रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

मिठाईपेक्षा भजी बरी: कोलकाता चेन्नई सायकलसफर


निद्रादेवी आम्हाला प्रसन्न झाली होती. रात्रभर शांत झोप झाल्यावर मी प्रथम चहाची सोय पाहून आलो. आम्ही मुक्काम केला होता ते ऑफिस असले तरी सध्या तिथे ऑफिसचे furniture आले नव्हते. आमची रात्रीची सोय नक्कीच छान झाली होती. आम्ही अन्हिके आवरून सायकली तयार केल्या. आता पुढील मुक्कामी सुशांत मदत करू शकणार नव्हता. माझा बाळूगावला राहण्याचा इरादा मी अग्रीमाला सांगितला होता. तेव्हाच तिने मला त्याऐवजी चिलिका येथे एक गुरुद्वारामध्ये व्यवस्था होऊ शकेल असे सांगितले. मीही लगेच गुरुद्वाराचा व्यवस्थापक सचिनसिंग ह्यांच्याशी बोललो. त्याने लगेचच माझी विनंती मान्य केली होती. त्यामुळे आजच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय झाली होतीच. 

ही गुरुद्वाराची सोय झाली तेव्हा मला सतीश आंबेरकर ह्यांच्या सायकलजगप्रवास करताना आलेल्या अनुभवावर आधारीत 'दोन चाक झपाटलेली' ह्या पुस्तकात त्यांनी वर्णन केलेला युरोपात एका गुरुद्वारा मध्ये आलेला अनुभव आठवत होता. त्यांच्याबरोबर तेव्हा एक शीख मित्र देखील होता. मात्र ज्या गुरुद्वारा मध्ये त्यांची सोय झाली तेथील वातावरण खलिस्तानी विचारांनी भारलेले होते. त्या शीख मित्राला देखील तेथील लोकांनी चांगलेच फैलावर घेतले होते. त्यांच्या सायकलसमूहातील एका मित्राची पत्नी त्या सुमारास त्यांना भेटायला भारतातून युरोपला गेली होती. ती देखील त्या दिवशी त्यांच्यासोबत होती. ती रात्र सगळ्यांनी चांगलीच तणावात घालवली होती. अर्थात आम्हाला ती भीती नव्हती. चिलिका येथील गुरुद्वाराचा संदर्भ आम्हाला अग्रीमा हिने दिला होता. तसेच फोन वर सचिनसिंग ह्यांच्याशी संभाषण झाले ते अगदी आश्वासक आणि दिलासादायक होते. 
 
आम्ही अंमळ उशिराने निघालो. काल रात्री झोपायला उशीर झाला होता आणि आज जेमतेम ११० - १२० किमीचीच दौड करायची होती. साधारण ८.१५ च्या सुमारास आम्ही निघालो. सकाळची महत्वाची वेळ आम्ही गमावली होती. त्यामुळे मला काम काळ वेग ह्या त्रिकुटावर लक्ष ठेवायला लागणार होते. नेहमीप्रमाणे सुरुवातीला काही वेळ एकत्र सायकलवल्यावर मी थोडी आघाडी घेतली. रस्ता चांगला रुंद आणि तुरळक वाहतुकीचा असल्याने वेग चांगला घेता येत होता. नाश्त्यासाठी योग्य ठिकाण काही सापडत नव्हते. मात्र माझ्या सॅकमध्ये अग्रीमाला देण्यासाठी कटक ते भुवनेश्वर मार्गातील स्वीटशॉप मधून घेतलेली केकच्या सारखी दिसणारी मिठाई होती. अग्रीमा भुवनेश्वरला आमच्या राहण्याच्या ठिकाणी येऊ न शकल्याने ती मिठाई तिला देता आली नव्हती. 
                                          

एका ठिकाणी सेवा रस्त्यावर चहाकेंद्र दिसले. तिथे आनंद आणि संजयची बराच वेळ वाट पाहिल्यावर मी त्या मिठाईचे उद्घाटन करायचे ठरवले. आज खरतर एका चांगल्या मेजवानीचा दिवस होताच. कारण आदल्याच दिवशी गुकेशने डिंग लीरेनला हरवून विश्वविजेत्याचे पद पटकावले होते. मी ती मिठाई सॅक मधून बाहेर काढली छेना (फाटलेले दूध) पासून बनवलेली ती मिठाई खूपच छान दिसत होती. मी त्याचा एक तुकडा तोडून त्याची चव पाहिली.वाह... मिठाई खूपच छान होती. त्या मिठाईचे तीनचार तुकडे मी खाल्ले खरे... मात्र ती मिठाई इतकी गोड होती की भूक असूनही पुढचा घास खाववेना. मी अक्षरशः मनाचा हिय्या करून आणखी एखादा तुकडा खाल्ला असेल. खरतर केवळ गुलाबजामच नव्हे तर त्याचा पाकही मी आवडीने पित असे मात्र ही मिठाई आणखी खाण्याची माझी हिंमतच होईना. आनंद आणि संजय आल्यावर गुकेशच्या विजयानिमित्त त्यांनाही ती मिठाई दिली. मात्र त्यांनीही लगेचच शरणागती पत्करली. अर्थात चहाला मात्र आम्हा कोणाचीच आडकाठी नव्हती. 



भुवनेश्वर सोडून जवळपास ५० किमी अंतर पार झाले तेव्हा टांगी नावाचे गाव लागले. महामार्गाला समांतर जवळपास १० किमी अंतरावर इथेच चिलिका लेक सुरू होतो. तो थेट आमचे गंतव्यस्थान असलेल्या चिलिका गावापर्यंत सोबत करतो. म्हणजे जवळपास ६०- ७० किमी लांबवर हा तलाव पसरला आहे. कोलकाता सोडल्यापासून आम्हाला निसर्गातील हिरव्या रंगातील उधळण पाहायला मिळाली नव्हती. मात्र टांगी गाव सोडून पुढे जाताच हिरव्या रंगाची चादर पसरलेली धरणी दिसू लागली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर मोठे होत असताना हे वैभव अनुभवायला मिळते. त्यामुळे मला पुन्हा एकदा सह्याद्री रागांची आठवण येऊ लागली. प्रवासाची मजा येत असली तरी पोटातील कावळे आम्हाला जठराग्नीची आठवण करून देत होते. सह्याद्रीच्या कुशीत खाण्याची सोय थोड्या थोड्या अंतरावर होत असते. इथे ती सोय नव्हती. वाटेत एके ठिकाणी एका मंदिरापाशी खूप गर्दी दिसली. तिथे तरी आसपास काही हॉटेल दिसेल असे वाटले. मात्र तिथेही काही सोय दिसत नव्हती. 

तिथे काहीतरी उत्सव सुरू असावा असे दिसत होते. एवढी गर्दी असूनही विक्रेत्यांची गर्दी दिसत नव्हती. किंबहुना आसपास एकही दुकान, टपरी दिसत नव्हती. 

अखेरीस मी मार्गक्रमण सुरूच ठेवले. अखेरीस बरीच दौड केल्यावर एक मोठा चौक दिसला. रस्त्याच्या डाव्या बाजूला बहुधा एक बस स्थानक होते. हे ह्या मार्गावरील मुख्य स्थानक असावे. तिथे बरेच प्रवासी उभे होते. डाव्या हाताला एक खाद्यकेंद्र आणि मागे एक मंदिर होते. तसेच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मोठे मंदिर रस्त्यालगतच दिसत होते. 







रस्त्याच्या डाव्या हाताला एक रस्ता जात होता जो रेल्वे स्टेशनकडे जात होता. त्याच्या बाजूला मोठे मोकळे आवार दिसत होते. मुख्य म्हणजे इथे खायलाही काहीतरी दिसत होते. आनंद आणि संजय आल्यावर आम्ही तेथील खाद्यकेंद्राकडे मोर्चा वळवला. तेथील पदार्थ काही समजत नव्हते. विचारले तर तेथील कोणालाही हिंदी भाषा येत नव्हती. फ्लॉवरची भजी दिसत होती. आम्ही ती भजी आणि आणखी एकदोन पदार्थ खाऊन जेवणाची भूक मिटवली. आत्ताही त्या छेनाची मिठाई खाण्याची कल्पना करवत नव्हतीच. 'थोडक्यात गोडी' ह्याचा शब्दशः अर्थ आम्हाला त्या छेनाच्या मिठाईने चांगलाच पटवला होता.



फ्लॉवरचे इंधन मिळाल्यावर सायकली पुन्हा सज्ज झाल्या. आता थेट चिलीका गाठायचे होते. सूर्यास्तापूर्वी तिथे पोचण्यासाठी आम्ही वेग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...