बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

जल ही जीवन है: कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २७

अलीपूरद्वार हे हिमालयाच्या पायथ्याशी, कालजनी नदीच्या काठावर आणि पश्चिम डुआर्स प्रदेशात वसलेले शहर. जलपाईगुडी जिल्ह्यातून वेगळे होऊन २५ जून २०१४ रोजी पश्चिम बंगालचा २० वा जिल्हा म्हणून अलीपुरद्वार जिल्ह्याची निर्मिती झाली. ब्रिटिश काळात या उपविभागाचे पहिले सहाय्यक आयुक्त असलेल्या कर्नल हेदायत अली खान यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. हा जिल्हा ३ T साठी प्रसिद्ध आहे.... Tea, Trees आणि Tigers. 

अलीपुरद्वार जिल्हा हा पश्चिम बंगालमधील 'डुअर्स' प्रदेशाच्या पूर्व टोकाकडील एक विस्तीर्ण भाग आहे. हा प्रदेश चढ-उतारांचा आणि मुख्यत्वे वनाच्छादित असून, येथून भूतानमधील हिमालयाच्या बाह्य रांगांतून उगम पावणाऱ्या अनेक नद्या वाहतात. हा प्रामुख्याने ग्रामीण भाग असून येथील जवळपास ८०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची एकत्रित लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे.

ह्या जिल्ह्याला भूतानचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते. अलीपूरद्वार शहरापासून साधारण ५०-६० किमी अंतरावर असलेले जयगाव हे भारत-भूतान सीमेवर थेट वसलेले एक प्रमुख व्यापारी शहर आहे. जयगाव शहरातील भूतान गेट द्वारा  भूतानच्या सीमावर्ती शहर फुएन्शोलिंग येथे प्रवेश करता येतो. भारत आणि भूतानमधील प्रवास आणि व्यापारासाठी प्राथमिक ओव्हरलँड गेटवे म्हणून काम करते.

दिवसभर थकवणारा प्रवास झाल्यानंतर आमच्या सायकलींना आवश्यक असलेली दुरुस्ती आणि आम्हाला आवश्यक असलेली पुरेशी विश्रांती अलीपूरद्वार शहरात आम्हाला मिळाली. त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे दिवसभर उपाशी राहून सायकलवल्यावर अतिशय चविष्ट आणि पोटभर मेजवानी देखील आम्हाला मिळाली होती. अर्थातच दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही अतिशय समाधानाने दिवसभरात कापावे लागणाऱ्या १२५ किमी अंतर पार करण्यासाठी थोडे लवकरच सज्ज झालो.

साधारण ६.३० वाजता आम्ही कूच केले. आजच्या दिवसात कापावे लागणारे अंतर या मोहिमेतील हे दुसरे सर्वाधिक अंतर होते. याआधी एका दिवशी आम्ही १४० किमी अंतर कापले होते. आम्ही अगदी प्रसन्नतेने सुरुवात केली. पहाटे पहाटे चहादेखील छान मिळाला होता. सायकली कालच सुसज्ज झाल्या होत्या आणि आम्हीही ताजेतवाने होतो. मात्र सुरुवातीचे १० किमी रस्ता अतिशय खराब होता. त्यामुळे आम्हाला वेग फार घेता आला नाही. त्यानंतर सातत्याने चढण होती. जरी ती फार तीव्र नव्हती तरी सतत १० किमीची चढण असल्याने आम्हाला अपेक्षित वेग गाठता येत नव्हता. मनोजने मात्र छान आघाडी घेतली होती. मी अतिशय संथपणे जात होतो. माझ्यासाठी संजयने देखील वेग कमी ठेवला होता.



आमचा प्रवास पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे सुरू होता. आमच्या उत्तर दिशेला म्हणजे डावीकडे दूरवर भूतानच्या डोंगररांगा दिसत होत्या. त्या डोंगररांगांना समांतर रेषेत आम्ही पुढे जात होतो. सध्या मात्र भूतान पेक्षा ओढ होती पूर्वोत्तर भारताची... आसामची.

वाटेत आम्हाला एक कामगार सायकल चालवत (किंवा सायकलसोबत चालत) जाताना दिसला. त्याच्या सायकलमधील हवा संपली असावी असे मला वाटले, म्हणून त्याला आमच्या एअर पंपने मदत करण्यासाठी मी थांबलो. मी त्याची चौकशी केली. त्याच्या सायकलच्या चाकात हवाच नव्हती. मी थांबताच संजयने देखील थांबा घेतला. मी संजयला त्याच्याकडे पंप आहे का हे विचारले. मी थोडा पुढे होतो. संजयने त्याची सायकल थांबवून त्याच्या सामनातून पंप बाहेर काढला. मी माझी सायकल स्टँडवर उभी केली आणि परत मागे त्या माणसाच्या सायकल कडे चालत गेलो. तोपर्यंत संजयने त्यांच्या पंपाने हवा भरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. इतक्यात एक धाडकन आवाज आला. मी वळून बघतो तर पण माझ्या सायकलच्या स्टँडला वजन न पेलता आल्याने सायकल धारातीर्थी पडली होती. मी परत सायकलजवळ येऊन पाहिले तर स्टँड तुटला होता. त्यामुळे आता मोहिमेच्या शेवटच्या दोन दिवसांसाठी माझ्या सायकलला स्टँड नव्हता. दरम्यान त्या माणसाच्या सायकलच्या टायरचा व्हॉल्व आणि संजयकडे असलेल्या पंपाचा व्हॉल्व ह्यांचे गणित सुटत नव्हते. अखेरीस आम्ही तो प्रयत्न सोडून दिला. इतक्या वेळात त्या माणसाच्या सायकलमध्ये हवा तर भरता आली नाहीच पण माझ्या सायकलचा स्टँड मात्र तुटला होता.

मी आणि संजयने पुन्हा सायकलवायला सुरुवात केली. लवकरच मनोजला गाठले. आता मी थोडी आघाडी घेतली. थोड्याच वेळात मी बंगाल आणि आसामच्या सीमारेषेवर प्रवेश केला. तिथे मी मनोज आणि संजय ह्यांची वाट पाहणे क्रमप्राप्त होते. नवीन राज्यात तिघांनी एकत्र प्रवेश करायचा होता..... आसाम.... माझी सायकल आता १७ व्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशात प्रवेश करत होती. भारताचा पश्चिम भाग, मध्य भाग, दक्षिण भाग, पूर्व भाग सायकलक्रांत करत आता मी पूर्वोत्तर अथवा ईशान्य भागात प्रवेश करत होतो.









आसाम...हे नाव पाहताच मला आठवण होते ती लाचित बरफुकनची! ह्याला आसामचा शिवाजी असेही म्हणता येईल. मुघल सत्तेला शिवाजी महाराजांप्रमाणेच पुरेपूर नामोहरम केले ते लाचित बरफुकनने. ह्याची दहशत एवढी होती की बलाढ्य औरंग्या आपल्या सरदारांना शिक्षा म्हणून आसामच्या मोहिमेवर पाठवत असे. वास्तविक लाचित बरफुकान हा राजा नव्हता, तर आहोम राजांचा तो एक सरदार होता.

शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटल्यामुळे औरंगजेब रामसिंग यांच्यावर अत्यंत संतापला होता. महाराजांच्या पलायनात रामसिंग यांचा हात असल्याचा किंवा त्यांच्याकडून दुर्लक्ष झाल्याचा संशय औरंगजेबाला होता. या घटनेमुळे औरंगजेबाने राग येऊन रामसिंग यांना दरबारातून बडतर्फ केले आणि त्यांची मनसबदारी काढून घेतली. तसेच त्यांना आसामला मोहिमेवर पाठवले गेले. आसाममधील अहोमांविरुद्धची मोहीम अतिशय बिकट आणि धोक्याची मानली जात असे. मुघल दरबारात ही मोहीम नकोशी व शिक्षेसारखी मानली जाई. रामसिंग ह्यांची आसामला रवानगी करणे ही एक प्रकारे त्यांना दिलेली शिक्षाच होती. सराईघाटच्या नौदल लढाईतील (१६७१) मिर्झा राजा राम सिंग (प्रथम) यांच्या नेतृत्वाखालील अत्यंत बलाढ्य मुघल सैन्याचे आक्रमण लाचित बरफुकनने परतवून लावले होते. दुर्दैवाने शिवाजी महाराजांप्रमाणेच लाचित बरफुकान देखील अल्पायुषी ठरले. १६७२ साली त्यांचे अवघ्या ५० व्या वर्षी निधन झाले.

सकाळी साधारण १० वाजता आम्ही लाचीत बरफुकान ह्यांच्या पवित्र भूमीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी सायकलने नवीन राज्य गाठले ह्याच्या आनंदापेक्षा शिवाजीमहाराज आणि लाचित बरफुकन ह्यांच्या स्मृतीने मला जास्त आनंद झाला होता.

त्या सीमारेषेवर थोडा विसावा घेत आम्ही पुन्हा कूच केले. एव्हाना सूर्य त्याचा दाह दाखवू लागला होता. मनोज पुन्हा पुढे गेला होता. मी आणि माझ्यासाठी संजय कमी वेगात जात होतो. वेळ साधारण ११.३० ची होती. आम्ही ५ तास सायकल चालवली होती, पण जेमतेम ५० किमी अंतरच कापले होते. उकाडा प्रचंड जाणवत होता. मला खरतर ह्या वातावरणात पाय मारण्याचा वैताग वाटू लागला होता. अजून जवळपास ७५ किमी अंतर बाकी होते. आणखी ४.३०-५ तासात संध्याकाळ होणार होती. वाटेत दोन तीन थांबे घ्यावे लागणार होते. मी मनात काम काळ वेग ह्यांचे त्रैराशिक मांडत होतो. मला लक्षात आले की माझ्या वेगामुळे संपूर्ण संघ गंतव्य स्थानी पोचण्यास अंधार पडला असता. इतक्यात मला गोसाइगाव जवळ आल्याचे दिसले. त्याबरोबर संदीप चटर्जी गेले दोन तीन दिवस मला गोसाइगाव येथे त्याच्या मित्राकडे राहण्याचा आग्रह करत असल्याचे आठवले. गोसाइगाव येथून गुवाहाटी साधारण २४० किमी होते. मी विचार केला तसेही गुवाहाटीला पोचायला अजून अडीच दिवस हातात आहेत. तर आज दमलेल्या स्थितीत आणखी ७५ किमी सायकल चालवायची तेही अंधारात... त्यापेक्षा संदीपच्या मित्राकडे आज आराम करू आणि पुढील दोन दिवसात उरलेले २४० किमी अंतर पार करू. मी मनोजला फोन लावला. तो आमच्यापेक्षा पुढे होता. संजय तडजोड करायला तयार होता पण मनोज उत्साहात होता. तो एवढ्या लवकर सायकल थांबवायला तयार नव्हता. मग मी त्याला दुसरा पर्याय दिला की मी आता दमलो आहे, मला उन्हाचा त्रास होतोय तर मी आणि संजय साहाय्य वाहन घेऊन थेट बोंगईगाव गाठतो, तू सायकल चालवत ये. मनोज चांगलाच गोंधळात पडला. त्याला लक्षात येईना की मी रणांगणात शस्त्रे गाळून एकदम असहाय्य होऊन उभा राहिल्यासारखा का बोलत आहे. खरतर भास्कराचार्यांनी माझ्यावर जादू केली होती. त्यांच्या जाळ्यात मी अडकलो होतो. उन्हाच्या दाहामुळे मी विचलित झालो होतो. 


मात्र मनोजने मला समजावले की आणखी तासभर सायकल चालवू आणि मग आपण निर्णय घेऊ. अखेर मी त्याचे म्हणणे मान्य केले. गोसाइगाव समोर होते. मात्र इथे थांबलो नाही तर थेट ७५ किमी अंतर जावे लागणार होते. अखेर मनोजला होकार देत मी सायकल थांबवली. मला डोक्यावरील उन्हापासून थोडा विसावा, पोटातील अग्नीसाठी आहुती तर घशाला पडलेला शोष शमवण्यासाठी पाणी तातडीने हवे होते. सायकल चालवणे थांबून मी पाणी पिण्यासाठी थांबलो. माझ्याबरोबर संजयनेदेखील थांबा घेत पाणी प्यायले. आम्ही पुन्हा निघण्याच्या तयारीत होतो. तितक्यात धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या एका व्यक्तीने आम्हाला थांबवले... "एक मिनिट थांबा..."

आम्ही थांबलो... खरतर त्याच्या आवाजातील जरबेने आपोआप थांबवले गेलो. त्याने लगेच आपल्या माणसांना पाण्याच्या दोन बाटल्या आणायला सांगितल्या. मी त्याच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो की, 'सायकलस्वाराला सर्वात जास्त कशाची गरज असते, तर ती पाण्याचीच.' तो त्या शहराचा - गोसाईगावचा - 'टोटो' (ऑटो-रिक्षा) असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्याचे नाव होते शोहर अली. त्याने आम्हाला पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि त्याच्या मोबाईलवरून आमच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली. आम्ही आनंदाने होकार दिला आणि आमच्या मोबाईलवरूनही त्याच्यासोबत सेल्फी काढला. त्याच्याबरोबर बोलता बोलता मला पुन्हा ऊर्जा मिळाली. 

सायकलवताना अनेकदा तहानेची जाणीव होऊनही सायकलवरून उतरण्याचा कंटाळा येऊन पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे डिहायड्रेशन किंवा शरीराचे निर्जलीकरण होऊन प्रचंड थकवा जाणवू शकतो. वास्तविक मला झालेला त्रास हा त्याच प्रकाराचा होता. मला मात्र त्याची जाणीव होत नव्हती... किंवा जाणीव होऊनही त्याची उमज येत नव्हती. म्हणूनच लांब पल्ल्याची सफर करताना नेहमी भूक लागण्याआधी खावे आणि तहान लागण्याआधी पाणी प्यावे.

मी शांतपणे पाणी प्यायलो. चेहरा पाण्याने स्वच्छ धुतला. चेहऱ्यावरील घामाची खारट चव थोडी जिभेला जाणवली. पाठीच्या मणक्यावरून पाणी सोडले. उन्हाने थकल्यावर जेव्हा पाठीच्या कण्यावरून थंड पाणी ओघळते तेव्हा पुन्हा ताजेतवाने वाटते. पाण्याला जीवन का म्हटले जाते ह्याचा प्रत्यय मला येत होता.

एव्हाना थोड्या वेळापूर्वी आलेला वैताग, कंटाळा पार पळून गेले. बहुधा त्यासाठीच शोहर अली आम्हाला भेटला होता. शोहर अलीचे मनापासून आभार मानत मी आणि संजयने पुन्हा सायकलींचे पेडल दामटवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...