पूर्व भारताविषयी मला प्रथमपासूनच एक कुतूहल आणि थोडी शंका होती. कुतूहल विशेषतः ओडिशा राज्याविषयी होते. सायकलने भारत भ्रमण करून आलेला गंधार आणि सध्या ओडिशा येथे असलेली अग्रिमा ह्यांनी माझ्या सगळ्या शंका आधीच दूर केल्या होत्या. मात्र ह्या राज्यासंबंधीचे कुतूहल कायम होते. ओडिशा मध्ये प्रवेश करून आम्हाला दोन दिवस झाले होते. दोनही दिवसात येथील लोकांचे प्रेमळ स्वागत आम्ही अनुभवत होतो.
ओडिशाचे पूर्वीचे नाव ओरिसा. खरतर ह्याला उत्कल असेही म्हटले जाते. आपल्या राष्ट्रगीतात ह्या राज्याचा उल्लेख उत्कल असाच आहे. श्रीरामाची माता कौसल्या ही ज्या कौशल प्रदेशाची राजकन्या होती तो हाच प्रदेश. अज्ञातवासात पांडवांना ज्या विराट राजाने आश्रय दिला त्याचा मत्स्य देश तो हाच! आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य कसे करावे हे येथील लोकांपेक्षा इतर कोण अधिक जाणणार? येथील लोकांच्या प्रेमळ आणि अतिथ्यशील स्वभावाची परंपरा रामायण महाभारत काळापासूनच चालत आलेली असावी.
ओरिसाची संस्कृती फारच प्राचीन आहे. येथील ओडिसी नृत्य सातशे वर्षांपासून चालत आलेले आहे. जवळपास ४०% लोकसंख्या ही अनुसूचित जाती जमातींची असलेले हे राज्य इतर राज्यांपेक्षा प्रगतीशील होऊ शकले नाही. आता मात्र ह्या राज्याने कात टाकून प्रगतीचा वेग पकडला असल्याचे जाणवते.
ओडिशा येथील संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी मी आमच्या मोहिमेतील चौथा दिवस कमी अंतराचा ठेवला होता. पहिल्या तीन दिवसातील कसर भरून काढण्यासाठी आता हा दिवस उपयोगी पडणार होता. वाटेत कटक येथे अग्रिमाही भेटणार होती. ही भटकी मुलगी सायकलवरून जगप्रवासासाठी निघून जवळपास वर्ष झाले तरी ओडिशाच्या प्रेमामुळे सहा सात महिने ह्याच राज्यात अडकली होती. तिने केरळ ते काश्मीर हा एकटीने सायकल प्रवास केला तेव्हा एक दिवस ती माझ्या घरी राहिली हा एवढाच आमचा परिचय. त्यावेळी तिचा धाडसी प्रवास पाहून मी तिला १०० वर्षांपूर्वी तीन पारशी लोकांनी सायकलने जगप्रवास केला त्यासंबंधातील जे पुस्तक भेट दिले ते वाचून तीही जगप्रवासास निघाली होती. आणि आता ओडिशामध्ये तिच्याच ओळखीने आमची मुक्कामाची सोय सुशांत करत होता.
अग्रीमा सध्या कटकमध्ये मुलींच्या हॉस्टेल मध्ये राहत होती. ती सकाळी आम्हाला भेटणार होती. नाश्त्याच्या वेळी तिला भेटून पुढे तडक पुरी, कोणार्क येथे जाण्याचा माझा विचार होता. आम्ही चांदीखोल मधील हॉटेल मिड ईस्ट येथून निघताना तरी हाच विचार होता.
हॉटेल मिड ईस्ट सोडून कूच करेपर्यंत सात वाजून गेले होते. मात्र आम्ही लगेचच वेग पकडला रस्ता चांगला होता. अग्रीमाबरोबर गप्पा मारण्यास मी उत्सुक होतो. आम्ही अडीच वर्षांनी प्रत्यक्ष भेटणार होतो. चांदीखोल ते कटक हे अंतर साधारण ५० किमी चे.
कटक ह्या शब्दाचा अर्थ आहे सेना छावणी किंवा राजधानीचे ठिकाण. ह्या शहराचा इतिहासदेखील हा अर्थ स्पष्ट करतो. इथे प्रथम वस्ती झाली ती सैन्याच्या छावणीसाठी... आणि पुढे हेच शहर राजधानीचे ठिकाण बनले. महानदी आणि कथाजोडी ह्या दोन नद्यांच्यामध्ये ५ गावांचे एकत्रीकरण करत कटक शहर निर्माण झाले. साधारण ११ व्या शतकात राजधानीचा दर्जा मिळाला तरी हे शहर व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले ते नागपूरकर भोसल्यांच्या काळात. अर्थातच मराठा साम्राज्याची ही कामगिरी आपल्याला नक्कीच अभिमानास्पद आहे.
अग्रिमाशी भेट ह्या बरोबरच नागपूरकर मराठा साम्राज्याच्या व्यापाराचे महत्वाचे ठिकाण असलेल्या कटक शहराला भेट देण्यासाठी म्हणूनच मी अधिक उत्सुक होतो. कटक, भुबनेश्वर, पुरी, कोणार्क ही शहरे पाहण्यासाठी मला मिळणार होता फक्त एक दिवस!
मी फुजीला दामटवत होतो. कटकला पोचण्याआधीच महानदीचे विशाल पात्र नजरेस पडले. प्राचीन काळात महानदीला चित्रोत्पला किंवा निलोत्पला असेही म्हटले जात असे. छत्तीसगड राज्यात उगम पावून पुढे ईशान्य दिशेकडे वाहणारी महानदी कटकजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. महानदीवर जगतपूर आणि कटक ह्या दोन शहरांना जोडणारा एक लांबलचक पूल होता. ह्याला जोबरा पूल असेही म्हणतात. ह्या पुलाची लांबी २ किमी आहे. कटक जवळ महानदीवर अनेक पूल आहेत. ओडिशाच नव्हे तर भारतामध्ये असलेल्या सर्वात लांब नदी पुलाच्या प्रकल्पाचा हा एक भाग आहे.
पुल ओलांडून आम्ही कटक शहरात प्रवेश केला थोड्याच अंतरावर उजव्या हाताला कटक रेल्वेस्थानकाची सुंदर वास्तू नजरेस पडली. मुंबईकरांसाठी रेल्वे किती महत्वाची आहे हे इतर कोणाला समजणे कठीण. रेल्वेची देखणी इमारत पाहून मन प्रसन्न झाले. मात्र रेल्वेस्थानकात शिरण्यासाठी आज वेळही नव्हता, मनसुबाही नव्हता आणि योगही नव्हता.
आज उत्सुकता होती ती अग्रिमाला भेटण्याची. मूळ केरळची रहिवासी असलेली अग्रिमा महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आम्हा तिघा सायकलस्वारांचे ओडिशामधील आतिथ्य करणार होती. किती कुतूहलाची बाब होती की आम्ही निघालो होतो जेमतेम कोलकाता ते चेन्नई प्रवासासाठी आणि ती निघाली होती जगप्रवासासाठी.
पुढे कटक रेल्वेमार्गावरील पुल ओलांडून आम्ही U टर्न घेतला. थोड्याच वेळात आमची भेट घेण्यासाठी पुढे असलेली अग्रीमा आम्हाला दिसली. माझ्याप्रमाणेच तीही आमच्या भेटीसाठी उत्सुक होती.


छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा