रविवार, ५ एप्रिल, २०२०

चहाची 'लक्ष्मण'वेळ: पुणे जम्मू सायकलसफर भाग २ : लेख ५

भारतीय राष्ट्रीय आणि शास्त्रीय दिनांक ६ पौष १९४१
युरोपियन ख्रिस्ती आणि अशास्त्रीय दिनांक २७ डिसेंबर २०१९


आज रसिकभाईंच्या कन्येचा वाढदिवस होता. त्यामुळे आमचे उदरभरण सुरू असताना रसिकभाई मात्र भ्रमणध्वनी घेऊन भ्रमंती करत होते. एकापाठोपाठ सगळ्यांनाच ही खबर लागली. मग सगळ्या सायकलपटूंनी रसिकभाईंच्याच भ्रमाणध्वनीद्वारे तिला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

उदरभरण झाल्यावर आमचा पुढील प्रवास सुरु झाला. एव्हाना दिवसभरातील जवळपास १०० किमी अंतर पार झाले होते. सगळे सायकलस्वार अतिशय मजेत जात होते.


अहमदाबाद येथील नवीन साथीदारांबरोबर प्रवास करण्याचा आजचा पहिलाच पूर्ण दिवस होता. त्यांच्यापैकी एकजण सकाळपासून टेम्पोमध्येच होता. इतर तिघेजण मात्र इतक्या सहजपणे सायकलिंग करत होते की ते कालच आम्हाला सामील झालेत असे वाटतच नव्हते. सकाळपासून बरोबर असल्यामुळे सायकलिंग करता करता त्यांच्याशी ओळखही होत होती.

देवधरांचे युनियन बँकेतील जुने सहकारी आसाभाई ह्यांच्यामुळेच स्वतः आसाभाईंसह चारही अहमदाबादकर आमच्या मोहिमेत सामील झाले होते. स्वतः आसाभाईंचे वय ते स्वतः ७० वर्ष असल्याचे सांगत.... म्हणजे कागदोपत्री त्यांचे वय ७० असेलही/होते. मात्र त्यांची तंदुरुस्ती ही १५-२० वर्षाच्या तरुणाला लाजवेल अशी होती.




आसाभाई म्हणजे उत्साहाचे मूर्तिमंत उदाहरण! सडपातळ आणि उंच शरीरयष्टी असणारे आसाभाई अक्षरशः लहान मुलाच्या उत्साहाने वावरत होते. त्यांची तंदुरुस्ती आणि उत्साह एवढा की लहान मुलांप्रमाणे ते कधी चटकन उडी मारून समोर यायचे ते कळतही नव्हते. क्षणामध्ये सगळ्यांना हसवण्याची कलाही त्यांच्याकडे होती. कोणाशी ओळख करायला त्यांना वेळ लागत नव्हता.

आसाभाई हे उत्साहाचे प्रतीक, तर रसिकभाई हे नावाप्रमाणेच रसिक! गळ्याभोवती एक मफलर गुंडाळून ते सायकल चालवू लागले की मला राजेश खन्नाचीच आठवण येत होती. आसाभाईंप्रमाणे रसिकभाई बोलघेवडे नव्हते मात्र त्यांच्याशी फुजीची नाळ लगेचच जुळली. मुख्य म्हणजे त्यांच्याबरोबर सायकलिंग करताना जुनी हिंदी गाणीही ऐकायला मिळत होती.



हे दोन्ही अहमदाबादकर बेमालूमपणे आमच्या संघात मिसळून गेले होते. आमचा संघ थोड्या धीम्या गतीने जात होता. मेहसाणा-  सिद्धपुर- पालनपुर पार करून अमिरगढही एव्हाना पार झाले होते. थोड्याच वेळात आम्ही गुजरात आणि राजस्थान मधील सीमेपाशी पोचलो. अहमदाबादकर प्रथमच सायकलने गुजरात राज्याची सीमा पार करणार होते. सगळ्यांचीच उत्कंठा वाढली होती. ती सीमा आम्ही केव्हा पार केली तेच कळले नाही. मात्र थोडेच पुढे जाताच आम्ही राजस्थानमधील मावळ प्रांताच्या पहिल्या रस्ता वाहतूक कार्यालयापाशी पोहोचलो. तेथील फलक पाहताच आम्ही नवीन राज्यात प्रवेश केल्याची खूण पटली.


आमच्या संघातील सर्वात तरुण सायकलपटू मोहित परमार हा तेव्हा फुजी(श्विन), ट्रेक बरोबर होता. तसे पाहता मोहित हा इतरांपेक्षा जवळपास एक- दोन पुढील पिढीचा प्रतिनिधी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना गुजरातचा तत्कालीन यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल संघात असताना इतर सहकाऱ्यांपेक्षा बराच लहान होता. मोहितकडे पाहून तसेच वाटत होते. मोहित हा सगळ्यात लहान असला तरी त्याला सांघिक सायकलिंग करताना असलेल्या जबाबदारीचे पूर्ण भान होते.


आमचे आजचे गंतव्यस्थान अबू रोड एव्हाना जेमतेम ९ किमी लांब राहिले होते. ह्याचा अंदाज आल्यामुळे सगळेजण थोडेफार आरामात होते. एकादशी कोल्हटकरचा चहा घेण्याचा एक नियम होता, ते म्हणजे घड्याळबाबांनी दुपारी चारचा इशारा दिला की चहा प्यायचा नाही. फुजी(श्विन) ला चहा हवा होताच. ३.३० वाजून गेले होते. त्यामुळे थेट अबू रोडला जाऊन चहा प्यायचा असेल तर आजचे वसतिस्थान शोधताना थोडक्यासाठी चहाची 'लक्ष्मण'वेळ (लक्ष्मणरेषेच्या धर्तीवर) चुकण्याची शक्यता होती. घड्याळबाबांचे भय होते. त्यामुळे फुजी(श्विन)ची नजर चहाकेंद्रासाठी भिरभिरु लागली. सुदैवाने १०-१५ मिनिटात चहाकेंद्र नजरेस पडले. फुजीची चाके आपोआपच रस्त्याच्या डावीकडे वळली. चहावाल्याच्या मागील बाजूस छानशी बाग दिसत होती. ती पाहताच एकामागोमाग सगळेच त्या छोट्याश्या बागेकडे वळले आणि तिथेच चहा आणून द्यायला चहावाल्याला सांगितले. थोड्याच वेळात बागेत बसल्या बसल्या ग्लुकोज बिस्किटाच्या दोन तीन पुड्यांचा फन्ना उडाला. चहा अजून येत होता. शतकी मजल केव्हाच पूर्ण झाली होती आणि आता गंतव्यस्थान हाकेच्या अंतरावर असल्याची जाणीव झाली होती. हळूहळू एकेकजण शरीर काटकोनातून विशालकोन करत हळूच थेट १८० अंशात करू लागले होते.







२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...