गुरुवार, २ एप्रिल, २०२०

उदरभरण नोहे...पुणे जम्मू सायकलसफर भाग २- लेख ४

भारतीय राष्ट्रीय निधर्मी शास्त्रीय दिनांक ६ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती अशास्त्रीय दिनांक २७ डिसेंबर २०१९

पहले प्रहर सब जागे
दुसरे प्रहर भोगी
तिसरे प्रहर तस्कर जागे
चौथे प्रहर योगी.

रात्रीचा चौथा प्रहर हा अतिशय पवित्र मानला जातो. याचे शास्त्रीय कारण सांगायचे तर ह्यावेळी वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण सर्वोधिक असते. ह्या प्रहरी उठणे तर दूरच पण झोप मात्र अतिशय गाढ लागते, हा श्विन(फुजी)चा अनुभव होता. मात्र सायकल सफरीवर निघाल्यावर मात्र श्विनला ह्या वेळी आपोआपच जाग येत असे.

आजही रात्री शांत झोप झाल्यावर श्विनला जाग आली. खरं सांगायचं तर श्विनला कोणीतरी दुसरं उठल्याशिवाय अंथरूण सोडायला आवडायचे नाही. मात्र आज गाढ झोपेनंतर अतिशय प्रसन्न वाटत होते. त्यामुळे श्विनने सगळ्यांच्या आधीच निद्रादेवीच्या मोहपाशातुन सुटका करून घेतली. हॉटेलमधील निवासी खोली बाहेर येत श्विनने लगोलग चहाच्या शोधात धाव घेतली. मात्र खाली उतरताच थंडीचा तडाखा जाणवू लागला. मात्र सुदैवाने शेजारील इमारती मध्येच चहाचे आधण ठेवलेले दिसले. श्विनने ताबडतोब चहाचा लाभ घेतला. चहा घेत असताना चहाच्या गरम ग्लासमुळे बोटांना बरे वाटत होते. मात्र श्विनचे समाधान एका चहाने होईना. पुन्हा एकदा चहा घेऊन झाल्यावर मात्र श्विनला तरतरी आली. मग मात्र सगळ्या सहप्रवाश्यांना चहासाठी निमंत्रण दिले. सगळ्यांनी आपापले सामान टेम्पोमध्ये चढवले आणि आजच्या प्रवासासाठी सज्ज झाले. अद्याप रस्त्यावर पूर्णपणे अंधार होता. मात्र सगळेजण एकमेकांच्या आधाराने मार्ग कापू लागले. थंडी मुळे सगळ्यांच्या हाताची बोटे गारठली होतीच. श्विनला पूर्ण बंद बूट घालायचे नसल्याने श्विनने पुढच्या बाजूस बोटे उघडी राहतील असे बूट घातले होते. मोजे असले तरी त्यामधून श्विनच्या पायाची बोटंही गारठत होती.

सगळेजण एकामागोमाग जात होते. महामार्गावर फारशी वर्दळ नव्हती. सायकलींच्या हाताळ्यावर लावलेल्या दिव्यांच्या उजेडात किती वेळ आम्ही जात होतो ते लक्षात येत नव्हते. काही वेळाने क्षितिजावर फटफटू लागले. जवळपास तासभर रपेट झाल्यावर मात्र आम्हाला चहाकेंद्र दिसले. सगळ्यांनीच आपापले लगाम ओढले. सूर्य दक्षिण गोलार्धाच्या अतिदक्षिण टोकाला जाऊन आज सहावा दिवस (दिनांक ६ पौष) होता, त्यामुळे गारठा चांगलाच जाणवत होता. चहा उकळत असलेल्या भांड्याला दोन्ही हातांनी पकडत श्विनने शेक घेण्यास सुरुवात केली. आता चहा घेण्यापेक्षाही बोटांना शेक मिळणे जास्त महत्वाचे वाटत होते. चहा घेऊन झाल्यावर मात्र सगळे सायकलस्वार रपेटीसाठी पुन्हा तय्यार झाले.

दरम्यान काल बडोद्याच्या वर्तमानपत्रातून झळकल्यानंतर आज अहमदाबाद येथील वर्तमानपत्रातही आमची छबी झळकली होती.




आमच्या मार्गावर सिद्धपूर हे शहर होते. सिद्धपुर ला सिद्धस्थल किंवा श्रीस्थल असेही म्हटले जाते. ह्या शहराचा उल्लेख ऋग्वेदातील ऋचांमध्येही आढळतो, जिथे ह्या स्थळाचे वर्णन गंगा आणि सरस्वती नदीच्या सान्निध्यात असल्याचे केले आहे. कपिल मुनींचे पिता कर्दम ऋषींचा आश्रम येथे होता असे म्हटले जाते. कैलास मानसरोवर, नारायण सरोवर, पुष्कर सरोवर, पंपा सरोवर याप्रमाणे पाचवे बिंदू सरोवर येथे आहे. असे म्हटले जाते की कपिल मुनींनी त्यांच्या मातेचे श्राद्ध येथे केले. तसेच मातृहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी परशुरामांनी येथे मातेचे श्राद्ध केले. याच कारणामुळे मातेला मोक्ष मिळावा यासाठी येथे दरवर्षी कार्तिक महिन्यात अनुष्ठान करण्यासाठी दुरदूरहून लोक येत असतात. येथे असणारी सरस्वती नदी ही देखील येथील मुख्य आकर्षण आहे. ही नदी समुद्राला मिळत नाही तर ती कच्छ प्रांतातील मरुभूमीमध्ये लुप्त होऊन जाते. त्यामुळे तिला कुमारिका नदी म्हटले जाते. सिद्धपुर जवळून जात असतानाही आम्ही या सर्व बाबतीत अनभिज्ञ होतो.  मात्र वाटेत एका मोठ्या चौकात एका पुतळ्याने फुजी(श्विन) आणि ट्रेकचे लक्ष वेधून घेतले. आत्तापर्यंत गाय वासरू, बैल ह्यांचे पुतळे पाहिले होते. असा पुतळा मात्र आत्तापर्यंत कधीही पाहिलेला नव्हता.





गवळणी बरोबर तिथे चक्क एक म्हैस उभी होती. गवळण आणि म्हैस ह्यांच्या पुतळ्याने फुजी(श्विन) आणि ट्रेकचा लगाम आपोआपच ओढला गेला. फुजी आणि ट्रेक त्या पुतळ्याकडे जितक्या आश्चर्याने आणि कुतूहलाने पाहत होते, तेवढ्याच आश्चर्याने आणि कुतूहलाने फुजी आणि ट्रेकला पाहण्यासाठी काही मुले- मुली जमा होऊ लागल्या होत्या. फुजी आणि ट्रेकच्या जवळ न येता लांबूनच ते बालगोपाळ फुजी आणि ट्रेकला न्याहाळत होते.


एकंदर प्रवास छानच चालला होता. मध्यानाची वेळ झाली होती. त्यामुळे सगळेजण क्षुधाशांतीसाठी थांबले. गेले काही दिवस पोटावर सतत अत्याचार सुरू असल्याने फुजीने मात्र उदरभरण करायला नकार दिला होता. अर्थात थोडेफार हलके काही मिळाले तरी पाहू म्हणून फुजीनेही खाद्यपदार्थसूची पाहायला सुरुवात केली. जीरासोडा असल्याचे कळताच फुजीने दोन छोट्या बाटल्या जीरासोडा प्राशन केले. अर्थात तरीही काहीही जडान्न स्वीकारण्याची फुजिची तयारी नव्हती. तरीही फुजीला मनुष्यशक्तीच्या इंधनाची कमतरता जाणवू नये म्हणून अस्मादिकांना थोडेफार उदरभरण करणे गरजेचे वाटत होते. इतक्यात मेजावरील काकडी, टोमॅटो कडे फूजीचे लक्ष गेले. सलाडच्या एकापाठोपाठ दोन डिशमधील काकडी, टोमॅटो फस्त केल्यावर मात्र फुजीने यज्ञकर्म आवरते घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...