सोमवार, २९ जानेवारी, २०१८

डोंबिवली सायकल क्लब

नदीचे कोंदण लाभलेली डोंबिवली नगरी वृक्षराजीने समृद्ध होती. आंबा, चिंच, बोरं, चिक्कू, जांभूळ, सीताफळ, नारळ असे अनेक वृक्ष आणि भातशेतीने डोंबिवली सजली होती. २० व्या शतकाच्या अखेरच्या दशकात  नवउच्चमध्यमवर्ग स्थिरावत असताना मात्र डोंबिवली चे रूप बदलत येथील वृक्षराजी आणि भातशेती झपाट्याने नाहीशी होत गेली. केवळ बैलगाडी या वाहनाची ओळख असलेल्या डोंबिवलीमध्ये धूर ओकणारी वाहने दिसू लागली. मात्र तरीही डोंबिवली कॉलेजच्या प्रांगण सायकलने व्यापलेले होते. धूर ओकणाऱ्या दुचाकी अपवादात्मकच दिसत.
२१ वे शतक उजडताना मात्र धूर ओकणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनी शहर व्यापून टाकले. शहरातील काही सायकलप्रेमी मात्र निष्ठेने आपापली शहरांतर्गत कामे सायकलनेच करत होती.
दरम्यान नोकरीनिमित्ताने ३ वर्षे पुण्याला असताना तेथील सायकल क्लब बरोबर जोडला गेल्यावर डोंबिवली मध्येही असा क्लब सुरु करण्याचा विचार मनात बळावत होता.
डोंबिवली येथे पुन्हा बदली झाल्यावर ऑर्कुट द्वारे Anand Parvate बरोबर याविषयी चर्चाही झाली. आनंद, Pradip Adur, Vaishal Dharamsey यांनी #dombivlicyclingclub ची स्थापनाही केली. दुर्दैवाने हा गट अल्पायुषी ठरला.
भारतीय राष्ट्रीय कॅलेण्डरचा शके १९३३ मधील फाल्गुन महिना सुरु होता. माझा आत्येभाऊ अजित अभ्यंकर याच फोन आला. त्याने दीपक देशपांडे (डी डी) यांच्या ऑफिसमध्ये एकत्र जमून सायकल क्लब सुरु करत असल्याचा निरोप कळवला. मी उत्सुकतेने डिडींच्या ऑफिसमध्ये पोचलो. तो शनिवारचा दिवस होता. दीपक देशपांडे, त्यांचे चिरंजीव, डॉ सुनील पुणतांबेकर, आनंद, अडुरकाका, देवनारायण, देव गायकवाड, अजित अभ्यंकर आणि मी (शशांक वैद्य) असे ९ जण तेथे जमलो होतो. एकमेकांची ओळख करून घेत आम्ही एकत्रितरित्या दर रविवारी सायकलिंग करण्याचे ठरवले. हि होती डोंबिवली सायकल क्लब (DCC) ची मुहूर्तमेढ!
लगोलग आमचे एकत्र सायकलिंग सुरु झाले. क्लब स्थापन झाला ती तारीख होती भारतीय सौर फाल्गुन १६, शके १९३३ अर्थात ख्रिस्ती दिनांक फेब्रुवारी ५, २०१२.
हिंदूनववर्ष दिन गुढीपाडवा जवळच आला होता. गणेशमंदिरसंस्थान आयोजित नववर्षस्वागतयात्रा हे तर डोंबिवली चे भूषण. DCC ची स्थापना झाल्यावर लगोलग DCC ला स्वागतयात्रेत सामील होण्याचे भाग्य लाभले. स्वागतयात्रेतील अग्रक्रमाने स्थान DCC ला मिळाले. क्लब स्थापन होताच जणू गणरायाचा अशीर्वादच DCC ला लाभला.
दर रविवारी सकाळी एकत्रित रित्या सायकलिंग सुरु झाले. दर आठवड्याला नवनवीन सभासद जोडले जाऊ लागले. दीपक देशपांडे यांच्या करड्या शिस्तीमुळे सर्वजण विशिष्ट लयीत जात असत.
डोंबिवली शहर, जवळपासचा परिसर यांचे अंतरंग आम्हाला खुणावत होते. एकत्रित सायकलिंग करत असताना आमच्याच शहराची नव्याने ओळख होत होती. सिमेंटच्या जंगलाने व्यापलेल्या शहरात आणि जवळपासच्या परिसरात अजून निसर्गाचा किती ठेवा उपलब्ध आहे हे अचंबित करत होते.
गंधार कुलकर्णी आणि इतरांच्या संपर्कातून शाळा कॉलेजमधील किशोरवयीन  डोंबिवलीकरही DCC शी जोडले जाऊ लागले.
डोंबिवली-ठाणे- डोंबिवली असा माझा cycle2work उपक्रम सुरु असताना वाटेत अनेक सायकलपटू भेटत. त्यांना रविवारी DCC च्या सायकलफेरीचे आमंत्रण देणे नित्याचेच!
डॉ. पुणतांबेकर अतिशय निष्ठेने दर रविवारच्या सायकलफेरीला हजर असत. त्यांची नियमितता वाखाणण्यासारखी होतीच. शिवाय त्यांचा जनसंपर्क, मनमिळाऊ स्वभाव यामुळेही DCC ची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत राहिली.
सदस्य संख्या वाढली त्याचप्रमाणे DCC सदस्यांची भूकही वाढत होती. मग DCC सदस्यांनी बदलापूर, भिवंडी, नेरळ, टिटवाळा या व इतर प्रदेशांवरही सायकलस्वारी करण्यास सुरुवात केली. 'आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना' हा मंत्र जपत DCC सदस्य इतरांना सायकलकडे आकृष्ट करत होते.
१९९० च्या दशकापासून नित्यनियमाने दरवर्षी माघी चतुर्थीनिमित्त कल्याण पाली सायकलयात्रा करणाऱ्या Gajanan Keshav Vaidya याला DCC सदस्य सामील झाले. यंदाची DCC सदस्यांची ४ थी कल्याण/ डोंबिवली -पाली वारी!
दरम्यान DCC मधील सदस्य आपली भूक भागवण्यासाठी इतर क्लबबरोबरही दीर्घकालीन सायकल दौरेही करत होतेच.
अश्या वेळी असे दौरे DCC ने ही आयोजित करायला हवेत असे मनोमन वाटत होते.
मी आणि अय्यरकाका यांनी केलेला अष्टविनायक दौरा हा केवळ DCC सदस्यांनी सहभाग घेतलेला पहिला साप्ताहिक दौरा ठरला. तर DCC सदस्यांपैकी ममता परदेशी ही ५०० किमी हुन अधिक अंतर सोलो सायकलिंग करणारी पहिली सायकलपटू ठरली.
DCC सदस्यांनी केवळ रविवारी सायकलिंग न करता, आठवड्यातील इतर दिवशीही नियमित सायकलिंग करावे या उद्देशाने एक अनोखा उपक्रम सुरु करण्याचे ठरले. या उपक्रमात सलग २१ दिवसात किमान १४ दिवस सायकलिंग करणे अपेक्षित होते. सायकलिंग मधील सातत्य वाढवणे, इतरांना सायकलिंग कडे वळवणे या बरोबरच DCC चा प्रसार करणे हि प्रमुख उद्दिष्ट्ये या उपक्रमाद्वारे साध्य करायची होती. या उपक्रमात २१ जणांनी भाग घेतला. फेसबुक सारख्या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून उपक्रमातील सहभागी सायकलपटूंनी आपली मोहीम इतरांपर्यंत पोचवणेही अपेक्षित होते. उपक्रम चांगलाच यशस्वी झाला. मुंबई, पुणेच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरूनही 'कोणती सायकल घेऊ'असे फोन येऊ लागले. उपक्रमात सहभागी झालेल्या सायकलपटूंना प्रमाणपत्र देण्यास RAAM (Race Across Amerika) चे विजेते डॉ हितेंद्र महाजन हजर राहणे हा सर्व सहभागी सायकलपटूंकरीता आनंदाचा धक्का होता.
केवळ ९ जणांनी स्थापन केलेल्या डोंबिवली सायकल क्लब ने सहाव्या वर्षी चांगलेच बाळसे धरले. सदस्यसंख्या जवळपास २०० पर्यंत पोचली.
डॉ पुणतांबेकर यांनी अनेक वर्षे मनाशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला काळ अनुकूल होता. ते स्वप्न होते -डोंबिवली येथे सायकल मित्र संमेलन आयोजित करण्याचे.
नॅशनल युथ ऑर्गनायझेशन #nationalyouthorganization  चे श्री कमलाकर क्षीरसागर आणि क्रीडाभारतीचे श्री ऋषिकेश यादव यांच्या सहकार्याने डोंबिवली सायकल क्लब DCC) सायकल मित्र संमेलनासाठी सज्ज झाला. Sahir Shaikh च्या #bikeport चा सहभागही महत्वाचाच. त्यानंतर केवळ DCC च नव्हे तर महाराष्ट्रातील इतर अनेक सायकल क्लबमधील सदस्यांनी दिलेल्या प्रतिसादाची फलित म्हणजेच राष्ट्रीय दिनांक सौर फाल्गुन ८, शके १९३९ अर्थात ख्रिस्ती दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी भरणारे 'पहिले सायकल मित्र संमेलन'!

- शशांक वैद्य
#tjsbbank #ismartcommute #saveoursahyadri #zenscycle2work #cycle2work #cyclingzens #cyclekatta #bikeport #kalyancyclist

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...