गुरुवार, ९ एप्रिल, २०२०

थंडीची सलामी: पुणे जम्मू सायकलसफर भाग २ लेख ७

भारतीय राष्ट्रीय दिनांक ६ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती दिनांक २७ डिसेंबर २०१९

अबू तलेटी जैन तीर्थ येथे आम्ही पोचलो तेव्हा जेमतेम साडेचार वाजले होते. डोंबिवलीपासून एव्हाना एकंदर ५३ तास सायकलिंग करत ७६६ किमी अंतर पार झाले होते.



सगळेजण थोडे शिथिलगात्र होत होते, इतक्यात आम्हाला समजले की तिथे जेवण संध्याकाळी ६-६.३० पर्यंतच मिळते. आम्हाला कोणालाच इतक्या लवकर जेवून चालणार नव्हते... (नाहीतर मध्यरात्री पुन्हा भूक लागायची!)

त्यामुळे बाहेर जाऊन जेवणाची सोय बघणे भाग होते. अर्थातच बऱ्यापैकी वेळ हाताशी होता. धर्मशाळा स्वच्छ आणि प्रशस्थ असली तरी अंघोळीसाठी गरम पाणी बाहेर बंबावर जाऊन आणावे लागणार होते. तो बंबही गरम व्हायला अजून वेळ होता. हवेतील गारठा जाणवत होताच. अस्मादिकांनी बाहेर जाऊन रात्रीच्या जेवणाची सोय बघून यायचे ठरवले. बाकी सगळ्यांची आवराआवर सुरू होती. जैन तीर्थ येथील मंदिर आणि मंदिरासमोरील आवार अतिशय सुंदर दिसत होते. हवाही छान होती. जैन तीर्थाच्या बाहेर पडताच रस्त्याच्या समोरील बाजूसच चहाकेन्द्र दिसले. अस्मादिकांची पावले तिकडे न वळती तरच नवल. चहा फक्कडच होता. चहा घेता घेता अस्मादिकांनी जेवणाची काही सोय होईल का ह्याचा अंदाज घेतला. चहावाल्याने सांगितल्या दिशेला अस्मादिकांनी मोर्चा वळवला. महामार्ग असला तरी त्याची रुंदी जेमतेम दोन वाहने बाजूबाजूने जाऊ शकतील इतपतच होती. चालून चालून २०-२५ पावले होतात न होतात तोच मागच्या बाजूने एक बैल धावत येत असल्याचे लक्षात आले. त्याला पकडण्यासाठी त्याचा मालक त्या बैलाच्या मागून धावत होता. त्या बैलाला चुकवण्यासाठी अस्मादिक एका भल्या मोठ्या वृक्षाच्या मागे दडले. तो बैल क्षणभर थांबला आणि त्यानेही त्याच वृक्षाच्या मागे धाव घेतली. अस्मादिकांनी त्या बैलाचा रोख ओळखून त्या वृक्षाला अर्धगोलाकृती फेरी मारत U आकारात वळण घेतले. सुदैवाने तो बैल मात्र त्या वृक्षामागे येऊन रस्त्याला समांतर पण पुढे निघून गेला. पाठोपाठ त्या बैलाचा मालकही धावत सुटला. अस्मादिकांनी निश्वास सोडला खरा पण दोनच मिनिटात तो बैल आणि त्याचा मालक समोरून बाजूने परत मागे पळत येताना दिसले. एकंदरीत हवेत गारठा होताच, मात्र अस्मादिकांना घाम फुटायचाच बाकी होता. इथेही एका वृक्षाने अस्मादिकांना साथ दिली. तो बैल आणि त्याचा मालक मागे निघून गेले तरी अस्मादिकांनी लगेच बाहेर न येता थोडा वेळ ते दोघे परत येत नाहीत याची खात्री करून घेतली आणि मगच पुढे कूच केले.

इतक्यात मीराचा फोन आला की तीसुद्धा बाहेर येत आहे. ती येईपर्यंत अस्मादिकांनी पुन्हा एकदा चहाचा आस्वाद घेतला. मीरा आल्यावर दोघेही क्षुधाशांतिगृह शोधण्यासाठी निघाले. समोरच एक मिठाईकेंद्र दिसले. अबू रोड येथे रबडी छान मिळते हे ऐकिवात होते. भुकेची जाणीव झाली होतीच, त्या मिठाईकेंद्रासमोरील रबडीची पाटी वाचताच भूक अधिकच तीव्र झाली. दुकानात बऱ्यापैकी गर्दी होती. तेथील पदार्थ डोळे, जिभेला आव्हान देत होते. आम्ही आमच्या रसनेला निराश न करण्याचे ठरवले. तेथील एकदोन पदार्थांचा फडशा पडल्यावर रबडी घेणे क्रमप्राप्तच होते.

जठराग्नीला आहुती देऊन जिव्हाही पूर्ण तृप्त झाल्यावर आम्ही पुन्हा रात्रीच्या भोजनाची व्यवस्था पाहायला पुढे गेलो. सुदैवाने लगेचच दोन भोजनालये दिसली. त्यांची वेळ विचारून आम्ही परतलो तोपर्यंत बाकीच्यांची आवराआवर संपत आली होती.

जेवणाची सोय धर्मशाळेत नसल्याने बाहेर पडणे भागच होते. त्यामुळे सगळेजण रात्री बाहेर पडले. गारठा मात्र चांगलाच वाढला होता. शाल, जाकीट आणि इतर गरम कपडे बॅगबाहेर पडून त्यांनाही मोकळा श्वास मिळाला होता. तरीही थंडीमुळे पावलाला पाऊल जोडूनच जाता येईल अश्या गतीने सगळेजण चालत होते. दोन्ही भोजनालये अगदी साधेशीच होती, मात्र जेवण चांगले होते. धर्मशाळेत परतेपर्यंत अंधार गडद झाला होता. अर्बुन्दाचलाच्या पायथ्याशी असलेल्या अबू रोड मधील तापमानाचा काटा ७ अंशावर स्थिरावला होता. राजस्थानच्या सीमारेषेवरील अबू रोड येथे थंडीने आम्हाला पहिली सलामी दिली होती. पुढे राजस्थानमधील हवामानाची ही केवळ चुणूक तर नव्हती ना!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...