रविवार, १७ जून, २०१८

सांग सांग भोलानाथ

'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?' या गाण्याबरोबरच लहानपणापासूनच पावसाशी आपले घट्ट नाते जडले जाते. आबालवृद्ध ज्या ऋतूची आतुरतेने वाट पाहत असतात तो पाऊस मात्र सुरुवातीला वर्दी देऊन यावर्षीही दडी मारून बसला होता. त्याची चाहूल लागल्याने काल पहिली पावसाळी सायकल सहल ठरवली खरी. पण कालचा दिवस आमच्याशी लपंडाव खेळून आम्हाला त्याने कोरडेच ठेवले.
आज श्विन आणि स्कॉट थोड्या उशिरानेच भ्रमंतीला निघाले तेव्हा 'नभ मेघांनी आक्रमिले' अशी परिस्थिती होती. नेवाळी फाटा येथे जाऊन पावसाचा अंदाज घेत पुढील निर्णय घेण्याचे ठरवत दोघांनी मार्गक्रमण सुरु केले. नेहमीप्रमाणे डोंबिवली शहरातून बाहेर पडेपर्यंत श्विन आणि स्कॉट संथ गतीने जात होते. कल्याण शिळ रस्त्याला लागताच वेग वाढला. अजूनपर्यंत ढगांचे छत्र डोक्यावर असले तरी पावसाचा मात्र पत्ता नव्हता. बदलापूर पाइपलाइन रस्त्यामार्गे तळोजा फाटा गाठला तेथे अजित मोडक भेटला. तो ऑफिसला जाताना तेथे ज्या अमृतपानकेंद्रामध्ये (शुद्ध मराठीत चहाची टपरी) जातो ते मात्र आज बंद होते. थोडावेळ गप्पा मारून तो त्याच्या ऑफिसला निघाला. मागोमाग श्विन आणि स्कॉटही नेवाळी फाट्याच्या दिशेने निघाले. मात्र आता ढगांची झालर दूर करून सूर्य त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागला होता. नेवाळी फाटा येथे पोचत असताना श्विन आणि स्कॉटने तेथे चहा घेऊन परत फिरायचे ठरवले. 
श्विन आणि स्कॉट नेवाळी फाटा येथील अमृतपानकेंद्रापाशी थांबत असताना तेथे अंबरनाथ येथील अनुपमा उनकुले आणि अपेक्षा पटेल यांची भेट झाली. त्या दोघीही मलंगगडाकडे जाऊन आल्या होत्या. अनुपमा जवळपास ३ महिन्यांनी सायकलजगतात परत आल्यामुळे चांगलीच खुश होती. पावसाळी सहली आणि जवळपासची ठिकाणे याबद्दल अनुपमा भरभरून बोलत होती. भटक्या खेडवाला म्हणजे विनायक वैद्य कोकणात अनुभवत असलेल्या पावसाळी गंमतीची चर्चा होताच आम्ही सगळेजण मनाने खेडला पोचलो. या पावसात खेडला जायचा प्लॅनही ठरू लागला.  आमची चर्चा ऐकण्याचा मोह न आवरल्याने पाऊसही अवतरला. त्याबरोबर आम्ही मलंगगडाच्या दिशेने जायचे ठरवले. खरतर घड्याळबाबा आम्हाला परत फिरायचा आदेश देत होते. 
अनुपमा आणि अपेक्षा अंबरनाथ वळत असताना श्विन आणि स्कॉटने मलंगगडाकडे जाणारा रस्ता पकडला. अर्थात मलंगगडापर्यंत न जाता वाटेत खरड येथील गावदेवी मंदिरापर्यंत जाण्याचे ठरवले होते. पाऊसही आता आम्हाला साथ करत होता. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. नेवाळी गाव, मांगरुळ पार केल्यावर तर पाऊस चांगलाच रंगात आला. नेवाळीहून मलंग गडाकडे जाताना खरड येथील गावदेवी मंदिर हे मुख्य रस्त्यापासून उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला वळल्यावर थोडा रस्ता काँक्रिटचा असून पुढे मात्र मातीचा रस्ता आहे. मातीच्या रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे श्विन आणि स्कॉट सावधतेने जात होते. जेमतेम ५-६ फूट रुंद असलेला हा रस्ता निसर्गसंपन्न आहे. आम्ही देवळाच्या प्रांगणात प्रवेश करेपर्यंत पावसानेही चांगलाच जोर पकडला होता. श्विन आणि स्कॉटला एका पत्र्याच्या शेडखाली उभे करत आम्ही गावदेवी आणि महादेवाचे दर्शन घेतले. एव्हाना पावसाने सातवा सूर लावला होता. डोळ्यांच्या पापण्यांवरचे पाणीही झटकन कठीण झाले होते. पावसामध्ये मनसोक्त भिजण्याची संधी मिळाल्यामुळे स्कॉट आणि श्विन खुश झाले होते. पावसाच्या ह्या मुसळधार सरींचा आनंद घेत परत फिरण्याचे श्विन आणि स्कॉटने ठरवले. देवळाच्या प्रांगणातून आम्ही निघालो तेव्हा पावसाचा जोर चांगलाच वाढला. मातीचा रस्ता आणि पुढील काँक्रिटचा रस्ता पार करेपर्यंत श्विन आणि स्कॉट अतिशय संथपणे पुढे सरकत होते. मलंगगडाकडून नेवाळीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावरही त्याच गतीने पुढे जावे लागणार होते. पावसाचा आमच्यावरील वर्षाव सुरूच होता. त्यामुळे आम्ही नेवाळी फाटा येथे पुन्हा चहा घेण्यासाठी थांबलो. 
तेथून परत निघणार तोच समोर गावातील ताजी भाजी घेण्याचा मोह झाला. बरोबरील सॅक भरेपर्यंत खरेदी करून स्कॉट आणि श्विन डोंबिवली च्या दिशेने निघाले. डोंबिवलीमध्ये प्रवेश करेपर्यंत पावसाचा जोरही ओसरला होता. मात्र तोपर्यंत मनसोक्तपणे भिजायला मिळाल्याने श्विन आणि स्कॉटही समाधानी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...