ज्यासाठी केला होता अट्टाहास तो आमच्या मोहिमेच्या शुभारंभाचा दिवस उजाडला खरा. मात्र आदल्या दिवसाच्या दगदगीमुळे आम्ही मुहूर्ताची वेळ गाठण्याची घाई केली नाही. किंबहुना आम्हाला इतकी शांत झोप लागली होती की पहाट झालेली समजलेच नाही. आम्ही उठलो तेव्हा डॉ केळकर आणि त्यांच्या पत्नीही उठल्याच होत्या. आमची झोप खरोखरच खूप छान झाली होती. आदल्या रात्री तो अंदाज आल्यामुळे आम्ही बेलूर मठा ऐवजी डॉ केळकर ह्यांच्या घरापासूनच सुरुवात करायचे ठरवले होते. बेलूर मठ येथील संपर्क क्रमांक संस्थेला विनंती करूनही मिळाला नव्हता त्यामुळे त्यांना काहीही कळवता येत नव्हते.बिकाश शहा आणि त्यांच्या सायकल समूहातील सभासदांना तसा निरोपही पाठवला होता. तसेच उशीर होण्याचा अंदाज आल्यामुळे आमचा शुभारंभ तासभर पुढे ढकलल्याचेही कळवले होते.
सकाळी आम्ही अगदी आरामात आवरले. पुढील दिवसात राहण्याची आणि जेवणाची इतकी छान व्यवस्था होईल अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळे केळकरांकडील पाहुणचाराचा अगदी मनपूर्वक आनंद घेतला. त्यांच्या घरी आलेल्या पक्ष्यांशी आनंदने संवाद साधला. तेही त्याला प्रत्युत्तर देत होते. आवारातील फुलझाडे, वृक्ष ह्यांच्याभोवती फेरफटका मारला. डॉ केळकर अगदी उत्साहाने आम्हाला तेथील बागेची माहिती देत होते.
चहापान करून आम्ही सज्ज झालो. डॉ दांपत्याने उत्साहाने आम्हाला मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आणि .. आम्ही तिघांनीही पहिले पेडल मारले. सायकलींच्या मागील बाजूस कॅरीयरवर सामान लावलेली पॅनियर्स दोन्ही बाजूस लावलेली होती. आमची सुरुवात अतिशय संथगतीने झाली होती. गुगलबाबांच्या मदतीने मी नकाशा पाहत पुढे जात होतो. संजय आणि आनंद मागून येत होते. थोड्याच वेळात आम्ही गल्लीबोळ मागे टाकले. पुढे नदीवर एक मोठ्ठा पूल दिसत होता... हा होता हुगळी नदीवरील विद्यासागर सेतू.
कोलकाता महानगर प्रदेशात हुगळी नदीवर बांधलेला हा दुसरा पूल होता. म्हणूनच कोलकाता आणि हावडा शहरांना जोडणाऱ्या ह्या विद्यासागर सेतुला दुसरा हुगळी पूल असेही म्हटले जाते. हा हुगळी नदी पूल प्रकल्प आयुक्तांच्या (HRBC) नियंत्रणाखाली सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांचा संयुक्त प्रयत्न होता. ह्या पुलाची बांधणी करण्यासाठी ₹३८८ कोटी खर्च आला. १९९२ मध्ये विद्यासागर सेतूचे उद्घाटन झाले त्यावेळी हा भारतातील पहिला आणि सर्वात लांब केबल-स्टेड पूल होता. सहा मार्गिका असलेल्या ह्या पुलाची लांबी ८२२.९६ मीटर (२,७०० फूट) आहे. त्याचे नाव शिक्षण सुधारक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या नावावर ठेवण्यात आले.
पुल समोर दिसताच आमचा उत्साह वाढला. नदीवरून आम्ही पुढे गेलो. माझा समज असा होता की आता आम्हाला लगेचच मोठ्ठा हायवे लागेल आणि आम्ही अगदी सहजतेने आणि वेगात पेडल मारत जाऊ. थोड्याच वेळात आणखी एक पुल दिसत होता. रस्ता मोकळा आणि प्रशस्त होता. तिथे टोलही दिसत होता. अर्थातच आम्हाला त्या टोलशी काही घेणे देणे नव्हते. टोल मागे टाकून आता वेग घ्यायला काही हरकत नव्हती. टोल पार केल्यावर मात्र एक चक्राकार वळण दिसत होते. आम्ही ज्या टोल महामार्गावरून आलो होतो त्याच्यावरच हे वळण रस्ते होते. तिथे इतके मार्ग होते की नक्की कोणता रस्ता धरावा ह्याचा नेमका अंदाज येत नव्हता. गुगलबाबा काय सांगत होते तेही कळेना. सुदैवाने पुलावर एक पोलिस दिसला. त्याला मी चेन्नईकडे जाणारा रस्ता विचारला. बहुधा त्याला नीट समजले नसावे. मी चौकशी करत असताना आनंद आणि संजयदेखील माझ्याजवळ येऊन पोचले. त्या पोलिसाने आम्हाला वळण घेऊन उजवीकडे जायला सांगितले. पोलिसाने सांगितल्यामुळे मी निर्धास्त झालो. पुढे पुन्हा एक प्रशस्त रस्ता लागला. संजय आणि आनंद थोडे मागे राहिले होते. पुढे आणखी एक पुल दिसू लागला. हा पुलसुद्धा लांबलचक आणि आधीच्या पुलासारखाच दिसत होता. मी पुल ओलांडून संजय आणि आनंदची वाट पहायचे ठरवले. पुल संपल्यावर एक उतार दिसू लागला... मात्र मला दिशेची खात्री वाटेना. संजय आणि आनंद मागोमाग येत होते. मी एका मोटारसायकल वाल्याला थांबवले आणि चेन्नईची दिशा विचारली. तो म्हणाला तुम्ही बरोबर उलट दिशेने जा. आम्ही त्या चक्राकार वळणाच्या चक्रव्युहात अडकून बहुधा तोच पूल उलट दिशेने परत ओलांडला होता. आनंद आणि संजय येताच मी त्यांनाही तसे सांगितले. आनंदही मला तेच सांगत होता. आम्ही तिघेही गोंधळलो होतो. पुन्हा एकदा खात्री करायचे ठरवत आम्ही थोडे मागे फिरलो. मागे पडलेला टोल पुन्हा दिसू लागला. तिथे एका माणसाला विचारले.. तर त्याने प्रतिप्रश्न केला तुम्हाला दिल्ली मार्गाने जायचे आहे की बॉम्बे (मुंबई) मार्गाने? आम्हाला तर चेन्नईला जायचे होते. त्याला म्हटले दिल्ली मार्ग असो की मुंबई मार्ग.. जो मार्ग प्रशस्त, खड्डेरहित असेल तो सांगा. त्यानेही आम्हाला आमची दिशा चुकल्याचे सांगितले. त्याने सांगितले की इथून रस्त्यांच्या पलीकडे जाऊन उलट दिशेला जात टोल पुन्हा ओलांडा. गुगलबाबा काय सांगत होते ते लक्षात येत नव्हते. अखेर आम्ही परत टोल ओलांडला आणि चौकशी केली. तिथे पुन्हा मुंबई मार्ग आणि दिल्ली मार्ग पैकी कोणता मार्ग हवा म्हणून विचारले गेले. आमची विनंती एवढीच होती की चेन्नईला जाणारा जवळचा मार्ग कोणता असेल तो सांगा. आनंद मला विचारू लागला आज आपण कुठे मुक्काम करायचा आहे. खरतर मला आज १५० किमी गाठून महामार्गावर जे हॉटेल सापडेल तिथे रहायचे होते. अगदी पेट्रोल पंपावर देखील रहावे लागेल हेही मी दोघांना आधी सांगितले होते. आनंदला आज खरगपूर जवळ कुठे तरी राहू असे सांगितल्यावर तो खरगपूरला जाणाऱ्या रस्त्याची चौकशी करू लागला. मात्र खरगपूरच्या आधी चेन्नईला जायला एक वळण आहे..त्यामुळे मी त्याला म्हटले खरगपूर नव्हे चेन्नईची चौकशी कर. नाहीतर आम्ही दुसऱ्याच रस्त्याने खरगपूरला पोचून उद्याचे अंतर २५-३० किमी ने वाढवण्याची भीती होती.
आम्ही स्वतः इतके गोंधळलो होतोच त्यात हे मुंबई मार्ग की दिल्ली मार्ग हे पर्याय आमचा गोंधळ आणखीच वाढवत होते.






Chhan मस्त असेच पुढे जात रहा
उत्तर द्याहटवानक्कीच. आपल्या शुभेच्छा आहेतच. साथही मिळाली तर अधिक आनंद होईल
हटवाछान चालू आहे. पुन्हा एकदा ते क्षण अनुभवले Keep it उप.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा