शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२६

१६ आणा बंगाली: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २६


जलपायगुडी हे शहर बांगलादेशच्या डोक्यावर आहे. आम्हाला आज गाठायचे होते अलीपूरद्वार! ह्या दोन शहरांमधील प्रवास हा बांगलादेशच्या डोक्यावरून होणार होता. आम्ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणार होतो. आमच्या दक्षिण बाजूस बांगलादेश असणार होता तर आमच्या उत्तरेला आता भुतान सुरू होत होता. खरेतर आजचे अंतर जवळपास १३० किमी असणार होते. मात्र काल आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो तेथील काउंटरवरील इसमाने आम्हाला एक दुसरा मार्ग सांगितला ज्यामुळे आमचे अंतर जेमतेम ९५ किमी असणार होते. त्यामुळे आम्ही अगदी निश्चिंत झालो. साधारण ७.१५ वाजता आम्ही सायकलवयाला सुरुवात केली. 

थोड्याच वेळात आम्ही तिस्ता नदीपाशी पोचलो. नदीचे पात्र बऱ्यापैकी रुंद दिसत होते. मात्र नदीपात्रामध्ये पाणी अगदीच कमी दिसत होते. बरेचसे पात्र कोरडेच होते. आतील खडक उघडे पडले होते.  



नदीपात्र ओलांडून आम्ही पुढे निघालो. रस्ता आता जेमतेम दुपदरी होता. रस्त्याच्या दुतर्फा आता हिरवळ दिसू लागली होती. केळी, नारळासारखी झाडे पाहून कोकणातील निसर्गाची आठवण येऊ लागली होती. रस्त्यावर फार रहदारीही नव्हती. आम्ही सलगपणे ३७-३८ किमी अंतर पार केले.







धुपगिरी गावाजवळ आम्ही उजवीकडे वळलो. एव्हाना भुकेची जाणीव होऊ लागली होती. आम्ही वळण घेऊन थोडे पुढे गेलो अन् तिथे एक छानसे क्षुधाशांतीगृह दिसले. आम्ही चौकशी केली असता तिथे पुरीभाजी उपलब्ध असल्याचे समजले. आम्ही लगेचच ऑर्डर केली. पुरीबरोबर जी भाजी आली ती बटाटा आणि सोयाबीनची होती. भाजी अप्रतिम होती. आम्ही त्या पुरीभाजीचा चांगलाच समाचार घेतला. येथे छानसे मिष्टी दोही देखील आम्हाला मिळाले.

आजचे अंतर फार नसल्याने आम्ही अंदाज करत होतो की बहुतेक जेवण करायलाच आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू. जवळपास ३५-४०% अंतर तर दोन अडीच तासातच पार झाले होते. उरलेले अंतर साधारण ६० किमी होते. अगदी आरामात गेलो तरी चार पाच तासात अंतर पार करू शकू असे वाटत होते. आम्ही पुन्हा एकदा सायकलवायला लागलो. आमचा प्रवास मजेत सुरू होता. नाष्टा झाल्यावर आणखी साधारण २० किमी अंतर आम्ही पार केले. लवकरच आम्ही फलकाटा गाव गाठले. इथे आम्हाला अलीपुरद्वार गावाकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांपैकी योग्य पर्याय निवडायचा होता. आम्हाला हॉटेलमालकाने जवळचा रस्ता कोणता ह्याचे मार्गदर्शन केले होतेच. तरी पुन्हा एकदा योग्य मार्गाची खात्री करण्यासाठी मी तिथे चौकात एका दुचाकीस्वाराकडे अलीपुरद्वारकडे जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली. एक रस्ता सरळ जात होता तर एक उजवीकडे वळण घेत होता. त्या दुचाकीस्वाराने आम्हाला सरळ जायला सांगितले. हॉटेल मालकाने आम्हाला काल रात्री देखील ह्याच सरळ जाणाऱ्या रस्त्याने जायला सांगितले होते. त्यामुळे आमची खात्री झाली. 

आम्ही पुढे निघालो. रस्ता थोडा खराब दिसला. कदाचित २००-४०० मीटर संपल्यावर पुन्हा चांगला रस्ता सुरू होईल असे वाटत होते. आमचा वेग मंदावला होता. चांगला रस्ता किती अंतरावर आहे हे पुढे जाऊन बघण्यासाठी मी थोडा वेग घेण्याचा प्रयत्न केला. मनोज आणि संजय सावधपणे येत होते. आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसे आमच्या लक्षात आले की येथील डांबर, सिमेंट ह्यांचे रस्त्यावरील अस्तित्व नाहीसे होत आहे. जे अस्तित्व टिकून आहे तिथे त्याने एकाच स्तरावर राहण्याचे मनावर घेतलेले नव्हते. अर्थातच एक तर खड्डे किंवा मातीचा रस्ता हे दोन पर्याय आम्हाला उपलब्ध होते. आणखी थोड्या अंतरावर पुन्हा चांगला रस्ता सुरू होईल ह्या आशेवर आम्ही पाय मारत होतो. पुढे जात असताना लक्षात आले की रस्ता केवळ ओबडधोबड नव्हता तर त्यावर रेती आणि खडीही पसरली होती. सायकलचे चाक घसरू नये ह्याची काळजी घेण्यासाठी आमचा वेग चांगलाच कमी झाला होता. चाक घसरण्याबरोबर सायकल पंक्चर होऊ नये ह्याचीही काळजी वाटू लागली होती. रस्त्याचे काम सुरू असल्याचे लक्षात येत होतेच. रस्त्याच्या कडेला खडी, रेतीचे ढीग लागले होते. शिवाय एकदा रस्त्याची डावी बाजू रहदारीसाठी उपलब्ध होती तर एकदा उजवी बाजू उपलब्ध होती. आता आम्हाला खोखोमध्ये पळतीचा खेळाडू जसे प्रतिपक्षाच्या खेळाडूंच्या रांगेमधून इकडून तिकडे, तिकडून इकडे पळत असतो तसे आम्हीही त्या रेताड जमिनीच्या एका बाजूकडून दुसरीकडे न कंटाळता (!) जात होतो.





आम्ही घेतलेला शॉर्टकट आम्हाला चांगलाच महाग पडला होता. सूर्यही आमच्यावर कोपला होता. ती आग वरून भाजून काढत होतीच. त्यातच पोटातील आगही पेटू लागली होती. आम्हाला अंतर वाचवण्यासाठी त्या हॉटेलमालकाने तसेच आज भेटलेल्या दुचाकीस्वाराने हा मार्ग सांगितला खरा. मात्र येथील रस्त्याचे काम सुरू होते, हा नवीन मार्ग तयार होत होता ही माहिती आम्हाला सांगितली गेली नव्हती. एक तर दुपारचे ऊन, पोटात पडलेली आग आणि हा अनपेक्षितपणे लागलेला वाळवंटी प्रदेश आमची परीक्षा घेत होते. ह्या संपूर्ण मार्गात क्षुधाशांती करण्यासाठी छोटेसे खोपटही दिसत नव्हते. 

जवळपास १८ किमी आम्ही कसेबसे पार केले आणि रस्त्याच्या डावीकडे एक मोठे खंडार ओलांडून एक दुकान दिसले. मोठ्या आशेने आम्ही तिकडे गेलो. तिथे आम्हाला थंड पेय आणि पाणी मिळाले. दुकानदारही चांगला होता. त्याच्याशी गप्पा मारत आम्ही थोडा विसावा घेतला. उरलेले अंतर फार नव्हते, मात्र पोटातील भूक आणि डोक्यावरील उन्हे आता पाय मारायला देत नव्हते. त्या दुकानात थंड पाणी घेऊन चेहरा धुवून काढला. पाठीच्या मणक्यावरून गार पाणी सोडले. थोडा विसावा घेतल्यावर मात्र आम्ही थोडे ताजेतवाने झालो.

सुदैवाने शेवटचे २० किमी मात्र रस्ता जुना होता... त्यामुळे चांगला होता. त्यामुळे त्या दुकानापासून सलग सायकलवत आम्ही अलीपूरद्वार गाठले. वाटेतील रस्त्यामुळे आज सायकलची देखभाल गरजेची होती. आम्ही हॉटेलमध्ये सामान ठेवून सायकल चालवण्याच्याच वेषात सायकली घेऊन सायकल दुरुस्तीच्या दुकानात गेलो. अरुंद बोळात एक छोटेसे दुकान होते. दुकानदार अतिशय मन लावून काम करत होता. 



आमचा पोशाख आणि सायकली पाहून तेथील लोक आमची विचारपूस करू लागले. त्यातील एकजण जास्तच उत्साहित झाला होता. मात्र त्याचा उत्साह त्याच्या मूळ स्वभावापेक्षा त्याने घेतलेल्या द्रव्यामुळे होता हे लगेचच लक्षात आले. त्याच्या द्रव्याचा त्याच्यावर चांगलाच परिणाम झाला होता. संजय आणि मनोज शांत उभे होते. मी मात्र माझे मनोरंजन करून घेत होतो. थोड्या वेळात मलाही कंटाळा आला. मनोज माझ्या सहाय्याला धावला. त्या माणसाच्या आणि माझ्या संभाषणात मनोजने भाग घेतल्यावर मी हळूच बाजूला झालो.

सायकल मेकॅनिक मात्र इकडे तिकडे ढुंकूनही न पाहता काम करत होता. त्याला आमच्या मोहिमेची माहिती एव्हाना समजली होतीच. शिवाय तो खरोखरच खूप मेहनती माणूस होता. आमच्या सायकली त्याने अगदी साफसूफ करून दिल्या. चेन मध्ये तेल टाकायला सांगितल्यावर त्याने ते काम तर केलेच शिवाय सायकलच्या इतर छोट्या छोट्या भागांचीही त्याने काळजी घेतली.

 

सायकल दुकानासमोर एक छोटेसे उपहारगृह होते. त्याची मालकीण  आमच्याकडे आली. तिने आमची चौकशी केली आणि आम्हाला चहा विचारला. आम्ही हो म्हणताच ती खुष झाली. आम्हाला बजावले चहा प्यायल्याशिवाय जाऊ नका. इतर लोक आमची चौकशी करत होते. थोड्या वेळात त्या बाईने आम्हाला चहा दिला आणि आम्ही नाही म्हणत असताना जबरदस्तीने बिस्किटेही दिली. आम्ही चहा बिस्किटे घेतल्यावर तिला खूप आनंद झाला. आमच्यासाठी काय करू आणि काय नाही असे तिला झाले होते. आम्ही जायला निघालो तर आमच्या पायाच पडायला लागली. ती मुळची आसामची आहे. आम्ही गुवाहाटी पर्यंत जाणार हे समजल्यावर ती खूप भावूक झाली होती.



तिचा भाऊदेखील तिथे होता. तो पूर्वी काही काळ मुंबईत राहून गेला होता. तो मात्र आमच्याबद्दल थोडा साशंक होता. त्याचा मुंबईतील अनुभव चांगला नव्हता असे त्याच्या बोलण्यावरून वाटत होते. तसेच तो हे मान्य करायलाच तयार नव्हता की कोणताही आर्थिक लाभ मिळणार नसला तरी आम्ही सायकलवरून अशी मोहीम करत आहोत. त्याच्या दृष्टीने आम्हाला शासकीय आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही अश्या मोहीमेत भाग घेत आहोत. आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की आर्थिक लाभापेक्षा आपण अनेक गोष्टी आनंद, समाधान मिळणे ह्यासाठीही करत असतोच. काही लोक चित्रपट बघायला जातात, काही पर्यटनाला जातात त्यासाठी सरकारकडून मदत मिळत नाही. मात्र तरीही ते मिळणाऱ्या आनंदासाठी चित्रपट बघतात किंवा पर्यटन करत असतात. तसेच आम्हीही आनंद मिळण्यासाठी आणि विविध भाग बघण्यासाठी सायकल पर्यटन करत आहोत. तो थोडा अंतर्मुख होऊन विचार करू लागला पण त्याचे मन मात्र साफ झाले नव्हते.

दुपारी जेवण झाले नव्हतेच. त्यामुळे आता रात्री तरी पोटभर आणि चांगले जेवण हवे होते. आम्ही तिथे जेवणासाठी चांगल्या हॉटेलची चौकशी केली. तेथील लोकांनी आम्हाला १६ आणा बंगाली ह्या हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही राहत होतो त्या लॉजपासून ते हॉटेल साधारण अडीच तीन किमी लांब होते. आम्ही रिक्षा करून तिथे गेलो. बाहेरूनच ते हॉटेल छान वाटत होते. गर्दीही बऱ्यापैकी होती. बरेचजण कुटुंबासह तिथे आले होते. आम्ही मेनुकार्ड बघत ऑर्डर दिली. हॉटेलचा थाट वेगळाच होता. पितळेच्या लख्ख केलेल्या ताटामध्ये पदार्थ मांडले जात होते. पिण्याचा पेला, पाण्याचा जार पितळ्याचेच होते. पदार्थात ही वैविध्य होते. बंगाल मध्ये असताना मत्स्याहार तर हवाच. पांढरा शुभ्र भात त्यावर विराजमान झालेली मासोळी त्याभोवती पद्धतशीरपणे भाज्या, डाळ आणि इतर चविष्ट पदार्थ ह्यांची रेलचेल होती. भात अमर्यादित होता. आम्ही अगदी तृप्त होईपर्यंत आडवा हात मारला आणि दुपारच्या चुकलेल्या जेवणाचीही भरपाई करून घेतली.







माझे एक मित्र श्री प्रमोद हेबळी ह्यांच्या शब्दात सांगायचे तर...आमचा प्रवास मानवी कथांच्या एका सुंदर संग्रहासारखा उलगडत चालला होता. सामान्य लोकांच्या मनात माणुसकी किती खोलवर रुजलेली आहे, याची प्रचिती आजच्या अनुभवातून पुन्हा एकदा आली. खडतर रस्ता, कडक ऊन आणि वाटेत अचानक आलेला तो 'वाळवंटासारखा' पट्टा—हे सर्व असूनही, त्या छोट्या गल्लीत पोहोचताच आम्हाला जी मनापासूनची आपुलकी मिळाली, ती खरोखरच मोलाची होती.

सायकल दुरुस्त करणाऱ्या त्या व्यक्तीचा साधेपणा, स्थानिकांची आमच्याशी बोलण्याची उत्सुकता आणि चहा-बिस्किटांचा पाहुणचार देणाऱ्या त्या माऊलीची मनापासूनची आत्मीयता—या सर्व गोष्टी आपल्या देशाची खरी संस्कृती आणि माणुसकी दर्शवतात. कधीकधी अनोळखी माणसेही आपल्या अपेक्षांपेक्षा कितीतरी अधिक प्रेम आणि जिव्हाळा देतात; आणि असे क्षण आपल्या स्मरणात कायमचे कोरले जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...