शनिवार, १६ जून, २०१८

वरूणराजांची हुलकावणी

सरोजिनी नायडू यांनी भारतीयत्वाबद्दल सांगितले आहे की विविधतेतील एकता म्हणजे भारतीयत्व.
भारतातील प्रमुख धर्म हिंदू आणि त्यानंतर मुस्लिम. ह्या दोन्ही धर्माची कालगणना हि चांद्र पद्धतीवर अवलंबून आहे. मात्र तरीही भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर हे भारतात अत्यल्प प्रमाणात असलेल्या ख्रिस्ती धर्माच्या प्रमाणे सौर कॅलेंडर आहे. याचे कारण सरोजिनी नायडू केलेल्या भारतीयत्वाच्या व्याख्येत दडले आहे. आज ईद-उल- फित्र म्हणजे मुस्लिम धर्मियांचा २९-३० दिवस चाललेला उपास सोडायचा दिवस. अर्थात रमदान या पवित्र महिन्याची अखेर तर मुस्लिम कॅलेण्डरचा दहावा महिना शव्वल याचा पहिला दिवस. बंधुत्व आणि जातीय सलोखा यांचा संदेश देणारा हा सण.

आज रमजान ईद च्या निमित्ताने मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करायला श्विन आणि स्कॉट उत्सुक होतेच. सायकल जगतात नुकताच सामील झालेला तेजस जोशी गेले काही दिवस नियमाने १०-१५ किमी सायकलिंग करत होता. त्यामुळे श्विन स्कॉटने आज त्याला बि घडवायचे ठरवले. त्याला विचारताच तोही लगेच तयार झाला. त्याची फुजीही लांब पल्ल्यासाठी उत्सुक होती. स्कॉट आणि फुजी या दोघीही एकाच घराण्यातल्या म्हणजे कल्याणमधील साहिर शेख याच्या बाईकपोर्टमधीलच. फुजीचे पहिले अर्धशतक पळस्पे फाटा येथे जाऊन करायचे आम्ही ठरवले.
सूर्याचे उत्तरायण सुरु असल्याने अरुण लवकर हजर होत होता. आणि गेल्या आठवड्यात हूल देऊन गायब झालेला वरूण धुमाकूळ घालण्याचे काही चिन्ह नव्हते. श्विन, स्कॉट आणि फुजी पहाटे ६-६.१५ ला तयार झाले तेव्हा मात्र अरुणने ढगांची दुलई पांघरली होती. क्षितिजावर काळी झालर दिसत असली तरी अनुभवामुळे श्विन निर्धास्त होती. अर्थात शिळ फाट्याजवळच्या डोंगररांगा मेघांना अडवण्याची शक्यता होतीच.

तिघांनी संथगतीने सुरुवात करत भोपर मार्गे कल्याण शिळ रस्ता गाठला. अजूनही अरुणमहाराज ढगाआडच लपले होते. पालवा, खिडकाळी पार करत श्विनने कोकनरत्नकडे एक नजर टाकली. परत येताना इथला मुक्काम हा ठरलेलाच होता. मात्र पहाटे तिथे थांबण्याचे प्रयोजन नसल्याने तिघेही शिळ फाट्याला पोचले. फुजीने पहिला महत्वाचा टप्पा गाठल्याने तेथे जलपान करत क्षणभर विसावा घेतला आणि तिघांनी पुढे कूच केले. 
मानपाडा पासून पुढे सगळ्यात वरील गियर टाकत वेग वाढवणे शक्य होते तरी आजतरी श्विनने शिळ फाट्यापर्यंत तसे केले नव्हते. मात्र शिळ फाट्याचा टप्पा ओलांडताच श्विनने गियर आणि वेग वाढवला. फुजीचा वेग पाहता तिच्या रोजच्या सरावाची प्रचिती येत होती. अभ्राच्छादित नभाची साथ असल्याने श्विन स्कॉट आणि फुजीची दौड लयीत सुरु होती. अवघ्या सव्वादोन तासात पळस्पे फाटा हे गंतव्यस्थान गाठले तेव्हा मात्र वरूण राजांनी तेथे आधीच लावलेल्या हजेरीची कल्पना येत होती. 'दत्त' समोर असलेल्या गर्दीची जाणीव होताच श्विन, स्कॉट आणि फुजीने रस्त्याच्या डावीकडील क्षुधाशांतीकेंद्राकडे मोहरा वळवला. मिसळीची तहान इडली वड्यावर भागवावी लागणार होती. आम्ही इडली सांभारचा फडशा पडत असताना वरूणराजांनी जोरदार हजेरी लावली. जणू आम्ही भिजू नये यासाठीच तो थांबला होता. त्याचा रागरंग पाहता परत जाताना पावसाळी सफरीचा अनुभव मिळण्याची शक्यता स्पष्ट होती. मात्र आमचे उदरभरण होऊन आम्ही परतीसाठी सज्ज होईपर्यंत वरूणराजांनी रजा घेतली.
परत येताना आम्ही सज्ज होत असताना शेजारीच पांढरेशुभ्र आणि स्वच्छ कपडे घातलेला एक मुस्लिम युवक आमची आस्थेने चौकशी करत होता. त्याला इदच्या शुभेच्छा देऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 
एकंदर वातावरण चांगलेच उल्हसित करणारे होते. फुजीचे नवखेपण अजिबात जाणवत नव्हते. किंबहुना हायब्रीड श्रेणीतील असल्यामुळे फुजीला MTB श्रेणीतील श्विन आणि स्कॉटपेक्षा वेगही जास्त घेता येत होता. एव्हाना सूर्यदर्शन झाले नसले तरी रस्त्यावरील वर्दळ जाणवू लागली होती. कळंबोली सर्कल, तळोजा येथे आमची गती मंदावली. पुढे टोल नाक्यावर पाण्याची सोय करून आम्ही शिळ नाकामार्गे कोकणरत्न गाठले. श्विनही बऱ्याच दिवसांनी कोकणरत्न गेली. तेथे चहा कॉफी घेऊन आम्ही फोटोसेशन केले. पालवा, पुढील टोलनाका आणि काटई नाका येथे थोडीफार गर्दी होतीच. 
तेथे मार्ग काढून आम्ही भोपरमार्गे डोंबिवली मध्ये शिरलो. वरुणराजाने हजेरी लावूनही आम्ही मात्र कोरडे राहिलो होतो. आणि एकंदर ७२ किमीचा पल्ला पार करूनही पहिले अर्धशतक नोंदवणाऱ्या फुजीचा उत्साह कायमच होता. 

२ टिप्पण्या:

  1. मस्त वर्णन ... वरुण राजे अशी हुलकावणी देण्यात माहीर आहेत .
    मला १ जुलैला गेल्यावर्षी अशीच हुलकावणी दिली होती ..

    उत्तर द्याहटवा
  2. वरूनराजांची अशी हुलकावणी मी cycle2work करताना बऱ्याचदा अनुभवतो. पाऊस सुरु झाला म्हणून रेनकोट घातला की तो गायब होतो आणि गरम व्हायला लागले म्हणून रेनकोट काढला की परत

    उत्तर द्याहटवा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...