रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड तर दुसऱ्या बाजूला वाहणारी अंबा नदी अश्या निसर्गरम्य सान्निध्यात एक गाव वसले आहे- ‘पाली.’
पाली येथील बल्लाळ नावाच्या गणेशभक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या बालकाने पुजलेल्या शिळेत कायम वास्तव्य करून राहिलाय तो ‘पालीचा बल्लाळेश्वर’. भक्ताच्या नावाने प्रसिद्धी पावलेला अष्टविनायकातील हा एकमेव गजानन.
असं म्हणतात, की पेशवेकाळात या देवस्थानाला कौल लावून न्यायनिवाडे होत. ‘सिंधुदेशेऽतिविख्याता पल्लीनामाऽभुवत्पुरी’ असा उल्लेख आलेला आहे. यातील पल्ली म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर विनायक.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव येथे साजरे होतात.माघी उत्सवाची यात्रा फार मोठी असते. सुमारे १५ ते २० हजार लोक यात्रेला येतात. माघी उत्सवात शुद्ध पंचमीला लळीत करण्याची फार जुनी प्रथा आहे. तृतियेला देवाची पालखी निघते. पालखीत नारळ व मूर्ती ठेवतात. पालखी पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात.माघी चतुर्थीला श्रीगजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात अशी श्रद्धा असल्याने त्यावेळी भाविकांची फार गर्दी होते.
माघी चतुर्थीला पाली येथे नित्यनियमाने येणारे हजारो भाविक आहेत. त्यात कल्याणचे विलास (गजानन) वैद्य, शेखर वैद्य हे बंधू या भाविकांमधील विशेषच. गेली ३३ वर्षे माघी चतुर्थीनिमित्त हे दोघे कल्याणहून १२५ किमी अंतरावरील पाली हे गाव सायकलने गाठतात. ह्यात त्यांना त्यांचा आत्तेभाऊ कुमार वेलणकर याचीही साथ ठरलेलीच.
गेल्या ४ वर्षांपासून डोंबिवली सायकल क्लबचे सदस्यही विलास बरोबर पालीच्या वारीत सहभागी होत आहेत. मार्गशीर्ष महिन्यापासूनच सर्वांना पालीला जायचे वेध लागतात. या वर्षी माघी चतुर्थी होती सौर माघ १ शके १९३९ या तारखेला म्हणजेच ख्रिस्ती तारीख २१ जानेवारी २०१८ रोजी. मात्र दिनांक ८ माघ शके १९३९ (ख्रिस्ती दिनांक २८ जानेवारी २०१८) रोजी डोंबिवली येथे आयोजित केलेल्या 'पहिल्या सायकल मित्र संमेलन'ची तयारी सुरु असल्याने डोंबिवली सायकल क्लबचे किती सभासद येतील याविषयी साशंकता होती. अखेरीस एकूण १० जणांचा वारकरी संप्रदाय माघी चतुर्थीनिमित्त तयार झाला.
पहाटे ६ वाजता डोंबिवली येथून निघणारे सारंग मुळ्ये, योगेश चौघुले, प्रितेश चौघुले आणि मी चार रास्ता येथे एकत्र जमलो. आम्हाला शिळ फाटापर्यंत साथ देण्यासाठी भीमाशंकर बिराजदारही तेथे आले होते, फोटोसेशन करून आम्ही मार्गस्थ झालो. सामंत पेट्रोल पंप येथे कल्याणहून येणारे वारकरी भेटणार होते. आम्ही तेथे पोहोचेपर्यंत कल्याणकर आलेही होते. मग वेळ न दवडता आम्ही शिळ फाटा गाठण्याचे ठरवले. पहाटे ६ वाजता डोंबिवली येथून निघणारे सारंग मुळ्ये, योगेश चौघुले, प्रितेश चौघुले आणि मी चार रास्ता येथे एकत्र जमलो. आम्हाला शिळ फाटापर्यंत साथ देण्यासाठी भीमाशंकर बिराजदारही तेथे आले होते, फोटोसेशन करून आम्ही मार्गस्थ झालो. सामंत पेट्रोल पंप येथे कल्याणहून येणारे वारकरी भेटणार होते. आम्ही तेथे पोहोचेपर्यंत कल्याणकर आलेही होते. ट्रीप्पल सीट सायकलवर दुर्गेश, शेखर आणि बडोद्याहून दरवर्षी पालीसाठी येणारा आमचा मित्र स्वार होते. मग वेळ न दवडता आम्ही शिळ फाटा गाठण्याचे ठरवले.
सकाळची वेळ असल्याने कल्याण शिळ महामार्गाला रहदारी तुरळक होती. आम्ही सर्वजण एकापाठोपाठ चाललो होतो. सर्वांच्या सायकलींनी वेग पकडला होता. आमच्या लक्षात येईपर्यंत आम्ही शिळ फाटा गाठलाही होता. शिळ फाटा येथे चहापान हे प्रत्येक पाली वारीच्या वेळी ठरलेलेच. सगळ्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर पनवेलच्या दिशेने निघण्यासाठी तयारी सुरु झाली खरी, पण बिराजदारांना परत जावे लागणार होते. पण त्यांना अमच्याबरोबरही अधिक वेळ घालवायचा होता. मग तेथे फोटोसेशन करण्यातही थोडा वेळ आम्ही थांबलो. पुढेमागे करत अखेरीस आम्ही पनवेलच्या दिशेने कूच केले आणि बिराजदारांना मात्र परत फिरण्याशिवाय पर्याय उरला नाही.
आम्ही पुढे सरकत असताना रविमहाराजही साथ करत होते. तळोजा फाटा सोडून पुढच्या चौकात पोचल्यावर मात्र आम्ही सेवा रस्ता पकडला. मी आणि योगेश चोघुले एकापाठोपाठ होतो. बाकी सगळेजण थोडे पुढेमागे झाले होते. कळंबोली सर्कलला मात्र पुन्हा सर्वजण एकत्र आले. पनवेल जवळ येत असताना रस्त्यावरील गर्दी वाढत होती. सारंगच्या सायकलला भगवा ध्वज लावलेला होता. पनवेल S T स्टँड जवळ एके ठिकाणी एका दुचाकीला भगवा ध्वज लावलेला मला दिसला. मात्र त्या दुचाकीभोवती काहीजण घोळका करून उभे होते. मग मी ध्वज लावलेले वाहन आणि वाहनस्वार बघण्यासाठी थांबलो. मी वारंवार पाहूनही अंदाज येईना. त्या वाहनाभोवती ओळखीचे चेहरे दिसेना. मग मात्र ध्वज लावलेले वाहन म्हणजे सारंगची सायकल नसल्याची खात्री करत मी पुढे निघालो. ह्या वेळात बाकी सगळे पुढे निघून गेले होते. मात्र लगेचच मी त्यांना गाठले. पळस्पे फाटा येताच आम्ही पुढील थांबा घेतला. येथे नाश्ता आणि चहा हेही पालियात्रेत नेहमीच ठरलेले.
गप्पागोष्टी, फोटोसेशन करत सगळेजण पुन्हा ताजेतवाने झाले. आता कर्नाळा येथील छोटा घाट लागणार होता. सर्व सायकली घाट पार करायला सज्ज होत्या.
आमच्या पाठोपाठ कुमार त्याच्या धूर सोडणाऱ्या दुचाकीवरून येत होता. सायकलस्वारांबरोबर त्यांना साथ देत अश्वशक्तीधारी दुचाकीवरून येणे वाटते तेवढे सोपे नाही. खरे तर सगळ्या सायकलींना आळीपाळीने साथ देत आमच्यापेक्षा कुमारचीच खरी परीक्षा होती.
कर्नाळ्याच्या दिशेने कूच करताना ध्वज लावलेल्या सारंगच्या सायकलपाठोपाठ श्विन जात होती. सारंग, त्याची ३२ वर्षीय सायकल आणि सायकलवर ध्वज यांचे आणि या सगळ्याच्या सावलीचे मनसोक्त फोटो काढत मीही जात होतो. कर्नाळ्याचा घाट सुरु होताच सारंग मागे पडला आणि मी पुढे सरकलो. श्विन ३*७ वरून प्रथम ३*६ आणि नंतर ३*५ गियरवर धावू लागली. थोडा अधिक चढ लागताच मी २*५ साठी खटका दाबला मात्र... श्विनची चेन सटकू लागली. मी आणि सारंग सगळ्यात मागे असल्याने कुमार आमच्या बरोबरच होता. मी श्विनला थांबवल्यावर त्याने थोडी खटपट केली. पण श्विन काही मनावर घेईना. पण मी श्विनची नस अन नस ओळखत होतो. मग चेनवर जास्त ताण न येण्यासाठी हळूहळू पेडल मारत मी घाट चढलो. अभयारण्याअगोदराचा उतार सुरु होत असतानाच एका सायकलने जागेवरच ठाण मांडले होते. दुर्गेश त्या सायकलची विचारपूस करत असताना आजूबाजूच्या झाडांवर आणि उंचवट्यांवर तेथिल स्थानिक शेपटीवाले द्विपाद आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. ते मानवाचे पूर्वज असल्याचे आम्हाला माहित असले तरी त्याच नात्याने ते आमच्याशी प्रेमाने वागतील का पूर्वजांना अपेक्षित मानवंदना आम्ही देत नसल्याने आमच्यावर रागावतील याची कल्पना नसल्याने आम्ही जरा सावधपणेच त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो. हो, कदाचित आमचे लक्ष नसल्याचे दिसताच ते वाटेतील टोल आमच्या सामनातून वसूल करतील हि भीती होतीच. त्यांच्या मार्कटलीला कॅमेराबद्ध करून आणि सायकल ठीकठाक करत आम्ही पुढे निघालो.
आम्ही ९ सायकलस्वार एकमेकाना साथ देत जात अभयारण्य मागे टाकल्यावर कर्नाळ्याच्या अंगठ्याचे जवळून दर्शन होऊ लागले. आम्ही काहीजण तेथे फोटो काढत थांबत पुढे सरकत होतो. मी आणि विलास मागे राहिलो. इतक्यात विलासला समोरील रिसॉर्ट मध्ये काम करत असलेल्या त्याच्या मित्राची आठवण झाली. विलासने त्याला बोलावून घेतले आणि माझी ओळख करून दिली.आमचे गप्पाष्टक रंगत होते, मात्र इतर सवंगडी पुढे गेले असल्याने आम्ही त्याचा निरोप घेतला.
आपटे फाट्याला सगळे सवंगडी आमची वाट पाहत होते. तेथे विलासचा शिरढोण येथे राहणारा शिवप्रेमी मित्रही त्याच्या सवंगड्यांसह आमची वाट पहात होता. एकमेकांची ओळख करून सरबत/ चहा घेऊन दोन्ही गट पुन्हा आपापल्या मार्गाला लागले. आता आम्हाला पेण गाव खुणावत होते. भास्कराचार्यही ऐन भरात आले होते. आम्ही सायकली दामटवत पेण गाठले. येथील जेवणाची सोय नेहमीप्रमाणेच उत्तम होती. जठराग्नी तृप्त झाल्यावर (आणि जेवण अंगावर आल्यावर) पेडल मारणे कठीणच होते. पण पाली गाठण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळ्या सायकली हळूहळू निघाल्या.
आता सत्याग्रह करण्याची पाळी होती योगेशच्या फायरफॉक्सची. त्या निमित्ताने आमची भोजनोत्तर विश्रांतीही झाली. पुढे लगेचच वडखळ येथे चहाच्या निमित्ताने आम्ही थांबलो. जेवणानंतरची रपेट जेवणानंतरच्या व्याख्यानाएवढी कठीण नसली तरी थोडी अवघडच. वडखळनंतर पुन्हा थोड्या वेळात आम्ही चहापान केले.
आता वाकण फाटा येथे एका वडापावच्या दुकानात मला जायचे असल्याने मी सगळ्यात पुढे निघालो आणि तेथे पोचून सगळ्यांना त्या दुकानात वडापाव/ चहाचे निमंत्रण दिले.
आता पाली अवघ्या ८ किमी वर होते.
सूर्य उतरणीकडे वळला होता. वडापाव, चहा, उसाचा रस याद्वारे जिव्हा तृप्त करून आम्ही निघालो खरे पण निसर्गाची रंगसंगती कॅमेराबद्ध करण्याचा मोह सोडवेना. मनसोक्त फोटोसेशन करून श्विन आणि तिच्या मैत्रिणींनी पाली कडे कूच केले. पाली हाकेच्या अंतरावर राहिले असते सुधागड (की सरसगड?) च्या सान्निध्यात फोटो काढण्याचा मोह मलाच काय श्विनलाही पडला.
पुढे पाली गावात अभूतपूर्व उत्साहात भाविक जमले होते. गर्दीतून वाट काढत आम्ही भक्त निवासपाशी पोचलो. आपापल्या सायकलींना विसावाकक्षात ठेवून आम्ही भक्तनिवासमधील आमच्या कक्षाचा ताबा घेतला. आंघोळ आटपून आणि सामान ठेवून बल्लाळेश्वराचे दर्शन आणि वैभव यांचे अनुभवण्यासाठी आम्ही मंदिरात गेलो तोपर्यंत रात्रीचे ७.३०- ८ झाले होते. भाविकांची गर्दी बल्लाळेश्वराच्या पायाशी नतमस्तक होत होती. दर्शन करून आम्ही निघेपर्यंत घड्याळबाबा १० वाजल्याचे सांगत होते. मंदिराबाहेर येऊन सभोवतालची सजावट पाहणे खरोखरच नेत्रदीपक होते. संपूर्ण मंदिर आणि परिसर लखलखत होता. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय ते समजत होते. तेथील उत्सव, लोकांचा उत्साह, सजावट यांचे वर्णन करणे खरेतर शब्दांच्या पलीकडलेच.
नेहमीप्रमाणेच मंदिराजवळच आमची जेवण्याची व्यवस्था केली होती. तेथे पंगतीला लाभ घेत पोटभर जेवण करून आम्ही पुन्हा भक्तनिवासकडे वळलो. निद्रादेवी लवकर प्रसन्न होईल याची खात्री नसली तरी दुसऱ्या दिवशी लवकर परत निघायचे असल्याने तिची आराधना करणे क्रमप्राप्त होते. बल्लाळेश्वराचे वैभव आणि एकंदर उत्सव वातावरण यांवर निद्रादेवीचा असर मात्र कमी पडत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा