शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

डॉक्टर श्विन

गेले कित्येक दिवस cycle2work राहो साधे सायकलिंगही करत नाहीये. रोज रेल्वेने ऑफिसला येऊन रेल्वेनेच परत घरी येतोय.

 परवा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या उजवा पाय आणि उजवा खांदा अचानक दुखायला लागला. पाय तर मुरगल्यासारखा दुखू लागला. कारण कळत नव्हते त्याचा आणखी एक त्रास होत होता.

मात्र काल रेल्वेतून ऑफिसला जाताना उलगडा झाला. माझी गाडीत उभे राहायची जागा ठरलेली आहे. तिथे गर्दीच्या रेट्याने माझ्या उजव्या घोट्यावर आणि पावलावर तसेच उजव्या खांद्यावर जोर येत होता.

अचानक झालेल्या आघातामुळे काही झाले तर त्याचे कारण समजते. मात्र माझा उजवा खांदा आणि उजवा घोटा, पाऊल यांच्यावर रोजच नकळत ठराविक पद्धतीने थोडा दाब येत होता. त्याचे पर्यवसान ह्या दुखण्यात झाले होते.

पाय आणि खांदा खूप दुखू लागल्याने वैद्यकीय इलाज करावासा वाटला.

मात्र आज सकाळी उठल्याबरोबर श्विनने साद दिली. मला खर तर इथे पाऊल टेकवताना विचार करावा लागत होता....

पण मग श्विनचे म्हणणे ऐकत श्विनवर स्वार झालो. संजय दात्ये आणि प्रसाद सरवटे गणेश घोळ मंदिर येथे गेले होते. त्यांना कोकणरत्नला भेटतो असे सांगितले. अर्थातच आता पाय दुखू लागला तरी अर्ध्या वाटेतून फिरता येणार नव्हते. अर्ध्या वाटेतून परतीचे दोर कापून टाकले होते.

श्विन संथ गतीनेच जाऊ लागली. आश्चर्य म्हणजे डोंबिवली शहरातील अनेकविध खड्डे तात्पुरती मलमपट्टी करून का होऊन बुजवलेले होते.

कोकणरत्नला पोचलो, तर दात्ये आणि प्रसाद माझी वाटच पाहत होते. त्यांच्याबरोबर गप्पा मारत अमृतपान केले. कोकणरत्न येथील चहा हे माझ्यासाठी अमृतच!

श्विनला आणि प्रसादाची स्कॉट आणि दात्येंची कॅनॉनडायल भेटल्यामुळे श्विनही खुश झाली होती. चहापान होताच आम्ही परत घराकडे निघालो. मानपाडा रस्ता नेहमीप्रमाणेच गजबजलेला होता. मात्र श्विन, स्कॉट, कॅनॉनडायल ला घरी परतण्याची फारशी घाई नसल्याने तिघी रमतगमत आणि मानपाडा रस्त्यावरील अश्वशक्तीधारी दुचाकी, चारचाकींची मजा पाहत शांतपणे मार्गक्रमण करत होत्या.

वाटेत स्कॉट आणि कॅनॉनडायलला निरोप देऊन श्विन घरी परतली तोपर्यंत दुखणारा घोटा आणि पाऊल यांची चाहुलही लागत नव्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...