सायकलवरून १५९ दिवसात २९००० किमीची जगप्रदक्षिणा करणाऱ्या वेदांगी कुलकर्णी हिचे अनुभव ऐकण्याचा योग नुकताच आला. जगप्रवास करण्याबद्दल वेदांगीचे कौतुक आहेच, मात्र त्याबरोबर कौतुक वाटत होते ते तिची आई (अपर्णा कुलकर्णी) आणि वडील (विवेक कुलकर्णी) यांचे. तिच्या जगप्रवासातील विलक्षण आणि थक्क करताना आठवण झाली एका मित्राची आठवण झाली- जो स्किट (Josiah Skeats)ची. ह्या पठ्ठ्याने इंग्लंड ते ऑस्टेलिया ह्या दरमनाचा प्रवास दोनदा केला आहे. एकदा सायकलने रस्त्यांवरून तर एकदा जलमार्गाने बोटीतून.
श्विन स्कॉटची मुंबई गोवा सायकलफेरी झाली, त्यानंतर श्विन स्कॉटच्या रोजच्या सरावाला स्वल्पविराम पडला होता. श्विनचे cycle2work आठवड्यातुन जेमतेम एकदा होऊ लागले होते. सौर कॅलेंडरच्या पौष महिन्यातील थंडीचा अनुभव घेत सकाळी लोळत पडण्याचाच तो परिणाम होता. मात्र वेदांगीचे अनुभव आणि जो ची आठवण यांच्यामुळे येता रविवार मात्र सत्कारणी लावायचे श्विन स्कॉटने ठरवले होते. त्या इच्छेचा पूर्तता होण्यासाठीच की काय २ दिवसांपूर्वी एक फोन आला. तो होता एका बालमित्राचा- महेश (मयूर) राणेचा. महेश आणि मी तसे म्हटले तर जन्मापासूनचे मित्र. मात्र तो बदलापूरला राहायला गेल्यावर म्हणजे जवळपास ३५ वर्षे आमची गाठभेट नव्हती. गेल्या काही काळात फोनवर बोलताना मात्र ती ओढ अजून कायम असल्याचे जाणवत होते. २ दिवसांपूर्वी फोनवर बोलताना त्याने घरी येण्याचे आमंत्रण दिले ते श्विनने तत्क्षणी स्वीकारले.
त्यानुसार आज श्विन आणि स्कॉट बदलापूरला जायला निघाले. सूर्यदेवाचे आगमन होऊन यंव वेळ झाला होता. मात्र सौर पौष महिन्यातील सूर्य हा सुखद उब देत होता. अतिशय संथपणे श्विन स्कॉटने डोंबिवली शहर मागे टाकले. कल्याण शिळ रस्त्याने न जाता आज माणगाव - उंबर्ली रस्त्याने श्विन स्कॉटने बदलापूर पाइपलाइन रस्ता गाठला. आपली संथ गती दोघेही कायम राखत होते. पाइपलाइन रस्त्याने जातानाही दोघांनी कोणतीही घाई केली नाही. मलंगगडकडे जाताना लागणारा नेवाळी चौक हा खरेतर श्विन स्कॉटचा हक्काचा थांबा. मात्र आज तिथेही न थांबता श्विन स्कॉट पुढे निघाले. बदलापूर शहरात शिरताना एक फलक आहे. तो पाहणाऱ्यावर मोहिनी पडते आणि नजरबंदी झाल्याप्रमाणे आपण पुढे जात राहतो याची श्विनला जाणीव होती. श्विनने स्कॉटलाही त्यासंबंधी जागरूक केले. त्या फलकावर 'नेरळ २० किमी' असे लिहिले आहे. हे वाचून श्विनने स्वतःच्याच नकळत एकदा नव्हे किमान दोनदा तरी नेरळ गाठले होते. आज मात्र महेशकडे जायची सूचना मेंदूकडे ठळकपणे नोंदवली गेली होती. त्यामुळे तो फलक पाहताच मन बहकले जाऊ लागले तरी आज त्या मनावर मेंदूने विजय मिळवला. कात्रप येथील महेशच्या बंगल्यात त्याच्या वडिलांनी आमचे स्वागत केले. महेश भटिंडा येथे गेल्यावर त्याची तब्बेत बिघडल्याने त्याला तिथेच थांबावे लागले असल्याचे त्याने कळवले होते. मात्र त्याच्या वडिलांना भेटण्याविषयी त्याने आग्रहाने सांगितले होते. महेश घरी नसल्याची कोणतीही जाणीव न होऊ देता महेशच्या बाबांनी आणि महेशच्या अर्धांगिनीने श्विन स्कॉटचे स्वागत केले. त्यांच्याशी गप्पा मारताना मधला ३५ वर्षांसाज अंतर केव्हाच नाहीसे झाले. महेश न भेटल्याबद्दल खंत वाटत असली तरी त्याच्या बाबांना भेटल्याचे समाधानही होते.
परत निघताना मन मात्र तिथेच राहू इच्छित होते. श्विन स्कॉट डोंबिवलीकडे वळले खरे पण नेरळचा फलकाने घातलेली मोहिनी परत जादू करू लागली. मात्र मोठ्या निर्धाराने त्या मोहिनीची जादू झुगारून श्विन स्कॉटने डोंबिवलीची दिशा धरली. वाटेत अंबरनाथ औद्योगिक परिसरातील वैभव स्नॅक्स हे उपहार गृह श्विनच्या आवडीचेच. तेथे उदरभरण करून श्विन स्कॉट पुढे निघाले. बदलापूरच्या ओढीने जाताना नेवाळी फाटा येथील चहा टाळला असला तरी परत घरी येताना मात्र तो मोह आवरला नाही.
नेवाळी फाट्याहून परत घरी येताना जो (josiah skeats)ने शिकवलेले गाणे मनात रुंजी घालू लागले....
"I am on the roads again...."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा