सौर चैत्र महिन्याप्रमाणेच सौर अश्विन महिन्यात सूर्याचा प्रवास विषुववृत्ताजवळच असतो. त्यामुळे अर्थातच गेले ८-१० दिवस त्याचा दाह जास्त जाणवू लागला आहे. मात्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करण्यासाठी श्विन उत्सुक होती. डोंबिवली सायकल क्लब (DCC) मधील तीन चार सदस्यांचे संदेश समाजमाध्यमावर दिसत होतेच. मात्र श्विनचा सूर्य थोडा उशिरा उगवत असल्याने त्यांच्याबरोबर जाणे शक्य नव्हते.
सकाळी दोन कप चहा पोटात रिचवून श्विनने घर सोडले. श्विन राइड सुरु करत ९० फुटी रस्त्यावर पोचत असतानाच दुभाजकापलीकडून श्विनला हाक ऐकू आली. श्विनची राइड सुरु होत असताना DCC मधील सौमित्र सामंत, रुधिर मोघे, रितेश सावला आणि विनय कोंडाळकर राइड करून घरी परतत होते. त्यांच्याशी थोडावेळ गप्पा मारून श्विनने कल्याणकडे मोर्चा वळवला. सुट्टी असल्याने पत्री पूल तर मोकळा होताच, शिवाय दुर्गाडी पूल, कोनगाव, गोवेगाव या वर्दळीच्या ठिकाणीही श्विनला मोकळा रस्ता मिळाला.
राजनोली येथे नाशिक ठाणे रस्त्याला लागताच श्विनला शेखर बापट या TJSB बँक मधील मित्राची आठवण झाली. त्याने नुकतीच नवीन आणि अनोखी सायकल घेतली होती आणि सायकलजगतात प्रवेश केला होता. त्याच्या सायकलचे वैशिष्ट म्हणजे त्याला जोडलेली बॅटरी! ह्या बॅटरीमूळे चढावर फारसा जोर न लावताच पॅडलिंग करता येते. शेखरला माझ्याबरोबर ठाणे ते डोंबिवली सायकलिंग करायचे होते. सुट्टी असल्याने ती संधी आज मिळेल असे वाटले. म्हणून खारेगाव टोळला श्विन पोचेपर्यंत शेखरला ठाण्याहून तेथे बोलावण्याचा विचार श्विनने केला. मात्र शेखरला फोन करताच तो दुसऱ्या कामात अडकल्याने ती संधी आज मिळणार नसल्याचे त्याने सांगितले.
अर्थात बऱ्याच दिवसांनी नाशिक ठाणे महामार्गाला लागल्याने श्विन खुश होतीच. लोढा साईमंदिराजवळ जात असतानाच आकाशात घिरट्या घालणाऱ्या घारींचा थवा श्विनने पाहिला. या मार्गाने घरी परतत असताना हे दृश्य नेहमीचेच असले तरी अंधार होण्यापूर्वी कल्याणला पोचायचे पडल्याने तेव्हा त्या घारींना कॅमेराबद्ध करण्यासाठी थांबणे श्विन टाळत असे. आज मात्र ती संधी साधत श्विनने त्या घारींना कॅमेरात टिपले. मानकोली, खारेगाव टोल मागे टाकून श्विनने ठाण्यातील साकेत मार्ग पकडला. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या समोरील बागेतील फुले श्विनचे लक्ष वेधत होती. मात्र बागेची सर्व दारे बंद असल्याने आत शिरण्याची संधी नव्हती. एव्हाना सूर्य पूर्ण शक्तीने आग ओकू लागला होताच शिवाय जठराग्निही भडकू लागला होता. तो जठराग्नी तृप्त करणेही आवश्यक होते.
सुट्टी असल्याने खाडीवरील कळवा पूल, कळवा शहर येथेही रस्ता मोकळाच होता. एव्हाना श्विनला आवश्यक असलेले मनुष्यशक्तीचे इंधन मिळत राहण्यासाठी कच्चा माल मिळवण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे नजर वळू लागली. पारसिक बँकेच्या मुख्यालायजवळ एका तिनचाकी अश्वशक्तीधारी वाहनावर इडली, डोसा उपलब्ध असलेले दिसले. अर्थातच इडली सांभार सारखा कच्चा माल मिळाल्यावर मनुष्यशक्तीचे इंधन श्विनला मिळत राहणार होते.
इडली सांभार ची आहुती जठराग्नी मध्ये पडल्यावर मुंब्रा बायपास चढायला श्विन तयार झाली. श्विनने तो बायपास सहजरीत्या सर केला आणि मुंब्रादेवीला वंदन केले. मुंब्रादेवीच्या देवळाकडे जाणाऱ्या पायऱ्यांचा टप्पा ओलांडल्यावर टेकडीचा उतार सुरु झाला. सूर्याच्या तप्त उन्हात श्विनने वाऱ्याच्या वेगाने तो उतार पार करून शिळ फाटा गाठला.
कोकणरत्न येथे न थांबताच श्विन पुढे निघाली खरी, मात्र आता तहानेने घसा कोरडा पडू लागला होता. आज पाण्याची बाटलीही बरोबर घेतली नव्हती. तहान वाढू लागताच श्विन असलेला वेग कायम ठेवत पुढे निघाली. डोंबिवली मध्ये शनिमंदिरापाशी पोचताच घसा ओला करण्यासाठी लिम्बु पाणी पिण्याचा मोह मात्र आवरला नाही. एव्हाना अर्धशतकी राइड केवळ इडली सांभार साठी एक विसावा घेत पार पडला होता. लिंबूपाणी पिऊन अर्धशतक साजरे केल्यावर मात्र श्विनने घरापर्यंतचा टप्पा संथगतीने आरामात पार केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा