सायकल रेल्वेने पाठवण्यासाठी मदत करायला सुमित येणार होता. त्याने सांगितलेले साहित्य मी येता येता वाटेत घेतले होते. घरी गेल्यावर संजय आणि आनंदला सुमित येणार असल्याचे कळवले. खरतर सुमितची night shift होती. ती करून तो आमच्यासाठी CST स्टेशनला येणार होता. CST ला गेल्यावर फुजीला सजवायचे असल्याने आम्ही सायकल चालवतच CST ला जाण्याचे ठरवले. पुन्हा एकदा मी आणि संजय आधी वाटेत भेटायचे ठरवले. फुजीबरोबर तिला सजवायचे साहित्य पाठीवर घेत अस्मादिकांची स्वारी निघाली तेव्हा भास्कराचार्य अवतरले होतेच. आजही ठरल्यापेक्षा थोडा उशीर झाला होता. शीळ फाटा, महापे ऐरोली मार्गे मी पूर्व द्रुतगती मार्ग गाठला. संजयजी माझी वाटच पाहत होते. खरतर आता भूक लागली होतीच. मात्र आम्ही कूच करायला सुरुवात केली.
सुमितला night shift वरून घरी यायला उशीर झाला असल्याचे त्याने कळवले. पूर्व द्रुतगती मार्गावर सायकल चालवायला मजा येत होती. घाटकोपर पार केले खरे मात्र पुढे महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेने मात्र आमच्या चाकांना चांगलाच लगाम घातला. मिळेल तशी वाट काढत आम्ही गोगलगायीच्या गतीने जाऊ लागलो. दादर TT येथे आनंद आमची वाट पाहत होता. आम्ही तिथे पोचताच आम्हाला ' आनंद ' होईल असा प्रश्न त्याने विचारला.... चहा घेणार का! माझी चहाची आवड माहीत असल्याने त्याने चहाकेंद्र हेरूनच थांबा घेतला होता. उदरभरण करणेही आवश्यक होते. मात्र तिथे अन्य काही दिसत नव्हते. त्यामुळे डबल चहा आणि बिस्कीट ढोसून आम्ही परत पुढे निघालो. एकदा CST गाठून सायकल रेल्वेच्या हवाली केल्या की मगच उदरभरण करू असे ठरवले. पुन्हा एकदा मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा सामना करत CST गाठले.
आनंदचा एक मित्र CST येथे रेल्वेमध्येच कामाला होता. तो आम्हाला मार्गदर्शन करायला येणार असे समजले. आनंद आणि त्याची फोनाफोनी होईपर्यंत मी सुमितचा अंदाज घेतला. आनंद आणि त्याचा मित्र पार्सल ऑफिसला चौकशी करायला गेले तोच हेमंत जाधवने आम्हाला पाहिले. तोही CST येथे रेल्वेमध्ये कामाला होताच शिवाय अतिशय चांगला सायकलपटू, मार्गदर्शकही होता. रेल्वेने सायकल पाठवायची ठरले तेव्हा सर्वप्रथम मी त्यालाच फोन करून सल्ला घेतला होता. त्याला आमच्या मोहिमेची कल्पना होतीच. इतक्यात सुमितही तेथे पोचला. आमच्या मोहिमेत तीन सदस्य होते आणि आम्हाला सहकार्य करायला हे आणखी तीनजण हजर होते. हेमंत देखील आमच्या बरोबर पार्सल ऑफिसला आला. पार्सल ऑफिस लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या शेवटच्या फलाटाच्या अगदी शेवटच्या टोकाला होते.
आनंदच्या मित्राने पार्सल ऑफिस मध्ये आमची सोय लावून दिली. कागदपत्रांची बाजू हेमंत पाहत होताच. आता सायकलला व्यवस्थित आवरण घालून त्या रेल्वेच्या हवाली केल्या की आम्ही मोकळे होणार होतो. आनंदचा मित्र आणि हेमंत परत निघाल्यावर सुमितने सायकलींचा ताबा घेतला.
प्रत्येक सायकलचे महत्वाचे भाग आच्छादले जातील ह्यासाठी तो कसोशीने पाहत होता. सुमित एक टेक्निशियन म्हणून आमच्याबरोबर असावा अशी माझी इच्छा होती. तो बरोबर असला तर सहाय्य वाहनाची गरज भासणार नाही असा माझा ठाम विश्वास होता. सध्यातरी त्याची मदत सायकल पाठवण्यापुरती मर्यादित होती. आनंद त्याचा खारीचा वाटा उचलत होता. मी मात्र ' मदत न करणे ' हीच माझी मदत असेल असे समजून फक्त लागेल तसे साहित्य पुरवणे इतकेच पाहत होतो. पोटातील कावळे कोकलून त्यांचा आवाज बसला होता. मनाप्रमाणे PACKING झाल्यावर आम्ही सायकली रेल्वे कर्मचारी शाहरुख ह्याच्या सुपूर्द केल्या. तोच गाडीमध्ये सायकल नेवून ठेवणार होता. त्यालाही थोडे खुश केले. हे सगळे होईपर्यंत सुमारे साडेतीन वाजले असावेत.
शाहरुखकडे सोपवून फुजीचा निरोप घेतला. पुढील तीन दिवस सरावासाठी माझी लाडकी श्विन होतीच. तीन दिवसांनी मात्र कोलकातापासून चेन्नईपर्यंत फुजीचीच साथ मिळणार होती.
एव्हाना भूक चांगलीच कडाडली होती. पोटातील कावळ्यांना ओरडण्याचेही त्राण उरले नव्हते. मात्र मी संधी हेरली... CST समोरील हॉटेल शिवाला माझे आवडते ठिकाण. बऱ्याच वर्षांनी CST समोरील शिवाला हॉटेल मध्ये खाण्याचा योग मला लाभला होता. शिवाला मध्ये काउंटरवर पूर्वी पान बनवून ठेवलेले असायचे. ते अतिशय सुरेख असायचे. त्यामुळे ३२- ३३ वर्षांपूर्वी मी येथला नियमित सदस्य होतो. CST ची संगत सुटल्यावर ' शिवाला ' ही लांब राहिले होते. सायकली शाहरुखच्या हवाली केल्यावर मात्र सुमित, आनंद आणि संजय ह्यांना घेऊन आज पुन्हा शिवालातील भोजनाचा आनंद घेतला. आता प्रतीक्षा होती आम्हा तिघांच्या प्रयाणाची...





Great
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवामस्त लिहिले आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूपच मेहनत आहे तयारीची ! मी डोंबिवलीला असतो तर जरूर मदतीला येऊन खारीचा वाटा घेतला असता ! तुझ्या मित्रांचेही कौतुक आहे!
उत्तर द्याहटवाधन्यवाद. तुम्ही प्रत्यक्ष सफरीला या. त्यात जास्त आनंद होईल
हटवाधन्यवाद!
उत्तर द्याहटवाBon voyage!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा