शनिवार, १४ एप्रिल, २०१८

आधी वंदू तुज मोरया

भारतीय सौर चैत्र २४, शके १९४०

#cycle2work करत #tjsbbank येथे जाताना रोज एकट्याला पिकनिक अनुभवायला मिळत असली, तरी सुट्टीच्या दिवशी स्कॉटबरोबर पिकनिकला जाण्याची संधी मिळते.

आज त्याच संधीचा लाभ घेत श्विन आणि स्कॉटने टिटवाळा येथील सिद्धिविनायक महागणपती मंदिर येथे दर्शनास जायचे ठरवले.

राजाधिराज दुष्यंन्त जिच्या प्रेमात पडला होता त्या शकुंतलेचा जन्म झाला ते हे ठिकाण. शकुंतलेने बांधलेले सिद्धिविनायक मंदिर काळाच्या ओघात एका तळ्यामध्ये लुप्त झाले होते. माधवराव पेशवे यांच्या काळात या क्षेत्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी येथील तळ्यातील गाळ साफ करायचे ठरले. तेव्हा त्या ठिकाणी गाडले गेलेले मंदिर नजरेस आले. पेशव्यांचे सरदार रामचंद्र मेहेंदळे यांना श्रीगणेशाची मूर्ती सापडली. मंदिराच्या पुनर्रचनेचे काम त्वरित हाती घेण्यात आले. वसईच्या जयानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला बांधलेला लाकडी सभामंडप खराब होऊ लागल्याने १९६५-६६ रु २०००००/- खर्च करून पुन्हा एकदा याच ठिकाणी मंदिराच्या बांधकामाची पुनर्रचना करण्यात आली.

या गणेशाच्या दर्शनाने विवाहोत्सुक लोकांचे लग्न जमते, ज्या जोडप्यात विघ्न आले असेल ते दूर होते तसेच ज्यांना अपत्य हवे असेल त्यास अपत्यप्राप्ती होते असा समज आहे. अंगारकी चतुर्थी ला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.

आज शनिवार असल्याने सर्व भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी उत्सुक असल्याने श्विन स्कॉटला श्रीमहागणपतीचे दर्शन आज सहजपणे करता येणार होते. उत्तरार्धातील सूर्याच्या कृपेमुळे लवकर उजाडू लागले होते. याचाच फायदा घेत श्विन आणि स्कॉट पहाटेच तयार झाले. दोन्ही सायकलच्या टायरमध्ये हवा पूर्ण भरल्याची खात्री करून दोघेही निघाले. पहाटेची वेळ असल्याने अश्वशक्तीधारी वाहनांची वर्दळ सुरु झाली नव्हती. डोंबिवली- ९० फुटी रस्ता- पत्री पूल पार करून श्विन स्कॉट जोडीने शहाडच्या दिशेने कूच केले. शहाड येथील रेल्वे पूल, बिर्ला मंदिर येथील चढ सहजतेने पार केल्यावर मोकळी हवा उत्साह वाढवू लागली. शहरातील अरुंद रस्ते, गतिरोधक, पादचारी आणि वाहनांची गर्दी यांच्या अडथळ्यांपासून दूर आल्यावर श्विन आणि स्कॉट यांची गती वाढली. रायते गावाजवळील नदीपुलावर फोटोसेशन करण्याचा मोह आवरणे कठीणच. रायते गाव येताच #saveoursahyadri मोहिमेतील उत्तर मार्गाचा आधारस्तंभ @avinash harad याची आठवण येणे स्वाभाविकच. त्याने स्वकष्टाने उभे केलेल्या अप्रतिम संग्रहालयाने मनात कायमचे स्थान मिळवले आहे. #dombivlicycleclub च्या सदस्यांनी या संग्रहालयात दोन वेळा हजेरी लावली आहे. गोवेली येथून डावे वळण घेत श्विन, स्कॉटने टिटवाळ्याची दिशा पकडली. श्रीमहागणपती मंदिरात पोचताच तेथे आणखी दोन सायकली दिसल्या. मात्र सायकलिस्ट आसपास दिसत नव्हते. श्रीमहागणपतीचे दर्शन घेऊन परत आल्यावर श्विन स्कॉट परत येण्यासाठी तयारी करत असतानाच त्या दोन सायकलींचे वाहक समोर दिसले. ते होते DCC चे @sanjay datye आणि @abhay kulkarni
त्या दोघांची पोटपूजा झाली असल्याने ते पुढे निघाले. मात्र श्विन स्कॉटला मनुष्यशक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी आम्हाला कच्चा माल भरायचा होता. मग मिसळरूपी कच्चा माल भरून मनुष्यशक्तीच्या इंधनाचा पुरवठा पुरेसा असल्याची खात्री करून श्विन, स्कॉटने परतीचा मार्ग धरला. मुरबाड रस्त्यावर आता वर्दळ सुरु झाली असणार हे लक्षात घेत परत येताना पुन्हा मुरबाड रस्त्याकडे न वळता टिटवाळा स्टेशन, आंबिवली स्टेशन ह्या रस्त्याने यायचे ठरवले.

आंबिवली पुढील रेल्वे फाटक ओलांडून उतारावरील नीरा स्थानक हा श्विनचे आवडता विसावा. एव्हाना सूर्यमहाराजही अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागले होते त्यामुळे स्कॉटलाही त्याची गरज होतीच.
निरापान झाल्यावर मात्र पुन्हा कल्याण शहरातील वर्दळ दिसू लागली. कल्याण स्टेशनची गर्दी टाळण्यासाठी बिर्ला महाविद्यालय, दुर्गाडी मार्ग पत्करला तरी पत्री पुलावर मात्र स्कॉटची तारांबळ उडाली. पुन्हा ९० फुटी रस्ता आल्यावर मात्र स्कॉटने निश्वास सोडला. खरेतर पुन्हा पेयपान करण्याची गरज वाटू लागली होती, मात्र आता श्विन- स्कॉटच्या टायरखालील नेहमीचा रस्ता सुरु झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करीत दोघांनी थेट घरी जाऊनच विसावा घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...