शुक्रवार, १४ मार्च, २०२५

पूर्वतयारी भाग १३: सूर्यपरीक्षा (कोलकाता चेन्नई सायकल सफर)

कोलकाता येथील मोर्चेबांधणी तर झाली होती. आमचा मार्ग आता पक्का होत असला तरी त्यातील टप्प्याचे गणित सोडवता येत नव्हते. पहिल्या तीन दिवशी सरासरी १६० किमी अंतर पार केले तर कोणार्क, पुरी येथून समाधानाने परत महामार्गाला लागता येईल असे दिसत होते. दरम्यान विवेक करमरकरने त्याच्या मित्राच्या मदतीने भुवनेश्वर येथे राहण्याची सोय होत असल्याचे सांगितले. मात्र तसे केल्यास आमचे गणित बदलून नंतर एखाद्या दिवशी १८०- २०० किमी सायकल चालवणे आवश्यक ठरणार होते.

आम्ही विमानाने ८ तारखेला कोलकाता येथे जाणार होतो. मात्र त्यासाठी आधी सायकल तर कोलकाता पर्यंत पोचवायला हव्या होत्या. आम्ही ट्रेन ने त्या सायकली ५ डिसेंबरला पाठवायचे ठरवले. म्हणजे सायकली ७ डिसेंबरला कोलकाता येथे पोचल्या असत्या.

सायकल पाठवण्याच्या आधी मी स्वतःची पुन्हा सराव परीक्षा घेण्याचे ठरवले. सूर्योदय ते सूर्यास्त ह्या वेळात डोंबिवलीहून पालीला गणपतीचे दर्शन घेऊन परत घरी पोचायचे असे ठरवले. संजय आणि आनंद हे मात्र येऊ शकणार नव्हते. सूर्य नेमका त्या(ही)दिवशी मी उठायच्या बऱ्याच आधी उगवला. घड्याळातील काटेही सकाळी बहुधा खूप वेगात धावले होते. मी फुजीला घेऊन निघालो तोपर्यंत जवळपास ८.०० वाजले होते. एक वाजेपर्यंत जिथे असेन तिथे पोचून परत फिरायचे मी ठरवले होते. तरच सूर्यास्तापर्यंत घरी परतू शकतो असे दिसत होते. त्यावेळेपर्यंत पालीला पोचायचे तर सरासरी वेग साधारण २० चा आवश्यक होता. फुजीने कोणतीही तक्रार न करता तो वेग घेतला. दरम्यान मध्यंतरी अप्पांकडूून पानियार आणले होते. तेही फुजीला लावले होते. 

फुजी दौडत होती. पनवेल, पळस्पे फाटा मागे पडले... ' दोस्ती चाय ' कडेही मी दुर्लक्ष केले कारण डोळ्यासमोर सूर्य आणि घड्याळ धावत होते. अर्धशतकी अंतर कापल्यावर एक मोठ्या झाडाच्या सावलीत थांबा घेतला. तिथे उदरात इंधन भरून पुन्हा धाव घेतली. खोपोलीपुढे जात असताना सूर्य तळपत होता. वाटेत दिसणारे नीरा केंद्र खुणावत होते. जीभ, ओठ कोरडे पडले होते. मात्र काम, काळ, वेग हे शाळेत पंख्याखाली बसून सोडवलेले गणित इथे प्रत्यक्ष अनुभवात सोडवणे कठीण होत होते. शाळेतील गणितात ह्या त्रैराशिकाशिवाय तहान, भूक, ऊन, पाऊस, थंडी ह्या आणि इतर गोष्टींचा विचार नसतो. निराकेंद्राकडे न पाहता मी पुढे निघालो. मात्र उन्हाचा तडाखा फारच जाणवू लागला तसा फुजीला रस्त्याच्या कडेला लावले. पाणी पिऊन ओठ आणि जीभ सुखावले. पाण्याने चेहरा धुतला, पाठीच्या कण्यावरून पाण्याची धार सोडली. पाचदहा मिनिटे गेल्यावर पुन्हा ताजातवाना झालो. मात्र ह्या गडबडीत काळाच्या तुलनेत काम आणि वेग मागे पडले. फुजीने पुन्हा वेग घेतला.

मी गणित थोडे बदलून अर्ध्या तासाचा अवधी वाढवला. मात्र तरीही दीड वाजेपर्यंत फुजी पेडली गावापर्यंत पोचू शकली. सूर्य जणू कोपला होता. तो अक्षरशः आग ओकत होता. पाली अजूनही ११ किमी दूर होते. पाली गणपतीची बहुधा आजही मला दर्शन देण्याची इच्छा नव्हती. भुकेची जाणीव होत होतीच. काळाच्या आकडेमोडित भुकेची वेळही धरावी लागणार होती. त्यामुळे मी पेडलीहून परत फिरायचे ठरवले. एव्हाना जवळपास ९२ किमी अंतर पार झाले होते. पेडलीहून मी मागे फिरलो. एका बस स्टॉपच्या सावलीत पद्धतशीर डबे काढले. 

दरम्यान आप्पांचे खुशाली विचारणारे मेसेज आले होते. त्यांना उत्तर धाडत माझा थकवा पळून गेला असे वाटत होते. मी परतीच्या प्रवासाला लागलो. मात्र उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला. दर पाच दहा मिनिटांनी तहान लागू लागली. मी कधीही थंड पाणी पित नाही. मात्र वाटेत थंड पाण्याची बाटली घेतली. त्या पाण्याने चेहरा धुतला. पाठीवरच्या कण्यावरही थंड पाणी ओतले. थोडे पुढे गेलो पण परत परत तहान लागत होती. आता मात्र नीरा प्राशन केले. दर दहा मिनिटांनी दोन दोन घोट पाणी पित कसाबसा खोपोली पार करून खोपोली पनवेल महामार्गाला लागलो.

थोड्या अंतरावर चहाकेंद्र दिसले. तिथे चहा बिस्किटे खाल्ली मात्र तरी हुशारी येईना. तिथे थोडी मोकळी जागा होती. तिथे जमिनीवर आडवा पडलो. बरोबर दोन तीन प्रकारचे लाडू होते ते खाऊन पुन्हा चहा घेतला. पुन्हा एकदा चेहरा आणि पाठीवर पाण्याचा प्रयोग केला. एव्हाना चार साडेचार झाले असावेत. असे वाटत होते की सरळ एखादे वाहन पकडून त्यात सायकल टाकून घरी जावे. आता सूर्यास्तापर्यंत घरच काय पनवेलही गाठता येईल का ह्याची शंका वाटू लागली.

जवळपास पाऊण तास विश्रांती झाल्यावर मात्र नाईलाज झाल्यासारखा उठलो आणि फुजीचे पेडल दाबले. फुजी आता सहजपणे जाऊ लागली होती. सूर्यदेवही परतीच्या वाटेला लागला होता. त्याचा त्रागा ओसरला होता. सूर्यास्ताच्या सुमारास पनवेल गाठले होते. मात्र फुजी आता थांबायला तयार नव्हती. उन्हाचा तडाखा थांबल्यामुळे पुन्हा एकदा एनर्जी लेव्हल वाढली होती. त्यामुळे फुजीने कोणताही थांबा न घेता घर गाठले.

घरी परत पोचेपर्यंत ठरवल्याप्रमाणे २०० किमी अंतर पार झाले होते. ह्यासाठी साधारण १२ तास सायकल चालवावी लागली होती. मात्र सूर्याने घेतलेल्या परीक्षेमुळे पाली गणपतीचे दर्शन घेण्याची सलग दुसरी संधी हुकली होती.

२ टिप्पण्या:

  1. मस्तच..एका दिवशी 200 km म्हणजे...खरच ग्रेट. आणी दुसर्‍या दिवशी परत डोंबिवली मुंबई साष्टांग दंडवत.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. स्वतःची परीक्षा घेणे आवश्यकच होते. त्याशिवाय कोलकाता चेन्नई महामार्गातील गणितही डोक्यात तयार करायचे होते

      हटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...