात्र त्याने जिद्द मात्र सोडली नाही. आम्हाला आवश्यक सामग्री दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडल्यावर मिळेल असे त्याने सांगितले. आम्हाला तर पहाटे आमच्या सफरीचा शुभारंभ करायचा होता. अश्रफ ने त्याचा सगळा अनुभव पणाला लावत दुरुस्ती चालूच ठेवली.
मी मनामध्ये एक दिवस उशीरा मोहीम सुरू करण्याची योजना आखू लागलो. अश्रफ मात्र हार मानायला तयार नव्हता. घड्याळाचे काटे अक्षरश: धावत होते. डेकाथलॉन मध्येही आम्ही बराचवेळ उभेच होतो. अश्रफने आनंदची सायकल आमच्या सफरीसाठी तयार केली. एव्हाना बरीच रात्र झाली होती. दुकानाची वेळ टळून गेली होती. आनंदने समाधानाने अश्रफला दुरुस्ती खर्च विचारला. दुकानातील व्यवस्थापक बर्नाली बोरो तिथे आली. तिने कोणताही दुरुस्ती खर्च घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. बर्नालीचे बोलणे, वागणे अतिशय शांत होते. अश्रफला आम्ही वैयक्तिकरित्या काही रक्कम घेण्याची विनंती केली. मात्र तोही कोणतीही रक्कम न स्वीकारण्यावर ठाम राहिला. त्यानेही अतिशय शांत आणि स्पष्टपणे आम्हाला नकार दिला. एव्हाना रात्रीचे १०.३० वाजून गेले होते. आता केळकरांकडे जाऊन परत बेलूर मठ गाठणे शक्य नव्हते.
मी केळकरांना साधारण तासाभरात घरी येऊ आणि रात्री तिथेच राहू असे कळवले. त्यांच्या घराचे डेकाथलॉन दुकानापासूनचे अंतर जवळपास १५ किमी होते. आम्ही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा साधारण ११.३० वाजले असावेत. डॉ केळकर आणि त्यांच्या पत्नी आमच्याबरोबर जेवण्यासाठी थांबले होते.
दिवसभर झालेली दगदग, पोटातील भूक आम्हाला जाणवत होती. मात्र डॉक्टरांच्या पत्नीने जी मेजवानी आम्हाला दिली त्यामुळे सगळा थकवा, शीण निघून गेला. दुपारी मिष्टी दोही मिळाले होतेच रात्रीही आमच्यासाठी खासा बेत होता. पहाटे चारला सुरू झालेला आमचा दिवस रात्री १२ च्या सुमारास संपत होता.
परिस्थिती कितीही वाईट असली तरी योग्य साथ मिळाली की त्यावर मात करता येते हेच दिवसभरात कोलकाता येथील ह्या सुहृदांनी शिकवले होते.
डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी किती वाजता निघणार असे विचारले. मी दुसऱ्या दिवशी पार कराव्या लागणाऱ्या दिडशे किमी अंतराचा आणि बंगालमधील सूर्याच्या परिक्रमणाचा अंदाज घेत साडेसहा असे उत्तर दिले खरे मात्र त्यावर माझा स्वतःचाच विश्वास नव्हता.



Adore your will power & efforts .God is with u definitely!
उत्तर द्याहटवादेव सर्वत्र आहेच. किंबहुना ' जे (अस्तित्वात) आहे ' ते म्हणजेच देव. त्यामुळे तो सगळ्यांच्याच मदतीला आहे. तोच तर जगनियंता आहे.
हटवा