भूतानच्या डोंगररांगा आम्हाला साथ करत होत्या. तसेच भूतानकडे जाणारे रस्तेही आम्हाला अधून मधून दिसत होते. खारट चहा पिऊन भूक भागली नव्हती. मात्र खाण्यासाठी काही दिसत नसल्याने आम्ही सातत्याने पाय मारत होतो. बोंगईगाव येथे पोचण्याच्या थोडे आधी एक छोटे गाव लागले. तिथून भूतानकडे जाणारा रस्ताही दिसत होता. चौकातच काही फळे दिसत होती. आम्ही तिथे दिसणारी संत्री घेतली. ती थेट भूतानमधून आली होती.
बोंगईगाव येथे पोचेपर्यंत अंधार झाला होता. मात्र आम्हाला एक छानसे हॉटेल वास्तव्यासाठी मिळाले. लॉजमालक आमच्या प्रवासाची कल्पना ऐकून उत्साहित झाला होता. त्याने माहिती पुरवली की ह्या हॉटेलमधील नळाचे पाणी हे अतिशय शुद्ध आहे. ते थेट भूतानमधूनच येते. ते पाणी प्यायल्यावर आम्हीही अगदी तृप्त झालो होतो. खरोखरच ते पाणी अतिशय मधुर होते. भारताच्या सीमेवर असताना, भारताच्या भूभागामध्ये आम्हाला भूतानची संत्रीच तर मिळालीच पण अगदी पाणीदेखील मिळाले होते. ते पाणी पिऊन भूतानमध्ये शिरण्याची इच्छा न झाली तर नवलच. पण सध्या गुवाहाटीची साद ऐकू येत होती.
चिकननेक पट्ट्यातून पुढे सरकत आता आम्ही बांगलादेशच्या ईशान्येला, भूतानच्या दक्षिणेला तर मेघालयच्या उत्तर दिशेला पोचलो होतो. गुवाहाटी आता जेमतेम दीड दोन दिवसांच्या टप्प्यावर आले होते. लॉजमधील आमचा मुक्काम अगदी आरामदायी झाला. शांत झोप लागल्यामुळे आणि गुवाहाटी आता जवळ येत असल्याची जाणीव असल्यामुळे आम्ही अतिशय उत्साहात होतो. आमचा पुढील मुक्काम नलबारी येथे होणार होता. संदीप माझ्या संपर्कात होताच. नलबारी येथील हॉटेलचे नाव त्याने सुचवले होतेच.
आम्ही सकाळी सातच्या सुमारास बोंगईगाव सोडले. सूर्य बऱ्यापैकी वर आला होता. आजही शतकी मजल मारायची होती. सकाळची प्रसन्न हवा, सुंदर आणि प्रशस्त रस्ते ह्यांचा लाभ घेत आम्ही वेग घेतला. इतक्यात एका मोटारसायकलस्वाराने आम्हाला थांबवले. कोलकत्याहून आम्ही गुवाहाटीपर्यंत सायकल चालवत जातोय हे समजताच तो अचंबित झाला. त्याला आमच्याबरोबर एक सेल्फी हवा होता. आम्हाला शुभेच्छा देऊन तो पुढे निघाला
साधारण तासभर सायकलवल्यावर आम्ही मानस नदी गाठली. ही हिमालयीन पायथ्याशी असलेली, भूतान, भारत आणि चीन या देशांमधून वाहणारी एक आंतरराष्ट्रीय नदी आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये सर्प देवी मानसाच्या नावावरून ह्या नदीला मानस नदी असे नाव देण्यात आले आहे.


मानस नदी ही ब्रह्मपुत्रेची उत्तर तीरावरील सर्वात मोठी उपनदी आहे. भूतानमध्ये ह्या नदीला 'द्रांगमे छू' असेही म्हणतात. या नदीच्या तीन प्रमुख शाखा आहेत - द्रांगमे छू, मांगदे छू आणि बुमथांग (चमखार) छू. ही नदी भूतानमधील 'लोअर हिमालया'च्या दोन रांगांच्या दरम्यान, 'V' आकाराच्या दऱ्यांतून नैऋत्य दिशेकडे वाहते आणि हिमालयाच्या दक्षिण-मध्य पायथ्याशी असलेल्या आसाममध्ये प्रवेश करते. डोंगरांच्या पायथ्याशी ही दरी रुंदावते, जिथे नदीच्या गाळाच्या मैदानी प्रदेशात दलदलीचे आणि पाणथळ भाग तयार होतात. नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात बहुतेक काळ बर्फ साचलेला असतो, तर मध्यम आणि खालच्या पाणलोट क्षेत्रात दाट जंगल आहे. एकूण ४०० किमी लांबीच्या या प्रवासात, ही नदी तिबेटमधून २४ किमी, भूतानमधून २७२ किमी आणि आसाममधून १०४ किमी अंतर कापते, आणि शेवटी जोगीघोपा येथे ब्रह्मपुत्रा नदीला मिळते.
मानस नदीवरील पूल पार करून आम्ही पुढे निघालो. वाटेत शाळेत जाणाऱ्या मुलांनी मला अडवले. त्यांना माझ्या मोहिमेबद्दल माहिती हवी होती. विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याची संधी मी साधली. त्यांनाही थोडे प्रोत्साहित केले. दोनेक तास दौड झाल्यावर नाष्टा करायला थांबायचे होते. रस्त्याच्या डावीकडे एक छोटे खोपट दिसले. तिथे नक्की काय खायला मिळेल ह्याचा अंदाज येत नव्हता. समोर काही बरण्या ठेवलेल्या होत्या. मात्र त्यामध्ये आमची क्षुधाशांती होऊ शकणार नव्हती. आम्ही आतमध्ये डोकावले. एक जोडपे ते दुकान चालवत होते. आतमध्ये गरम गरम रोटी तयार होताना दिसत होत्या. त्याबरोबर आम्ही रोटी आणि बरोबर भाजी मागवली. एका वृत्तपत्राच्या कागदावर रोटी आणि त्या रोटीवर कसलीतरी भाजी आमच्यासमोर आली. भाजी नक्की कसली होती ते कळले नाही. मात्र चव छानच होती. खाता खाता त्या दोघांबरोबर आमच्या गप्पा रंगल्या. आम्हीही निवांतपणे बसलो होतो. ते दोघेही आमची मोहीम ऐकून खूप खूष झाले. रोटी भाजी खाऊन आम्ही तृप्त झालो होतो
हे आसामी जोडपे अतिशय प्रेमळ होते. त्यांच्याशी बोलताना आम्हाला प्रथमच त्यांना भेटत होतो असे वाटतही नव्हते. आसामची सलामी अतिशय हृद्य होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा