बुधवार, १ एप्रिल, २०२०

मेजवानी: पुणे जम्मू सायकलसफर भाग २- लेख ३



भारतीय राष्ट्रीय निधर्मी शास्त्रीय दिनांक ५ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती अशास्त्रीय दिनांक २६ डिसेंबर २०१९


अडालज येथील विहीर ख्रिस्ती वर्ष १४९८-१४९९ मध्ये बांधली गेली. ह्या विहिरीचा इतिहास हा एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

१५ व्या शतकात दांडाई देश येथे वाघेला वंशातील राजा राणावीर सिंग राज्य करत होता. तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. प्रजा पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. त्यावर मात करण्यासाठी राजाने एक खोल आणि मोठी विहीर बांधण्यास सुरुवात केली. मात्र त्याच दरम्यान शेजारच्या देशातील राजा  मोहम्मद बेगडा ह्याच्याबरोबरील युद्धात राजा मारला गेला. विजयी राजाने तेथील राज्य तर मिळवलेच त्याशिवाय राजा राणावीर याची पत्नी राणी रुपबा (रुदाबाई/ रुदादेवी) हिच्याबरोबर विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. राणीने अर्धवट राहिलेल्या विहिरीचे काम पूर्ण करण्याच्या अटीवर प्रस्ताव मान्य केला. मोहम्मद बेगडा ह्याने विक्रमी वेळेत विहीर पूर्ण केली. विहीर पूर्ण होताच राणीने विहिराला प्रदक्षिणा घालून त्याच विहिरीत उडी घेत जीवन संपवले.

सूर्य उत्तरेला असताना माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमीला बुधवारी ही विहीर बांधली असल्याचा उल्लेख पूर्व दिशेकडील पहिल्या मजल्यावरील शिलालेखात आहे.


एका अख्यायिकेप्रमाणे विहिरीशी संबंधित आणखी एक शोकांतिका आहे, जी त्या विहिरीशेजारील थडग्यांशी निगडित आहे. ती विहीर बांधणाऱ्या ६ कारागिरांना राजा बेगडाने अशीच एक विहीर बांधू शकाल का हे विचारले. त्यांनी होकार देताच सर्व ६ कारागिरांना त्याने मृत्युदंड दिला. राजा बेगडा त्या विहिरीच्या बांधकामावर इतका खुश होता की अशी दुसरी विहीर बांधली जाणे त्याला मान्य नव्हते.

विहीर बांधल्यानंतर तब्बल ५ शतकांनंतर त्या ठिकाणी पोचलेल्या आम्हा सायकलस्वारांना ह्या इतिहासाची काहीही माहिती नव्हती. तेथील परिसरात आम्ही मात्र आनंदात फिरत होतो. विहिरीच्या हिंदुमुस्लिम बांधकामाच्या कलाकुसरीवर आम्ही बेहद्द खुश होतोच. शिवाय शेजारील बागही अतिशय सुंदर होती. २००० किमी पेक्षा अधिक सायकलफेरीवर आम्ही निघालो आहोत याचा आम्हाला विसरच पडला होता. त्याऐवजी आम्ही एखाद्या सहलीला आलो आहोत असेच वाटत होते. खरतर अजून आजचे जवळपास निम्मे अंतर बाकी होते आणि सूर्य डोक्यावर आला होता. आम्ही काळवेळेचे भान विसरून गेलो असलो तरी आमचे यजमान मात्र सावध होते. त्यांनी आमच्यासाठी मेजवानीचाच बेत आखला होता.




तसे पाहता अहमदाबादच्या वेशीवर आमचे स्वागत झाल्यापासूनच आमचे उदरभरण सुरूच होते. मात्र अदालज विहिरीच्या परिसरात निरनिराळ्या खाद्यपदार्थांचा आग्रह मोडून काढणे शक्यच नव्हते. आम्हा ११ सायकलपटूंचे आदरातिथ्य करणाऱ्या सुमारे ४० जणांना आम्ही कितीसे पुरे पडणार!

अखेरीस अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही तेथून पुढे कूच केले. हो, आता आमचा ७ नव्हे तर ११ सायकलपटूंचा संघ पूर्ण झाला होता. अजून सुमारे ६० किमीचा प्रवास बाकी होता. आम्ही सगळेजण अतिशय उत्साहाने पुढे जात होतो.  साधारण अर्धा पाऊण तासाचा प्रवास झाल्यावर एक दुचाकीस्वार फुजीला समांतर जाऊ लागला. त्याला आमच्या मोहिमेचा पल्ला आणि उद्देश सांगताच तो फारच खुश झाला. तोही त्याच्या आठवणींबद्दल उत्साहाने बोलू लागला. त्याने केवळ भारतातच नव्हे तर श्रीलंका- भारत- नेपाळ अशी दुचाकीवरील फेरी सुमारे २० वर्षांपूर्वी पूर्ण केली होती. तो त्या आठवणींनी भावुक झाला होता. 'तुमची सायकलफेरी पाहून मलाही पुन्हा भारतभ्रमण करावेसे वाटत आहे', असे तो सांगू लागला. फुजीनेही त्याला प्रोत्साहन देत म्हटले, नक्कीच तुम्ही आमच्याप्रमाणे सायकलवरूनही भारतभ्रमण करू शकता. तो दुचाकीस्वार इतका भारावून गेला होता की शक्य असते तर अमच्याबरोबरच जम्मू पर्यंत आला असता. मात्र थोड्या वेळातच त्याचे शहर आले, त्यामुळे त्याने फुजीचा निरोप घेतला.

नवीन साथीदारांबरोबर आम्ही चांगला वेग घेतला होता. मात्र अचानक महामार्गावर संपूर्ण वाहतूक अडवलेली दिसत होती. दोन्ही बाजूने जाणारी वाहतूक पूर्ण बंद केल्यामुळे रस्त्याच्या बाजूनेही जाणे अशक्य झाले होते. वाटेत एक कार आणि ट्रॅक्टर ह्यांचा अपघात झाला होता. रस्तादुभाजकावर ती कार विचित्र अवस्थेत आदळली होती. एव्हाना रवीराजांनीही त्यांची अस्त्रे आवरती घेण्यास सुरुवात केली होती. त्या कोंडीतून सुटून अश्वशक्तीधारी वाहने प्रखर दिव्यांच्या साहाय्याने जाऊ शकत असली तरी त्यांच्यापुढे आमच्या मनुष्यशक्तीधारी वाहनांच्या दिव्यांचे डोळे दिपून जात असतं. त्यामुळे आम्हाला त्या वेढ्यातून लवकर सुटका करून घेणे भाग होते. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या मनुष्यशक्तीधारी वाहनांना मार्ग मिळाला.

अखेरीस सुमारे ७ वाजता आम्ही मेहसाना येथील स्वामीनारायण मंदिरात पोचलो. तेथेही आमचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले.


अहमदाबाद येथे आमच्या संघात सामील झालेल्या आसाभाईंची कन्या मित्तल आणि तिच्या परिवाराने आमचे स्वागत केले. तेथे पेयपान झाल्यावर आमची राहण्याची सोय केली होती त्या हॉटेल जनपथ येथे आम्ही पोहोचलो. तर तिथे युनियन बँक ऑफ इंडिया मधील निवृत्त कर्मचाऱ्यांचा संघ तिथे आमचे स्वागत करायला हजरच होता. श्री देवधर आणि आसाभाई दोघेही युनियन बँकेतीलच निवृत्त कर्मचारी होते. त्यांच्यावरील स्नेहामुळेच हे सर्व सहकारी आम्हाला शुभेच्छा देण्यास आले होते.


आमच्या जेवणाची सोय मात्र हॉटेलवर नव्हती. आसाभाईंच्या कन्येच्या घरी जेवणाचे आमंत्रण होते. त्यामुळे आम्ही लगोलग हॉटेलच्या खोलीमध्ये जाऊन शुचिर्भूत होऊन पुन्हा खाली आलो. आमची आसाभाईंच्या कन्येच्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आम्ही तिथे पोहोचलो तरी त्यांच्या घरीही बरीच मंडळी आमची प्रतीक्षा करत होती. आजचा दिवस तसा आमच्या स्वागताचाच ठरत होता. मात्र तिथे जमलेल्या मंडळींचा परिचय सुरू होताच आम्ही सगळेच जमिनीवर येत होतो. तिथे जमलेल्या मंडळींमध्ये ठराविक वेळेत १००० किमी ची सायकल स्पर्धा असलेली BRM पूर्ण करणारे होते तसेच triathlon स्पर्धा पूर्ण करणारीही मंडळी होती. कोणी कोणाचे कौतुक करायचे?  आमच्या २००० किमी साठी आम्ही तब्बल १७ दिवस घेणार होतो आणि आमचे कौतुक करायला आणि आम्हाला शुभेच्छा द्यायला येणारांनी १००० किमी अंतर केवळ ७५ तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केले होते.



आसाभाईंची मुलगी मित्तल हिच्या घरी गप्पागोष्टी झाल्यावर आम्ही जेवण्यासाठी पुन्हा बाहेर निघालो. तिथे पाहतो तर एक मोठा हॉलच जेवण्यासाठी आरक्षित करण्यात आला होता. बुफे पद्धतीचे जेवण तिथे आयोजित करण्यात आले होते। खाद्यपदार्थांचीही रेलचेल होती. दुपारचे जेवण एखाद्या सहलीला गेल्याप्रमाणे झाले होते तर रात्रीचे जेवण एखाद्या लग्नसमारंभात सामील झाल्याप्रमाणेच होत होते. एकंदर दोन्ही वेळेस जेवणाची मेजवानीच आम्हाला मिळाली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...