रविवार, ३० सप्टेंबर, २०१८

सहल

भारतीय सौर अश्विन ८, शके १९४०

रविवार असल्यामुळे आज श्विन आणि स्कॉटने छोटी सहल करायचे ठरवले. संध्याकाळी ठाण्याला जायचे असल्याने उशिरा येऊन चालणार नव्हते. त्यामुळे शतकी राइड आज करता येणार नव्हती. मात्र सुट्टी असताना तेमतेम २५-३० किमी ची राइड करणे श्विनला चालणार नव्हते.

सकाळी दोन तास राइड झाल्यावर जिथे असू तेथे आजचे गंतव्यस्थान निश्चित करायचे ठरवून श्विन स्कॉटने राइडला सुरुवात केली. ९० फुटी रस्त्यामार्गे पत्री पूल गाठला. लवकरची वेळ असल्याने अजून गर्दी सुरु झाली नव्हती. शहाड मागे पडल्यावर श्विन स्कॉटने गती पकडली.

श्विन आणि स्कॉट झपाट्याने रायते गावाजवळ पोचले. रायतेजवळ नदीचे पात्र विस्तीर्ण असले तरी प्रवाह मात्र शांत आहे. नदीच्या पात्राच्या मधोमध लाकडाच्या साधारण ६*६ लांबरुंद फळकुटावर बसून एकजण नदीमध्ये मासे पकडत होता. त्या चौकोनी लाकडी फळकूटाला कोणत्याही बाजूने काठ नव्हते. मात्र शांत प्रवाहात ते तरते फळकूट जवळपास स्तब्ध झाले होते. रायते गावाकडील काठावर काही गृहिणी कपडे धुवत होत्या. रायते गावाकडे तोंड करून पुलावर उभे राहिले तर उजव्या बाजूच्या दिशेने सूर्य उगवलेला दिसत होता. त्याची किरणे आता अगदी कोवळी नसली तरी नदीपात्रामध्ये ती लोभसवणी दिसत होती. नदीवरील पुलावरून फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

अविनाश हरड हा हरहुन्नरी युवक रायते गावातीलच. इथे आल्यावर त्याची आठवण हटकून येते. उल्हास नदीच्या खोऱ्यात फिरून त्याने जमा केलेल्या विविध वस्तूंचे, जिवाश्मांचे संग्रहालय त्याने रायते गावात मोठ्या कष्टाने उभे केले होते. हळूहळू त्या वस्तूंचा संग्रह इतका वाढला की त्यासाठी जागा अपुरी पडू लागली. शिवाय जवळपासच्या मुलांना पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी त्याने वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकांचा संग्रह करून त्या मुलांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. संग्रहालयातील वाढता संग्रह लक्षात घेता उल्हास खोऱ्यातील वस्तूंचे संग्रहालय टिटवाळा येथे हलवण्यात आले. ते संग्रहालयात लाल फितीत अडकल्याने उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

मात्र आज वेळेच्या अभावी अविनाशला भेटता येणार नव्हते. गोवेली गाठल्यावर श्विन आणि स्कॉटने दिशा पकडली ती राजाधिराज दुष्यंन्त ज्या शकुंतलेच्या प्रेमात पडला त्या शकुंतलेच्या गावाची. शकुंतलेचा जन्म झाला ते हे ठिकाण. शकुंतलेने बांधलेले सिद्धिविनायक मंदिर काळाच्या ओघात एका तळ्यामध्ये लुप्त झाले होते. 

माधवराव पेशवे यांच्या काळात या क्षेत्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी येथील तळ्यातील गाळ साफ करायचे ठरले. तेव्हा त्या ठिकाणी गाडले गेलेले मंदिर नजरेस आले. पेशव्यांचे सरदार रामचंद्र मेहेंदळे यांना श्रीगणेशाची मूर्ती सापडली. मंदिराच्या पुनर्रचनेचे काम त्वरित हाती घेण्यात आले. वसईच्या जयानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीला बांधलेला लाकडी सभामंडप खराब होऊ लागल्याने १९६५-६६ रु २०००००/- खर्च करून पुन्हा एकदा याच ठिकाणी मंदिराच्या बांधकामाची पुनर्रचना करण्यात आली.

या गणेशाच्या दर्शनाने विवाहोत्सुक लोकांचे लग्न जमते, ज्या जोडप्यात विघ्न आले असेल ते दूर होते तसेच ज्यांना अपत्य हवे असेल त्यास अपत्यप्राप्ती होते असा समज आहे. अंगारकी चतुर्थी ला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होत असते.


भाद्रपदात शुक्ल पक्षातील गणेशोत्सव संपून वद्य पक्ष सुरु झाला होता. आपल्या पितरांची आठवण जागवणारा हा पक्ष म्हणून ह्याला पितृपक्ष असेही म्हणतात. नुकताच गणेशोत्सव संपल्याने गणपती मंदिरात अजिबात गर्दी नव्हती. मंदिरात भविकांपेक्षा मंदिरातील पुजाऱ्यांचीच संख्या जास्त वाटत होती. अर्थातच श्रीमहागणपतीचे दर्शन शांतपणे आणि निर्विघ्नं झाले. 

विठोबा (देवदर्शन) झाल्यावर पोटोबाची आठवण येऊ लागली. श्विन स्कॉटला मनुष्यशक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी आम्हाला कच्चा माल भरायचा होता. मात्र मंदिराजवळच इंधन न भरता श्विन स्कॉटने टिटवाळा येथील लोहमार्ग स्थानक गाठले. खोबऱ्याच्या चटणीचा मोठ्ठा डबा भरलेला दिसताच श्विन आणि स्कॉट तिकडे वळले. एका पातेल्यात झाकणाखाली इडल्या आणि ओनियन उत्तप्पा ठेवलेला दिसत होता. इंधन भरण्याची चांगलीच सोय झाली होती. श्विन आणि स्कॉटने इडलीची फर्माइश करताच एकेक प्लेटमध्ये पाच पाच इडल्या आणि त्यावर भरपूर चटणी ओतलेली डिश समोर आली. एका प्लेट खाताच पुरेसे इंधन भरल्याची खात्री झाली. मग श्विन, स्कॉटने परतीचा मार्ग धरला.

आंबिवली पुढील रेल्वे फाटक गाठले तोपर्यंत सूर्यमहाराजही अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागले होते. श्विन आणि स्कॉट निर्धाराने मार्गक्रमण करू लागले. कल्याण शहरात शिरतानाच वर्दळ दिसू लागली. कल्याण स्टेशनची गर्दी टाळण्यासाठी दोघांनी बिर्ला महाविद्यालय, दुर्गाडी मार्ग पत्करला. जुना पत्री पूल तोडण्याचे काम सुरु होत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक एकाच म्हणजे नवीन पुलावरून सुरु होती. तो पूल एका दिशेने वाहने जायलाही अपुरा होता. आतातर दोन्ही दिशेची वाहतूक त्या अरुंद पुलावर सुरु होती. त्यामुळे तेथे चांगलीच कोंडी झाली होती. श्विन आणि स्कॉटने मात्र तेथून सफाईने सुटका करून घेतली.

पत्री पूल संपल्यावर उजवीकडे ९० फुटी रस्त्यावर जायला बंदी असल्याने त्या तळपत्या उन्हात तसेच थोडे पुढे जाऊन श्विन स्कॉटने U टर्न घेतला. ९० फुटी रस्ता म्हणजे श्विन- स्कॉटच्या टायरखालील नेहमीचाच रस्ता! तो सुरु होताच श्विन स्कॉटला पुन्हा गती मिळाली. आता कोणतेही अडथळे न येता घरी पोचणार याची खूण गाठ श्विन स्कॉटने बांधली खरी. मात्र गणेशनगर, दोन टाकी मार्गे रेती बंदर रस्ता पकडल्यावर मात्र श्विन स्कॉटला चूक लक्षात आली.

श्रावणात उपाशी राहिलेल्या मत्स्यप्रेमींना तृप्त करण्यासाठी रस्त्याच्या कडेला ओळीने मासेविक्रेते बसले होते. त्यांच्या पुढे टोपल्या, त्यापलीकडे ग्राहक आणि ग्राहकांच्या मागे त्यांनी उभ्या केलेल्या अश्वशक्तीधारक दुचाकी यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडून अगदी मध्यापर्यंत जागा व्यापली होती. थोडक्यात आपण रस्त्यावर आहोत की मासेबाजारात सायकल चालवत आहोत हा संभ्रम निर्माण व्हावा हीच परिस्थिती होती. मात्र ज्या महागणपतीचे दर्शन घेऊन श्विन आणि स्कॉट परतले होते त्याच्याच कृपेने रस्त्यातील ह्या विघ्नातुन स्कॉट आणि श्विन सुखरूप घरी परतले.

२ टिप्पण्या:

फरक्का बॅरेज : कोलकाता गुवाहाटी सायकल सफर भाग २३

दुपारच्या सुमारास आम्ही फरक्का शहर पार केले. फरक्का शहर हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्याची बांगलादेशलगत एक सच्छिद्र आं...