आमचे विमान पहाटेचे होते. आनंद गोरेगावला राहत असल्याने त्याच्या घरून विमानतळ जास्त जवळ होते. त्याने मला आणि संजयला आदल्या रात्री त्याच्या घरी यायचे आमंत्रण दिले. मी आणि संजयने अगदी आनंदाने ते स्वीकारले.
मला माझे सामान घेऊन बँकेत जायचे होते. फुजी तर आधीच रवाना झाली होती. मात्र श्विन हजर होतीच. शेवटचे दोन तीन दिवस श्विनवरच सराव सुरू होता. अप्पांनी दिलेले पॅनियर्स मी श्विनवर लादले. त्या पॅनियर्स मध्ये माझे सगळे सामान ठेवले होते. मी कोलकाता येथे जाताना श्विनला नेणार नव्हतो. ती बँकेत तशीच ठेवणेही योग्य नव्हते. त्यामुळे माझी सहकारी कांचन हिला मी विचारून घेतले होते की ती श्विनला घरी घेऊन जाऊ शकेल का? पूर्वी एकदा Cycle2work करत फुजीला नेले असता कांचनने उत्साहाने फुजीला फिरवले होते. त्यामुळे कांचन श्विनला व्यवस्थित नेईल ह्याची खात्री होतीच. मात्र मी कांचनला एक अटही घातली होती की श्विनला फिरती ठेवले पाहिजे. तिनेही आनंदाने ती अट स्वीकारली होती. अर्थातच त्यामुळेच मी ऑफिसला जाताना श्विनला नेण्यासाठी सज्ज झालो.
फुजीवर सामान लादलेले पॅनियर्स लावल्यावर प्रथमच स्वार होत होतो. दोन्ही बाजूला पेनियर्स आणि शिवाय कॅरीयरवर माझी सॅक होतीच. सुरुवातीला अरुंद रस्त्यावरून थोडा जपूनच सुरुवात केली. नाशिक ठाणे महामार्गावर लागल्यावर थोडा पुढे गेल्यावर चौपदरी रस्ता दुपदरी रस्ता मध्ये रूपांतरित होत होता. नेमके त्याच ठिकाणी एका बाजूचे पॅनियर्स झटकन खाली आले. सुदैवाने ते बांधले असल्याने रस्त्यावर पडले नाही मात्र हेलकावू लागले. इथे महामार्ग दुपदरी असल्याने सायकल बाजूला घ्यायलाही जागा नव्हती आणि रहदारीमुळे तिथेच थांबताही येत नव्हते. थोड्याशा जागेत उभे राहून कसेबसे ते पॅनियर्स पुन्हा अडकवले. मग मात्र परत काही अडचण न येता थेट ऑफिस गाठले.
कांचन जणू माझी वाटच पाहत होती. श्विन वरील पॅनियर्स काढून श्विन कांचनच्या हवाली केली. ऑफिसमधील आमचा लाडका कॅमेरामन राहुल माने देखील हजर होता. त्याने लगेचच त्याची कारागिरी पार पाडली.
संध्याकाळी संजय आणि मी आनंदच्या घरी मुक्कामासाठी गेलो तर तिथे आनंदचे मित्र आणि मैत्रीण आम्हा तिघांना शुभेच्छा देण्यासाठी हजरच होते. आनंदचे शेजारीही आम्हाला येऊन भेटले. त्यांनीही आम्हाला शुभेच्छा दिल्या. आमची मोहीम ऐकून आनंदचे शेजारी इतके उत्साहित होते की त्यांनी आनंदला एक हवा भरण्याचा एक ऑटो पंप भेट दिला होता. गप्पा मारण्यात झोपायला उशीर झाला होता आणि पहाटेही लवकर उठायचे होते. मात्र थोडा वेळ अगदी शांत झोप लागली. पहाटे ओला करून आम्ही विमानतळावर पोहोचलो.
सगळे सोपस्कार आटोपून विमानात स्थानापन्न झालो. लगेचच उरलेली झोप पूर्ण करण्यासाठी तिघांनीही पुन्हा एकदा निद्रादेवीची आराधना केली. बंद केलेल्या डोळ्यासमोर कोलकाता तरळत होते.....





Bon voyage!
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा