भुवनेश्वर ह्या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मांडाचा देव. शंकराला उद्देशून हे नाव आहे. मूळ शहरात अनेक मंदिरे असल्याने ह्या शहराला मंदिरांचे शहर किंवा भारतातील कॅथेड्रल शहर असेही म्हटले जाते. आम्हाला मात्र ओढ होती ती कोणार्क येथील सूर्यमंदिर आणि पुरी येथील जगन्नाथ मंदिर येथे भेट देण्याची!
थोडा वेळ वाट पाहून मी अग्रीमाला फोन केला. तर ती अजूनही कटकलाच होती. मग तिनेच सुचवले की आम्ही भुवनेश्वरहून पुढे निघावे, कोणार्क येथील सूर्यमंदिर पाहून पुरी येथे जावे. ती आम्हाला थेट पुरी येथे भेटेल. मग आम्ही तिघांनी एक गाडी करून कोणार्क, पुरी येथे जायचे ठरवले. सायकल प्रवास नसल्याने आता आम्ही निवांत असलो तरी रात्री उशीर होऊन चालणार नव्हते. खरं पाहता मला सूर्यमंदिरामागून होणारा सूर्योदय पहायचा होता. मी अग्रीमाला तसे म्हटलेही होते. पण आता मात्र आम्ही पोचणार होतो सूर्यास्तावेळी! आम्ही कोणार्क येथे पोचत असताना अग्रीमाला पुन्हा फोन केला. तिने ठरल्याप्रमाणे कटक येथून ट्रेन पकडली होती मात्र ती ट्रेन जवळपास तासभर उशिराने धावत होती. आमची गाडी मंदिरापाशी पोचत असताना सूर्य अस्ताला जाण्यास थोडा वेळ होता. गाडी पार्क करत असतानाच लक्षात आले की मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेला होते. म्हणजे सूर्योदयावेळी मंदिरामागून सूर्य उगवताना पाहता आलाच नसता तर आत्ता मात्र मंदिरामागे होणारा सूर्यास्त पाहता येणार होता. हे लक्षात आल्यावर पहाटे ऐवजी संध्याकाळी मंदिरापाशी पोचण्याच्या योगायोगाबद्दल मी खुषच झालो. मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेला ठेवण्यामागे एक मुख्य कारण होते ते म्हणजे सूर्योदयावेळी सूर्याचा प्रथम किरण मंदिराच्या प्रवेशद्वारावर पडावा.
मंदिराचे आवारही चांगलेच प्रशस्त होते. मूळ मंदिरापाशी पोचण्याआधी सूर्यास्त होऊ नये म्हणून आम्ही थोडे घाईघाईने आवारात शिरलो. आवारात लांबवर दिसणारे मूळ मंदिर आणि मागे अस्ताला जाणारा सूर्य विलोभनीय वाटत होते. आवारात मोठ्या संख्येने लोक आले असले तरी ते आवार इतके मोठे होते की कुठेही गर्दी होत नव्हती. म्हणूनच आम्ही जलदीने पुढे जाऊ शकत होतो. भारतातील ठिकठिकाणचे लोक तिथे आले होते.
त्यातही हा गोतावळा पाहून राजस्थानची आठवण येत होती. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील राजस्थानातील लोक देशाच्या पूर्व किनाऱ्यावर चांगलेच विसावले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान, शांतता आणि निश्चिंत भाव भारताच्या एकतेची साक्ष देत होते.
कोणार्क हा शब्द कोन आणि अर्क (सूर्य) ह्या दोन शब्दांपासून बनला आहे ज्याचा अर्थ सूर्याचा कोन असा होतो. कोणार्क येथील मन्दिराचा परिसर, मूर्तिकाम भारताच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत होते. ह्या मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकात राजा नरसिंहदेव ह्यांच्या काळातील आहे. हे मंदिर बांधण्यासाठी १२०० कामगार १२ वर्षे काम करत होते. ह्या मंदिराविषयी अशी दंतकथा सांगितली जाते की ह्या मंदिराचा वास्तुविशारद बिसु मोहराणा आपले गाव सोडून येथे कामात मग्न झाला होता. त्याचवेळी त्याला एक पुत्र झाला. हा पुत्र देखील या कार्यशाळेचा एक भाग बनला आणि मंदिराचा घुमट बांधल्यानंतर, जो त्याचे वडील पूर्ण करू शकले नाहीत, त्याने अंतराळात उडी मारून आत्महत्या केली.
कोणार्क सूर्य मंदिर सूर्यदेवाच्या रथाच्या स्वरूपात बांधले आहे. त्यात २४ तासांचे प्रतिनिधित्व करणारी २४ चाके आणि आठवड्याचे सात दिवसांचे प्रतिनिधित्व करणारे सात घोडे आहेत. मंदिराच्या भिंती आणि खांबांवर उत्कृष्ट कोरीवकाम आहे,ज्यामध्ये देव-देवता, पौराणिक कथा, दैनंदिन जीवन आणि कामुक दृश्ये दर्शविली आहेत. मंदिराची वास्तुकला आणि शिल्पकला भारतीय कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी म्हटले होते की हे असे स्थान आहे की जिथे दगडांच्या भाषेपुढे माणसांची भाषा देखील खुजी ठरते.
कोणार्क सूर्य मंदिर हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या स्मारकांपैकी एक आहे. १९८४ मध्ये युनेस्कोने ह्या मंदिराला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे. ह्या मंदिराला ब्लॅक पॅगोडा असेही म्हटले जाते. मंदिराची आता बऱ्याच प्रमाणात पडझड झाली आहे. मंदिरातील गर्भगृहदेखील बंदच झाले असल्याने येथे पूजा अर्चा केली जाऊ शकत नाही. १९०३ मध्ये मंदिराची अवस्था लक्षात घेऊन ब्रिटिशांनी गर्भगृह रेती भरून बंद केले तसेच गर्भगृहात जाण्याचे सर्व दरवाजे बंद केले. अर्थात ह्या आधी आतील सर्व मूर्ती काढण्यात आल्या होत्या असे सांगितले जाते.
कोणार्क मंदिराच्या बांधकामात ५२ टनाचा एक चुंबक वापरण्यात आला होता. असे म्हटले जाते की तो चुंबक मंदिराच्या शिखरावर होता. कोणार्क समुद्रातून जाणारी अनेक जहाजे त्याकडे आकर्षित झाल्यामुळे लोहचुंबक जागेमुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले. तसेच, हे चुंबक समुद्रातील जवळजवळ सर्व जहाजांच्या कंपासला त्रास देत असे. म्हणून, त्रासाचे कारण दूर करण्यासाठी, पोर्तुगीज लोकांनी हा लोहचुंबक चोरला. मंदिराची पडझड होण्यासाठी मुस्लिम आक्रमणाबरोबर हेही कारण सांगितले जाते.
आम्ही मुख्य मंदिराजवळ जात असताना सूर्यही अस्ताला जात होताच. मुख्य मंदिराभोवती मोठी प्रदक्षिणा घालावी लागणार होती. आम्ही ती प्रदक्षिणाही घाईघाईने पूर्ण करत होतो. मात्र त्याभोवतीची शिल्पकला आमची गती कमी करत होती. पण आम्हाला ती शिल्पकला पाहता यावी ह्यासाठी जणू आमच्यासाठी सूर्याने त्याच्या अस्ताला जाणाऱ्या प्रवासाची गती संथ केली होती.
मंदिराच्या मुख्य वास्तूची पडझड मन खिन्न करत होती मात्र तरीही त्या मंदिराची भव्यता भारताच्या समृद्ध वास्तुकलेची, स्थापत्य शास्त्राची जाणीव करून देत होती. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही ह्याची नोंद घेत दहा रुपयांच्या नोटेवर कोणार्क सूर्यमंदिराला स्थान दिले आहे.
आम्ही ती वास्तू डोळे भरून पाहिली. तेथून बाहेर पडताच मराठी भाषा कानावर पडली. महाराष्ट्रातील डॉक्टर मित्रांचा एक गट कुटुंबाबरोबर पर्यटनासाठी तिथे आला होता. त्यांना आमची मोहीम समजल्यावर तेही खूप खूष झाले, आमच्याबरोबर त्यांनी फोटोही काढून घेतले.
मंदिराबाहेर चहाचा आस्वाद घेत अग्रीमाला फोन केला. तिची गाडी अजूनही उशिराने येणार असल्याचे समजले. त्यामुळे तिने आम्हाला पुढे पुरी येथे जाण्यास सांगितले.
( https://youtu.be/NPNmg1UfICQ ह्या यूट्यूब लिंकवर जाऊन आपण मुख्य मंदिराभोवतीचे दृश्य पाहू शकता.)


















सुंदर , सूर्यमंदिराचे दर्शन घडवलेत , धन्यवाद!
उत्तर द्याहटवाधन्यवाद. YouTube वर व्हिडिओ नक्की पाहा
हटवा