आम्ही सायकलने भुवनेश्वरला सुशांतच्या ऑफिसला जाऊन आमचे सामान तिथे ठेवू आणि अग्रीमा आम्हाला तिथे भेटेल असे ठरले. कटक ते भुवनेश्वर हे अंतर जेमतेम २०-२५ किमीचेच. नाष्टाही छान झाला होताच. त्यामुळे हे अंतर सलग पार करायला साधारण दिड तास पुरेसा होता. आद्या आणि अग्रिमाचा निरोप घेऊन आम्ही पुन्हा एकदा सायकलींवर स्वार झालो. परत एकदा रेल्वे पूल पार करून कटक भुवनेश्वर रस्त्याला लागलो. जेमतेम २ किमी वर काठजोडी नदी दिसू लागली. महानदी आणि काठजोडी नद्यांच्या मध्ये वसलेले कटक शहर मागे पडत असल्याचे लक्षात आले.
दोन नद्यांच्या मध्ये वसलेले कटक शहर
वास्तविक काठजोडी नदी ही महानदीचीच एक उपनदी आहे असे म्हणता येईल. नाराज बंधाऱ्यावर काठजोडी नदी उगम पावते आणि लगेचच विभाजित होते. तिच्या दक्षिण शाखेला कुआखाई असे म्हणतात. त्याचा अर्थ आहे कावळ्याचा तलाव. ही शाखा पुढे पुरी जिल्ह्यात वाहत जाते. काठजोडी नदीवरील पुल देखील बराच लांब होता. नदीचे पात्र चांगलेच रुंद होते. मात्र ह्या पात्रामध्ये पाणी दिसत नव्हते. नदीचे ते रुक्ष पात्र पाहवत नव्हते. त्या पुलावरून मी पुढे सरकलो. आता लवकरात लवकर सुशांतच्या ऑफिसमध्ये जाऊन सामान ठेवायचे तोपर्यंत अग्रीमाही आलेली असेल. तिच्याबरोबर लगेचच निघायचे असा विचार करून आम्ही भुवनेश्वरची दिशा पकडली. साधारण १०-१२ किमी पुढे गेलो असेन. डाव्या हाताला ओळीने काही मिठाईची दुकाने दिसत होती. मागे वळून पाहिले तर आनंद आणि संजय दिसत नव्हते. जेमतेम १२ किमी मध्ये ते का मागे राहिले कळत नव्हते. मी थोडा वेळ त्यांची वाट पाहिली. ते दोघेही आल्यावर आम्ही त्या दुकानांकडे मोहरा वळवला. त्यातला त्यात मटका स्वीट हे दुकानाचे नाव जरा विशेष वाटले. म्हणून तिथे गेलो. येथील दुकानदाराकडे मिठाईबद्दल चौकशी केली. ती मिठाई छेना पासून बनवतात असे तो सांगत होता. मला खरतर छेना म्हणजे नक्की काय ह्याचा काहीच उलगडा होत नव्हता. दुधामध्ये लिंबू पिळून पनीर बनवले जाते त्याला छेना म्हणतात असे गुगलबाबा सांगत होते.
दुकानात ओळीने वेगवेगळे पदार्थ दिसत होते. आजूबाजूला मधमाश्या फिरत होत्या. आम्ही आधी सर्व पदार्थ पाहून घेतले. रसगुल्ला ओळखीचा होताच. त्यांना रसगुल्ला खायला मागताच एका disposable bowl मध्ये त्यांनी रसगुल्ला दिला. मधमाश्यांकडे लक्ष देता देता आम्ही रसगुल्ला मटकावला मी गुलाबजामचा शौकीन. पाक भरपूर मुरलेला गुलाबजाम खाण्यात जी मजा आहे ती रसगुल्ला खाताना येत नाही. मात्र येथील रसगुल्लाही छान वाटला. पण त्याचबरोबर केकसारखा गोल आकारात एक पदार्थ ठेवलेला होता.
रसगुल्ला खाऊन माझे समाधान झाले नव्हते. तो गोल पदार्थही खावासा वाटत होता. मात्र त्याचा आकार पाहता तो संपवता येणार नाही ह्याचा अंदाज आला. अग्रीमा भेटली की तिला तो पदार्थ भेट देऊ असा विचार करून तो गोल पदार्थ पॅक करून घेतला.
तिथून मात्र थेट भुवनेश्वर गाठले. सुशांतच्या सांगण्यावरून त्याच्या ऑफिसमधील एक कर्मचारी आम्हाला घ्यायला आला. अर्थात तो आला तेच बरे झाले. कारण ते ऑफिस सहज सापडण्यासारखे नव्हते. एका कालव्याशेजारी एक रस्ता जात होता. त्यानंतरही थोडासा चक्रव्यूह भेदल्यावर बांधकामाचे सामान रस्त्यात दिसत होते. त्यापुढे एक दुमजली बांधकाम दिसत होते. ते होते सुशांतचे काही काळानंतर सुरू होणारे ऑफिस. दुसऱ्या मजल्यावर एक २ BHK सदनिका होती. तिथे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी मस्त जेवणाची व्यवस्था केली. खरतर जेवण झाल्यावर ताणून द्यायचाच विचार होता. आज अजून सायकलवायचे नसल्याने आम्ही आता सुस्तावलो होतो .


Mastaaa!!!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा