शनिवार, १० ऑक्टोबर, २०२६

खारट चहा आणि सुंदरी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग २८

 



मी आणि संजय आता ताजेतवाने झालो होतो. आम्ही नव्या जोमाने सायकलवायला सुरुवात केली. मनोजने मला तासाभराच्या बोलीवर पुन्हा सायकल चालवण्यास तयार केले होतेच. त्यातच शोहर अली अगदी वेळेवर भेटला होता. मी नेटाने पेडल मारत मारत वाटेत खायला काही मिळते का ह्याचा वेध घेऊ लागलो. थोड्याच वेळात एक छोटी टपरी दिसली. पाहतो तर मनोज तिथे मस्त आडवा झाला होता. माझ्याप्रमाणेच भास्कराचार्यांनी त्यालाही नामोहरम केले होते. तिथे फार काही खायला मात्र नव्हते. भूक सगळ्यांनाच लागली होती. मनोज आणि संजयने ऑमलेट ची ऑर्डर दिली. मी ऑमलेट खाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी थोडे पुढे जाऊन काही मिळते का ते बघण्याचे ठरवले. त्या दोघांना तसे सांगून मी पुढे निघालो.

ऊन रणरणत होते. शरीराची त्वचाच काय रस्ताही भाजून निघाला होता, हवाही तापलेली होती. मात्र त्यामुळे पाय मारणे थांबवून चालणार नव्हते.



मी पुढे निघालो. शाळा कॉलेज सुटत होते. तिथे काही महाविद्यालयीन विद्यार्थीही होते, ज्यांनी माझ्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. मीही माझ्या फोनवर त्यांच्यासोबत सेल्फी काढला. माझी मोहीम ऐकून सगळे विद्यार्थी एकदम उत्साहित झाले. मी त्यांना म्हणालो तुम्हीही अशीच एखादी मोहीम काढा. त्यांच्याशी गप्पा मारता मारता मीही थोडा उत्साहित झालो होतो.

मोठी शहरे अभावानेच दिसत होती. जी शहरे, गावे वाटेत दिसत होती. तिथे महामार्गावरून सायकल चालवता चालवता तरी कोणत्याही खाद्यकेंद्राची चाहूल लागत नव्हती. मात्र काही सुंदर वास्तुरचना, निसर्ग दिसला की सायकल आपसूक थांबत होती, कॅमेरा ऑन होत होता. मी गुपचुप त्यामध्ये सामील होत होतो.








शाळा, महाविद्यालयातील प्रांगणामध्ये दिसणाऱ्या सायकली पाहून फुजीला आनंद होत होता. मुंबईमध्ये असे दृश्य पाहण्याची आता कल्पनाही करता येत नाही. मात्र आमची मोहीम सुरू झाल्यापासून म्हणजे कोलकत्यापासून अगदी आसाम मध्ये प्रवेश करेपर्यंत सायकल चालवणारे विद्यार्थी विद्यार्थिनीच नव्हे तर कामावर जाणारे लोक आणि अगदी गृहिणीही नजरेस पडत होते. आसाममध्येही हे दृश्य दिसत होते.



महामार्ग चांगलाच प्रशस्त होता. तीनपदरी रस्ता, १०-१५ फुटांचा दुभाजक आणि पलीकडे परत तीन पदरी रस्ता असा प्रशस्त कारभार होता. मला अजूनही खायला मिळाले नसले तरी मी पाय मारणे सुरूच ठेवले होते. दुभाजकाच्या पलीकडे मला शाळेतून घरी परतणारी काही मुले सायकलवरून जाताना दिसली. ती विरुद्ध दिशेला जात होती..त्यांचेही लक्ष माझ्याकडे गेले. मी त्यांना मोठ्याने ओरडत फोटो काढायचा का असे विचारले. आमच्यामध्ये अंतर खूप जास्त असल्याने माझा आवाज त्यांच्यापर्यंत नीट पोहोचू शकत नव्हता. म्हणून मी त्यांना खुणेने विचारले की मी त्यांच्यासोबत फोटो काढू शकतो का. त्याबरोबर ती सर्व मुले अचानक सायकलवरून खाली उतरली आणि महामार्ग ओलांडून धावत माझ्याकडे आली; त्यातील एकाने तर आपली सायकल देखील उचलून आणली. मी त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यांनी आनंदाने माझ्यासाठी जल्लोष केला.


सूर्य आता डोक्यावरून बाजूला झाला होता. मनोज आणि संजय दोघांचाही काही पत्ता नव्हता. एकतर त्यांची विश्रांती थोडी लांबली असावी किंवा त्यांनी आता वेग कमी ठेवणे पसंत केले असावे. बोंगाईगाव जवळ येत होते. आजचे जवळपास १०० किमी अंतर पार झाले होते.



वेग मिळत नसल्यामुळे, वेळ वाचवण्यासाठी मी दुपारचे जेवण न करता सुकामेव्याचे लाडू खाणे पसंत केले. दरम्यान, मी चहाच्या शोधात पुढे गेलो. एका कोपऱ्यावर मला झोपडीवजा चहाचे दुकान दिसले. मी चहा मागितला. तो चहा चुलीवर बनवला जात होता - अस्सल 'चुलीवरचा चहा'. मी साखर नसलेला चहा मागितला. त्यांनी मला विचारले की मला दूध हवे आहे का. मी 'हो' असे उत्तर दिले. चहा बनवताना त्या महिलेने त्यात काहीतरी पांढरी पूड टाकल्याचे मी पाहिले. तिने त्यात साखर टाकली असावी असे मला वाटले आणि मला आश्चर्य वाटले. जेव्हा चहा टेबलावर आला, तेव्हा मला समजले की ती साखर नसून मीठ होते.




त्या मुलीने मला दिलेला खारट चहा मी निमुटपणे प्यायला. कारण चहा टाळणे म्हणजे माझ्या तत्वाच्या विरोधात जाणारे. आपले तत्व मोडणे हे योग्य नव्हे. खारट चवीकडे लक्ष न देता मी चहाला मान देणे माझे कर्तव्य समजलो. चहा पिऊन मी बाहेर येत संजय आणि मनोजला फोन करण्यासाठी थांबलो. इतक्यात ते दोघे मला मागून येताना दिसले. त्यांना लांबूनच इथे चहा प्यायचा नाही असे खुणावत मी सायकलयावला सुरुवात केली. त्या दोघांनीही मला काहीही न विचारता माझ्यामागे येणे पसंत केले. मी त्यांना हळूच त्या सुंदरीने मला जो चहा दिला होता त्याची महती सांगितली. 

आता उन्हे कलू लागण्यास सुरुवात झाली होती. चहासुंदरी ने केलेल्या आदरतिथ्याने चहाची तल्लफ भागली होती. मात्र भूक भागली नव्हती. लाडूंनी दिलेली एनर्जी संपत चालली असताना आणखी एक सुंदरी नजरेस पडली.



ह्या सुंदरीकडे नाष्टा किंवा चहाच काय अगदी पाणीसुद्धा नव्हते. मी तिच्याकडे पाहत शांतपणे पुढे निघालो.

आता आम्ही तिघेही बरोबरीने जाऊ लागलो. पुढे आम्हाला एक राजस्थानी ढाबा दिसला. तिथे आम्हाला राजस्थानी चहा मिळेल असे आम्हाला वाटले. तिथे एक ट्रकचालक आपल्या जेवणाची वाट पाहत बसला होता. तो सुद्धा राजस्थानचाच होता आणि नागालँडला चालला होता. आमच्या त्याच्याशी छान गप्पागोष्टी झाल्या. चहा घेतल्यावर आम्ही त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना आणि बिल भरत असताना, त्याने हॉटेलच्या मालकाला ठामपणे सांगितले की आमचे बिल तो भरेल. त्या बरोबर हॉटेल मालकाने देखील आमच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. त्या दोघांचे आभार मानत आम्ही बोंगाईगावकडे वळलो.

अशा या घटनापूर्ण दिवसानंतर, पुन्हा एकदा रवीने (सूर्य) शशांकला (चंद्र) हरवले.

हो, आज आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच सूर्यास्त झाला. साडेचार वाजेपर्यंत सूर्य क्षितिजावर आला होता. बोंगाईगावला पोहोचण्यासाठी आम्ही शेवटचे १० किलोमीटर अंधारात सायकल चालवली. मोहिमेतील हा सर्वात मोठा, पण घटनापूर्ण असा दिवस होता.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

भेट आसामच्या शिवाजीशी: कोलकाता गुवाहाटी सायकलसफर भाग ३३

आमची गुवाहाटी येथील व्यवस्था रवींद्र हणमत्तेकर करणार होते. आम्ही पुढे एक चौकात जाऊन त्यांना संपर्क करण्याच्या निमित्ताने चहा पिण्यासाठी थांब...