रविवार, २३ फेब्रुवारी, २०२०

दादाभाईंच्या साम्राज्यात: पुणे जम्मू सायकलसफरः भाग १ लेख ८

भारतीय सौर २ पौष १९४१ (जागतिक निधर्मी कॅलेंडर).


युरोपियन ख्रिस्ती दिनांक २३ डिसेंबर २०१९


पहाटे सगळ्यांनाच लवकर जाग आली. सायकलींची तयारी सुरू असतानाच प्रकल्पातील प्रतिनिधी आमच्यासाठी चहा घेऊन आले. दूध उपलब्ध नसल्याने खास काळा चहा आमच्या सेवेत हजर होता. खरंतर काहीजणांना काळा चहा नको होता, अस्मादिकांना मात्र कोणत्याही प्रकारचा चहा असो, तो हवाच होता. आलं घालून केलेला तो काळा चहा खरोखरच उत्कृष्ट होता. हळूहळू जवळपास सगळ्यांनीच तो चहा घेतला.

चहापान झाल्यावर सगळेजण एकामागोमाग जाऊ लागले. मुंबई अहमदाबाद रस्ता अक्षरशः गुळगुळीत असल्याने आज पहाटेपासूनच MTB श्रेणीतील श्विनऐवजी अस्मादिकांनी हायब्रीड श्रेणीतील फुजीलाच पसंती दिली होती. फुजीने भुसारा सरांचे आभार मानत कूच केले. फूजीच्या पाठोपाठ गौतम त्याच्या टेम्पोसह जाऊ लागला. अद्यापि तेजोनिधी प्रकट व्ह्यायला अवकाश होता. त्यामुळे सगळ्याच सायकलींनी विजेऱ्या लावल्या होत्या. फुजीने लगेचच पुढे गेलेल्या सायकलपटूंना गाठले. तलासरी येथील वनवासी विकास प्रकल्पापासून अवघ्या १२ किमी अंतरावरच गुजरात राज्याची सीमा सुरू होते. सायकलयात्रींनी गुजराथेत प्रवेश केला तोपर्यन्त रविराजही क्षितिजावर अवतरले होते. साधारण तासाभराच्या प्रवासानंतर पुन्हा एकदा चहापानाची तहान लागली होती.

हमरस्त्याच्या शेजारीच असलेल्या एका चहा टपरीसमोर  सगळ्या सायकली रांगेत उभ्या राहिल्या. चहा/दूध बिस्किटांवर सगळे तुटून पडले.






एव्हाना बऱ्यापैकी उजाडले होते. रस्ताही सुंदर होता. पुन्हा एकदा मार्गाला लागत सगळ्यांनी वेग घेतला. त्या लोण्यासारख्या मऊ रस्त्यावर फुजी दिमाखात पूढे जात होती. अर्थातच फुजी संपूर्ण चमुच्या मागेच होती. जेव्हा तुम्ही एखाद्या चमूचे नेतृत्व करता तेव्हा तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी घ्यावीच लागते. केवळ अधिकार स्वतःच्या हातात ठेवून जबाबदारी दुसऱ्यांवर सोपवणे योग्य ठरत नाही.


थोड्या वेळाने नाश्त्यासाठी थांबा घेतला. नाश्त्यासाठी शेंगदाणे घातलेली रोटी खाताना उदरभरण होत होतेच पण रसनेचीही तृप्ती होत होती. ह्या रोटीमुळे मिळालेली ऊर्जा आता मनुष्यशक्तिमध्ये रूपांतरीत झाली होती. त्या इंधनाच्या जोरावर सगळ्या सायकली वेगाने अधिक वेगाने मार्ग कापू लागल्या.






पाहता पाहता सकाळ पासून जवळपास ९० किमी अंतर पार झाले होते. सुर्यदेवही आता डोक्यावर पोहोचला होता. आपोआपच सगळेजण हमरस्त्याच्या डावीकडे असलेल्या हॉटेल डिसेंटकडे वळले. हॉटेलमधील खाणे नावाप्रमाणेच डिसेंट होते. गुजराथ प्रांतात आल्यामुळे फुजीने गुजराथी थाळीचा आस्वाद घेतला.


 इतर जण जठराग्नी शांत करत असेपर्यंत फुजीची नजर हॉटेलच्याच आवारात भिंतीपालिकडे पसरलेल्या खाटांवर गेले. उदरभरण झाल्यावर लगेच सायकल चालवण्यासाठी पोटातील स्नायूंना ताणण्यापेक्षा आता जठराग्नीला मिळालेल्या आहुतीला पचवण्याचे काम त्या स्नायूंना करायचे होते. त्यासाठी वामकुक्षी करण्याची निकड फुजीला वाटू लागली. बाकीच्यांचे उदरभरण होईपर्यंत फुजीने संधीचा लाभ घ्यायचे ठरवले. मात्र थोड्याच वेळात एकापाठोपाठ सगळ्यांनीच तो मार्ग पत्करला.




आता केवळ १५-२० किमी अंतर बाकी असल्याने सगळेच सैलावले होते. थोडीशी वामकुक्षी झाल्यावर मात्र फुजी आणि तिच्या सख्या पुन्हा दौड करू लागल्या. नवसारी जवळ आल्याचे चिन्ह दिसू लागताच सातही स्वार आणखी वेगात जाऊ लागले. एके ठिकाणी हमरस्त्याशेजारी सेवा रस्ता सुरू होत होता. फुजी आणि इतर स्वार मुख्य हमरस्त्याकडे वळणार इतक्यात सेवा रस्त्यावरून हाका ऐकू आल्या....

एक उमदा माणूस आम्हा सर्वांना बोलावत होता. ते करसन भाई होते. आम्हा सगळ्यांचे स्वागत करण्यासाठी आणि आम्हाला दिशा दाखवण्यासाठी करसनभाई नवसारीहून ३-४ किमी पुढे आले होते. त्यांनी सर्व स्वारांना हार घातले आणि पेढे व चॉकलेट देऊन आम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजच्या मुक्कामी हॉटेल सुप्रीम येथे पोचलो.


महात्मा गांधींनी काढलेल्या सत्याग्रहयात्रेमुळे प्रसिद्ध पावलेल्या दांडी ह्या सगरतटानजीकच्या ठिकाणापासून नवसारी शहर जवळ आहे. पूर्णा नदिनजीक वसलेल्या नवसारी नगरीचे मूळ नवसारिका असे होते. ही नगरी विष्य ह्या प्रदेशाची राजधानी होती. ह्या नगरीला नुसारिपा असेही संबोधले जाते असे. दुसऱ्या शतकातील ग्रीक गणिती, खगोलशास्त्रज्ञ, भविष्यवेत्ता क्लाडिअस प्लॉटेमी ह्याच्या ग्रंथात नुसारिपा शहराचा उल्लेख आहे. चालुक्यांनी येथे प्रथम वसाहत केली. त्यानंतर राष्ट्रकूट आणि नंतर पारशी समाजाने येथे वसाहत केली.
इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हेही नवसारी येथीलच.

सुप्रीम हॉटेलमधील व्यवस्था उत्तम होती. मुख्य म्हणजे हॉटेल हमरस्त्याशेजारीच होते. दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्याबरोबर थोडी दौड करण्याची इच्छा व्यक्त करत करसनभाईनी आमचा निरोप घेतला.

गुजराथेत जेवण छान असणारच याची फुजीला खात्री होतीच. ह्याचा अनुभवही रात्री जेवताना आलाच.







1 टिप्पणी:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...