बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

वनवासी विकास प्रकल्प, तलासरी: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ७

'वनवासी विकास प्रकल्प' येथे पोहोचताच श्री भुसारा सरांनी आमचे स्वागत केले. डोंबिवली येथील क्रीडाभारती आणि नॅशनल युथ ऑर्गनायझेशनचे श्री कमलाकर क्षीरसागर, श्री नवरे ह्यांच्यामार्फत गेल्या वर्षी श्री सुनील ननावरे, श्री सुनील पाटील ह्यांच्याबरोबर काश्मीर ते कन्याकुमारी (K2K) सायकलयात्रा करणाऱ्या चमुची येथे एक दिवस राहण्याची सोय झाली होती. तेव्हा K2K च्या सदस्यांना तेथून डोंबिवली येथे आणण्यासाठी मागील वर्षी श्विनने या प्रकल्पाला भेट दिली होती. त्याचवेळी श्विनचा या प्रकल्पाबरोबर भुसारा सरांशीही स्नेह जडला होता. आम्हा पुणे जम्मू सायकलसफरीतील सदस्यांचीही येथील सोय पुन्हा एकदा श्री नवरे व श्री क्षीरसागर ह्यांच्यामार्फत झाली होती.

श्री भुसारासरांनी स्वतः सुद्धा याच प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण घेत पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. गेली २३ वर्ष अविरतपणे दिवस रात्र भुसारा सरांनी या प्रकल्पासाठी स्वतःला वाहून घेतले आहे.

सगळे सायकलस्वार थोडे शिथिलगात्र झाल्यावर चहासाठी प्रकल्प कार्यालयाच्या सज्जात जमले. सर तेथील प्रकल्पाची माहिती सांगत होते. येथील वसतिगृहात साधारण १५०-२०० मुले/ मुली राहत असून शाळेत एकंदर ८०० मुले शिक्षण घेत आहेत. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय येथे केली जाते. शाळेमध्ये मुलांकरीता २५ संगणक असून सुसज्ज प्रयोगशाळाही आहे. पहाटे ५ ते रात्री १० असा येथील मुलांचा दिनक्रम असतो. आज मात्र येथील मुलांची सहल गेली असल्यामुळे त्यांना भेटण्याची आमची संधी हुकली होती.

येथे अनेक सामाजिक उपक्रम केले जातात. एक गोशाळाही येथे असून त्यामध्ये १३० गाई वासरे आहेत. भारत विकास परिषदेमार्फत ह्या गोधनाचा खर्च उचलला जातो. अंगणवाडीचा अभ्यासक्रम येथे घेतला जातो. 'प्रथम' संस्थेमार्फत अभ्यासक्रम घेतला जातो. 'वृद्धांचा सांभाळ कसा करावा' याविषयी ३ महिन्यांचा अभ्यासक्रम येथे सुरू झाला असून तो पूर्ण झाल्याबरोबर मुंबई येथे त्यांना रोजगारही त्वरित सुरू होतो. रक्षाबंधनानिमित्त येथील मुली साधारण ५०००० राख्या बनवतात तसेच संक्रांती निमित्त २०००० ते २५००० तिळगुळ बनवून त्यांचे आसपासच्या शाळांमध्ये, गावांमध्ये वाटप केले जाते. तसेच गणेशोत्सवानिमित्त साधारण १५० गणेशमूर्ती बनवून त्यांचे गावागावात वितरण केले जाते. जवळपासच्या साधारण २० दहीहंड्या फोडायला प्रकल्पातील मुले जातात तेव्हा १०००० च्या आसपास लोक त्यांना प्रोत्साहन देण्यास जमत असतात. दरवर्षी साधारण ५० जोडप्यांचे सामूदायिक विवाहही प्रकल्पाद्वारे लावले जातात.

या प्रकल्पाचा आज दिसत असलेला वटवृक्ष लावणारे श्री माधवराव काणे हे मूळ कल्याणचे रहिवासी. १९६७ साली त्यांनी कल्याण येथील नगराध्यक्षपद सोडून तलासरी येथे केवळ ७ मुलांसह प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या नावाने प्रकल्पाद्वारे 'वनसखा' हे त्रैमासिकही काढले जाते.


(डावीकडून) आमचा टेम्पोचालक गौतम, श्री वसंत भुसारा सर यांच्याबरोबर पुणे जमू सायकलयात्रेतील सदस्य




                  वनवासी विकास प्रकल्पाचे प्रांगण

आमचे चहापान आणि सरांबरोबरील संभाषण होत असताना आमचा टेम्पोचालक गौतम मात्र मोकळा झाला नव्हता. मुळात केवळ टेम्पोचालक म्हणून तो आला नव्हता तर सायकल दुरुस्ती करण्यासाठीही गौतमला बरोबर घेतले होते. आजच्या दिवसात त्याला टेम्पो चालवण्याबरोबर सायकल दुरुस्तीच्या कामाचेही पूर्ण समाधान मिळत होते.

आम्ही फुजी, स्कॉटसह एकूण ४ राखीव सायकली बरोबर घेतल्या होत्या. डोंबिवली ते तलासरी या प्रवासादरम्यान श्विनबरोबर इतर तीन सख्या जायबंदी होऊन त्यांच्या बदली चारही राखीव सायकलींना टेम्पोतुन उतरण्याची संधी मिळाली होती. आम्ही सरांबरोबर बोलत बसलो असता गौतम चारही जायबंदी सायकलींची मलमपट्टी करत होता.

स्नान करून ताजेतवाने झाल्यावर अतिशय स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत सगळ्यांनी तृप्त मनाने निद्रादेवीची आराधना सुरू केली. येथील शांत आणि प्रसन्न वातावरणात निद्रादेवीही सगळ्यांना त्वरित प्रसन्न झाली.

  

२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...