शनिवार...कोणतेही नवीन काम सुरु करायचे असेल तर माझ्यासाठी हा सर्वात उत्तम वार. कदाचित त्यामुळेच आज सकाळी प्रसन्न वाटत होते.
श्विनने आज ऑफिसकडे कूच केले तेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश पसरला होता. डोंबिवली पश्चिमेकडून ठाकुर्लीजवळील उड्डाणपुलावर जात असताना एकदम एक हाक ऐकू आली. खरतर घरातून निघताना थोडा उशीर झाला होता आणि उड्डाणपुलावर पोचत असताना श्विनला लय सापडली होती. त्यामुळे तिथे थांबण्याचा श्विनचा कोणताही विचार नव्हता. ज्या कोणी हाक मारली त्याला हात हलवत अभिवादन करून पुढे निघायचे असा विचार करत मी मान वळवली. तर मागे एका टेम्पोतून एकजण मला हाक मारत असल्याचे जाणवले. त्या टेम्पोच्या चालकाच्या खिडकीतून एकजण बाहेर डोकावत होता. त्याला पाहताच श्विनचा पुढे जायचा विचार ताबडतोब बारगळला, आणि श्विन आपोआपच मागे वळली. तो चेहरा होता अविनाश हरडचा.
अविनाश हरड हा कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायते या छोट्याश्या गावातील साधा सरळ युवक. मात्र त्याचे कार्यबाहुल्य मात्र अतुलनीय. Save our sahyadri ह्या सायकलिंग मोहिमेतील नवापूर ते महाबळेश्वर ७०० किमी हुन अधिक अश्या उत्तर मार्गातील अविनाश हा प्रमुख आधारस्तंभ. 'अश्वमेध प्रतिष्ठान' ची धुरा सांभाळणाऱ्या अविनाशने जवळपासच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध व्हावीत यासाठी एक पुस्तकालयसुद्धा स्वतःच्या घरी उभे केले आहे. त्याचबरोबर सह्याद्रीच्या खजिन्यातून जमा केलेल्या वैविध्यपूर्ण वस्तूंचे संग्रहालय अविनाशने स्वतःच्या घरीच उभे केले होते. त्या मध्ये सातत्याने भर पडत असल्याने मोठ्या जागेची आवश्यकता भासू लागली, तेव्हा त्याने टिटवाळा येथील प्रशस्त जागेत हे संग्रहालय हलवण्याचे ठरवले. हे संग्रहालय नवीन वास्तूत उदघाटनेच्या प्रतीक्षेत आहे. ह्या संग्रहालयासाठीच काही सामान आणण्यासाठी अविनाश आला होता. अविनाशने मनाच्या कोपऱ्यात अढळ स्थान प्राप्त केले असल्याने त्याला बघितल्यावर त्याच्याशी गप्पा मारल्याशिवाय पुढे जाणे शक्यच नव्हते. त्याच्याशी गप्पा मारायला कितीही वेळ हा अपुराच! मात्र ऑफीसला जायचे भान असल्याने थोड्याच वेळात श्विन पुढे निघाली. खरोखरच आजचा दिवस भाग्याचा होता, याचा हा संकेतच होता.
श्विन पुढे जात असताना ९० फुटी रस्ता संपताना DCC चा विकास नागदा भेटला. मात्र वेळ वाचवायचा असल्याने त्याला केवळ अभिवादन करून श्विन पुढे निघाली. पुढे दुर्गाडी पुलावर सर्व अश्वशक्तीधारी वाहने कुर्मगतीने जात होती. दुर्गाडी येथील चौकात उभ्या असलेल्या अश्वारूढ शिवाजीमहाराजांच्या साक्षीने गनीमी कावा वापरत श्विनने सर्व अश्वशक्तीधारी वाहनांना मागे टाकले. कोनगाव ते गोवेगाव दरम्यान परिस्थिती तशीच होती. शिवाय एकामागोमाग एक अवतरलेल्या खड्यांच्या मालिकेमुळे रस्त्याला डावी बाजूच शिल्लक नव्हती. श्विनने डावीउजवी आघाडी बदलत बदलत इथेही बाजी मारली.
राजनोली पार करून श्विन नाशिक ठाणे महामार्गागाला लागताच मी ठाण्याच्या क्षितीजाकडे पाहिले. इथून १६ किमी अंतरावर असलेल्या ठाणे येथील क्षितिज स्वच्छ असले तरी वाटेत काळ्या ढगांचा एक पट्टा दिसत होता. त्यावरून मानकोली येथे तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज श्विनला आला. मात्र तरीही लोढा साईमंदिरापुढील उताराचा फायदा घेत त्या तुरळक सरींना तोंड देण्याचे ठरवत श्विन पुढे निघाली. सुदैवाने श्विनचा अंदाज आजही बरोबर ठरला. खरेतर ओवळी गावाकडे जाणारा रस्ता पार करेपर्यंत सूर्य अस्तित्व दाखवू लागला होता. मात्र मानकोली येथे आकाशात आलेल्या ढगांनी सूर्य झाकोळला गेला. किंबहुना आकाशातील काळे ढग पाऊस पाडण्यासाठी न येता सूर्यापासून संरक्षण करण्यासाठीच अवतरले होते. श्विनने त्या छत्राखाली मार्गक्रमण सुरु ठेवले.
ठाणे जवळ येताच मात्र सूर्याने पुन्हा सुटका करून घेतली होती. TJSB HOUSE आता काही अंतरावरच असल्याने आता श्विनला सूर्याच्या प्रखरतेची चिंता नव्हती. त्यामुळे माजीवाडा/ कापूरबावडी येथील उड्डाणपूल आणि नंतर व्हिव्हियाना मॉल येथील उड्डाणपुलावर चढाई करत श्विनने तीन हात नाका गाठला.
TJSB HOUSE गाठले तेव्हाही श्विनचा उत्साह कायम होता. कदाचित यामागे उत्साही अविनाशची झालेली अवचित भेट हेच कारण असावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा