क्षुधाशांती झाल्यावर आम्ही पुन्हा महामार्गाला लागलो. एव्हाना १० वाजून गेले होते. सूर्य डोक्यावर आला होता. आमची चाल शांतपणे सुरू होती. रस्त्यावर फार रहदारी नव्हती. वाटेतील लोक आमच्याकडे कुतुहलाने पाहत होते. नाष्टा करून साधारण अर्धा तास झाला असावा. एक रिक्षावाला आम्हाला समांतर येत आमची चौकशी करू लागला. कोलकाता ते गुवाहाटी अशी आमची सायकल मोहीम ऐकून तो खूपच प्रभावित झाला. त्याने आम्हाला थांबवले. तो आमच्यासाठी काहीतरी करू इच्छित होता. खरतर काय करावे हे न कळल्याने तो गोंधळलाही होता.
त्याने आमच्यासाठी एक गाणे म्हणून दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. वास्तविक सकाळपासून आम्ही फार मजल मारली नव्हती. सायकलवण्यापेक्षा थांबून गप्पा मारण्यात अधिक वेळ गेला होता. मात्र तो रिक्षावाला इतक्या मनापासून आम्हाला सांगत होता की आम्हाला थांबावेच लागले. त्याने गाणे सुरू केले...
' मायाबिनी रतीर बुकुट, देखा पालू तोमार सोबी
धोरा दिला गोपोने आहि, हिजार कोनोत .....'
(अर्थ:मंत्रमुग्ध करणाऱ्या (जादुई) रात्रीच्या हृदयात, मला तुझ्या प्रतिमेची झलक दिसली. तू गुपचूप आलीस आणि माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात विसावलीस.)
गाण्याचा अर्थ तर दूर...शब्दही नीट कळत नव्हते. पण कळत होती ती त्याच्या गाण्याबद्दलची भावना... आसाममधील प्रसिद्ध गायक झुबिनदा... झुबिन गर्ग... ह्याला आदरांजली देत तो रिक्षावाला आमच्यासाठी गाणे म्हणत होता....
'तुमि जे मूर शुकान मोनोट, नियरोरे सेंचा टोपल
नामी ओहा रोदोरे नोई, मूर देहोत प्रोती पुवा...
(अर्थ: माझ्या कोरड्या आणि उदास मनासाठी, तू सकाळी अंगावर पडणाऱ्या दवबिंदूंसारखी किंवा सूर्यप्रकाशाच्या ओघळणाऱ्या नदीसारखी शीतल आहेस.)
झुबिनदा... ह्याचे चित्र असलेले फलक आम्ही वाटेत पाहिले होते. खरतर मी ह्या गायकाचे नावही प्रथम ऐकत होतो. तेही त्यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर...
झुबीन गर्ग ह्यांचा जन्म झाला होता १८ नोव्हेंबर १९७२ रोजी. आम्हाला तो रिक्षावाला भेटला तो १८ नोव्हेंबर २०२५ रोजी. आसामी संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व झुबिन गर्ग यांचे १९ सप्टेंबर २०२५ रोजी सिंगापूर येथे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पहिल्या जयंतीदिनीच आम्हाला तो रिक्षावाला भेटला होता. तो अतिशय भावूक होऊन त्याने आम्हाला गाणे ऐकवण्याचे हे मुख्य कारण होते.
झुबिनदा हे गायक तर होतेच शिवाय संगीतकार, संगीत संयोजक, आणि गीतकारही होते. त्यांनी प्रामुख्याने आसामी, बंगाली आणि हिंदी भाषेतील चित्रपट आणि संगीत उद्योगांमध्ये काम केले आणि गायन केले. त्यांनी इतर ४० भाषा आणि बोलीभाषांमध्येही ३८००० हून अधिक गाण्यांचे गायन केले.
सिंगापूरमधील कोरोनरच्या चौकशीत असे दिसून आले की, झुबिन गर्ग ह्यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला एक अपघात होता; यात कोणताही घातपात झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. याउलट, आसाम गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) विशेष तपास पथकाने (SIT) आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असा दावा केला की, हा मृत्यू एक नियोजित खून होता. एसआयटीने सात व्यक्तींविरुद्ध (ज्यामध्ये त्याचा व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांचा समावेश आहे) खुनाचा आणि गुन्हेगारी कटाचा आरोप ठेवत एक सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे.
विशेष तपास पथकाने (SIT) दाखल केलेल्या ३,५०० पानांच्या आरोपपत्रावरून असे दिसून येते की, झुबिन गर्ग यांच्या विरोधातील कट प्रामुख्याने आर्थिक शोषणाशी संबंधित होता.
SIT ने फॉरेन्सिक बँकिंग डेटाची सखोल तपासणी केली असता, १.१ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघडकीस आले आहेत जे कथितरीत्या दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या साखळीचा भाग आहेत. तसेच तपासादरम्यान २ कोटी रुपयांच्या निधीत मोठी अनियमितता असल्याचे समोर आले आहे. सिंगापूर दौऱ्यापूर्वी, या मोठ्या आर्थिक तफावतीमुळे गायक आणि त्याच्या व्यवस्थापन टीममध्ये अविश्वास वाढला होता आणि त्यांच्यात तीव्र वैयक्तिक कटुता निर्माण झाली होती. आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, गायक सिद्धार्थ शर्मा (व्यवस्थापक) आणि श्यामकानू महंत (कार्यक्रम आयोजक) यांनी या प्रसिद्ध गायकाच्या नावाचा वापर करून विक्रेते आणि प्रायोजकांकडून खंडणी उकळली आणि त्यांची फसवणूक केली. सुरक्षा कर्मचारी नंदेश्वर बोरा आणि परेश बैश्य यांच्यावर 'गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासभंग' केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकाच्या मालमत्तेशी आणि कार्यक्रमांच्या बुकिंग रकमेशी संबंधित अनेक आर्थिक अनियमितता हाताळण्यात त्यांचा सहभाग असल्याचे आरोप आहेत.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, या "नियोजित हत्ये"ची मुळे सिंगापूर दौऱ्याच्या खूप आधीपासून रुजलेली होती. याचा अर्थ असा की, या मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकार लपवण्यासाठीच हा कट रचला गेला असावा.
चार मुख्य आरोपींवर—कार्यक्रमाचे आयोजक श्यामकानू महंत, माजी व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, बँडमधील सहकारी शेखर ज्योती गोस्वामी आणि सहगायिका अमृतप्रभा महंत—हत्या, गुन्हेगारी कट, खंडणी, फसवणूक, विश्वासाचा भंग आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी औपचारिक आरोप ठेवण्यात आले आहेत. झुबीनसोबत सिंगापूरला गेलेल्या अमृतप्रभा महंत हिच्यावर, वैद्यकीय इशारे असूनही, गायकाला वारंवार मद्यपान करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
संदीपान गर्ग (निलंबित आसाम पोलीस डीएसपी आणि झुबीनचे चुलत भाऊ) यांच्यावर सदोष मनुष्यवध निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांनी झुबिनदा अत्यंत नशेत असताना आणि प्रकृती खालावलेली असतानाही, पोहायला जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
झुबिनदा ह्यांनी आसामी संगीत क्षेत्राला नव्या उंचीवर नेले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण आसामी जनता अतूट दुःखात बुडाली. राज्यातील लोकांसाठी, हा आसामी संगीताच्या एका सुवर्णयुगाचा अंत होता, एक अशी हानी जी कधीही भरून येणार नाही.
त्यांच्या निधनाने आसाममध्ये विविध क्षेत्रात लक्षणीय बदल घडले. आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) आणि रायजोर दल यांसारख्या स्थानिक संघटनांनी न्यायाच्या मागणीसाठी भव्य मोर्चे काढले आणि मानवी साखळ्या तयार केल्या.
ऑक्टोबर २०२६ मध्ये, जेव्हा न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी झुबिनचा चुलत भाऊ संदीपान गर्ग ह्याला जामीन मंजूर केला, तेव्हा आसाम सचिवालयाबाहेर (जनता भवन) प्रचंड गदारोळ झाला आणि ४० लाखांहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर #JusticeForZubeenGarg मोहीम सुरू केली.
जनतेच्या रोषाच्या पार्श्वभूमीवर, आसाम सरकारने आणि सीआयडीने आरोपीला दिलेल्या जामिनाविरुद्ध तात्काळ सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चाहते आणि संगीतप्रेमींचे एक मोठे जाळे डिजिटल माध्यमांद्वारे झुबिन यांची हजारो गाणी, जी गहाळ झाली होती किंवा उपलब्ध नव्हती, ती ऑनलाइन प्रसारित आणि संग्रहित करत आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला त्यांची रॉयल्टी मिळू शकेल.
आसामभर त्यांच्या सन्मानार्थ भित्तिचित्रे तयार करण्यात आली आहेत आणि नियमितपणे श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत.
झुबिन केवळ एक गायकच नव्हते, तर एक परोपकारी व्यक्तीही होते; त्यांनी १५ हून अधिक गरजू मुलांना दत्तक घेतले होते आणि वन्यजीव संवर्धनासाठी काम केले होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या सामाजिक सुधारणा आणि अनाथाश्रम मोहिमांना मोठा धक्का बसला, ज्या आता त्यांचे चाहते आणि 'झुबिनसाठी न्याय' चळवळीद्वारे पुढे नेल्या जात आहेत.
थोडक्यात, झुबिन गर्ग यांच्या निधनाने केवळ आसामला भावनिक धक्काच बसला नाही, तर ते सत्य आणि न्यायाच्या मागणीचे एक शक्तिशाली प्रतीक बनून राज्यातील लोकांना एकजूट केले. होय, झुबिनदा ह्यांचा इतका प्रभाव आसाममध्ये आहे की त्यांच्या मृत्यूनेही संपूर्ण आसामी लोकांना एकत्र केले. खरोखरच झुबिनदा यांच्यावरील लोकांचे प्रेम हे अलौकिक आहे. झुबीनदा ह्यांच्या पहिल्या जयंतीदिनी झालेल्या त्यांच्या ओळखीमध्ये आम्हीदेखील भारावून गेलो होतो. मायाबिनीची जादू आमच्यावरही झाली होती. रिक्षावाल्याने आमचा निरोप घेतला. मात्र मायाबिनीची साथ आता आम्हाला होती. आम्ही पुन्हा पेडल मारले ते गुणगुणत... ' मायाबिनी रातिर बुकुत...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा