कोलकाता... विमानतळावर उतरलो मात्र... अचानक लक्षात आले. माझ्या हातात असलेली पांढऱ्या रंगाची पिशवी दिसत नव्हती. आधी पटकन लक्षात येईना त्या पिशवीत नक्की काय असावे. मग हळूहळू विचार केला.... इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्या पिशवीत असणार... सायकलचे दिवे, चार्जर, charging cable.. ठीक आहे, फार काही अजून नसावे. हळूहळू जाग येत होती, तसा विचार केला...अजून काय बरं असावे. हम्म, चहासाठी पाणी गरम करण्याचा विजेवर चालणारा जार.... ओह, आणि... ह्या मोहिमेसाठी खास घेतलेला... कॅमेरा... GoPro १२... !
हा कॅमेरा ह्या मोहिमेसाठी मुद्दाम विकत घेतला होता. त्याची किंमतही चांगलीच होती. कॅमेराची किंमत श्विनपेक्षा सुद्धा जास्त होती. नक्की कुठे विसरलो...? विमानात मी ती पिशवी आणली नसावी.. नव्हती...म्हणजे मग.. बोर्डिंग पास घेतानाच...?
आनंदने धीर दिला. म्हणाला.. तू लगेच तक्रार कर. मी आणि संजय विमानतळावर तक्रार दाखल करायला चौकशी केली. विमानतळ कार्यालय आणि एअर इंडिया एकमेकांकडे बोट दाखवत होते. मी हताश झालो होतो. मात्र एअर इंडिया अधिकाऱ्याने नीट समजावले ते म्हणाले तुम्ही मुंबई विमानतळावर संपर्क साधा. त्यांच्या संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. मीराची मैत्रीण मोनिका मुंबई विमानतळावर एअर इंडिया मध्येच काम करते. तिला सगळी कल्पना दिली. तिलाही चौकशी करायला सांगितले.
हे सगळे सोपस्कार करेपर्यंत डॉ केळकर ह्यांनाही सगळी कल्पना देत आम्हाला उशीर होत असल्याचे कळवले होते. अखेरीस सामान परत मिळण्याची खात्री नसली तरी शक्यता गृहीत धरून विमानतळ सोडण्याचा निर्णय घेतला. ह्या सगळ्यात बराच वेळ गेल्यामुळे आता थेट केळकरांकडे जाऊन मग सायकल आणायला कोलकाता रेल्वे स्थानकावर जायचे ठरवले.
अलीपोर भागातील Burdwan रोड येथील डॉ केळकर ह्यांच्या निवासस्थानी पोहोचलो. तेथील भलामोठा दरवाजा कसा उघडायचा ते कळेना. केळकरांना फोन केला..इतक्यात आनंदने तो दरवाजा उघडला. दरवाजा उघडून आत पाहतो तर प्रशस्त आवार नजरेस पडले. डॉ केळकर सुहास्य वदनाने आमचे स्वागत करायला येतच होते. आवार चांगलेच मोठे होते, त्यामध्ये बगीचा केला होता, समोर मोठे गवताच्छादित मैदानही होते.
डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी अतिशय शांत स्वभावाचे होते. दोघेही मोजकेच बोलत होते, मात्र अतिशय अगत्याने वागत होते. बंगल्यात आधी एक बाल्कनी होती, आत प्रशस्त दालन होते. दालनाच्या आत तीन चार बाजूंना वेगवेगळ्या खोल्या होत्या. बाहेरील दालन अतिशय सुंदर आणि टापटिपीने सजवले होते. वास्तविक आम्ही प्रथमच त्यांना भेटत होतो. मात्र त्यांच्या स्वागताने आमचा संकोच अगदीच लगेच निघून गेला. त्या दालनाच्या एका बाजूला त्यांनी आमची रहायची सोय केली होती. तिथेही एका आत एक अश्या दोन खोल्या आणि त्याहून आत मध्ये अतिशय प्रशस्त असे बाथरूम होते. एकंदरीत हा एक राजवाडाच होता. मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या चौरस फुटफुटाच्या मोजमापात राहणाऱ्या आम्हा तिघांनाही इतक्या मोठ्या बंगलीची अपेक्षाच नव्हती. मी तर स्वप्नातही इतक्या प्रशस्त जागेत स्वागत होणार आहे ह्याची कल्पनाही केली नव्हती.
डॉक्टरांच्या पत्नीला बागकामाची आवड होती. त्यांनी वेगवेगळी फुलझाडे लावली होतीच. शिवाय आवारात मोठमोठे वृक्षही होते. काही पक्षी तिथे नियमित येत असत. त्यांचेही स्वागत डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी आनंदाने करत असत. खरतर तर ते पक्षीही त्यांच्या घरातील सदस्यच झाले होते.
निवासस्थानाप्रमाणे डॉक्टरांचे मनही मोठे होते. खरतर डॉक्टरांना भेटून, सामान ठेवून लगेच सायकल आणायला जायचा विचार होता. सकाळच्या गडबडीत नाश्ताही केला नव्हता. डॉक्टरांनी चहा विचारल्यावर लगेचच होकार दिला. चहा बिस्किटे घेतली. गप्पाही सुरू होत्या. डॉक्टरांची दोनही मुले परदेशात स्थायिक होती. इथे ह्या बंगल्यात आता दोघे पतिपत्नीच राहत होते.
सायकल आणण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जायचा विचार असला तरी आता भूकही लागली होती आणि डॉक्टर दांपत्याचे अगत्य पाहून लगेच पायही निघत नव्हता. त्यामुळे आम्ही जेवण करूनच निघायचे ठरवले. जेवण करून थोडी विश्रांतीही घेतली.
दुसऱ्या दिवशी पहाटे बेलूर मठ येथून निघायचे असल्याने रात्री तिथेच मुक्कामाला जायचे होते. मात्र डॉक्टर आम्हाला रात्रीही इथेच राहण्याचा आग्रह करत होते. आमची मनस्थिती द्विधा होत होती. अर्थातच डॉक्टरांचे अतिथ्यशील वागणे, येथील निवांत आणि शांत वातावरण, एकंदर परिसर पाहून येथेच मुक्काम करण्याचा मोह आम्हालाही सुटत नव्हताच.
अखेरीस कुठे राहायचा ह्याचा निर्णय सायकल आणल्यावर घेऊ असे ठरवत आम्ही रेल्वे स्थानकाकडे निघालो.









छान लेख लिहिले आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा